लढा स्वतःशीच स्वतःचा (भाग -५)

भाग - ४ वाचण्यासाठी  इथे क्लिक करा


प्रज्ञा घरी पोहोचली. आई बाबा हॉल मध्येच खुर्चीवर बसले होते. शंतनू त्याच्या रुममध्येच होता. प्रज्ञाला आलेली पाहून घाई घाईने काळजीने आईंनी विचारलं,
 “अगं काय कुठे गेली होतीस सकाळी सकाळी न सांगताच?
“आई..ते,....अं ....”
“काय झालंय प्रज्ञा?” बाबांनीही विचारलं.
“काही नाही जरा महत्वाचं काम होतं म्हणून गेले होते.”
प्रज्ञाची खरं तर हिम्मत झाली नाही. हात-पाय थरथरत होते, डोळ्यांमधून अपोआप पाणी येत होते. रुममध्ये गेली, आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःलाच ठणकावून सांगू लागली. “तूच करणार आहेस सगळं व्यवस्थीत, आणि तुला ते जमेलच. शंतनूच्या आयुष्यात मला पुन्हा नव्याने रंग भरायचे आहेत त्यामुळे मी प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाणार.” अशा स्व-सुचना देऊन, डोळे पुसून चेहरा स्वच्छ धुतला आणि तोंड पुसत पुसत हॉलमध्ये आई बाबांजवळ येऊन बसली.
बाबांच्या लक्षात आलं की, प्रज्ञाला काहीतरी सांगायचं आहे. “बोल बाळा काय झालय?” बाबा प्रज्ञाला म्हणाले. आजूबाजूला कोणी नाहीये ना याची तिने खात्री करून घेतली आणि, तीने बोलायला सुरुवात केली.
“आई-बाबा, मी एका मानसोपचार केंद्रात गेले होते.”
“काय?
आई बाबा दोघेही गोंधळले. तसा शंतनूच्या वागण्याचा त्यांना अंदाज आलाच होता. पण याही  गोष्टीला सामोरे जावे लागेल असं त्यांना वाटलं नव्हतं. वयोमानानुसार त्याच्यात ती ताकदही नव्हती.
“हो, मी भेटले तिथल्या डॉक्टरांना. शंतनू बद्दल सगळं सांगितलं. त्यांनाही अंदाज आला आहे पण,शंतनूला चेक केल्याशिवाय कुठलाच निर्णय घेता येणार नाही असं त्या म्हणाल्या.”
आईच्या डोळ्यातून घळा घळा अश्रूंच्या धारा वहायला लागल्या. सत्याची जाणीव त्यांना होती पण हे सत्य असं काही वळण घेईल असं त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. शंतनूच बालपण सरकन आईंच्या  डोळ्यासमोरून गेलं. त्यांना राहवेना, त्या खूप अस्वस्थ झाल्या.
प्रज्ञा त्यांच्या जवळ गेली त्यांना कुशीत घेऊन पाठीवरून हात फिरवत म्हणाली,
“आई शांत व्हा तुम्ही मला तरी कोणाचा आधार आहे? आपणच आहोत एकमेकांसाठी. आपला शंतनू आपल्याला आधीसारखा परत हवा असेल आणि हे सगळं घडतंय ते पुसून टाकून पुन्हा नव्याने सुरुवात करायची असेल तर आत्ता ह्या प्रसंगाला सामोरे जावेच लागेल. आपण खूप प्रयत्न करू, सगळं छान आधीसारखं  करू. फक्त तुम्ही बरोबर रहा. माझ्यावर विश्वास ठेवा.”

“हो गं प्रज्ञा आमचा तुझ्यावर विश्वास आहेच शंतनू काय आणि तू काय आमची मुलंच आहात. खरं तर मला तुझा अभिमान वाटतो बेटा ज्या पद्धतीने तू सगळं सांभाळत आहेस ते खरच कौतुकास्पद आहे. आम्ही आहोत तुझ्या बरोबर तू फक्त सांग काय करायचं ते.”
बाबांचं हे बोलणं ऐकून प्रज्ञाला चांगलाच धीर आला. तिची हिम्मत वाढली. आईंनीही तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला आता आईची कुशी दिली आणि, आम्ही आहोत अशी जाणीवही. मुलींनाही ही गोष्टं समजावली पण,त्यांना त्यांच्या दृष्टीने ही गोष्टं आत्ता इतकी मोठी वाटली नाही “दवाखान्यात तर, नेऊन आणायचं ना मग, त्यात काय एवढं” अशी काहीशी प्रतिक्रिया होती त्यांची. प्रज्ञालाही आत्ता त्यांना ह्यापेक्षा जास्ती काही समजावून सांगण्याची गरज वाटली नाही.
आता समोर दिसत होता तो शंतनू. ह्याला कसं समजावून सांगू? त्या रात्री ती काहीही बोलू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्याच बागेत शंतनूला फिरवण्यासाठी घेऊन गेली. शंतनू आणि प्रज्ञाने मिळून लावलेलं एक रोपटं अतिशय सुंदर झालं होतं. ती कुंडी देखील त्या दोघांनी रंगवलेली होती. प्रज्ञाने ती कुंडी शंतनूला दिसणार नाही अशी लपवून ठेवली आणि त्यासारखीच साधारण दिसणारी कुंडी तिथे ठेऊन ती फोडून अस्ताव्यस्त करून ठेवली होती. शंतनूच्या फारशा गोष्टी लक्षात येत नसत पण एवढ्यात त्याला बागेत फिरायला नेलं की, त्याच्याकडून झाडांना पाणी घालून घेण्याचं काम प्रज्ञा करत. आजही तो त्या कुंडीजवळ आला आणि पाणी घालायला लागला तर त्याच्या लक्षात आले की, त्यात रोपटं नाहीचे आणि कुंडीही खराब झालीये. तो गडबडला कशी प्रतिक्रिया द्यावी ते समजेना पण काहीतरी वेगळं वाटतंय असं त्याला जाणवलं. बैचेन झाला, ओरडायला लागला. प्रज्ञाने लगेच त्याला शांत केले आणि ती कुंडी त्याच्या समोर आणून ती प्लास्टर ऑफ पॅरिस जोडली. त्यात माती भारली आणि एक छोटंसं रोपटं त्या कुंडीत खोचलं. ती तशीच्या तशी बघीतल्यानंतर तो हळू हळू शांत झाला. ह्याचाच आधार घेऊन तिने शंतनूला खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. तसं त्यालाही फारसं समजत नव्हतं की, आपण कुठे जाणार आहोत? कशासाठी आहोत? पण एका दृष्टीने त्यालाही ही गोष्टं माहिती असणे महत्वाचे होते.
सगळी तयारी झाली शंतनूच्या मित्राला सिद्धार्थला देखील तिने ह्या विषयी कल्पना दिली. डॉक्टरांची तीन दिवसानंतरची अपॉईंटमेंट मिळाली होती. तो दिवस उगवला वेगळ्याच मार्गाची सुरुवात आज होणार होती. जो खरं तर तसा खडतर पण चांगल्या गोष्टीकडे नेणारा होता. त्यावरून चालण्यासाठी प्रज्ञा आणि तिचे घरचे अगदी खंबीरपणे तयार होते. प्रज्ञा स्वतः तयार होऊन शंतनूला तयार करत होती. का कुणास ठाऊक शंतनू आज खूप शांत होता. त्याच्या शांत राहण्याचीही भीतीच वाटत होती. काळजी मनात तशीच ठेऊन प्रज्ञा भरभर आवरत होती. सिद्धार्थ देखील त्यांच्या सोबत जाणार होता. त्याने गाडीचा होर्न बाहेरूनच वाजवला, तसे तयार झालेले प्रज्ञा आणि शंतनू रूममधून हॉलमध्ये आले. आई-बाबाही तिथेच उभे होते. घाई घाई आईने देवाजवळ चा अंगारा आणला आणि दोघांनाही लावला. दोघेही बाहेर पडले. शंतनूला सगळं वेगळंच वाटत होतं. जवळ जवळ गेले सात आठ महिने तो असा बाहेरच पडला नव्हता. शंतनू तसं गाडीत बसायलाच घाबरत होता. प्रज्ञाने त्याला बसवून त्याचा हात हातात घट्ट पकडला आणि अगदी त्याला जवळ घेऊन बसली होती.
प्रज्ञालाही जगाचं मुळीच भान नव्हतं शंतनू शंतनू आणि फक्त शंतनू एवढंच सध्या तिचं ध्येय होतं. मन खरच खूप गूढ आणि अथांग असतं त्याच्या मनात कधीही काहीही विचार येऊ शकतात. अगदी तसच प्रज्ञाच झालं होतं. असंख्य विचार आणि काळजीने तिचं मन घेरलं होतं. त्यातल्या त्यात ती मनाला भरपूर प्रयत्नाने सकारात्मकतेकडे वळवून विचारांची दिशा बदलत होती. अचानक एक कुत्रा गाडी समोर येऊन थांबला. सिद्धार्थ ने ब्रेक दाबला आणि गाडी जागेवरच थांबली तशी प्रज्ञा दचकून जागी झाली. तिचं लक्ष शंतनूकडे  गेलं तर तोही खूप घाबरलेला होता. तिने त्याच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवत त्याला शांत केले. सिद्धार्थने मागे सगळं व्यवस्थीत आहे ना ह्याची खात्री करून घेतली आणि तो पुढे निघाला. थोड्याच वेळात ते संस्थेमध्ये पोहोचले.
संस्थेचा परिसर खूप मोठा आणि प्रसन्न होता. घरासारखीच कौलारू छप्पर असलेली इमारत होती ती. समोरच मोठा बगीचाही होता. त्यात रंगीत कारंजाही होता. पहिल्यांदा प्रज्ञा आली होती त्यावेळी तिचं इतकं लक्ष नव्हतच पण, यावेळी शंतनू ह्या गोष्टींकडे वेगळ्याच नजरेने बघत होता. त्यामुळे तिचंही लक्ष आपोआपच त्याकडे जात होतं. शंतनू जरासा खुशच वाटत होता आता प्रज्ञाला. सगळं बघत बघत ते डॉक्टरांच्या केबिनजवळ पोहोचले पण, तेवढ्यात शंतनूला समोरच्या घोळक्यातून येणारा आवाज अजीबात सहन नाही झाला तो खरं तर स्पष्ट ऐकू येण्यासारखा नव्हताच पण, त्याला असं वाटलं की, कंपनीबाहेर सगळे कसला तरी संप करत आहेत आणि कंपनीविरुद्ध नारे देत आहेत. तसा तो त्या लोकांवर धावून गेला, जोरजोरात ओरडायला लागला, हातात जे येईल ते उचलून फेकाफेकी करायला लागला. प्रज्ञाने आणि सिद्धार्थने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. तो काही केल्या ऐकत नव्हता. तेवढ्यात डॉक्टरही आवाज ऐकून बाहेर आल्या मदतनीस ला सांगून लगेच त्याला एका रुममध्ये नेण्यास सांगितले. एका बेडवर त्याला झोपवले दोघांनी हात पकडले आणि दोघांनी पाय. प्रज्ञाला हे बघवत नव्हतं पण, नाईलाज होता. त्याला एक इंजेक्शन देऊन शांत केले. त्या इंजेक्शन मुळे त्याला पाचच मिनिटात झोप लागली. प्रज्ञा शंतनूकडे एकटक बघत उभी होती. आजच्या शांत राहण्यावारून तिला भीती वाटतच होती आणि, नेमकं इथे आल्यावारच हे असं घडलं.
प्रज्ञाला आणि सिद्धार्थ ला डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलावून घेतलं. सुस्कारा टाकत डॉक्टर त्यांच्या खुर्चीत बसल्या आणि ह्या दोघांनाही बसायला सांगितले. “सॉरी प्रज्ञा, खरं तर मी आज शंतनूचे पूर्ण निरीक्षण करून काही टेस्ट करून मग नक्की काय ते सांगणार होते. पण हा इथे आल्यावरचा प्रकार बघितला आणि माझी शंका दूर झाली. तुम्हाला शंतनूला आजपासूनच इथे काही दिवस admit करावं लागेल.”
“काय”? प्रज्ञा जरा ओरडूनच म्हणाली. खांद्याला अडकवलेली पर्स खाली पडली. तिचे हातपायच गळाले. तिला काहीच सुधरेना.
“हे असं आत्ता जे घडलं ते ह्या आधी कधी घडलं तुला आठवतंय का?डॉक्टरांनी  प्रज्ञाला प्रश्न केला.
“हो आठ दहा दिवसापूर्वीच, आधी एक-दीड महिन्याने त्याला असं व्हायचं पण, लगेच शांतही होत होता. एवढ्यात त्याला सारखंच असं होतंय आणि गोळी दिल्याशिवाय शांतच होत नाहीये.”
“हो ते समजलंच मला, आत्ताच्या त्याच्या कृतीवरून. हा काळ आता अजूनही कमी कमी होऊ शकतो आणि तो जास्तीच हायपर देखील होऊ शकतो. लवकरात लवकर त्याच्यावर उपचार सुरु करणं गरजेचं आहे”
“फक्त दवाखान्यात नेऊन तर आणायचं, त्यात काय एवढं?” असं श्रेयाचं निरागस वाक्य तिला पुन्हा आठवलं. तिच्या काळजात धस्स झालं. पुन्हा एकदा तिचं नव्या वळणावर पुढचं पाऊल पडलं.
      जवळ जवळ अख्खा दिवस संपत आला होता. शंतनूला जाग आली. आपण इथे काय करतोय? आणि हा कोणता ड्रेस घातलाय मी? हे सगळं त्याला खूप विचित्र वाटलं. तो पुन्हा आरडा-ओरड, चिडचिड  करायला लागला. “मी आहे शंतनू, मी आहे तुझ्या जवळ शांत हो”. असं म्हणत प्रज्ञाने त्याला जवळ घेऊन शांत केले. घरी तशी वेळ लागेल अशी कल्पना दिली होती पण admit करून घेतलंय हे सांगितलं नव्हतं. शंतनूचे आई-बाबा अगदी डोळ्यात तेल घालून वाट बघत होते. मुलीही आज खेळायला न जाता आजी आजोबांबरोबर आई बाबा कधी येत आहेत याची वाट बघत होत्या. इकडे प्रज्ञाला घरी जावसं वाटतच नव्हतं. पण घरी जाणं आणि सगळ्यांना समोरा समोरच सांगितलेलं योग्य राहणार होतं. सिद्धार्थ मधल्या वेळेत त्याच्या घरी जाऊन पुन्हा आला. प्रज्ञाला आता घरी जाणं भागच होतं. तिची पावलं जड झाली होती. कसं जाऊ घरी आणि काय सांगू सगळ्यांना तिला काहीच कळत नव्हतं. कशी-बशी रिक्षाजवळ पोहोचली आणि पत्ता सांगून रिक्षात बसली डोकं सुन्न झालं होतं आता तिच्या डोक्यात काहीच विचार नव्हते. चेहऱ्यावरही शून्य भाव होते रिक्षातून बाहेर बघत बघत ती हरवून गेली होती. फक्त डोळ्यातून अपोआप पाणी ओघळत होते अगदी शांतपणे. तिला घर आलेलं देखील समजले नाही. रिक्षा थांबली आणि ती भानावर आली. पैसे देऊन तिची पाठ वळली आणि दारातच सगळे उभे असलेले दिसले. रिक्षा आली म्हणून सगळेच धावत आले होते.
         “हे काय तू रिक्षेतून? शंतनू कुठे आहे? आणि सिद्धार्थ कुठे गेला? काय झालय प्रज्ञा?" आई-बाबांचा काळजीने  प्रश्नांचा भडीमार सुरु झाला. प्रज्ञा काहीच बोलत नव्हती. तिने आईंना मिठी मारली आणि जोरजोरात रडायला लागली. त्यांनाही सुचेना, नेमकं काय झालंय ते कळेना. मुलीही अगदी गांगरून गेल्या. गेल्या सात-आठ महिन्यात प्रज्ञाला खूप strong झालेलं बघितलं होतं त्यांनी, पण आज तीच प्रज्ञा वेगळीच वाटत होती. आईंनी तिला शांत केले. सगळे आत गेले. स्मिता मावशीही आलेल्या होत्या. प्रज्ञाला पाणी प्यायला दिले. प्रज्ञाने डोळे पुसले आणि पाणी पिता-पिता घडलेला सगळा वृतांत सांगितला. आई-बाबांना हे ऐकून चांगलाच धक्का बसला. स्मिता मावशीने आईंना सावरले. श्रेया आणि प्रिया पुढे आल्या त्यांनी प्रज्ञाला घट्ट मिठी मारली. श्रेया म्हणाली, “आई तू काळजी करू नकोस आपला बाबा लवकर बरा होऊन घरी येईल.” हे ऐकून प्रज्ञालाही पुन्हा एकदा तिच्या निश्चयाची जाणीव झाली.




अस्मिता कुलकर्णी
Share:

0 comments:

Post a Comment

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या