लढा स्वतःशीच स्वतःचा (भाग -६)

भाग - ५ वाचण्यासाठी  इथे क्लिक करा


जच्या रात्रीचाच डबा फक्त प्रज्ञाला घेऊन जायचा होता. उद्यापासून सगळं संस्थेतच होणार होतं. न काळजी घेणं जमणार होतं न त्याच्या आवडीच्या काही गोष्टी करायला मिळणार होत्या. भेटायलाही फक्त रविवारच तेही ठरवून आणि मान्यता घेऊन. काही दिवस तरी असंच चालणार होतं. शंतनूच्या आवडीची भरली वांग्याची भाजी, पोळी, पुलाव, आणि गुलाबजाम असा सागरसंगीत डबा भरून घेऊन प्रज्ञा निघाली. खरं तर आत्ता सगळ्यांनाच बरोबर जावसं वाटत होतं. प्रज्ञाने सिद्धार्थला फोन करून तिथे विचारायला सांगितले की, एकदा आम्हा सगळ्यांना शंतनूला भेटण्याची इच्छा आहे तर, आम्ही येऊ शकतो का? डॉक्टरांकडून प्रज्ञाच्या प्रश्नाला होकार आला. आई, बाबा, मुली, प्रज्ञा आणि स्मिता मावशी असे सगळेच शंतनूला बघण्यासाठी गेले. तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी खूप स्ट्रॉंग राहायचं. कोणीही डोळ्यातून एक थेंब काढायचा नाही. प्रिया आणि श्रेया बाबाला फक्त एक मिठी मारायची, फार प्रश्न विचारायचे नाहीत. अशा भरपूर सूचनांचा मारा करून प्रज्ञा आता त्यांच्याच गाडीतून सगळ्यांना घेऊन निघाली. पोहचेपर्यंत सगळे अगदी चडीचूप होते.
      संस्थेत पोहोचले. ओठांवर शांतता होती पण मनात खूप उलथा पालथ चालली होती. परिसर तर  प्रसन्नच वाटत होता. दारातून आत जाता जाता पायरीला ठेच लागून नेमकी आईंची चप्पल तुटली. कितीही आधुनिक विचारांच्या असल्या  तरी मनात शंकेची पाल चुकचुकली. प्रज्ञाला लगेच लक्षात आले ती घाई-घाई म्हणाली, “मी घरून निघतानाच म्हणणार होते आई, ही चप्पल घालू नका कधीही तुटू शकते.” तशी आईंनी मान डोलावून “हो का, का ग नाही म्हणालीस मग? असे म्हंटले. प्रज्ञाने पर्स उचकून एक पिन शोधली आणि ती चपलेला लाऊन चप्पल तात्पुरती घालण्यासारखी केली आणि सगळे पुढे चालू लागले. आत गेल्यानंतर नाही म्हणलं तरी थोडा औषधाचा वास, आजूबाजूला बाकीचे शंतनू सारखेच आणखी काहीजण. एकाला तिथला मदतनीस फिरवत फिरवत त्याच्याशी छान संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. तो देखील खूप प्रयत्नाने दुजोरा देण्याचा प्रयत्न करत होता. व्हीलचेअर वरून इकडे तिकडे करावे लागणारेही काही पेशंट्स त्यांना दिसत होते. खरं तर ते सगळं बघून सगळ्यांना खूप वेगळंच वाटत होतं. मनावरती खूप दडपण आल्यासारखं झालं होतं आणि व्यक्तही होता येत नव्हतं. मुलींना तर ह्या जगाची पहिल्यांदाच ओळख झाली होती. त्या जराशा घाबरल्याच होत्या. आपला बाबा आता इथे राहणार ही कल्पनाच त्यांना करवत नव्हती. प्रज्ञाला रूम माहितीच होती. ती भरभर पुढे चालली होती आणि बाकी सगळे आजूबाजूचं निरीक्षण करत तिच्या मागे-मागे जात होते. रुमजवळ पोहोचले मनात साठलेल्या दुःखाबरोबर सगळ्यांची जड पावलं शंतनूच्या रुममध्ये पडली. शंतनू बेडवर नुसताच पडला होता. आत गेल्यावर अगदी खऱ्याखुऱ्या आणि प्रसन्न हास्याने प्रज्ञाने शंतनूकडे बघितले, त्याला उठवून बसवले. मुलींनी बाबाला गच्च मिठी मारली. शंतनूला बोललेलं फारसे संबंध लागत नव्हते पण, तरीही सगळे मनमोकळ्या गप्पा मारत होते त्याच्याशी. प्रिया तर शंतनूला म्हणाली, “बाबा मी तुला नेहमी जादूकी झप्पी देत जाईल म्हणजे, तू बरा होऊन लवकर घरी येशील”. सगळे शंतनूला भेटले, त्याला जेवायला घातलं आणि, तोही शांतपणे जेवला सगळेच खुश झाले.  
प्रज्ञा पुन्हा एकदा डॉक्टरांना भेटली. डॉक्टर म्हणाल्या की, “तू लकी आहेस की, तुला शंतनूला इथे घेऊन यायचं लवकर सुचलं. लक्षणं तशी स्किझोफ्रेनिया च्या जवळ जाणारी वाटत होती पण ती stage अजून आलेली नाहीये. तो नक्कीच यातून सावरू शकतो कदाचित त्याला बरीच वर्ष औषधं आणि कौन्सिलिंगचा आधार घ्यावा लागेल. पण तो रोजच्या त्याच्या गोष्टी, बाहेर जाणं येणं करू शकतो. संवाद साधूच शकतो. त्यानंतर त्याने ठरवलंच तर तो काहीही करू शकतो. एकदा त्याच्यामध्ये आत्मविश्वास आला की, तो पुन्हा एकदा ठामपणे उभा राहू शकतो.”
“हो डॉक्टर तो पुन्हा आधीसारखा होईल आम्ही सगळे प्रयत्न करू.”
“अगदीच तुमची साथ, प्रेम त्याच्या बरोबर असणं हाच सगळ्यात महत्वचा उपचार आहे खरं तर.”
तो पूर्णपणे बराच होणार अगदी आधीसारखा असा माझा विश्वास आहे, असंच प्रज्ञा स्वतःला सांगत होती. कसाबसा शंतनूचा निरोप घेतला आणि गेल्या पावली सगळे घरी परतले. येताना मात्र सगळ्यांचेच अश्रू अनावर झाले होते. प्रज्ञा मात्र खंबीरपणे सगळ्यांना समजावत समजावत शांत करत होती.
      संस्थेतला दूसरा दिवस उगवला. रात्रीच्या गोळ्यांच्या डोसमुळे शंतनूला चांगलीच झोप लागली होती. डोळ्यांसमोर नेहमी दिसणारं दृश्य आज बदललेलं होतं. उठल्यानंतर त्याला नक्कीच वेगळेपणा जाणवत होता. तो अस्वस्थ झाला “मला जायचंय, मला घरी जायचंय” असं काहीतरी बडबडायला लागला जवळ जवळ उठून पळायलाच लागला. त्याला बळच बेडवर थांबवून धरले. सगळ्यांनी त्याला अक्षरशः करकचून पकडले होते. त्यानंतर बऱ्याच वेळ तो शांत होत नव्हता पुन्हा एकदा त्याला इंजेक्शन द्यावेच लागले. त्यानंतर हळू-हळू तो शांत झाला.
      त्या संस्थेतली त्याची वाटचाल सुरु झाली. तिथलीच ती सकाळ आणि तिथलीच ती संध्याकाळ. रोजचीच पण रोज नवीन वाटणारी. प्रत्येक दिवशी शंतनूचं नवीन रूप दिसत होतं. औषधं आणि कौन्सिलिंग या माध्यमाद्वारे त्याची आवश्यक ती treatment सुरु झाली. सकाळी उठल्यानंतर चहा, नाष्टा नंतर बाहेर बागेमध्ये एक चक्कर, मग औषध, एक कौन्सेलिंगचं सेशन, त्यानंतर जेवण, पुन्हा एकदा फेरफटका, पुन्हा औषधाचा डोस, मग आराम, पुन्हा संध्याकाळचा चहा, इतर activity, मग जेवण आणि पुन्हा औषधं आणि झोप. असा शंतनूचा दिनक्रम झाला होता. तोही बळच करून घ्यावा लागत. त्याचा रिस्पॉन्स तसा शून्यच होता. खरं तर त्याला थोड्या फार प्रमाणात जाणीव होती पण सूचना दिल्याशिवाय तो काहीच करत नव्हता. स्वतःहून बेडवरून उठत सुद्धा नसायचा. तो एकटक कुठेही बघत रहायचा पण कोणाच्या नजरेला नजर देत नसायचा. शंतनूच्या दैनंदिन कृतींपासून सगळं काही करूनच घ्यावं लागत होतं. बरेचदा हायपर होणंही सुरूच होतं. मधूनच प्रज्ञाच नाव तर मधेच मुलींचं नाव घेऊन ओरडायचा, का ते कोणालाच समजत नव्हतं आणि त्यालाही कळत नव्हतं.
 घरच्यांसाठी देखील वेगळच विश्व. शंतनू शिवाय पण, त्याला गृहीत धरून सगळं करणं खूप अवघड जात होतं. कॅलेंडर वर खुणा करणं, देवाजवळ अखंड दिवा तेवत ठेवणं, जप करणं, वहीवर शंतनू बरा होऊन घरी आला आहे असं सकारात्मक लिखाण करणं. अशा कितीतरी गोष्टी दिनचर्येचाच एक भाग बनल्या होत्या. कितीही समजूतदार लोकं आजूबाजूला असली तरी शंतनूच्या admit झाल्यामुळे खूपच चर्चा वाढली होती. कसा आहे शंतनू? बोलतो का? कधी बरा होणार? कधी घरी सोडणार? असे असंख्य प्रश्न प्रज्ञाला आणि घरच्यांना सतत विचारले जात. कोणी काळजीपोटी तर, कोणी उपहासात्मक देखील. ह्या सगळ्यांना घरचे अगदी हसत सामोरे जात होते. मुलींनाही त्यांच्या मैत्रिणी तुझा बाबा तुला शाळेत सोडायला आणायला का नाही येत? तो कुठे गेलाय? तो वेडा झालाय का? असे नको नको ते खूप प्रश्न विचारले जात होते. मुली सुरुवातीला बरेचदा रडत रडत घरी येत पण, प्रज्ञाने त्यांना समजावलं की, ठीक आहे त्या जरी तुम्हाला विचारत असतील तरी तुम्ही उत्तर द्यायचं की, “माझा बाबा लवकरच घरी येणार आहे, मग बघा कशी मज्जा येईल ते.”                                                                
प्रज्ञा आणि बाबा जितकं हातात आहे तितकं ऑफिस देखील सांभाळत होते आणि, आई घर. असा अधांतरी संसार पुढे पुढे चालला होता. शंतनू लवकर परत येईल ह्या एका आशेवर.
एक आठवडा पूर्ण झाला होता. शंतनूला भेटण्याचा दिवस आला होता. बाबांना ऑफिसमध्ये काम  होतं, मुली शाळेत गेल्या होत्या, आणि आईंनी स्वतःहूनच जाण्यासाठी नकार दिला कारण, त्यांना शंतनूची अवस्था बघवत नव्हती. प्रज्ञा एकटीच निघाली होती. जाता जाता पुन्हा एकदा डोक्यात खूप विचार कसा दिसेल शंतनू? मला ओळखेल का? बोलेल का माझ्याशी? असे खूप प्रश्न प्रज्ञाच्या मनात येत होते. प्रज्ञा संस्थेत पोहोचली पण शंतनू अजूनही तसाच होता, जसा तो इथे आल्यानंतर होता. थोडक्यात तीने शंतनूला नुसते बघितले, समोरासमोर येऊनही त्यांची भेट झालीच नाही. डॉक्टरांनी प्रज्ञाला समजावून सांगितले, “इतक्या लवकर कोणत्याही माणसात जाणवण्या इतका बदल होऊच शकत नाही. त्याला थोडासा वेळ दे होईल सगळं व्यवस्थीत.” पुन्हा एकदा नवी आशा घेऊन प्रज्ञा घरी परतली. घरी आल्यावर आई बाबांनी प्रज्ञाला उत्सुकतेने विचारले पण त्यांचाही अपेक्षा भंगच झाला.
      दिवस पुढ-पुढे चालले होते. शंतनू ची दिनचर्या आणि घरच्यांची दिनचर्या यात काडी मात्र बदल नव्हता. अधून मधून शंतनूला भेटण्यासाठी कोणी न कोणी जाऊन येत. प्रज्ञाला सुरुवातीला प्रत्येक वेळी गेली की वाटायचं, शंतनू अगदी आधीसारखा झाला असेल आता. बरेचदा ती त्याला बघून नाराजच व्हायची पण त्याला आणि घरच्यांना तिने कधीही जाणवू दिले नाही. कितीतरी वेळा तिच्या मनात येऊन देखील गेलं की, आपण घेतलेला निर्णय योग्य आहे ना? उत्तर हो असंच यायचं कारण शंतनू नक्की बरा होऊन येणार असा सगळ्यांचाच विश्वास होता.
जवळ जवळ चार महीने होऊन गेले होते. प्रज्ञाने आता त्याला किती वेळ घ्यायचा आहे तितका तू घे शंतनू असं मनाशी ठरवूनच टाकल होतं. आता तिला प्रत्येक वेळी फक्त एकाच नवीन कृतीची आशा असायची आणि त्यातच ती खुश होऊन जायची. तसं पाहता आता शंतनूच खाणं सुधारलं होतं. दाढी केलेली, स्वच्छ आंघोळ, अगदी आधीसारखा नाही पण जरा बरा दिसायला लागला होता. सकाळी उठल्यानंतरच्या सगळ्या कृती तो स्वतः करण्याचा प्रयत्न करायला लागला होता. कौन्सेलींग मुळे नजरेलाही नजर देण्याचा त्याचा प्रयत्न लक्षात येण्यासारखा होता. पण बरेचदा खूप गोंधळलेला असायचा. हे कधी करायचं? कसं करायचं? हे प्रश्न नेहमीच त्याला गोंधळात टाकत. औषधांमुळे त्याला भास होणेही बऱ्यापैकी कमी झाले होते. त्यासाठी असणाऱ्या औषधाचा डोस देखील कमी करण्यात आला होता. अधूनमधून अजूनही चिडत होताच कोणालाच ऐकत नसायचा. इतर activity करायला मात्र अजिबातच तयार नसायचा रादर त्याला त्या जमतही नसायच्या. तसा फोटोवरून घरच्या सगळ्यांना तो आता नावासहीत ओळखायला लागला होता.
      एकदा प्रज्ञा अशीच त्याला भेटायला गेली होती. डॉक्टर आज बाहेर बागेतच तिला भेटल्या आणि म्हणाल्या की, कदाचित तुला आज एक सुंदर surprise मिळणार आहे. हे ऐकून प्रज्ञाच्या मनातली धडधड वाढली होती. पुढची पावलं ती टाकत होती की, नव्हती तिचं तिलाच समजत नव्हतं. तिने रुमचं दार उघडलं आणि आत गेली. शंतनू स्वतः आरशात बघून स्वतःच आवरण्याचा प्रयत्न करत होता. प्रज्ञा त्याच्याकडे बघतच राहिली. आत गेली, त्याच्याजवळ जाऊन त्याला मदत करायला लागली. तर तो चक्क तिला “थांब प्रज्ञा” असं म्हणाला. प्रज्ञाचा स्वतःच्या कानावर विश्वासच  बसला नाही. काय म्हणालास तू? प्रज्ञाने पुन्हा एकदा प्रश्न केला. आता मात्र तो काहीच बोलला नाही. पण प्रज्ञाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शंतनूने आज आपल्याला ओळखलंय, “ माझं नाव तुझ्या तोंडून ऐकण्यासाठी माझे कान इतक्या दिवस आसुसले होते शंतनू.” असं म्हणून तिने शंतनूला मिठीच मारली. आज इतक्या दिवसानंतर, जवळ-जवळ वर्षानंतर अशी मिठी प्रज्ञाने मारली होती शंतनूला आणि, शंतनूने देखील तिला तितक्याच प्रेमाने जवळ घेतले होते. तिच्या अंगावर रोमांच उठले होते. तिला त्याची मिठी हवी हवीशी वाटत होती. फार वेळ मिठी राहिली नाही, शंतनू लगेच लांबही झाला. पण प्रज्ञा मात्र खूप खुश झाली होती. हा दिवस प्रज्ञाच्या दृष्टीने, सगळ्यांच्याच दृष्टीने खूप महत्वाचा होता. आज प्रज्ञा संस्थेमधून खूप आनंदी होऊन बाहेर पडली. घरी आल्यानंतर घरच्यांना काय सांगू नी, काय नको असं तिला झालं होतं. आज तिने आईंना तशीच मिठी मारली जशी शंतनूला admit केलं होतं तेंव्हा मारली होती, फरक फक्त तेंव्हा ती खूप रडली होती आणि आता तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शंतनूचा पुढचा प्रवास चालूच होता. शंतनूकडे बघून वाटत नव्हतं की, त्याला घरी जायची फारशी घाई आहे. फार प्रयत्न करावे लागणार असतील तर त्या कामाकडे तो दुर्लक्ष करायचा. म्हणजे त्याच्यातला पेशन्स जवळ जवळ संपलाच होता. 
इकडे प्रज्ञाने आणि बाबांनी चांगलाच जम बसवला होता ऑफिसमध्ये खूप मोठे प्रोजेक्ट नक्कीच नव्हते पण, जे होते त्यावरच लक्ष केंद्रित केले होते. घरच्यांबरोबरच ऑफिसमधले देखील शंतनू परत येण्याची आतुरतेने वाट बघत होते. तेही पूर्ण झोकून देऊन काम करत होते. शंतनू परत आल्यावर काही बिघडलं होतं असं त्याला अजिबातच वाटायला नको असं प्रत्येकालाच अगदी मनापासून वाटत होतं.
शंतनू असाच एकदा त्याच्या रुममध्ये असणाऱ्या खिडकीतून बाहेर टक लावून उभा होता. त्या खिडकीच्या अगदीच समोर गुलमोहोराच झाड होतं. शंतनू तसा रोजच बघायचा पण, आज तो गुलमोहोर लाल तांबूस रंगानी खुलल्यासारखा दिसत होता. त्याचं सौंदर्य हळू हळू बहरत चाललं होतं. जणू तोही खूप खूष आहे आज असंच वाटत होतं. शंतनू रोजच त्या गुलमोहोराला आवर्जून बघायला लागला तसा तो रोजच आणखीनच मोहोरत चालला होता. लाल सुंदर रंगाने ते पूर्ण झाड व्यापून टाकलं होतं. शंतनूला नक्कीच त्याच्याकडे बघून खूप छान वाटायचं. तो चक्क त्याच्या मनातल्या गोष्टी गुलमोहोराला बोलून दाखवायला लागला होता. गुलमोहोराच्या बहरण्या बरोबरच शंतनूतही चांगले बदल होत होते. अशीच हळू हळू त्या खिडकीशी आणि त्या गुलमोहोराशी त्याचे नाजूक बंध जुळले. त्याच्याशी छान मैत्री झाली.


अस्मिता कुलकर्णी
Share:

0 comments:

Post a Comment

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या