लढा स्वतःशीच स्वतःचा (भाग -३)


शंतनू स्पर्धेत उभा राहिला खरा पण त्याला वारंवार छोट्या-मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. वर वर पाहता सगळं व्यवस्थित आहे असं वाटायचं पण, शंतनूला आता ह्या गोष्टींचा त्रास व्हायला लागला होता. मनात नुसती घालमेल, त्रास आणि चेहऱ्यावर मात्र हसू असं खोटं वागणं त्याला जमेनासं झालं होतं. छोट्या छोट्या ऑर्डेर साठी खूप धडपड करावी लागत होती. कंपनीला बरेच नुकसानही होत होते. कधी काय होईल याची भीती सतत त्याच्या मनात असायची. टेन्शन मुळे बरेचदा स्टाफ वर देखील आवाज वाढायचा, पण त्यांनी आधीचा शंतनू बघितला होता. त्यामुळे ते त्याच्या ह्या वागण्याचं मनावर घेत नव्हते. हातातून काहीतरी निसटून चाललंय अशी काळजी, असा भाव नेहमीच त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागला होता. खूप ताण निर्माण होत होता. त्याच्या वागण्यातला बदल सगळ्यांनाच जाणवायला लागला  होता. घरच्यांनाही खूप काळजी वाटत होती. शंतनूचे बाबा त्याच्या मागे ठामपणे उभे होते. तेही नेहमी त्याला योग्य ते मार्गदर्शन करत होते.  
एका नवीन ऑर्डर च्या बाबतीतही त्याच्या मनात सध्या विचार चालूच होते. त्या क्लाइंटला देखील थांबवणे त्याला अवघड झाले होते. बऱ्याच मित्रांचा, जाणकारांचा सल्ला घेतल्यावर त्यांनी प्रलोभनं देण्याचा उपाय सुचवला तेंव्हा, ह्याने बरेच दिवस विचार केला आणि शेवटी नाईलाजाने तो मार्ग देखील अवलंबून बघितला. आपल्या तत्वांना मुरड घालत त्याने त्या क्लाइंट थांबवण्याचा खूप प्रयत्न केला होता. अजूनही क्लाइंटने त्याचा ठोस असा काहीच निर्णय शंतनूला कळवला नव्हता. शंतनू ह्या निर्णयाची खूप आतुरतेने वाट पाहत होता. ही ऑर्डर त्याच्या कंपनीसाठी खूप महत्वाची होती. कंपनीचा आधार होता ही ऑर्डर म्हणजे. खरं तर प्रलोभनं देऊन ऑर्डर मिळवणे ह्या गोष्टीमुळे त्याला अजिबातच समाधान वाटत नव्हते. आपलं काहीतरी चुकलंय असं सतत त्याच्या मनात येत होतं. मनावर एक प्रकारचं दडपणच असायचं. पण काहीही करून ही ऑर्डर आपल्याला मिळायलाच हवी अशी त्याची गरज होती. डोक्यात हाच विचार ठेऊन तो ऑफिस आणि घर दोन्हीही ठिकाणी वागायला लागला होता, दोन्हीमधली सीमारेषा पुसट होत चालली होती.
आज त्याने मनाशी ठरवून स्वतःहून त्या क्लाइंटला फोन केला पण त्यांनी उद्या बोलू असे म्हणून फोन ठेऊन दिला. शंतनूला आता मात्र खूपच टेन्शन आलं होतं.
दुसऱ्या दिवशी सगळे आपापली सकाळची कामे उरकून, मुली शाळेत निघाल्याही पण, शंतनू अजूनही झोपलेलाच होता. सगळ्यांना अश्यर्यच वाटलं. प्रज्ञा उठवायला गेली तर, घाबरून उठला आणि भरभर आवरायला लागला. “खूप उशीर झाला गं प्रज्ञा मला, आता मी पोहोचणार नाही वेळेत. कोणी क्लाइंट आले असतील, ऑफिसमध्ये कॉल आला असेल, बापरे!! खूपच उशीर झालाय.” तेच तेच वाक्य परत परत बोलत होता. खूप गोंधळल्यासारखा वाटत होता. तरी प्रज्ञा त्याला मदत करत होतीच. सगळं आवरलं आणि तो निघाला. आज त्याने मुलींविषयी काहीच विचारले नाही शिवाय आई बाबांकडेही त्याचे लक्ष गेले नाही. त्याने गाडी चालू केली.
“निट जारे शंतनू, काळजी घे”
प्रज्ञाचं हे वाक्यही त्याने आज निट ऐकलं नाही.
          गाडी चा स्पीड कितीही वाढवला तरी त्याला तो कमीच वाटत होता. डोक्यात नुसतं विचारांचं थैमान चाललं होतं. आजूबाजूचा आवाजही त्याच्या कानावर पडत नव्हता. तो कधी ऑफिसला पोहचला हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही. गाडीतून उतरल्यावरही बराच वेळ तो गेटजवळच घुटमळत होता. शेवटी जरा भीत भीतच त्याने ऑफिसमध्ये पाय ठेवला. आज गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणण्याच्या मनस्थितीत तो नव्हताच. आत केबिनमध्ये गेला आणि, फक्त फोनवरच लक्ष ठेऊन होता. फोनची रिंग वाजली. शंतनू खूप घाबरला, फोन उचलायला गेला तर हात थरथर कापायला लागले. खूप वेळा रिंग वाजली तरी त्याने उचललाच नाही. शेवटी प्रथमेश कसली तरी फाईल घेऊन आत आला त्यालाच तो फोन उचलायला लावला. त्याने तो उचलला आणि शंतनूची खात्री खरी ठरली त्या क्लाइंटचाच कॉल होता. सर नाहीयेत असं खोटच त्याने सांगायला लावलं. प्रथमेशने काळजीने विचारलं, “सर आर यू ऑल राईट?” शंतनू हो म्हणाला पण, त्याच्या वागण्यावरून मुळीच तसं वाटत नव्हतं. खूप घाम आला होता त्याला. प्रथमेशने पाणी दिलं आणि तो बाहेर गेला. आता शंतनू स्वतःशीच पुटपुटत होता. “नक्कीच ऑर्डर कॅन्सल करण्यासाठीच कॉल केला असेल. तसं झालं तर काय करू मी? आणि का असं होतंय? मला काहीच सुचत नाहीये. मला काहीच जमणार नाहीये, काहीच जमणार नाहीये....”
        थोडा वेळ गेल्यानंतर पुन्हा रिंग वाजली आता मात्र त्याने हिमतीने फोन उचलला आणि त्याला जी भीती होती तेच घडलं. आता मात्र तो पूर्ण कोलमडला. जवळ जवळ सगळच संपलं होतं. अजून एक मोठी ऑर्डर त्याच्या हातातून गेली होती. फोन ठेवायचं देखील त्याला भान राहीलं नाही. जवळ जवळ फोन हातातून निसटलाच. बऱ्याच वेळ तो खुर्चीत सुन्नपणे बसून राहिला. उठून नंतर समोरच्या भिंतीजवळ गेला. शंतनूच्या बाबांनी ज्या दिवशी हा बिजनेस त्याला सोपवला होता त्या दिवशी एक फ्रेम गिफ्ट म्हणून दिली होती. त्यावर अशा अर्थाचे लिहिले होते की “तुझ्या शेवटच्या प्रयत्नापर्यंत लढ कधीही आशा सोडू नकोस”. त्या भिंतीवर लावलेल्या फ्रेमवरून हात फिरवत “सॉरी बाबा मी हरलो” असं म्हणून तो अक्षरशः लहान मुलासारखा रडायलाच लागला. आज त्याला काहीच सुधरत नव्हतं. कंपनीच्या पहिल्या दिवसापासून सगळ्या गोष्टी, सगळ्यांनी केलेली मेहनत, वाढवलेला हा बिजनेस, प्रत्येक क्षणाशी जोडल्या गेलेल्या भावना, घरच्यांचा, स्टाफचा आपल्यावर असलेला प्रचंड विश्वास, घरच्यांचे चेहरे, मुलींचं हसणं हे सगळं त्याच्या नजरेसमोरून भरभर जाऊ लागलं. डोकं दुखायला लागलं, चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं. Laptop बंद करणंही त्याला समजत नव्हतं. शंतनूचा मित्र दिनेश जो की त्याच्याच कंपनीत काम करत होता, त्याने शंतनूची अवस्था बघितली आणि त्याला लवकरच घरी घेऊन गेला. श्रेया आणि प्रिया तर एकदम खुश झाल्या आज इतक्या लवकर बाबा घरी आला म्हणजे दोघींचे मस्त प्लान सुरु झाले.
”आजी आम्ही बाबा बरोबर फिरायला जाणार “
“अरे आत्ताच तर आलाय बाबा त्याला थोडं बसू द्या”
आईला त्याचं लवकर येणं आणि दिनेश ने बरोबर असणं जरा काळजीचच वाटलं होतं. शंतनू गाडीतून उतरला आणि दिनेश बाहेरच्या बाहेरच एका अर्जंट मिटींगसाठी निघून गेला.
प्रज्ञाच्याही मनात असंख्य प्रश्न होते?
शंतनूने कोणाकडेही बघितले नाही त्याला नजरेला नजर देणं अवघड वाटत होतं.पूर्ण हरल्यासारखं वाटत होतं त्याला. आला आणि खुर्चीवर बसला.
“बाबा चल ना आपण गार्डनमध्ये जाऊ”. शंतनूने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तो जागेवरच बसून होता. मुली आवरून देखील आल्या आणि परत म्हणाल्या, “चल बाबा आम्ही तयार झालोत.” तेंव्हा मात्र त्याचा पारा एकदम चढला. तो जोरात मुलींवर ओरडला. “मला नाही जमणार यायला, मी आत्ताच आलोय मला जरा एकट्याला शांत बसू द्या. तुम्हाला कळत नाही का?
त्याचा असा आवाज ऐकून सगळीकडे शांतता पसरली. सगळेच घाबरले. शंतनूचे हे रूप सगळ्यांसाठीच नवं आणि अनपेक्षित होतं.
सगळ्यांनीच त्याला समजून घेतलं.. “बाबा दमला असेल त्याला एकटं राहू द्या म्हणजे तो मस्त फ्रेश होईल. आपण घरी परत आल्यावर त्याच्याशी खेळू.” मुलींना आज्जीने समजावून सांगून फिरायला नेलं. खरं तर प्रज्ञा आणि त्याचे आई-बाबा काळजीतच पडले होते. उरलेला संपूर्ण दिवस त्याने एकट्यानेच रूममध्ये बसून काढला. जेवायला बोलावलं तरी तो आलाच नाही जेवलाच नाही. कधी झोप लागली त्याचं त्यालाच कळलं नाही. प्रज्ञा त्याच्याजवळ बऱ्याच वेळ बसून होती. नंतर तिचाही डोळा लागला. दुसरा दिवस उगवला.
“अरे शंतनू आज आंघोळ करायच्या आधीच काय ऑफिसचं आवरून बसलास?
“हो का मी आंघोळ नाही केलीये का?” स्वतःच प्रज्ञाला प्रश्न करतो.
“जाऊदे आता उशीर झालाय.” आवरलय तर जातो असाच.
“अरे असं काय लहान बाळासारखं करतोस, दोन मिनिटे लागतील फक्त”
“नको मी जातो”
शेवटी रूममधून तसाच बाहेर पडला. प्रज्ञा वरचं सगळं आवरून स्वच्छता करून खाली आली आणि तिला दिसलं की, शंतनू खालीच खुर्चीत बसलेला होता.
“अरे शंतनू उशीर होईल म्हणालास आणि इथेच बसला आहेस अजून.”
प्रज्ञा एवढं बोलली पण त्याचं लक्षच नव्हतं तिच्या बोलण्याकडे.
“शंतनू, अरे शंतनू”
प्रज्ञाने त्याला हलवलं तेंव्हा त्याने “काय झालं?” असं घाबरून विचारलं आणि काहीही न बोलता परत वरच्या रूममध्ये निघून गेला.
     प्रज्ञाने दिनेश ला फोन लावून सगळं व्यवस्थीत विचारून घेतले. कारण शंतनू बोलण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता. तिला सगळं व्यवस्थीत समजल्यावर तिने शंतनू शी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. पण तरीही तो ह्या विषयावर काहीच बोलत नव्हता. घरातल्या सगळ्यांनी, मित्र कंपनीने सगळ्यांनीच त्याला खूप सपोर्ट केला. ही एक फेज आहे. तू काळजी करू नकोस, ही वेळ पण जाईल. आपण सगळे मिळून प्रयत्न करू. असं सगळेच समजावून सांगत होते पण, त्याचा आत्मविश्वास इतका कमी झाला होता की, आपण आता हे सगळं पुन्हा उभा करू असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. त्या दिवसानंतर त्याचं बोलणच कमी झालं. माणसांमध्ये मिसळण्याची त्याला भीती वाटू लागली. तो एकटा एकटा राहायला लागला. हळू हळू त्याचं ऑफिसला जाणं देखील बंद झालं.
अस्मिता कुलकर्णी

Share:

0 comments:

Post a Comment

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या