Showing posts with label Experience. Show all posts
Showing posts with label Experience. Show all posts

जीवन एक सुंदर गाणं ♫♫♫


प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... 

आपल्याच अवखळ शब्दात,
ते अगदी सहज मांडावं,
स्वतःच्या स्वरातच पण,
स्वच्छंदपणे गुणगुणावं,
प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫

 

तालासुरांसारखंच नात्यांना,
कसं हळुवार जपावं,
नात्यांच्या सोबतीनेच, 
ते अगदी सुरेल रंगवावं,
प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫

 

सुख दु:खाच्या मैफिलीत,
कधीतरी हरवून जावं,
मनाला साद घालत,
भान हरपून गात रहावं,
प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫

 

तक्रार असली तरी, लयबद्ध असावं,
माघार घेतली कधी तरी, स्थितप्रज्ञ असावं,
गुणगुणता येईल सर्वांबरोबर,
असं सहज सोप्पंही दिसावं,
प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫

 

मग कधीतरी शांत बसून, 
आपल्यालाच ऐकावं,
पुढचे स्वर हसरेच लागू दे रे,
मागणं एकच असावं,
प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫

 

- अस्मिता कुलकर्णी 

Share:

गेट मूव्ह ऑन..


          परवा एक जुनी मैत्रीण अचानक मॉल मध्ये दिसली. तिच आहे का दोनदा तीनदा खात्री करून घेतली आणि मग हाक मारली, “प्रीती” ती देखील धावत धावत आली. होस्टेल नंतर कित्येक वर्षानंतर भेटलो होतो आम्ही. “कशी आहेस?” “मी मस्त, तू सांग, इथेच असतेस का?” “हो अगं, इथेच असते.” मी जरा विचारात पडले खरं तर तिचं एका मुलावर खूप प्रेम होतं. तो तर हैद्राबादला रहायचा. शिक्षण इथे पुण्यात झालं होतं. होस्टेल मध्ये असताना खूप बोलायची, त्याच्याबद्दल सांगायची. मला त्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. मी काही विचारणार, तेवढ्यात तिचे मिस्टर आणि लहान मुलगा दोघंही तिथे आले आणि माझी उत्सुकता अजूनच वाढली कारण तो, तो नव्हताच. ते थोडसं बोलून, मला हाय-हेलो करून पुन्हा कोणत्यातरी शॉप मध्ये शिरले. मग, मी न राहून शेवटी विचारलंच. “अगं काय हे, तुझं?” मी काही विचारणार तेवढ्यात तीनेच माझ्या डोळ्यातला प्रश्न ओळखला आणि तिने सांगितलं. “मलाही कळलंच नाही की, नेमकं काय काय घडलं आणि माझ्या आयुष्यातून तो अचानक कसा निघून गेला, आता मी नवीन नातं स्वीकारलं आहे. आम्ही तिघे खूप खुश आहोत आमच्या आयुष्यात. खूप गोष्टी मागे सोडून पुन्हा नव्याने सुरुवात केली. सुरुवातीला अवघड गेलं पण नंतर जमलं सगळं.” “ओह्ह sorry, मी विचारायलाच नको होतं. तुला दुखवायचं नव्हतं मला.” “अगं असं काही नाही, ठीक आहे. मला फारसं वाईट नाही वाटत आता कारण, मी ते सगळं विसरले आहे. बराच काळ स्वतःला त्रास करून घेत होते पण, आता नाही. माझा नवरा खूप छान आहे. माझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याला सगळं माहिती देखील आहे. कदाचित मी त्याच्याबरोबरही इतकी खुश राहिले नसते जेवढी आत्ता आहे.” मला खरं तर वाईट वाटलं कारण खरचंच तिचा खूप जीव होता त्याच्यावर. तिच्याशी बोलून घरी निघाले पण, त्याच सगळ्या आठवणी येत होत्या डोक्यात. खरं तर म्हणतात पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही पण, तिने समजून घेतलं परिस्थितीला, त्याला आणि स्वतःच्या आयुष्याला देखील. कितीतरी गोष्टी, आठवणी खरच आपण मागे सोडून पुढे निघून येतो, परत कधीच मागे वळून न बघण्यासाठी. सहज नवं स्वीकारतो आणि चालत राहतो, आनंदाने नव्या वाटा शोधत आणि त्या सापडतात देखील. वेळेलाही थोडा वेळ दिला की पुसटश्या होत जातात गोष्टी. कोत्याही दुःखाचं असो वा कोणत्या आठवणींचं असो, असंच असतं काळ सरला की, त्याचा प्रभाव कमी होतो आणि धुरकट झालेल्या चारी दिशा, हरवत चाललेल्या वाटा, निसटत चाललेली नाती, आणि शोधत असलेलं प्रेम पुन्हा एकदा नव्याने स्वच्छ दिसायला लागतं आणि, आपणही त्याच्याशी पुन्हा समरस होऊन जातो नव्याने सगळं अनुभवायला...किती छान आहे हे खरं. कधीच थांबल्यासारख वाटणार नाही, आयुष्यात सतत चांगले बदल होत राहणार, वाहत्या पाण्यासारखं स्वच्छंद वाटणार नेहमीच आणि, मनातला आणि चेहऱ्यावरचा आनंदही वारंवार सापडणार...

गाडी चालवत चालवत घरी पोहोचेपर्यंत एक कविता सुचली...
  
प्रेमाच्या क्षणांचा आनंद अन, मोकळ्या वाटा
त्याचा सहवास अंतरी अन, त्याच्याच वेगळ्या छटा
बावरले होते त्याच्याचसाठी, विसरून मला मी
सावरले होते त्याला मी, सावरून मला मी  
मी गुंतून राहिले, त्या विरघळणाऱ्या क्षणांमध्ये
तो मात्र थांबला नाही...
त्या जुन्या कोणत्याच आठवणींचा
हिशोबही आता उरला नाही.....

वेगळीच होते मी, आता ती गवसत नाही
सापडल्या कधी खुणा तरी, तशी मी मलाच आठवत नाही
सैरभैर होते कधी मन, माझेच मला समजत नाही
भावनेचा गुंता सोडवला तरी, काही कोडी सुटता सुटत नाही
वादळात धरला होता हात
पण, तो कधी बरोबर चालला नाही...
 त्या जुन्या कोणत्याच आठवणींचा
हिशोबही आता उरला नाही.....

एकटी ना कधी, संगे सदा सोबती
गप्पांच्या मैफिली अन, मैत्रीचे बंध हाती
वेगळे माझे बघणे, त्यानेच हेरले होते
बरोबरीने आम्ही कितीतरी, क्षण जगले होते
ओळखून माझे मन, जाणूनी ती घुसमट
तो कधीच काही बोलला नाही...
 त्या कोणत्याच आठवणींचा
हिशोबही आता उरला नाही.....

हातावरच्या बोलक्या रेषा, नाव त्याचेच सांगती
गालावरची खळी बोलकी, लाजून हळूच हसती
 त्याच्या डोळ्यात मी, प्रेम पहिले होते
त्याच्या मनातले नकळत मी, जाणिले होते
अर्ध्यावरती डाव सोडला त्याने
पण, तो रडला नाही...
 त्या कोणत्याच आठवणींचा
 हिशोब आता उरला नाही....

पुसटसे झाले क्षण, पाऊल अचानक वळले
नव्याने बंध जोडूनी, नवीन नाते जुळले
थबकला आज पुन्हा, येऊन माझ्या समोर
पाणावले डोळे त्याचे, त्याने चुकविली नजर...
प्रश्न ठेउनी गेला पुन्हा,
आजही मला तो कळला नाही
असो, तसंही त्या कोणत्याच आठवणींचा
हिशोब आता उरला नाही....



- अस्मिता कुलकर्णी

Share:

‘विशेष’ क्षण





       मी अमेरिकेत, मस्त एन्जॉय सुरु होता. सावनीचं लहानपण आणि अमेरिकेचं नवखेपण दोन्ही गोष्टी मनसोक्त अनुभवणं चालू होतं. सावनी तीन वर्षाची झाली होती. आम्ही जिथे राहत होतो तिथे सहा महिने बर्फ आणि थंडच असायचं त्यामुळे थंडीच्या दिवसात सावनीला मॉल मध्ये असलेल्या ‘प्ले-एरिया’ मधे न्यावं लागायचं. एकदा तिला ‘साऊथ हिल’ नावाच्या एका मॉल मध्ये आम्ही घेऊन गेलो होतो. ती तर एकदम खूष असायची. खूप मुलं मुली, खेळायला खूप गोष्टी, नुसत्या उड्या आणि धिंगाणा आई-बाबांना विसरून नुसता अखंड दंगा. मग फक्त लांबूनच लक्ष ठेवावे लागत. तिच्याबरोबरच इतर मुलांकडेही लक्ष जायचच. मुलांचा निरागसपणा, गोडवा, प्रत्येकाच्या वायानुसारचा समजूतदारपणा, स्वतः विचार करून काहीतरी वेगळ्याच कृतीतून रंगवलेल्या कल्पना हे सारं काही बघण्यात एक वेगळीच मौज असायची.

   मुलांची संख्या भरपूर, अगदी गोंधळ चालू होता. सगळ्यांकडे बघता बघता नजर एका मुलावर पडली साधारण चार वर्षाचा वाटत होता. एकाच जागी स्थिरावलेला, चेहऱ्यावर वेगळेच हावभाव, एक वेगळाच आवाजाचा टोन, वेगळ्याच हालचाली, फक्त एकटाच आईची आठवण काढणारा, म्हणजे आईशिवाय काहीच न करणारा. आजूबाजूला एवढी मुलांची गर्दी असूनही तो एकटाच होता त्याच्या स्वतःच्याच विश्वात. डोळे थबकले, विचार थांबले, सावनी सुद्धा दिसेनाशीच झाली. जगाच्या पाठीवर कुठेही जा हे एक जागतिक आणि नैसर्गिक सत्य आहे जे मी समोर बघत होते. मी भारतात असताना अशा मुलांबरोबर आणि त्यांच्या पालकांबरोबर नोकरीनिमित्त  खूप छान क्षण घालवले होते. त्यांच्यामुळे खूप गोष्टी शिकलेही होते. आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच पूर्ण बदलून गेला होता. स्वतःचीच नव्याने ओळख झाली होती. इथे आल्यापासून सावनीमुळे ह्या विषयी विचारच केला गेला नाही आणि आज अचानक हा समोर दिसला. खूप वाईट वाटलं, त्याच्या आईकडे बघितल्यावर जीवाची घालमेलही झाली. तिचं लक्ष इतर मुलांकडे जात होतं. इतर वेळेस ती नक्कीच कणखर असेल पण त्या क्षणाला तिचं जग किती थांबल्यासारखं झालं असेल, असं उगाच वाटून गेलं. अचानक सावनी दिसली आणि परत सगळं सुरु झाल्यासारखं वाटलं. मी सावनीकडे गेले तिला त्याला ‘हाय’ ‘हॅलो’ म्हणायला लावले. त्याच्याशी खेळायलाही लावले. मलाही छान वाटलं आणि त्याच्या आईलाही मोकळं वाटलं. तिच्या चेहऱ्यावर त्या काही क्षणापुरतं तरी समाधान दिसलं. थोडा वेळ थांबून बाय करून आम्ही निघालो त्याचे बाबा आले आणि तेही घरी निघाले.

    मला मनातून खूप छान वाटत होतं. त्याच्याकडे किंवा आईकडे बघून जर नुसतच वाईट वाटून घेतलं असतं तर त्यातून काहीच अर्थ निघाला नसता. फार वेळ नाही पण त्याच्याबरोबर काही क्षण खेळून, बोलून त्याच्या आणि आईच्या चेहऱ्यावर हास्य उमटवल्याचे समाधान वाटत होते आणि, महत्वाचं म्हणजे सावनीलाही ह्या सत्याची अजाणतेपणाने का असेना पण ओळख झाली याचे मला वाटलेले समाधान.

       विशेष मुलं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुलांमधे खूप प्रकार आहेत जसे की, ऑटिस्टिक, मतीमंद, डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, डिस्लेक्सिया, असे बऱ्याच प्रकारची मुलं आपल्याला आजूबाजूला सतत वावरतांना दिसत असतात.  अशा मुलांना समजून घेणं तसं फार सोपं असतं फक्त त्यांच्या नजरेतून, हालचालीतून त्यांना नेमकं काय सांगायचं आहे याचा विचार करून ते समजून घ्यावं लागतं. प्रत्येकामध्ये अशी एक तरी गोष्टं असते की, जी त्यांना खूप चांगल्या प्रकारे येत असते. त्यांना थोडसं प्रेम आणि वेळ दिला की ते आपल्याला अपोआप समजतच. एक सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांच्याकडे बघायला हवं. त्यांना मनापासून स्वीकारायला हवं. आपले काहीसेच क्षण का असेनात पण त्यांच्याबरोबर घालवायला हवेत. आपण जितके त्यांच्या सहवासात राहू, त्यांच्या जवळ राहू तितकीच त्यांची सुंदरता आपल्याला जवळून अनुभवायला मिळेल. विचित्र नजरेनी त्यांना फक्त बघण्यापेक्षा त्याच नजरेनी तू किती छान आहेस याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे त्यांच्या पालकांच्या मनातही त्यांच्या बद्दल काही आशेची किरणे निर्माण होतील.

        आपल्या मुलांनाही ह्या एका समजाच्या अविभाज्य घटकाची ओळख होईल आणि या मुलांबरोबरही छान मैत्रीचे नाते नक्कीच निर्माण होऊ शकते याची जाणीवही होईल.

                                                                                                                                                          
  अस्मिता कुलकर्णी

Share:

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या