लढा स्वतःशीच स्वतःचा (भाग -१)




अंगात लाल पांढरा शाळेचा ड्रेस घातलेला, केसाला लाल रंगाचा बेल्ट लावलेला, पाठीला दप्तर, गळ्यात वॉटरबॅग अडकवलेली, पायात काळे शूज, पांढरे मोजे अशी छान शाळेसाठी तयार झालेली श्रेया आपल्या आईचा म्हणजे प्रज्ञाचा हात पकडून रूममधून खाली आली, खाली आल्या आल्या तिने प्रज्ञाचा हात झटकला आणि तिच्या बाबाला म्हणजे, शंतनूला हाका मारत पळत सुटली.
“बाबा, ए बाबा अरे, कुठे आहेस तू? बाबा….”
प्रज्ञाही तिच्या मागे धावत होती.
“अगं काय झालं श्रेया? कशाला हवाय बाबा? आल्यावर भेटेल तुला तो, आत्ता कामात असेल तो.”
“थांब ग आई, माझं काम आहे ग त्याच्याकडे”
“बाबा, येना रे लवकर”
“अगं असं ओरडून बोलावू नकोस, थांब.”
खरं तर प्रज्ञाला शंतनूची काळजी वाटत होती की, श्रेयाचा असा आवाज ऐकून तो कशी प्रतिक्रिया देईल.
शंतनू बागकामात अगदी रमून गेला होता. नवीन कुंडीमध्ये नवीन रोपटं लावत तो गाणं गुणगुणत होता. हात सगळे चिखलाने माखलेले होते. ह्या वेळी त्याला कोणी बोलावणार नाही अशी खात्रीच  होती जणू त्याला पण, श्रेयाच्या हाका ऐकल्या आणि, त्याच्या काळजात धस्स झालं. मला परत भास तर नाही ना झाला, असा पुसटसा विचार त्याच्या मनात येऊन गेला. खरच आवाज येतोय का ह्याची त्याने दोन तीनदा खात्री करून घेतली, तर ती खरचच आवाज देत होती. श्रेया आत्ता मला का बोलावत असेल या भीतीने घाई घाई ने त्याने हात धुतले आणि जवळ ठेवलेल्या रुमालाला हात पुसत पुसत तो धावत श्रेयाजवळ आला.
प्रज्ञाने शंतनूला आलेलं बघितलं आणि त्याच्याकडे बघत जागीच थांबली. श्रेया त्याच्या जवळ गेली आणि त्याला मिठी मारली.
“अरे कुठे गेला होतास मी कधीची शोधतेय तुला.” असं जरा लटक्या रागातच ती त्याला म्हणाली.
“अगं मी बागेत होतो. ऐकूच नाही आला तुझा आवाज "
“तुझं माझ्याकडे लक्षच नसतं” अगदी मोठ्या ठसक्याने ती म्हणाली.
“काय झालं माझ्या सानुलीला ?
शंतनूकडे तिला पटेल असं कारण नव्हतच. त्याने आत्ताही तिला असंच सांगितलं की, “मी आत्ता बागकाम करतोय ना मग मला नाही जमणार. आई येतेय ना सोडवायला.”
“नाही मला आई नकोय, आज तूच हवा आहेस, तू कधीच येत नाहीस, आधी कसा आम्हाला शाळेत सोडायला येत होतास, घरी आल्यावर परत फिरायलाही घेऊन जात होतास. आपण कित्ती धम्माल करायचो.
“श्रेया, ऐक असं नको करूस मी येते सोडवायला तुला” प्रज्ञा पुन्हा एकदा समजूत काढत म्हणाली.
“नाही आई, मला आज बाबाच सोडायला येणार नाहीतर मी नाही जाणार शाळेत.” हाताची घडी घालून अगदी रुसूनच बोलली ती.
“बाबा, तुला माहितीये, तू घरी नव्हतास तेंव्हा मला खूप आठवण येत होती तुझी. मी आणि आई रोज तुझ्याबद्दल गप्पा मारायचो की, तू परत आल्यावर मला शाळेत सोडायला येशील, आता तर तू घरी पण आला आहेस मग तू येत का नाहीस? काय झालय तूला?

श्रेंयाचा प्रेमळ आग्रह ऐकून त्याला राहवेना. त्या आग्रहामागे तिच्या दृष्टीने किती महत्वाच्या भावना दडलेल्या होत्या त्या तिने बोलून दाखवल्या. प्रज्ञा नेहमीच त्याला सपोर्ट करत असे. तिनेही त्याला अनेकदा एकटा बाहेर जात जा, आता नक्की जमेल तुला असं म्हंटलं होतं. पण त्याची हिम्मत होत नव्हती. आजही शंतनू आणि प्रज्ञाची नजरा-नजर झाली. तिलाही असच वाटत होतं की, श्रेयाला आज त्यानेच सोडायला जावं. डोळ्यानेच ती शंतनूला धीर देत होती. खरं तर श्रेयाच्या हट्टामुळे आज तो पाघळला होता. त्याच्यात आधीसारखी हिम्मत आलीये असं त्याला क्षणभर वाटलही. पण, जमेल की, नाही ही भीती अजूनही घर करून होतीच. श्रेयाच्या बोलण्याने त्याला गहिवरून आलं आणि तिच्या प्रश्नाला काहीही उत्तर न देता तो त्याच्या रुममध्ये निघून गेला. प्रज्ञाने श्रेयाची कशी बशी समजूत काढली आणि ती तिला सोडवायला गेली. शंतनू खिडकीतून दिसणाऱ्या फुललेल्या गुलमोहराकडे बघत स्वतःला पुन्हा एकदा शोधण्याचा प्रयत्न करू लागला.

खरं तर शंतनू खूप मोठा बिजनेसमन होता. तसा वडिलोपार्जित व्यवसाय पण, त्याने अगदी जिद्दीने नव्या पद्धतीने तो खूप मोठा केला होता. रात्रंदिवस कष्ट केले. प्रज्ञाची ही त्याला साथ होतीच. ती देखील  ऑफिसमध्ये जात होती. वडीलही होते सुरुवतीला पण, आता वडीलांना आराम मिळावा आणि प्रज्ञालाही घरी मुलींची काळजी घ्यावी लागणार त्यामुळे त्याने स्वतःहूनच त्यांना सांगितले की, “मी करेल सगळं एकटा मॅनेज, तुम्ही काहीही काळजी करू नका” आणि, तो करतही होता. त्याला दोन मुली होत्या. सहा  वर्षाची श्रेया आणि नऊ वर्षाची प्रिया. शंतनूचे आई वडीलही तिथेच राहत होते. अशी एकदम आनंदी आणि परफेक्ट फमिली होती. शंतनू काम संभाळून घरी देखील वेळ देत असे. मुलींचे तर भरपूर लाड करायचा प्रत्येक शनिवारी ते सगळे ठरवून बाहेर फिरायला जात. तो आपल्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांशी देखील खूप आपुलकीने, सहकार्याने वागायचा त्यामुळे त्याच्याबद्दलचा लोकांचं मतही चांगलच होतं. खूप माणसं कमावली होती त्याने. मस्त टुमदार बंगला, बंगल्याच्या बाजूला बगीचा, गाडी, घरात नोकरही होते. त्यांनाही तो कधी कमी लेखत नसत. त्यांच्या अडचणींमध्ये तो त्यांना नेहमी मदत करत असत. त्यांच्या दृष्टीने तो देवमाणूस होता. एकंदर काय तर सगळं कसं अगदी दृष्ट लागण्यासारखं होतं.




क्रमशः
भाग २ वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

अस्मिता कुलकर्णी 


Share:

0 comments:

Post a Comment

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या