भाग - ३ वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

खूप समजावून देखील शंतनू वेगळंच वागत होता. गेल्या दोन महिन्यापासून शंतनूच्या
वागण्यात खूपच बदल झाला होता. कशातच लक्ष नसायचं. family डॉक्टर च्या चकरा वाढल्या होत्या. शारीरिक दृष्ट्या तो तसा व्यवस्थित होता पण, नीट बोलत नव्हता, मनापासून हसत नव्हता, झोप व्यवस्थीत
नव्हती, एक तर खूप जेवायचा नाहीतर भूक नाहीये म्हणायचा.
त्यामुळे तब्येतीवर परिणाम झालाच होता. त्याचा चेहराही पूर्ण सुकला होता. वरचे वर
बऱ्याच गोष्टी वाढत चालल्या होत्या. डॉक्टरांनी नकळत प्रज्ञाला मानसोपचाराचा सल्ला
सुचवलाही होता पण, तीला खात्री वाटत
होती की, शंतनू लवकर यातून बाहेर पडेल. त्यासाठी सगळेच
नेहमी प्रयत्नात असायचे. आवर्जून त्याच्याशी बोलत, त्याच्या आवडीचं जेवण करत, मुलीही आजूबाजूला
सतत त्याला आवडत्या गोष्टी करत, घराबाहेर असलेल्या
गार्डन मध्ये फिरवून आणत. चार महिने झाले पण शंतनूमध्ये फारसा फरक झाला नव्हता.
उलट गोष्टी वाढतच चालल्या होत्या. शंतनूची आई खूप खचली होती. तिला शंतनूची वाटणारी
काळजी लपवता येत नव्हती. बाबांनी मात्र परिस्थितीशी चांगलाच झगडा सुरु ठेवला होता.
प्रज्ञाने आणि शंतनूच्या बाबांनी जमेल तशी ऑफिस ची जबाबदारी घ्यायला सुरुवात
केली होती. प्रज्ञा शंतनू बरोबर ठामपणे उभी होती. घरातले, ऑफिसमधले त्याचे सगळेच मित्र त्याला खूप समजून
घेत होते, धीर देत होते, त्याची काळजीही घेत होते.
शंतनू कधी-कधी अचानक घाबरल्यासारखा वागायचा, दिवस दिवस रूममध्येच बसून रहायचा. तर, कधी स्वतःशीच
काहीतरी पुटपुटत बसायचा. असा शंतनू आपल्याला कधी बघायला मिळेल असं स्वप्नातही
कुणाला वाटलं नसेल. एका छानशा पझल चा तुकडा हरवल्यावर त्यातली रिकामी जागा कशी
डोळ्यांना लगेच जाणवते, अगदी तसच ह्या
कुटुंबाकडे बघितल्यावर जाणवू लागलं होतं. शंतनू तसाच झाला होता, असून नसल्यासारखा. हे बघून मुलींना देखील खूप
वाईट वाटायचं. छोटी तर असंख्य प्रश्न विचारायची, तीला उत्तर देता देता घरातले अजूनच खचून जात पण, त्यांनी कधीही शंतनूला जाणवू दिले नाही, त्याच्यासमोर साधे अश्रू देखील काढले नाहीत. त्याच्या
अपरोक्ष मात्र कितीतरी रात्री त्यांच्या जागरण करून, रडण्यात गेल्या असतील.
एकदा शंतनू गॅलरीत बसला होता त्याचा मित्रही त्याच्या सोबत होता. संध्याकाळची
वेळ होती.काही मुलंही खाली खेळताना दिसत होती. सगळे आजोबा लोकं खाली ग्रुप करून
सहज गप्पा मारत होते. मित्र शंतनूशी बोलत होता पण त्याचं त्याच्याकडे लक्षच
नव्हतं. शंतनू चं सगळं लक्ष खाली असलेल्या त्या ग्रुपकडेच जात होतं. त्यांचा आवाज
त्यांचं हसणं त्याला खटकत होतं. त्याला असा संशय येत होता की, ते आपल्याबद्दल आपल्या कंपनीबद्दल बोलत आहेत. आपली टर उडवत आहेत. त्याने ऐकलं ऐकलं आणि अचानक उठला, त्यांच्याकडे हात करू करू मोठ्याने बोलायला लागला “मलाच हसत आहात ना तुम्ही? तुम्ही माझ्याविषयी का बोलत आहात? कंपनीला काही करू नका. तुम्ही कितीही प्लान
केला तरी कंपनीला काही नाही होणार. बघून घेईल मी तुम्हाला, बघून घेईल एकेकाला” असं खूप काही बोलायला
लागला. मित्राने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, आवाज ऐकून कसा बसा पटपट जिना चढून प्रज्ञाही वर
आली. आणि शंतनूचे बाबा त्या आजोबांकडे शंतनू तर्फे माफी मागण्यासाठी गेले. प्रज्ञाने
आणि शंतनूच्या मित्राने मिळून त्याला अगदी ओढत ओढत खोलीत आणले तरी त्याची अखंड
बडबड चालूच होती. शेवटी पाणी आणि डॉक्टरांनी दिलेली एक गोळी देऊन त्याला शांत केले
त्याचे हातवारे अजूनही सुरूच होते. त्याला हळू हळू झोप लागली तेंव्हा कुठे तो शांत
झाला. प्रज्ञाच्या जीवात जीव आला.
घराबरोबर बाहेरही त्याच्या वागण्याचा परिणाम जाणवायला लागला होता. ह्या
कृतीमुळे शंतनूच्या बाबांना खूपच वाईट वाटले होते. सगळ्यांशी प्रेमाने, आदराने बोलणाऱ्या माझ्या मुलाची अवस्था अशी का
केलीस रे ? असा देवाला त्यांचा नेहमी प्रश्न असायचा.
हातातल्या ओंजळीतल पाणी जसं निसटून
जावं तसं खूप प्रयत्न करूनही तो हळू हळू सगळ्यांपासून लांब चालला होता.
प्रज्ञासाठी तर हे एक वाईट स्वप्नच होतं. कोणीतरी झोपेतून जागं करावं आणि सगळं
काही आधीसारख व्हावं असं तिला कित्येक वेळा वाटायचं. खरं तर तीची झोपच उडाली होती.
एकमेकांबरोबर घालवलेल्या कित्येक क्षणांबद्दल ती त्याच्याशी सतत बोलायची, हातात हात घेऊन तासन तास त्याच्याजवळ बसून
राहायची. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला खूप आवडतोस
आणि तू सगळं छान करशील असा मला पूर्ण विश्वास आहे. असे त्याला ती वारंवार बोलून
दाखवायची. पण शंतनूची म्हणावी तशी प्रतिक्रिया येत नव्हती.
कंपनी तशी नावाजली होतीच त्यामुळे मीडियाही पाठ सोडत नव्हती. त्यांनाही उत्तरं
देता देता खूप त्रास होत होता. नातेवाईकांमध्ये देखील चर्चा, काळजीनेच का असेना पण सारखे फोन, भेटायला येणं हे चालूच असायचं. त्यात पुन्हा
सगळ्यांची वेगवेगळी मतं सगळं सावरता सावरता अजूनच बिघडत चाललं होतं.
एक दिवस असंच सगळे आवरून आपापल्या खोलीत झोपायला गेले. मध्यरात्रीचे दोन वाजले होते. सगळे गाढ झोपेत
होते. शंतनूला अचानक जाग आली आणि तो घाईने उठून पळत-पळत खाली हॉल मध्ये फोनजवळ
गेला, घरातले लाईट्स बंद होते पण, तरी तो अचूक जिन्याच्या पायऱ्या उतरून फोनजवळ
पोहोचला. फोन उचलून बोलू लागला. प्रज्ञाही त्याच्या मागे धावत गेली. तो काय करतोय
हे प्रज्ञा हळूच जिन्यात उभा राहूनच लपून बघत होती. तो अगदी पहिल्यासारखा म्हणजे
कंपनीत होता तसाच बोलत होता फोनवर. तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. सगळे आधीचेच दिवस
सरकन तिच्या डोळ्यासमोरून गेले. कित्येक दिवस झाले त्याचं असं बोलणं तिने ऐकलच
नव्हतं. तिने अजून कान देऊन ऐकलं तिला वाटलं तिलाच भास झाला की काय, तो जणू क्लाइंट ला कन्व्हिन्स करतोय असंच बोलत होता. आमची कंपनी तुमच्या साठी
किती महत्वाची आहे हे त्यांना पटवून देत होता. त्याचा चेहरा त्या क्षणासाठी इतका
खुलला की, जसं काही क्लाइंट कन्व्हिन्स झाला होता. तो खुश होऊन “थँक्यू” म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. तो पुन्हा रुममध्ये गेला. प्रज्ञा त्याचा फोन
ठेवल्या ठेवल्या जीन्यातूनच हळूच परत रुममध्ये गेली. रुममध्ये गेल्यावर शंतनू
स्वतःशीच पण प्रज्ञाला सांगतोय अशा पद्धतीने त त पं पं करत
मोडक्या भाषेतच बोलला “अगं प्रज्ञा, ते..मी.. चा क्लाइंट कॉल होता. शेवटी मी
त्याला कन्व्हिन्स केलंच, केलं मी त्याला कन्व्हिन्स..मिळाली आपल्याला order.” दोन तीनदा तेच तेच वाक्य बोलत बोलत तो बेडवर आडवा
झाला. आता मात्र प्रज्ञा पूर्ण हादरली होती कारण, खरं तर फोन दोन दिवसांपासून बंदच पडला होता. शंतनूला भास झाला होता. शंतनू
मुळे आधीपासूनच प्रज्ञा रात्र रात्र जागीच असायची. आता प्रज्ञाच्या काळजीत आणखीनच
भर पडली होती. ती पार कोलमडून गेली.
यानंतरही शंतनूला बरेचदा दार वाजतय, कोणीतरी हाका
मारतंय असे दोन-तीनदा भास झाले होते.
आता मात्र सगळे परिस्थितीसमोर हरत चालले होते. कंपनीत जाणं बंद होऊन आता
जवळ-जवळ सात महिने झाले होते. शंतनू खूप खराब झाला होता. दाढी वाढली होती, नखं वाढले होते. प्रज्ञालाही तो काही करू देत
नव्हता. जेवण नाही, झोप नाही, स्वच्छता टापटीपपणा नाही. सगळच बिघडलं होतं.
असा अनोळखी बनला होता शंतनू. शंतनू जेवत नव्हताच पण प्रज्ञा रोजच त्याला आग्रहाने
खाऊ घालायची. असच ती एकदा खाऊ घालत असताना शंतनूने अचानक ताटाकडे बघितले आणि
त्याला काय वाटले कोणास ठाऊक त्याने ते ताट भिरकावून लावले सगळे अन्न सांडले. “मला
नको, मला नको,” असं म्हणून शंतनू
रडायलाच लागला. प्रज्ञालाही हे सगळं बघून खुप वाईट वाटले तिने हुंदका गिळला आणि
तिथलं सगळं आवरून शंतनूला शांत करून त्याला बेडवर झोपवलं आणि, ती खाली गेली. आता तिला रहावलं नाही. ती
स्वयंपाक घरात गेली ओट्यावर ताट ठेवलं आणि ढसा ढसा रडली. तीला त्याच्याच मिठीत
जाऊन मोकळं व्हावसं वाटत होतं. पण ते तर आता शक्यच नव्हतं. बऱ्याच वेळा नंतर तिने
स्वतःला सावरलं आणि, तिने मनाशी एक
निश्चय केला. थोडा गेला असेल लांब पण, मी चालेल
त्याच्यासाठी तिथपर्यंत. गोंधळला असेल धावपळीत, मी सावरेल त्याला.. मी परत आणेल त्याच्या चेहऱ्यावरच हसणं. हातात हात घट्ट
धरून शिकवेन पुन्हा नव्याने जगणं. माझा शंतनू जसा होता तसाच मला परत हवा आहे.
आम्हाला सगळ्यांना तो तसाच हवा आहे. असं म्हणून तिने डोळे पुसले आणि तेंव्हा ती जे
रडली होती ते शेवटचं.
उगवत्या सूर्याबरोबर नवीन आशा घेऊन
प्रज्ञाही उठली. आज तिने पुण्यातल्याच एका संस्थेत डॉक्टर शिवार म्हणून एक मानसोपचारतज्ञ होत्या, त्यांची उद्याची अपॉईंटमेंट घेतली. खूप सकारात्मक विचार करून चेहऱ्यावर एक वेगळीच अशा ठेऊन आज दिवसभर ती
वावरत होती. आजचा दिवस कधी संपतोय असं तिला झालं होतं.
पुढचा दिवस उगवला. प्रज्ञाने भर
भर सगळं आवरलं आणि ती बाहेर पडली. विचार करत करत मनाची तयारी करत ती कशी बशी
संस्थेत पोहोचली. मनात धाकधूक आणि टेन्शन घेऊन डॉक्टरांच्या केबिनपाशी
पोहोचली. ती आतून घाबरली होती, तिला घाम फुटला
होता. तिचे पाय देखील घुटमळत होते. पण तिचा निश्चय तिला हे सगळं करायला भाग पाडत
होता. ती आत शिरली. डॉक्टरांनी तिला बसायला सांगितले. थरथरत्या हातानी तिने टेबलावरचा
ग्लास उचलला आणि एका दमात सगळं पाणी प्यायली. डॉक्टरांनी तीला शांत केले.
“अगं बिनधास्त बोल, इतकी घाबरून जाऊ
नकोस.”
“हो पण, मला कुठून सुरुवात करावी तेच समजत नाहीये.”
“सगळ्यात पहिले मला सांग नेमका काय प्रॉब्लेम आहे?”
“तेच तर समजत नाहीये, तुमचा सल्ला हवा
होता.”
“कोणाच्या बाबतीत? काय झालय नेमकं? मोकळेपणाने सांग.”
“माझे मिस्टर शंतनू, खूप हुशार, कर्तबगार, टापटीप सगळ्यांना
समजावून घेणारा आहे पण, गेल्या काही
महिन्यांपासून तो पूर्ण बदलून गेलाय बोलत नाही जेवत नाही ऑफिस तर त्याला खूप प्रिय
होतं पण त्याचं ऑफिसला जाणही बंद झालं आहे. स्वतःकडे अजिबात लक्ष नसतं स्वच्छता
नाही. सगळच अवघड होत चाललंय.”
“मला सांग प्रज्ञा ऑफिसमध्ये काही टेन्शन्स होते का?”
“हो, कंपनीला खूप मोठा लॉस झालाय आमच्या.”
“ओके किती दिवस झाले ह्या गोष्टीला?”
“सहा महिने होऊन गेले, सुरुवातीला वाटायचं
की, तो पडेल यातून बाहेर पण, परिस्थती वरचे वर बिघडायलाच लागली. आता मात्र
तो पूर्ण हरवत चाललाय. मनाशीच बोलत असतो. कसले तरी भास देखील होतात सारखे.”
प्रज्ञाला आता स्वतःला आवरता येत नव्हते, त्याचा चेहरा आठवून
आठवून तिला अजूनच भरून येत होतं.
“प्लीज डॉक्टर माझ्या शंतनूला बरं
करा तुम्ही म्हणाल तसं मी करेन, त्याची काळजी
घेईल.”
“रडू नकोस, तुझं त्याच्या बरोबर ठामपणे उभा असणं हे खूप
महत्वाचे आहे.”
डॉक्टरांनी प्रज्ञाच्या पाठीवरून हात फिरवत तीला आधार दिला आणि शांत केले.
प्रज्ञाला एक आन्सर शीट भरायला दिली. अजून बरीच माहिती तिच्याकडून विचारून घेतली.
त्यावरून त्यांना अंदाज आलाच की, प्रॉब्लेम तर
नक्कीच आहे.
“मिस प्रज्ञा, एकंदर पाहता मला
असं वाटतय की, लवकरात लवकर तुझ्या मिस्टरांना इथे घेऊन येणं
खूप गरजेचे आहे. नाहीतर हातातून वेळ निघून जाईल.”
“म्हणजे खूप काही सिरीयस झालंय का शंतनू ला? तो बरा होईल ना?”
“खरं सांगायचं तर हो सिरीयसच आहे पण, तो यातूनही बरा होऊ
शकतो. ती काळजी तू करू नकोस मी नक्की त्याला यातून बाहेर काढेल पण, लवकरात लवकर त्याला इथे घेऊन ये.”
प्रज्ञाच्या डोक्यात खूप विचार सुरु झाले होते. पाऊल तर उचलले होते. पण पुढे
जायचं कसं हे तीला या क्षणी सुधरत नव्हतं.
“प्रज्ञा मी तुला अंधारात ठेऊ इच्छित नाही कारण, सगळ्यात महत्वाचा सपोर्ट तुझाच असणार आहे. त्यामुळे तुला सगळंच माहिती असणं
खूप महत्वाचं आहे. तू सांगितल्याप्रमाणे आणि ह्या लिहिलेल्या आन्सर शीट वरून सगळी
लक्षणं स्कीझोफ्रेनियाची वाटत आहेत.”
प्रज्ञाच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह दिसत होते. शंतनूच्या बाबतीत असं होऊ
शकतं ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिचे हात पाय गळून गेले. डॉक्टरांनी तिला ह्या आजाराविषयी सगळी
माहिती सांगितली.
“तरी तू घेऊन ये मग, पुढे काय ते आपण ठरवू.”
“ डॉक्टर
मला खूप भीती वाटतेय, टेन्शन येतंय.”
“अगं घाबरू नकोस, खरं तर मी तुझ्या हीम्मतीला
सलाम करते की, तू हा निर्णय घेऊन इथपर्यंत आलीस. तू नेहमीच
त्याच्या बरोबर आहेस. तुझ्या कर्तव्यात तू कुठेही कमी पडली नाहीस. मला खरं तर
अभिमान वाटतोय तुझा. अशीच ठामपणे उभी रहा. सामोरे जा, सगळं छान होईल आणि, काळजी करू नकोस मी आहेच.”
सगळी हिम्मत एकवटून आणि मोठ्ठा सुस्कारा सोडून प्रज्ञा तयार झाली.
“ठीक आहे डॉक्टर मी घेऊन येईल शंतनूला, “थँक्यू”
प्रज्ञा तिथून हो म्हणून बाहेर पडली खरी पण, पूढे तीला काहीच सुचत नव्हते.
आई बाबांना काय सांगायचं? मुलींना कसं
समजवायचं? महत्वाचं म्हणजे शांतनूलाच कसं सांगू की, तुला असं काही झालय. बापरे!! किती अवघड आहे हे.
त्याच्या मित्राला सांगायला सांगू का? नको नको त्याला
नाही आवडणार. नाहीतर स्मिता मावशींना सांगू दे का? नको त्या उगाच बाऊ करतील. मग दादाला? नकोच आई बाबा सगळेच
टेन्शन मध्ये येतील. काय करू? काय करू?
असं स्वतःशीच झगडणं चालू होतं प्रज्ञाच. चालता चालता एका मंदिरात ती शिरली.
शेवटी श्रद्धेने गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि, थोडसं बळ दे आणि आमच्या पाठीशी रहा कायम असा आशीर्वाद मागितला.शेवटी प्रज्ञाने
ठरवलं की, मीच स्वतः बोलणार सगळ्यांशी.
अस्मिता कुलकर्णी
0 comments:
Post a Comment