लढा स्वतःशीच स्वतःचा (भाग -२)

शंतनूने खूप छान पद्धतीने सगळाच भार सांभाळला होता. घर आणि बिजनेस दोन वेगवेगळी पण महत्वाची दोन विश्व होती त्याच्यासाठी. जीव ओतून काम करायचा आणि घरच्यांना खूप जीव लावायचा. बिजनेस चे सुरुवातीचे काही दिवस खडतरच होते. प्रज्ञा त्याच्या आयुष्यात आली आणि त्याची हिम्मतच वाढली. बिजनेस देखील वाढला. त्याचं एकंदर व्यक्तिमत्व बघितलं तर खूप जिद्दी, भरभरून आत्मविश्वास, मोकळ्या स्वभावाचा, आणि अगदीच सरळ मार्गी असं होतं. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणूनही त्याची ओळख होती. नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या कंपनीसाठी कसा करून घेता येईल ह्यासाठी त्याचे प्रयत्न असायचे. ऑर्डर मिळवण्यासाठी कोणाला कन्व्हेन्स करायचं असेल तर ते त्याला अगदीच सहज शक्य असायचं. स्टाफ म्हणजे त्याचे सगे सोयरेच होते जणू. प्रेमाने वागत त्यांच्याशी त्यामुळे स्टाफ ने देखील कोणतीही तक्रार न करता नेहमीच मन लावून काम केले. त्यांच्या विश्वासावर कितीतरी प्रोजेक्ट त्याने चुटकीसरशी पूर्ण केले होते.  
यारी दोस्ती तर होतीच खूप मित्रांचा गोतावळा होता. त्यांच्यातही रमायला आवडायचं त्याला. मित्रांनाही प्रत्येक वेळेस मदतीसाठी धावून जायचा. पैश्याच्या स्वरुपात असू दे अथवा शारीरिक, मानसिक कोणत्याही पद्धतीने जमेल तशी मदत करायचाच. पुढे पहिली मुलगी झाली आणि बिजनेस ने चांगलाच जोर धरला. प्रियाच्या म्हणजेच ह्या मुलीच्या पायगुणानेच हे झालं असं आज्जी-आजोबांचं पक्क मत होतं. शंतनू आणि प्रज्ञाचा आई-बाबांवर प्रचंड विश्वास होता. सगळ्यांचाच एकमेकांवर खूप विश्वास आणि जीवापाड प्रेम होतं अगदी “एक दुसरेसे करते हे प्यार हम, एक दुसरेके लिये बेकरार हम.” सारखं. प्रज्ञाच्या घरच्यांना देखील  जावईबापुंबद्दल भारी अभिमान होता. “लाखात एक जावई मिळाला हो आम्हाला” असं अगदी नेहमीच कौतूक चालायचं. शंतनूची आत्या जवळच रहात होती, तिचाही तो अतिशय लाडका होता. दुसरी मुलगी श्रेया त्यांच्या आयुष्यात आली आणि त्यांचं कुटुंब पूर्ण झालं. सगळ्यांशी अगदी गोड बोलायचा, मिसळून जायचा प्रत्येकामध्ये.
 त्याचं काम जोरदारच चालू होतं. बघायला गेलं तर  आत्ताची बाहेरची परिस्थिती बघता खूपच स्पर्धा वाढत  होती. शंतनूची खूप धावपळही होत होती. कामाचं प्रेशरही खूप होतं. कंपनी वाढवण्यासाठी त्याने लोन देखील काढलं होतं. आपल्या कंपनीला सगळ्यात बेस्ट कंपनी म्हणून अवॉर्ड मिळवून द्यायचं असं त्याचं स्वप्न होतं. तसं सगळं मॅनेज करणं जरासं अवघड वाटायला लागलं होतं. कामं मिळवण्यासाठी खूप खटपट करावी लागत होती. पण त्याने एका शब्दानेही कधीही तक्रार केली नाही. तो हिमतीने सगळ्या गोष्टींना सामोरं जात होता. घरी कोणाला त्रास नको म्हणून यातलं तो घरीही काही सांगत नसे. खरं तर ऑफिस आणि घर हे काही केल्या एकत्र झालं नाही पाहिजे, त्याचा परिणाम नात्यांवर, घरातल्या छोट्या छोट्या आनंदावर होऊ शकतो अशी त्याच्या वडिलांची शिकवण होती. तो ती मनापसून जपत होता. घर आणि कंपनी दोन्ही अगदी छान बघत होता.
शंतनूला टापटीप राहणं खूप आवडायचं. एक दिवस रोजप्रमाणे सगळं आवरून तो ऑफिसमध्ये पोहोचला. प्रसन्न चेहऱ्याने त्याने सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं आणि तो केबिनमध्ये पोहोचला. सेक्रेटरीला इंटरकॉम करून आजच्या मिटींग्स बद्दल चर्चा केली. रोजप्रमाणे लॅपटॉप उघडून तो सगळे मेल चेक करत होता. त्याला त्याच्या एका जुन्या Client चा मेल दिसला. जो की, प्रत्येक ऑर्डर शंतनूच्याच ऑफिसला देत. आता ती  ऑर्डर दुसऱ्या कंपनीला देणार होता. तसं त्यांनी आधीच बोलता बोलता अंदाज दिलाच होता पण, इतक्या लवकर होईल असं त्याला वाटलंच नव्हतं. खूप मोठी होती ऑर्डर ती शंतनूसाठी आणि, तिच आता हातातून जाणार ह्या गोष्टीमुळे तो खूपच घाबरला, टेन्शन मध्ये आला. दिवसभराचे काम कसेबसे संपवून तो घरी आला. त्याच्या डोक्यातून तो मेल जाता जात नव्हता. प्रत्येक शब्द डोळ्यासमोरून जात होता.
घरी आल्यावर श्रेया आणि प्रिया दोघीही नेहमीसारख्या बाबा बाबा करत आल्या.
“हे बघ बाबा, आम्ही आज काय काय बनवलंय”
“काय बनवलंय?
तो उसनं अवसान आणून बोलतोय हे प्रज्ञाच्या लगेच लक्षात आलं.
तरीपण “छानच आहे की,” असं म्हणून तो त्याच्या रुममध्ये गेला. मागोमाग प्रज्ञाही गेली.
“काय झालं शंतनू?
“अगं कुठे काय, काही नाही झालं”
“मग असं लगेच वर का निघून आलास?
“अगं, ते... जरा जास्तीच काम होतं आज. थकलोय जरासा.”
“नक्की सांगतो आहेस ना?
“हो ग नक्की.”
असं म्हणता म्हणता तो परत खाली निघून गेला.
शंतनूची आई सगळ्यांना जेवायला बोलावत होती. सगळे जेवायला बसले. शंतनूचं फारसं लक्ष नव्हतं पण, ते कोणाच्याही लक्षात येऊ नये याची तो पुरेपूर काळजी घेत होता.पण, प्रज्ञाच्या नजरेतून ते चुकणारं नव्हतं. शंतनूच्या वडिलांनीही काळजीपोटी आणि स्वानुभवानुसार त्याला विचारलं काही काळजी करण्यासारखं तर नाही ना? त्यांनाही “नाही बाबा काही नाही” असं म्हणून शंतनुने बोलणं टाळलं. सगळे जेवण करून आपापल्या रूममध्ये गेले. प्रज्ञाने दोन्ही मुलींना झोपवले आणि परत शंतनूला प्रश्न केला,
“मला वाटत नाही सगळं ठीक आहे असं, खरं सांगशील का काय झालंय ?
पुन्हा तेच उत्तर देऊन तो झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर त्याने त्या क्लायंट ला संपर्क करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण त्याला काहीच response मिळत नव्हता. त्याला धक्का बसलाच होता कारण सगळं व्यवस्थित असून ऑर्डर का काढून घेतली असेल? हा प्रश्न डोक्यातून जाता जात नव्हता. शेवटी दोन तीन दिवसानंतर त्याला समजले की, दुसऱ्या कंपनीने त्यांना चांगले प्रलोभन दाखवून ती स्वतःकडे ऑर्डर घेतली होती.
खरे कारण समजल्यावर त्याच्या जीवात जीव आला कारण त्याच्याकडून अशी काहीच चूक झाली नव्हती. पण प्रलोभनं दाखवून तो कामही करू शकत नव्हता. त्याच्या तत्वात ते बसत नव्हतं. त्याचे खरं तर खूप मोठे नुकसान झाले होते. तरी तो परिस्थितीशी लढत होता. कसंही करून हे पोकळी भरून काढणारच असा त्याचा विश्वास होता. तो खरचच त्या धक्क्यातून सावरला. त्याने खूप कष्ट करून पुन्हा सगळं व्यवस्थीत करून स्पर्धेत उभा राहीला.


Share:

2 comments:

  1. Wynn Casino, Las Vegas, NV - MapYRO
    Find 제천 출장샵 Wynn Casino, Las Vegas, 나주 출장샵 NV, 여수 출장마사지 United States, United States, photos, map, street 경기도 출장마사지 view and road conditions - with real-time driving 문경 출장안마 directions to

    ReplyDelete

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या