लढा स्वतःशीच स्वतःचा (भाग -५)

भाग - ४ वाचण्यासाठी  इथे क्लिक करा


प्रज्ञा घरी पोहोचली. आई बाबा हॉल मध्येच खुर्चीवर बसले होते. शंतनू त्याच्या रुममध्येच होता. प्रज्ञाला आलेली पाहून घाई घाईने काळजीने आईंनी विचारलं,
 “अगं काय कुठे गेली होतीस सकाळी सकाळी न सांगताच?
“आई..ते,....अं ....”
“काय झालंय प्रज्ञा?” बाबांनीही विचारलं.
“काही नाही जरा महत्वाचं काम होतं म्हणून गेले होते.”
प्रज्ञाची खरं तर हिम्मत झाली नाही. हात-पाय थरथरत होते, डोळ्यांमधून अपोआप पाणी येत होते. रुममध्ये गेली, आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःलाच ठणकावून सांगू लागली. “तूच करणार आहेस सगळं व्यवस्थीत, आणि तुला ते जमेलच. शंतनूच्या आयुष्यात मला पुन्हा नव्याने रंग भरायचे आहेत त्यामुळे मी प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाणार.” अशा स्व-सुचना देऊन, डोळे पुसून चेहरा स्वच्छ धुतला आणि तोंड पुसत पुसत हॉलमध्ये आई बाबांजवळ येऊन बसली.
बाबांच्या लक्षात आलं की, प्रज्ञाला काहीतरी सांगायचं आहे. “बोल बाळा काय झालय?” बाबा प्रज्ञाला म्हणाले. आजूबाजूला कोणी नाहीये ना याची तिने खात्री करून घेतली आणि, तीने बोलायला सुरुवात केली.
“आई-बाबा, मी एका मानसोपचार केंद्रात गेले होते.”
“काय?
आई बाबा दोघेही गोंधळले. तसा शंतनूच्या वागण्याचा त्यांना अंदाज आलाच होता. पण याही  गोष्टीला सामोरे जावे लागेल असं त्यांना वाटलं नव्हतं. वयोमानानुसार त्याच्यात ती ताकदही नव्हती.
“हो, मी भेटले तिथल्या डॉक्टरांना. शंतनू बद्दल सगळं सांगितलं. त्यांनाही अंदाज आला आहे पण,शंतनूला चेक केल्याशिवाय कुठलाच निर्णय घेता येणार नाही असं त्या म्हणाल्या.”
आईच्या डोळ्यातून घळा घळा अश्रूंच्या धारा वहायला लागल्या. सत्याची जाणीव त्यांना होती पण हे सत्य असं काही वळण घेईल असं त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. शंतनूच बालपण सरकन आईंच्या  डोळ्यासमोरून गेलं. त्यांना राहवेना, त्या खूप अस्वस्थ झाल्या.
प्रज्ञा त्यांच्या जवळ गेली त्यांना कुशीत घेऊन पाठीवरून हात फिरवत म्हणाली,
“आई शांत व्हा तुम्ही मला तरी कोणाचा आधार आहे? आपणच आहोत एकमेकांसाठी. आपला शंतनू आपल्याला आधीसारखा परत हवा असेल आणि हे सगळं घडतंय ते पुसून टाकून पुन्हा नव्याने सुरुवात करायची असेल तर आत्ता ह्या प्रसंगाला सामोरे जावेच लागेल. आपण खूप प्रयत्न करू, सगळं छान आधीसारखं  करू. फक्त तुम्ही बरोबर रहा. माझ्यावर विश्वास ठेवा.”

“हो गं प्रज्ञा आमचा तुझ्यावर विश्वास आहेच शंतनू काय आणि तू काय आमची मुलंच आहात. खरं तर मला तुझा अभिमान वाटतो बेटा ज्या पद्धतीने तू सगळं सांभाळत आहेस ते खरच कौतुकास्पद आहे. आम्ही आहोत तुझ्या बरोबर तू फक्त सांग काय करायचं ते.”
बाबांचं हे बोलणं ऐकून प्रज्ञाला चांगलाच धीर आला. तिची हिम्मत वाढली. आईंनीही तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला आता आईची कुशी दिली आणि, आम्ही आहोत अशी जाणीवही. मुलींनाही ही गोष्टं समजावली पण,त्यांना त्यांच्या दृष्टीने ही गोष्टं आत्ता इतकी मोठी वाटली नाही “दवाखान्यात तर, नेऊन आणायचं ना मग, त्यात काय एवढं” अशी काहीशी प्रतिक्रिया होती त्यांची. प्रज्ञालाही आत्ता त्यांना ह्यापेक्षा जास्ती काही समजावून सांगण्याची गरज वाटली नाही.
आता समोर दिसत होता तो शंतनू. ह्याला कसं समजावून सांगू? त्या रात्री ती काहीही बोलू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्याच बागेत शंतनूला फिरवण्यासाठी घेऊन गेली. शंतनू आणि प्रज्ञाने मिळून लावलेलं एक रोपटं अतिशय सुंदर झालं होतं. ती कुंडी देखील त्या दोघांनी रंगवलेली होती. प्रज्ञाने ती कुंडी शंतनूला दिसणार नाही अशी लपवून ठेवली आणि त्यासारखीच साधारण दिसणारी कुंडी तिथे ठेऊन ती फोडून अस्ताव्यस्त करून ठेवली होती. शंतनूच्या फारशा गोष्टी लक्षात येत नसत पण एवढ्यात त्याला बागेत फिरायला नेलं की, त्याच्याकडून झाडांना पाणी घालून घेण्याचं काम प्रज्ञा करत. आजही तो त्या कुंडीजवळ आला आणि पाणी घालायला लागला तर त्याच्या लक्षात आले की, त्यात रोपटं नाहीचे आणि कुंडीही खराब झालीये. तो गडबडला कशी प्रतिक्रिया द्यावी ते समजेना पण काहीतरी वेगळं वाटतंय असं त्याला जाणवलं. बैचेन झाला, ओरडायला लागला. प्रज्ञाने लगेच त्याला शांत केले आणि ती कुंडी त्याच्या समोर आणून ती प्लास्टर ऑफ पॅरिस जोडली. त्यात माती भारली आणि एक छोटंसं रोपटं त्या कुंडीत खोचलं. ती तशीच्या तशी बघीतल्यानंतर तो हळू हळू शांत झाला. ह्याचाच आधार घेऊन तिने शंतनूला खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. तसं त्यालाही फारसं समजत नव्हतं की, आपण कुठे जाणार आहोत? कशासाठी आहोत? पण एका दृष्टीने त्यालाही ही गोष्टं माहिती असणे महत्वाचे होते.
सगळी तयारी झाली शंतनूच्या मित्राला सिद्धार्थला देखील तिने ह्या विषयी कल्पना दिली. डॉक्टरांची तीन दिवसानंतरची अपॉईंटमेंट मिळाली होती. तो दिवस उगवला वेगळ्याच मार्गाची सुरुवात आज होणार होती. जो खरं तर तसा खडतर पण चांगल्या गोष्टीकडे नेणारा होता. त्यावरून चालण्यासाठी प्रज्ञा आणि तिचे घरचे अगदी खंबीरपणे तयार होते. प्रज्ञा स्वतः तयार होऊन शंतनूला तयार करत होती. का कुणास ठाऊक शंतनू आज खूप शांत होता. त्याच्या शांत राहण्याचीही भीतीच वाटत होती. काळजी मनात तशीच ठेऊन प्रज्ञा भरभर आवरत होती. सिद्धार्थ देखील त्यांच्या सोबत जाणार होता. त्याने गाडीचा होर्न बाहेरूनच वाजवला, तसे तयार झालेले प्रज्ञा आणि शंतनू रूममधून हॉलमध्ये आले. आई-बाबाही तिथेच उभे होते. घाई घाई आईने देवाजवळ चा अंगारा आणला आणि दोघांनाही लावला. दोघेही बाहेर पडले. शंतनूला सगळं वेगळंच वाटत होतं. जवळ जवळ गेले सात आठ महिने तो असा बाहेरच पडला नव्हता. शंतनू तसं गाडीत बसायलाच घाबरत होता. प्रज्ञाने त्याला बसवून त्याचा हात हातात घट्ट पकडला आणि अगदी त्याला जवळ घेऊन बसली होती.
प्रज्ञालाही जगाचं मुळीच भान नव्हतं शंतनू शंतनू आणि फक्त शंतनू एवढंच सध्या तिचं ध्येय होतं. मन खरच खूप गूढ आणि अथांग असतं त्याच्या मनात कधीही काहीही विचार येऊ शकतात. अगदी तसच प्रज्ञाच झालं होतं. असंख्य विचार आणि काळजीने तिचं मन घेरलं होतं. त्यातल्या त्यात ती मनाला भरपूर प्रयत्नाने सकारात्मकतेकडे वळवून विचारांची दिशा बदलत होती. अचानक एक कुत्रा गाडी समोर येऊन थांबला. सिद्धार्थ ने ब्रेक दाबला आणि गाडी जागेवरच थांबली तशी प्रज्ञा दचकून जागी झाली. तिचं लक्ष शंतनूकडे  गेलं तर तोही खूप घाबरलेला होता. तिने त्याच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवत त्याला शांत केले. सिद्धार्थने मागे सगळं व्यवस्थीत आहे ना ह्याची खात्री करून घेतली आणि तो पुढे निघाला. थोड्याच वेळात ते संस्थेमध्ये पोहोचले.
संस्थेचा परिसर खूप मोठा आणि प्रसन्न होता. घरासारखीच कौलारू छप्पर असलेली इमारत होती ती. समोरच मोठा बगीचाही होता. त्यात रंगीत कारंजाही होता. पहिल्यांदा प्रज्ञा आली होती त्यावेळी तिचं इतकं लक्ष नव्हतच पण, यावेळी शंतनू ह्या गोष्टींकडे वेगळ्याच नजरेने बघत होता. त्यामुळे तिचंही लक्ष आपोआपच त्याकडे जात होतं. शंतनू जरासा खुशच वाटत होता आता प्रज्ञाला. सगळं बघत बघत ते डॉक्टरांच्या केबिनजवळ पोहोचले पण, तेवढ्यात शंतनूला समोरच्या घोळक्यातून येणारा आवाज अजीबात सहन नाही झाला तो खरं तर स्पष्ट ऐकू येण्यासारखा नव्हताच पण, त्याला असं वाटलं की, कंपनीबाहेर सगळे कसला तरी संप करत आहेत आणि कंपनीविरुद्ध नारे देत आहेत. तसा तो त्या लोकांवर धावून गेला, जोरजोरात ओरडायला लागला, हातात जे येईल ते उचलून फेकाफेकी करायला लागला. प्रज्ञाने आणि सिद्धार्थने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. तो काही केल्या ऐकत नव्हता. तेवढ्यात डॉक्टरही आवाज ऐकून बाहेर आल्या मदतनीस ला सांगून लगेच त्याला एका रुममध्ये नेण्यास सांगितले. एका बेडवर त्याला झोपवले दोघांनी हात पकडले आणि दोघांनी पाय. प्रज्ञाला हे बघवत नव्हतं पण, नाईलाज होता. त्याला एक इंजेक्शन देऊन शांत केले. त्या इंजेक्शन मुळे त्याला पाचच मिनिटात झोप लागली. प्रज्ञा शंतनूकडे एकटक बघत उभी होती. आजच्या शांत राहण्यावारून तिला भीती वाटतच होती आणि, नेमकं इथे आल्यावारच हे असं घडलं.
प्रज्ञाला आणि सिद्धार्थ ला डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलावून घेतलं. सुस्कारा टाकत डॉक्टर त्यांच्या खुर्चीत बसल्या आणि ह्या दोघांनाही बसायला सांगितले. “सॉरी प्रज्ञा, खरं तर मी आज शंतनूचे पूर्ण निरीक्षण करून काही टेस्ट करून मग नक्की काय ते सांगणार होते. पण हा इथे आल्यावरचा प्रकार बघितला आणि माझी शंका दूर झाली. तुम्हाला शंतनूला आजपासूनच इथे काही दिवस admit करावं लागेल.”
“काय”? प्रज्ञा जरा ओरडूनच म्हणाली. खांद्याला अडकवलेली पर्स खाली पडली. तिचे हातपायच गळाले. तिला काहीच सुधरेना.
“हे असं आत्ता जे घडलं ते ह्या आधी कधी घडलं तुला आठवतंय का?डॉक्टरांनी  प्रज्ञाला प्रश्न केला.
“हो आठ दहा दिवसापूर्वीच, आधी एक-दीड महिन्याने त्याला असं व्हायचं पण, लगेच शांतही होत होता. एवढ्यात त्याला सारखंच असं होतंय आणि गोळी दिल्याशिवाय शांतच होत नाहीये.”
“हो ते समजलंच मला, आत्ताच्या त्याच्या कृतीवरून. हा काळ आता अजूनही कमी कमी होऊ शकतो आणि तो जास्तीच हायपर देखील होऊ शकतो. लवकरात लवकर त्याच्यावर उपचार सुरु करणं गरजेचं आहे”
“फक्त दवाखान्यात नेऊन तर आणायचं, त्यात काय एवढं?” असं श्रेयाचं निरागस वाक्य तिला पुन्हा आठवलं. तिच्या काळजात धस्स झालं. पुन्हा एकदा तिचं नव्या वळणावर पुढचं पाऊल पडलं.
      जवळ जवळ अख्खा दिवस संपत आला होता. शंतनूला जाग आली. आपण इथे काय करतोय? आणि हा कोणता ड्रेस घातलाय मी? हे सगळं त्याला खूप विचित्र वाटलं. तो पुन्हा आरडा-ओरड, चिडचिड  करायला लागला. “मी आहे शंतनू, मी आहे तुझ्या जवळ शांत हो”. असं म्हणत प्रज्ञाने त्याला जवळ घेऊन शांत केले. घरी तशी वेळ लागेल अशी कल्पना दिली होती पण admit करून घेतलंय हे सांगितलं नव्हतं. शंतनूचे आई-बाबा अगदी डोळ्यात तेल घालून वाट बघत होते. मुलीही आज खेळायला न जाता आजी आजोबांबरोबर आई बाबा कधी येत आहेत याची वाट बघत होत्या. इकडे प्रज्ञाला घरी जावसं वाटतच नव्हतं. पण घरी जाणं आणि सगळ्यांना समोरा समोरच सांगितलेलं योग्य राहणार होतं. सिद्धार्थ मधल्या वेळेत त्याच्या घरी जाऊन पुन्हा आला. प्रज्ञाला आता घरी जाणं भागच होतं. तिची पावलं जड झाली होती. कसं जाऊ घरी आणि काय सांगू सगळ्यांना तिला काहीच कळत नव्हतं. कशी-बशी रिक्षाजवळ पोहोचली आणि पत्ता सांगून रिक्षात बसली डोकं सुन्न झालं होतं आता तिच्या डोक्यात काहीच विचार नव्हते. चेहऱ्यावरही शून्य भाव होते रिक्षातून बाहेर बघत बघत ती हरवून गेली होती. फक्त डोळ्यातून अपोआप पाणी ओघळत होते अगदी शांतपणे. तिला घर आलेलं देखील समजले नाही. रिक्षा थांबली आणि ती भानावर आली. पैसे देऊन तिची पाठ वळली आणि दारातच सगळे उभे असलेले दिसले. रिक्षा आली म्हणून सगळेच धावत आले होते.
         “हे काय तू रिक्षेतून? शंतनू कुठे आहे? आणि सिद्धार्थ कुठे गेला? काय झालय प्रज्ञा?" आई-बाबांचा काळजीने  प्रश्नांचा भडीमार सुरु झाला. प्रज्ञा काहीच बोलत नव्हती. तिने आईंना मिठी मारली आणि जोरजोरात रडायला लागली. त्यांनाही सुचेना, नेमकं काय झालंय ते कळेना. मुलीही अगदी गांगरून गेल्या. गेल्या सात-आठ महिन्यात प्रज्ञाला खूप strong झालेलं बघितलं होतं त्यांनी, पण आज तीच प्रज्ञा वेगळीच वाटत होती. आईंनी तिला शांत केले. सगळे आत गेले. स्मिता मावशीही आलेल्या होत्या. प्रज्ञाला पाणी प्यायला दिले. प्रज्ञाने डोळे पुसले आणि पाणी पिता-पिता घडलेला सगळा वृतांत सांगितला. आई-बाबांना हे ऐकून चांगलाच धक्का बसला. स्मिता मावशीने आईंना सावरले. श्रेया आणि प्रिया पुढे आल्या त्यांनी प्रज्ञाला घट्ट मिठी मारली. श्रेया म्हणाली, “आई तू काळजी करू नकोस आपला बाबा लवकर बरा होऊन घरी येईल.” हे ऐकून प्रज्ञालाही पुन्हा एकदा तिच्या निश्चयाची जाणीव झाली.




अस्मिता कुलकर्णी
Share:

लढा स्वतःशीच स्वतःचा (भाग -४)


भाग - ३ वाचण्यासाठी  इथे क्लिक करा

खूप समजावून देखील शंतनू वेगळंच वागत होता. गेल्या दोन महिन्यापासून शंतनूच्या वागण्यात खूपच बदल झाला होता. कशातच लक्ष नसायचं. family डॉक्टर च्या चकरा वाढल्या होत्या. शारीरिक दृष्ट्या तो तसा व्यवस्थित होता पण, नीट बोलत नव्हता, मनापासून हसत नव्हता, झोप व्यवस्थीत नव्हती, एक तर खूप जेवायचा नाहीतर भूक नाहीये म्हणायचा. त्यामुळे तब्येतीवर परिणाम झालाच होता. त्याचा चेहराही पूर्ण सुकला होता. वरचे वर बऱ्याच गोष्टी वाढत चालल्या होत्या. डॉक्टरांनी नकळत प्रज्ञाला मानसोपचाराचा सल्ला सुचवलाही होता पण, तीला खात्री वाटत होती की, शंतनू लवकर यातून बाहेर पडेल. त्यासाठी सगळेच नेहमी प्रयत्नात असायचे. आवर्जून त्याच्याशी बोलत, त्याच्या आवडीचं जेवण करत, मुलीही आजूबाजूला सतत त्याला आवडत्या गोष्टी करत, घराबाहेर असलेल्या गार्डन मध्ये फिरवून आणत. चार महिने झाले पण शंतनूमध्ये फारसा फरक झाला नव्हता. उलट गोष्टी वाढतच चालल्या होत्या. शंतनूची आई खूप खचली होती. तिला शंतनूची वाटणारी काळजी लपवता येत नव्हती. बाबांनी मात्र परिस्थितीशी चांगलाच झगडा सुरु ठेवला होता.
प्रज्ञाने आणि शंतनूच्या बाबांनी जमेल तशी ऑफिस ची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली होती. प्रज्ञा शंतनू बरोबर ठामपणे उभी होती. घरातले, ऑफिसमधले त्याचे सगळेच मित्र त्याला खूप समजून घेत होते, धीर देत होते, त्याची काळजीही घेत होते.
शंतनू कधी-कधी अचानक घाबरल्यासारखा वागायचा, दिवस दिवस रूममध्येच बसून रहायचा. तर, कधी स्वतःशीच काहीतरी पुटपुटत बसायचा. असा शंतनू आपल्याला कधी बघायला मिळेल असं स्वप्नातही कुणाला वाटलं नसेल. एका छानशा पझल चा तुकडा हरवल्यावर त्यातली रिकामी जागा कशी डोळ्यांना लगेच जाणवते, अगदी तसच ह्या कुटुंबाकडे बघितल्यावर जाणवू लागलं होतं. शंतनू तसाच झाला होता, असून नसल्यासारखा. हे बघून मुलींना देखील खूप वाईट वाटायचं. छोटी तर असंख्य प्रश्न विचारायची, तीला उत्तर देता देता घरातले अजूनच खचून जात पण, त्यांनी कधीही शंतनूला जाणवू दिले नाही, त्याच्यासमोर साधे अश्रू देखील काढले नाहीत. त्याच्या अपरोक्ष मात्र कितीतरी रात्री त्यांच्या जागरण करून, रडण्यात गेल्या असतील.
एकदा शंतनू गॅलरी बसला होता त्याचा मित्रही त्याच्या सोबत होता. संध्याकाळची वेळ होती.काही मुलंही खाली खेळताना दिसत होती. सगळे आजोबा लोकं खाली ग्रुप करून सहज गप्पा मारत होते. मित्र शंतनूशी बोलत होता पण त्याचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. शंतनू चं सगळं लक्ष खाली असलेल्या त्या ग्रुपकडेच जात होतं. त्यांचा आवाज त्यांचं हसणं त्याला खटकत होतं. त्याला असा संशय येत होता की, ते आपल्याबद्दल आपल्या कंपनीबद्दल बोलत आहेत. आपली टर उडवत आहेत. त्याने ऐकलं ऐकलं आणि  अचानक उठला, त्यांच्याकडे हात करू करू मोठ्याने बोलायला लागला  “मलाच हसत आहात ना तुम्ही? तुम्ही माझ्याविषयी का बोलत आहात? कंपनीला काही करू नका. तुम्ही कितीही प्लान केला तरी कंपनीला काही नाही होणार. बघून घेईल मी तुम्हाला, बघून घेईल एकेकाला” असं खूप काही बोलायला लागला. मित्राने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, आवाज ऐकून कसा बसा पटपट जिना चढून प्रज्ञाही वर आली. आणि शंतनूचे बाबा त्या आजोबांकडे शंतनू तर्फे माफी मागण्यासाठी गेले. प्रज्ञाने आणि शंतनूच्या मित्राने मिळून त्याला अगदी ओढत ओढत खोलीत आणले तरी त्याची अखंड बडबड चालूच होती. शेवटी पाणी आणि डॉक्टरांनी दिलेली एक गोळी देऊन त्याला शांत केले त्याचे हातवारे अजूनही सुरूच होते. त्याला हळू हळू झोप लागली तेंव्हा कुठे तो शांत झाला. प्रज्ञाच्या जीवात जीव आला.
घराबरोबर बाहेरही त्याच्या वागण्याचा परिणाम जाणवायला लागला होता. ह्या कृतीमुळे शंतनूच्या बाबांना खूपच वाईट वाटले होते. सगळ्यांशी प्रेमाने, आदराने बोलणाऱ्या माझ्या मुलाची अवस्था अशी का केलीस रे ? असा देवाला त्यांचा नेहमी प्रश्न असायचा.
 हातातल्या ओंजळीतल पाणी जसं निसटून जावं तसं खूप प्रयत्न करूनही तो हळू हळू सगळ्यांपासून लांब चालला होता. प्रज्ञासाठी तर हे एक वाईट स्वप्नच होतं. कोणीतरी झोपेतून जागं करावं आणि सगळं काही आधीसारख व्हावं असं तिला कित्येक वेळा वाटायचं. खरं तर तीची झोपच उडाली होती. एकमेकांबरोबर घालवलेल्या कित्येक क्षणांबद्दल ती त्याच्याशी सतत बोलायची, हातात हात घेऊन तासन तास त्याच्याजवळ बसून राहायची. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला खूप आवडतोस आणि तू सगळं छान करशील असा मला पूर्ण विश्वास आहे. असे त्याला ती वारंवार बोलून दाखवायची. पण शंतनूची म्हणावी तशी प्रतिक्रिया येत नव्हती.
कंपनी तशी नावाजली होतीच त्यामुळे मीडियाही पाठ सोडत नव्हती. त्यांनाही उत्तरं देता देता खूप त्रास होत होता. नातेवाईकांमध्ये देखील चर्चा, काळजीनेच का असेना पण सारखे फोन, भेटायला येणं हे चालूच असायचं. त्यात पुन्हा सगळ्यांची वेगवेगळी मतं सगळं सावरता सावरता अजूनच बिघडत चाललं होतं.   
एक दिवस असंच सगळे आवरून आपापल्या खोलीत झोपायला गेले. मध्यरात्रीचे दोन वाजले होते. सगळे गाढ झोपेत होते. शंतनूला अचानक जाग आली आणि तो घाईने उठून पळत-पळत खाली हॉल मध्ये फोनजवळ गेला, घरातले लाईट्स बंद होते पण, तरी तो अचूक जिन्याच्या पायऱ्या उतरून फोनजवळ पोहोचला. फोन उचलून बोलू लागला. प्रज्ञाही त्याच्या मागे धावत गेली. तो काय करतोय हे प्रज्ञा हळूच जिन्यात उभा राहूनच लपून बघत होती. तो अगदी पहिल्यासारखा म्हणजे कंपनीत होता तसाच बोलत होता फोनवर. तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. सगळे आधीचेच दिवस सरकन तिच्या डोळ्यासमोरून गेले. कित्येक दिवस झाले त्याचं असं बोलणं तिने ऐकलच नव्हतं. तिने अजून कान देऊन ऐकलं तिला वाटलं तिलाच भास झाला की काय, तो जणू क्लाइंट ला कन्व्हिन्स करतोय असंच बोलत होता. आमची कंपनी तुमच्या साठी किती महत्वाची आहे हे त्यांना पटवून देत होता. त्याचा चेहरा त्या क्षणासाठी इतका खुलला की, जसं काही क्लाइंट कन्व्हिन्स झाला होता. तो खुश होऊन “थँक्यू म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. तो पुन्हा रुममध्ये गेला. प्रज्ञा त्याचा फोन ठेवल्या ठेवल्या जीन्यातूनच हळूच परत रुममध्ये गेली. रुममध्ये गेल्यावर शंतनू स्वतःशीच पण प्रज्ञाला सांगतोय अशा पद्धतीने  त त पं पं करत मोडक्या भाषेतच बोलला “अगं प्रज्ञा, ते..मी.. चा क्लाइंट कॉल होता. शेवटी मी त्याला कन्व्हिन्स केलंच, केलं मी त्याला कन्व्हिन्स..मिळाली आपल्याला order.” दोन तीनदा तेच तेच वाक्य बोलत बोलत तो बेडवर आडवा झाला. आता मात्र प्रज्ञा पूर्ण हादरली होती कारण, खरं तर फोन दोन दिवसांपासून बंदच पडला होता. शंतनूला भास झाला होता. शंतनू मुळे आधीपासूनच प्रज्ञा रात्र रात्र जागीच असायची. आता प्रज्ञाच्या काळजीत आणखीनच भर पडली होती. ती पार कोलमडून गेली.
यानंतरही शंतनूला बरेचदा दार वाजतय, कोणीतरी हाका मारतंय असे दोन-तीनदा भास झाले होते.
आता मात्र सगळे परिस्थितीसमोर हरत चालले होते. कंपनीत जाणं बंद होऊन आता जवळ-जवळ सात महिने झाले होते. शंतनू खूप खराब झाला होता. दाढी वाढली होती, नखं वाढले होते. प्रज्ञालाही तो काही करू देत नव्हता. जेवण नाही, झोप नाही, स्वच्छता टापटीपपणा नाही. सगळच बिघडलं होतं. असा अनोळखी बनला होता शंतनू. शंतनू जेवत नव्हताच पण प्रज्ञा रोजच त्याला आग्रहाने खाऊ घालायची. असच ती एकदा खाऊ घालत असताना शंतनूने अचानक ताटाकडे बघितले आणि त्याला काय वाटले कोणास ठाऊक त्याने ते ताट भिरकावून लावले सगळे अन्न सांडले. “मला नको, मला नको,” असं म्हणून शंतनू रडायलाच लागला. प्रज्ञालाही हे सगळं बघून खुप वाईट वाटले तिने हुंदका गिळला आणि तिथलं सगळं आवरून शंतनूला शांत करून त्याला बेडवर झोपवलं आणि, ती खाली गेली. आता तिला रहावलं नाही. ती स्वयंपाक घरात गेली ओट्यावर ताट ठेवलं आणि ढसा ढसा रडली. तीला त्याच्याच मिठीत जाऊन मोकळं व्हावसं वाटत होतं. पण ते तर आता शक्यच नव्हतं. बऱ्याच वेळा नंतर तिने स्वतःला सावरलं आणि, तिने मनाशी एक निश्चय केला. थोडा गेला असेल लांब पण, मी चालेल त्याच्यासाठी तिथपर्यंत. गोंधळला असेल धावपळीत, मी सावरेल त्याला.. मी परत आणेल त्याच्या चेहऱ्यावरच हसणं. हातात हात घट्ट धरून शिकवेन पुन्हा नव्याने जगणं. माझा शंतनू जसा होता तसाच मला परत हवा आहे. आम्हाला सगळ्यांना तो तसाच हवा आहे. असं म्हणून तिने डोळे पुसले आणि तेंव्हा ती जे रडली होती ते शेवटचं.
 उगवत्या सूर्याबरोबर नवीन आशा घेऊन प्रज्ञाही उठली. आज तिने पुण्यातल्याच एका संस्थेत डॉक्टर शिवार म्हणून एक मानसोपचारतज्ञ होत्या, त्यांची उद्याची अपॉईंटमेंट घेतली. खूप सकारात्मक विचार करून  चेहऱ्यावर एक वेगळीच अशा ठेऊन आज दिवसभर ती वावरत होती. आजचा दिवस कधी संपतोय असं तिला झालं होतं.
     पुढचा दिवस उगवला. प्रज्ञाने भर भर सगळं आवरलं आणि ती बाहेर पडली. विचार करत करत मनाची तयारी करत ती कशी बशी संस्थेत पोहोचली. मनात धाकधूक आणि टेन्शन घेऊन डॉक्टरांच्या केबिनपाशी पोहोचली. ती आतून घाबरली होती, तिला घाम फुटला होता. तिचे पाय देखील घुटमळत होते. पण तिचा निश्चय तिला हे सगळं करायला भाग पाडत होता. ती आत शिरली. डॉक्टरांनी तिला बसायला सांगितले. थरथरत्या हातानी तिने टेबलावरचा ग्लास उचलला आणि एका दमात सगळं पाणी प्यायली. डॉक्टरांनी तीला शांत केले.
“अगं बिनधास्त बोल, इतकी घाबरून जाऊ नकोस.”
“हो पण, मला कुठून सुरुवात करावी तेच समजत नाहीये.”
“सगळ्यात पहिले मला सांग नेमका काय प्रॉब्लेम आहे?
“तेच तर समजत नाहीये, तुमचा सल्ला हवा होता.”
“कोणाच्या बाबतीत? काय झालय नेमकं? मोकळेपणाने सांग.”
“माझे मिस्टर शंतनू, खूप हुशार, कर्तबगार, टापटीप सगळ्यांना समजावून घेणारा आहे पण, गेल्या काही महिन्यांपासून तो पूर्ण बदलून गेलाय बोलत नाही जेवत नाही ऑफिस तर त्याला खूप प्रिय होतं पण त्याचं ऑफिसला जाणही बंद झालं आहे. स्वतःकडे अजिबात लक्ष नसतं स्वच्छता नाही. सगळच अवघड होत चाललंय.”
“मला सांग प्रज्ञा ऑफिसमध्ये काही टेन्शन्स होते का?
“हो, कंपनीला खूप मोठा लॉस झालाय आमच्या.”
“ओके किती दिवस झाले ह्या गोष्टीला?
“सहा महिने होऊन गेले, सुरुवातीला वाटायचं की, तो पडेल यातून बाहेर पण, परिस्थती वरचे वर बिघडायलाच लागली. आता मात्र तो पूर्ण हरवत चाललाय. मनाशीच बोलत असतो. कसले तरी भास देखील होतात सारखे.”
प्रज्ञाला आता स्वतःला आवरता येत नव्हते, त्याचा चेहरा आठवून आठवून तिला अजूनच भरून येत होतं.
“प्लीज  डॉक्टर माझ्या शंतनूला बरं करा तुम्ही म्हणाल तसं मी करेन, त्याची काळजी घेईल.”
“रडू नकोस, तुझं त्याच्या बरोबर ठामपणे उभा असणं हे खूप महत्वाचे आहे.”
डॉक्टरांनी प्रज्ञाच्या पाठीवरून हात फिरवत तीला आधार दिला आणि शांत केले. प्रज्ञाला एक आन्सर शीट भरायला दिली. अजून बरीच माहिती तिच्याकडून विचारून घेतली. त्यावरून त्यांना अंदाज आलाच की, प्रॉब्लेम तर नक्कीच आहे.
“मिस प्रज्ञा, एकंदर पाहता मला असं वाटतय की, लवकरात लवकर तुझ्या मिस्टरांना इथे घेऊन येणं खूप गरजेचे आहे. नाहीतर हातातून वेळ निघून जाईल.”
“म्हणजे खूप काही सिरीयस झालंय का शंतनू ला? तो बरा होईल ना?
“खरं सांगायचं तर हो सिरीयसच आहे पण, तो यातूनही बरा होऊ शकतो. ती काळजी तू करू नकोस मी नक्की त्याला यातून बाहेर काढेल पण, लवकरात लवकर त्याला इथे घेऊन ये.”
प्रज्ञाच्या डोक्यात खूप विचार सुरु झाले होते. पाऊल तर उचलले होते. पण पुढे जायचं कसं हे तीला या क्षणी सुधरत नव्हतं. 
“प्रज्ञा मी तुला अंधारात ठेऊ इच्छित नाही कारण, सगळ्यात महत्वाचा सपोर्ट तुझाच असणार आहे. त्यामुळे तुला सगळंच माहिती असणं खूप महत्वाचं आहे. तू सांगितल्याप्रमाणे आणि ह्या लिहिलेल्या आन्सर शीट वरून सगळी लक्षणं स्कीझोफ्रेनियाची वाटत आहेत.”
प्रज्ञाच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह दिसत होते. शंतनूच्या बाबतीत असं होऊ शकतं ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिचे हात पाय गळून गेले. डॉक्टरांनी तिला ह्या आजाराविषयी सगळी माहिती सांगितली.
 “तरी तू घेऊन ये मग, पुढे काय ते आपण ठरवू.”
डॉक्टर मला खूप भीती वाटतेय, टेन्शन येतंय.”
“अगं घाबरू नकोस, खरं तर मी तुझ्या हीम्मतीला सलाम करते की, तू हा निर्णय घेऊन इथपर्यंत आलीस. तू नेहमीच त्याच्या बरोबर आहेस. तुझ्या कर्तव्यात तू कुठेही कमी पडली नाहीस. मला खरं तर अभिमान वाटतोय तुझा. अशीच ठामपणे उभी रहा. सामोरे जा, सगळं छान होईल आणि, काळजी करू नकोस मी आहेच.”
सगळी हिम्मत एकवटून आणि मोठ्ठा सुस्कारा सोडून प्रज्ञा तयार झाली.
“ठीक आहे डॉक्टर मी घेऊन येईल शंतनूला,थँक्यू
प्रज्ञा तिथून हो म्हणून बाहेर पडली खरी पण, पूढे तीला काहीच सुचत नव्हते.
आई बाबांना काय सांगायचं? मुलींना कसं समजवायचं? महत्वाचं म्हणजे शांतनूलाच कसं सांगू की, तुला असं काही झालय. बापरे!! किती अवघड आहे हे. त्याच्या मित्राला सांगायला सांगू का? नको नको त्याला नाही आवडणार. नाहीतर स्मिता मावशींना सांगू दे का? नको त्या उगाच बाऊ करतील. मग दादाला? नकोच आई बाबा सगळेच टेन्शन मध्ये येतील. काय करू? काय करू?
असं स्वतःशीच झगडणं चालू होतं प्रज्ञाच. चालता चालता एका मंदिरात ती शिरली. शेवटी श्रद्धेने गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि, थोडसं बळ दे आणि आमच्या पाठीशी रहा कायम असा आशीर्वाद मागितला.शेवटी प्रज्ञाने ठरवलं की, मीच स्वतः बोलणार सगळ्यांशी.


अस्मिता कुलकर्णी
Share:

लढा स्वतःशीच स्वतःचा (भाग -३)


शंतनू स्पर्धेत उभा राहिला खरा पण त्याला वारंवार छोट्या-मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. वर वर पाहता सगळं व्यवस्थित आहे असं वाटायचं पण, शंतनूला आता ह्या गोष्टींचा त्रास व्हायला लागला होता. मनात नुसती घालमेल, त्रास आणि चेहऱ्यावर मात्र हसू असं खोटं वागणं त्याला जमेनासं झालं होतं. छोट्या छोट्या ऑर्डेर साठी खूप धडपड करावी लागत होती. कंपनीला बरेच नुकसानही होत होते. कधी काय होईल याची भीती सतत त्याच्या मनात असायची. टेन्शन मुळे बरेचदा स्टाफ वर देखील आवाज वाढायचा, पण त्यांनी आधीचा शंतनू बघितला होता. त्यामुळे ते त्याच्या ह्या वागण्याचं मनावर घेत नव्हते. हातातून काहीतरी निसटून चाललंय अशी काळजी, असा भाव नेहमीच त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागला होता. खूप ताण निर्माण होत होता. त्याच्या वागण्यातला बदल सगळ्यांनाच जाणवायला लागला  होता. घरच्यांनाही खूप काळजी वाटत होती. शंतनूचे बाबा त्याच्या मागे ठामपणे उभे होते. तेही नेहमी त्याला योग्य ते मार्गदर्शन करत होते.  
एका नवीन ऑर्डर च्या बाबतीतही त्याच्या मनात सध्या विचार चालूच होते. त्या क्लाइंटला देखील थांबवणे त्याला अवघड झाले होते. बऱ्याच मित्रांचा, जाणकारांचा सल्ला घेतल्यावर त्यांनी प्रलोभनं देण्याचा उपाय सुचवला तेंव्हा, ह्याने बरेच दिवस विचार केला आणि शेवटी नाईलाजाने तो मार्ग देखील अवलंबून बघितला. आपल्या तत्वांना मुरड घालत त्याने त्या क्लाइंट थांबवण्याचा खूप प्रयत्न केला होता. अजूनही क्लाइंटने त्याचा ठोस असा काहीच निर्णय शंतनूला कळवला नव्हता. शंतनू ह्या निर्णयाची खूप आतुरतेने वाट पाहत होता. ही ऑर्डर त्याच्या कंपनीसाठी खूप महत्वाची होती. कंपनीचा आधार होता ही ऑर्डर म्हणजे. खरं तर प्रलोभनं देऊन ऑर्डर मिळवणे ह्या गोष्टीमुळे त्याला अजिबातच समाधान वाटत नव्हते. आपलं काहीतरी चुकलंय असं सतत त्याच्या मनात येत होतं. मनावर एक प्रकारचं दडपणच असायचं. पण काहीही करून ही ऑर्डर आपल्याला मिळायलाच हवी अशी त्याची गरज होती. डोक्यात हाच विचार ठेऊन तो ऑफिस आणि घर दोन्हीही ठिकाणी वागायला लागला होता, दोन्हीमधली सीमारेषा पुसट होत चालली होती.
आज त्याने मनाशी ठरवून स्वतःहून त्या क्लाइंटला फोन केला पण त्यांनी उद्या बोलू असे म्हणून फोन ठेऊन दिला. शंतनूला आता मात्र खूपच टेन्शन आलं होतं.
दुसऱ्या दिवशी सगळे आपापली सकाळची कामे उरकून, मुली शाळेत निघाल्याही पण, शंतनू अजूनही झोपलेलाच होता. सगळ्यांना अश्यर्यच वाटलं. प्रज्ञा उठवायला गेली तर, घाबरून उठला आणि भरभर आवरायला लागला. “खूप उशीर झाला गं प्रज्ञा मला, आता मी पोहोचणार नाही वेळेत. कोणी क्लाइंट आले असतील, ऑफिसमध्ये कॉल आला असेल, बापरे!! खूपच उशीर झालाय.” तेच तेच वाक्य परत परत बोलत होता. खूप गोंधळल्यासारखा वाटत होता. तरी प्रज्ञा त्याला मदत करत होतीच. सगळं आवरलं आणि तो निघाला. आज त्याने मुलींविषयी काहीच विचारले नाही शिवाय आई बाबांकडेही त्याचे लक्ष गेले नाही. त्याने गाडी चालू केली.
“निट जारे शंतनू, काळजी घे”
प्रज्ञाचं हे वाक्यही त्याने आज निट ऐकलं नाही.
          गाडी चा स्पीड कितीही वाढवला तरी त्याला तो कमीच वाटत होता. डोक्यात नुसतं विचारांचं थैमान चाललं होतं. आजूबाजूचा आवाजही त्याच्या कानावर पडत नव्हता. तो कधी ऑफिसला पोहचला हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही. गाडीतून उतरल्यावरही बराच वेळ तो गेटजवळच घुटमळत होता. शेवटी जरा भीत भीतच त्याने ऑफिसमध्ये पाय ठेवला. आज गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणण्याच्या मनस्थितीत तो नव्हताच. आत केबिनमध्ये गेला आणि, फक्त फोनवरच लक्ष ठेऊन होता. फोनची रिंग वाजली. शंतनू खूप घाबरला, फोन उचलायला गेला तर हात थरथर कापायला लागले. खूप वेळा रिंग वाजली तरी त्याने उचललाच नाही. शेवटी प्रथमेश कसली तरी फाईल घेऊन आत आला त्यालाच तो फोन उचलायला लावला. त्याने तो उचलला आणि शंतनूची खात्री खरी ठरली त्या क्लाइंटचाच कॉल होता. सर नाहीयेत असं खोटच त्याने सांगायला लावलं. प्रथमेशने काळजीने विचारलं, “सर आर यू ऑल राईट?” शंतनू हो म्हणाला पण, त्याच्या वागण्यावरून मुळीच तसं वाटत नव्हतं. खूप घाम आला होता त्याला. प्रथमेशने पाणी दिलं आणि तो बाहेर गेला. आता शंतनू स्वतःशीच पुटपुटत होता. “नक्कीच ऑर्डर कॅन्सल करण्यासाठीच कॉल केला असेल. तसं झालं तर काय करू मी? आणि का असं होतंय? मला काहीच सुचत नाहीये. मला काहीच जमणार नाहीये, काहीच जमणार नाहीये....”
        थोडा वेळ गेल्यानंतर पुन्हा रिंग वाजली आता मात्र त्याने हिमतीने फोन उचलला आणि त्याला जी भीती होती तेच घडलं. आता मात्र तो पूर्ण कोलमडला. जवळ जवळ सगळच संपलं होतं. अजून एक मोठी ऑर्डर त्याच्या हातातून गेली होती. फोन ठेवायचं देखील त्याला भान राहीलं नाही. जवळ जवळ फोन हातातून निसटलाच. बऱ्याच वेळ तो खुर्चीत सुन्नपणे बसून राहिला. उठून नंतर समोरच्या भिंतीजवळ गेला. शंतनूच्या बाबांनी ज्या दिवशी हा बिजनेस त्याला सोपवला होता त्या दिवशी एक फ्रेम गिफ्ट म्हणून दिली होती. त्यावर अशा अर्थाचे लिहिले होते की “तुझ्या शेवटच्या प्रयत्नापर्यंत लढ कधीही आशा सोडू नकोस”. त्या भिंतीवर लावलेल्या फ्रेमवरून हात फिरवत “सॉरी बाबा मी हरलो” असं म्हणून तो अक्षरशः लहान मुलासारखा रडायलाच लागला. आज त्याला काहीच सुधरत नव्हतं. कंपनीच्या पहिल्या दिवसापासून सगळ्या गोष्टी, सगळ्यांनी केलेली मेहनत, वाढवलेला हा बिजनेस, प्रत्येक क्षणाशी जोडल्या गेलेल्या भावना, घरच्यांचा, स्टाफचा आपल्यावर असलेला प्रचंड विश्वास, घरच्यांचे चेहरे, मुलींचं हसणं हे सगळं त्याच्या नजरेसमोरून भरभर जाऊ लागलं. डोकं दुखायला लागलं, चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं. Laptop बंद करणंही त्याला समजत नव्हतं. शंतनूचा मित्र दिनेश जो की त्याच्याच कंपनीत काम करत होता, त्याने शंतनूची अवस्था बघितली आणि त्याला लवकरच घरी घेऊन गेला. श्रेया आणि प्रिया तर एकदम खुश झाल्या आज इतक्या लवकर बाबा घरी आला म्हणजे दोघींचे मस्त प्लान सुरु झाले.
”आजी आम्ही बाबा बरोबर फिरायला जाणार “
“अरे आत्ताच तर आलाय बाबा त्याला थोडं बसू द्या”
आईला त्याचं लवकर येणं आणि दिनेश ने बरोबर असणं जरा काळजीचच वाटलं होतं. शंतनू गाडीतून उतरला आणि दिनेश बाहेरच्या बाहेरच एका अर्जंट मिटींगसाठी निघून गेला.
प्रज्ञाच्याही मनात असंख्य प्रश्न होते?
शंतनूने कोणाकडेही बघितले नाही त्याला नजरेला नजर देणं अवघड वाटत होतं.पूर्ण हरल्यासारखं वाटत होतं त्याला. आला आणि खुर्चीवर बसला.
“बाबा चल ना आपण गार्डनमध्ये जाऊ”. शंतनूने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तो जागेवरच बसून होता. मुली आवरून देखील आल्या आणि परत म्हणाल्या, “चल बाबा आम्ही तयार झालोत.” तेंव्हा मात्र त्याचा पारा एकदम चढला. तो जोरात मुलींवर ओरडला. “मला नाही जमणार यायला, मी आत्ताच आलोय मला जरा एकट्याला शांत बसू द्या. तुम्हाला कळत नाही का?
त्याचा असा आवाज ऐकून सगळीकडे शांतता पसरली. सगळेच घाबरले. शंतनूचे हे रूप सगळ्यांसाठीच नवं आणि अनपेक्षित होतं.
सगळ्यांनीच त्याला समजून घेतलं.. “बाबा दमला असेल त्याला एकटं राहू द्या म्हणजे तो मस्त फ्रेश होईल. आपण घरी परत आल्यावर त्याच्याशी खेळू.” मुलींना आज्जीने समजावून सांगून फिरायला नेलं. खरं तर प्रज्ञा आणि त्याचे आई-बाबा काळजीतच पडले होते. उरलेला संपूर्ण दिवस त्याने एकट्यानेच रूममध्ये बसून काढला. जेवायला बोलावलं तरी तो आलाच नाही जेवलाच नाही. कधी झोप लागली त्याचं त्यालाच कळलं नाही. प्रज्ञा त्याच्याजवळ बऱ्याच वेळ बसून होती. नंतर तिचाही डोळा लागला. दुसरा दिवस उगवला.
“अरे शंतनू आज आंघोळ करायच्या आधीच काय ऑफिसचं आवरून बसलास?
“हो का मी आंघोळ नाही केलीये का?” स्वतःच प्रज्ञाला प्रश्न करतो.
“जाऊदे आता उशीर झालाय.” आवरलय तर जातो असाच.
“अरे असं काय लहान बाळासारखं करतोस, दोन मिनिटे लागतील फक्त”
“नको मी जातो”
शेवटी रूममधून तसाच बाहेर पडला. प्रज्ञा वरचं सगळं आवरून स्वच्छता करून खाली आली आणि तिला दिसलं की, शंतनू खालीच खुर्चीत बसलेला होता.
“अरे शंतनू उशीर होईल म्हणालास आणि इथेच बसला आहेस अजून.”
प्रज्ञा एवढं बोलली पण त्याचं लक्षच नव्हतं तिच्या बोलण्याकडे.
“शंतनू, अरे शंतनू”
प्रज्ञाने त्याला हलवलं तेंव्हा त्याने “काय झालं?” असं घाबरून विचारलं आणि काहीही न बोलता परत वरच्या रूममध्ये निघून गेला.
     प्रज्ञाने दिनेश ला फोन लावून सगळं व्यवस्थीत विचारून घेतले. कारण शंतनू बोलण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता. तिला सगळं व्यवस्थीत समजल्यावर तिने शंतनू शी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. पण तरीही तो ह्या विषयावर काहीच बोलत नव्हता. घरातल्या सगळ्यांनी, मित्र कंपनीने सगळ्यांनीच त्याला खूप सपोर्ट केला. ही एक फेज आहे. तू काळजी करू नकोस, ही वेळ पण जाईल. आपण सगळे मिळून प्रयत्न करू. असं सगळेच समजावून सांगत होते पण, त्याचा आत्मविश्वास इतका कमी झाला होता की, आपण आता हे सगळं पुन्हा उभा करू असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. त्या दिवसानंतर त्याचं बोलणच कमी झालं. माणसांमध्ये मिसळण्याची त्याला भीती वाटू लागली. तो एकटा एकटा राहायला लागला. हळू हळू त्याचं ऑफिसला जाणं देखील बंद झालं.
अस्मिता कुलकर्णी

Share:

लढा स्वतःशीच स्वतःचा (भाग -२)

शंतनूने खूप छान पद्धतीने सगळाच भार सांभाळला होता. घर आणि बिजनेस दोन वेगवेगळी पण महत्वाची दोन विश्व होती त्याच्यासाठी. जीव ओतून काम करायचा आणि घरच्यांना खूप जीव लावायचा. बिजनेस चे सुरुवातीचे काही दिवस खडतरच होते. प्रज्ञा त्याच्या आयुष्यात आली आणि त्याची हिम्मतच वाढली. बिजनेस देखील वाढला. त्याचं एकंदर व्यक्तिमत्व बघितलं तर खूप जिद्दी, भरभरून आत्मविश्वास, मोकळ्या स्वभावाचा, आणि अगदीच सरळ मार्गी असं होतं. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणूनही त्याची ओळख होती. नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या कंपनीसाठी कसा करून घेता येईल ह्यासाठी त्याचे प्रयत्न असायचे. ऑर्डर मिळवण्यासाठी कोणाला कन्व्हेन्स करायचं असेल तर ते त्याला अगदीच सहज शक्य असायचं. स्टाफ म्हणजे त्याचे सगे सोयरेच होते जणू. प्रेमाने वागत त्यांच्याशी त्यामुळे स्टाफ ने देखील कोणतीही तक्रार न करता नेहमीच मन लावून काम केले. त्यांच्या विश्वासावर कितीतरी प्रोजेक्ट त्याने चुटकीसरशी पूर्ण केले होते.  
यारी दोस्ती तर होतीच खूप मित्रांचा गोतावळा होता. त्यांच्यातही रमायला आवडायचं त्याला. मित्रांनाही प्रत्येक वेळेस मदतीसाठी धावून जायचा. पैश्याच्या स्वरुपात असू दे अथवा शारीरिक, मानसिक कोणत्याही पद्धतीने जमेल तशी मदत करायचाच. पुढे पहिली मुलगी झाली आणि बिजनेस ने चांगलाच जोर धरला. प्रियाच्या म्हणजेच ह्या मुलीच्या पायगुणानेच हे झालं असं आज्जी-आजोबांचं पक्क मत होतं. शंतनू आणि प्रज्ञाचा आई-बाबांवर प्रचंड विश्वास होता. सगळ्यांचाच एकमेकांवर खूप विश्वास आणि जीवापाड प्रेम होतं अगदी “एक दुसरेसे करते हे प्यार हम, एक दुसरेके लिये बेकरार हम.” सारखं. प्रज्ञाच्या घरच्यांना देखील  जावईबापुंबद्दल भारी अभिमान होता. “लाखात एक जावई मिळाला हो आम्हाला” असं अगदी नेहमीच कौतूक चालायचं. शंतनूची आत्या जवळच रहात होती, तिचाही तो अतिशय लाडका होता. दुसरी मुलगी श्रेया त्यांच्या आयुष्यात आली आणि त्यांचं कुटुंब पूर्ण झालं. सगळ्यांशी अगदी गोड बोलायचा, मिसळून जायचा प्रत्येकामध्ये.
 त्याचं काम जोरदारच चालू होतं. बघायला गेलं तर  आत्ताची बाहेरची परिस्थिती बघता खूपच स्पर्धा वाढत  होती. शंतनूची खूप धावपळही होत होती. कामाचं प्रेशरही खूप होतं. कंपनी वाढवण्यासाठी त्याने लोन देखील काढलं होतं. आपल्या कंपनीला सगळ्यात बेस्ट कंपनी म्हणून अवॉर्ड मिळवून द्यायचं असं त्याचं स्वप्न होतं. तसं सगळं मॅनेज करणं जरासं अवघड वाटायला लागलं होतं. कामं मिळवण्यासाठी खूप खटपट करावी लागत होती. पण त्याने एका शब्दानेही कधीही तक्रार केली नाही. तो हिमतीने सगळ्या गोष्टींना सामोरं जात होता. घरी कोणाला त्रास नको म्हणून यातलं तो घरीही काही सांगत नसे. खरं तर ऑफिस आणि घर हे काही केल्या एकत्र झालं नाही पाहिजे, त्याचा परिणाम नात्यांवर, घरातल्या छोट्या छोट्या आनंदावर होऊ शकतो अशी त्याच्या वडिलांची शिकवण होती. तो ती मनापसून जपत होता. घर आणि कंपनी दोन्ही अगदी छान बघत होता.
शंतनूला टापटीप राहणं खूप आवडायचं. एक दिवस रोजप्रमाणे सगळं आवरून तो ऑफिसमध्ये पोहोचला. प्रसन्न चेहऱ्याने त्याने सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं आणि तो केबिनमध्ये पोहोचला. सेक्रेटरीला इंटरकॉम करून आजच्या मिटींग्स बद्दल चर्चा केली. रोजप्रमाणे लॅपटॉप उघडून तो सगळे मेल चेक करत होता. त्याला त्याच्या एका जुन्या Client चा मेल दिसला. जो की, प्रत्येक ऑर्डर शंतनूच्याच ऑफिसला देत. आता ती  ऑर्डर दुसऱ्या कंपनीला देणार होता. तसं त्यांनी आधीच बोलता बोलता अंदाज दिलाच होता पण, इतक्या लवकर होईल असं त्याला वाटलंच नव्हतं. खूप मोठी होती ऑर्डर ती शंतनूसाठी आणि, तिच आता हातातून जाणार ह्या गोष्टीमुळे तो खूपच घाबरला, टेन्शन मध्ये आला. दिवसभराचे काम कसेबसे संपवून तो घरी आला. त्याच्या डोक्यातून तो मेल जाता जात नव्हता. प्रत्येक शब्द डोळ्यासमोरून जात होता.
घरी आल्यावर श्रेया आणि प्रिया दोघीही नेहमीसारख्या बाबा बाबा करत आल्या.
“हे बघ बाबा, आम्ही आज काय काय बनवलंय”
“काय बनवलंय?
तो उसनं अवसान आणून बोलतोय हे प्रज्ञाच्या लगेच लक्षात आलं.
तरीपण “छानच आहे की,” असं म्हणून तो त्याच्या रुममध्ये गेला. मागोमाग प्रज्ञाही गेली.
“काय झालं शंतनू?
“अगं कुठे काय, काही नाही झालं”
“मग असं लगेच वर का निघून आलास?
“अगं, ते... जरा जास्तीच काम होतं आज. थकलोय जरासा.”
“नक्की सांगतो आहेस ना?
“हो ग नक्की.”
असं म्हणता म्हणता तो परत खाली निघून गेला.
शंतनूची आई सगळ्यांना जेवायला बोलावत होती. सगळे जेवायला बसले. शंतनूचं फारसं लक्ष नव्हतं पण, ते कोणाच्याही लक्षात येऊ नये याची तो पुरेपूर काळजी घेत होता.पण, प्रज्ञाच्या नजरेतून ते चुकणारं नव्हतं. शंतनूच्या वडिलांनीही काळजीपोटी आणि स्वानुभवानुसार त्याला विचारलं काही काळजी करण्यासारखं तर नाही ना? त्यांनाही “नाही बाबा काही नाही” असं म्हणून शंतनुने बोलणं टाळलं. सगळे जेवण करून आपापल्या रूममध्ये गेले. प्रज्ञाने दोन्ही मुलींना झोपवले आणि परत शंतनूला प्रश्न केला,
“मला वाटत नाही सगळं ठीक आहे असं, खरं सांगशील का काय झालंय ?
पुन्हा तेच उत्तर देऊन तो झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर त्याने त्या क्लायंट ला संपर्क करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण त्याला काहीच response मिळत नव्हता. त्याला धक्का बसलाच होता कारण सगळं व्यवस्थित असून ऑर्डर का काढून घेतली असेल? हा प्रश्न डोक्यातून जाता जात नव्हता. शेवटी दोन तीन दिवसानंतर त्याला समजले की, दुसऱ्या कंपनीने त्यांना चांगले प्रलोभन दाखवून ती स्वतःकडे ऑर्डर घेतली होती.
खरे कारण समजल्यावर त्याच्या जीवात जीव आला कारण त्याच्याकडून अशी काहीच चूक झाली नव्हती. पण प्रलोभनं दाखवून तो कामही करू शकत नव्हता. त्याच्या तत्वात ते बसत नव्हतं. त्याचे खरं तर खूप मोठे नुकसान झाले होते. तरी तो परिस्थितीशी लढत होता. कसंही करून हे पोकळी भरून काढणारच असा त्याचा विश्वास होता. तो खरचच त्या धक्क्यातून सावरला. त्याने खूप कष्ट करून पुन्हा सगळं व्यवस्थीत करून स्पर्धेत उभा राहीला.


Share:

लढा स्वतःशीच स्वतःचा (भाग -१)




अंगात लाल पांढरा शाळेचा ड्रेस घातलेला, केसाला लाल रंगाचा बेल्ट लावलेला, पाठीला दप्तर, गळ्यात वॉटरबॅग अडकवलेली, पायात काळे शूज, पांढरे मोजे अशी छान शाळेसाठी तयार झालेली श्रेया आपल्या आईचा म्हणजे प्रज्ञाचा हात पकडून रूममधून खाली आली, खाली आल्या आल्या तिने प्रज्ञाचा हात झटकला आणि तिच्या बाबाला म्हणजे, शंतनूला हाका मारत पळत सुटली.
“बाबा, ए बाबा अरे, कुठे आहेस तू? बाबा….”
प्रज्ञाही तिच्या मागे धावत होती.
“अगं काय झालं श्रेया? कशाला हवाय बाबा? आल्यावर भेटेल तुला तो, आत्ता कामात असेल तो.”
“थांब ग आई, माझं काम आहे ग त्याच्याकडे”
“बाबा, येना रे लवकर”
“अगं असं ओरडून बोलावू नकोस, थांब.”
खरं तर प्रज्ञाला शंतनूची काळजी वाटत होती की, श्रेयाचा असा आवाज ऐकून तो कशी प्रतिक्रिया देईल.
शंतनू बागकामात अगदी रमून गेला होता. नवीन कुंडीमध्ये नवीन रोपटं लावत तो गाणं गुणगुणत होता. हात सगळे चिखलाने माखलेले होते. ह्या वेळी त्याला कोणी बोलावणार नाही अशी खात्रीच  होती जणू त्याला पण, श्रेयाच्या हाका ऐकल्या आणि, त्याच्या काळजात धस्स झालं. मला परत भास तर नाही ना झाला, असा पुसटसा विचार त्याच्या मनात येऊन गेला. खरच आवाज येतोय का ह्याची त्याने दोन तीनदा खात्री करून घेतली, तर ती खरचच आवाज देत होती. श्रेया आत्ता मला का बोलावत असेल या भीतीने घाई घाई ने त्याने हात धुतले आणि जवळ ठेवलेल्या रुमालाला हात पुसत पुसत तो धावत श्रेयाजवळ आला.
प्रज्ञाने शंतनूला आलेलं बघितलं आणि त्याच्याकडे बघत जागीच थांबली. श्रेया त्याच्या जवळ गेली आणि त्याला मिठी मारली.
“अरे कुठे गेला होतास मी कधीची शोधतेय तुला.” असं जरा लटक्या रागातच ती त्याला म्हणाली.
“अगं मी बागेत होतो. ऐकूच नाही आला तुझा आवाज "
“तुझं माझ्याकडे लक्षच नसतं” अगदी मोठ्या ठसक्याने ती म्हणाली.
“काय झालं माझ्या सानुलीला ?
शंतनूकडे तिला पटेल असं कारण नव्हतच. त्याने आत्ताही तिला असंच सांगितलं की, “मी आत्ता बागकाम करतोय ना मग मला नाही जमणार. आई येतेय ना सोडवायला.”
“नाही मला आई नकोय, आज तूच हवा आहेस, तू कधीच येत नाहीस, आधी कसा आम्हाला शाळेत सोडायला येत होतास, घरी आल्यावर परत फिरायलाही घेऊन जात होतास. आपण कित्ती धम्माल करायचो.
“श्रेया, ऐक असं नको करूस मी येते सोडवायला तुला” प्रज्ञा पुन्हा एकदा समजूत काढत म्हणाली.
“नाही आई, मला आज बाबाच सोडायला येणार नाहीतर मी नाही जाणार शाळेत.” हाताची घडी घालून अगदी रुसूनच बोलली ती.
“बाबा, तुला माहितीये, तू घरी नव्हतास तेंव्हा मला खूप आठवण येत होती तुझी. मी आणि आई रोज तुझ्याबद्दल गप्पा मारायचो की, तू परत आल्यावर मला शाळेत सोडायला येशील, आता तर तू घरी पण आला आहेस मग तू येत का नाहीस? काय झालय तूला?

श्रेंयाचा प्रेमळ आग्रह ऐकून त्याला राहवेना. त्या आग्रहामागे तिच्या दृष्टीने किती महत्वाच्या भावना दडलेल्या होत्या त्या तिने बोलून दाखवल्या. प्रज्ञा नेहमीच त्याला सपोर्ट करत असे. तिनेही त्याला अनेकदा एकटा बाहेर जात जा, आता नक्की जमेल तुला असं म्हंटलं होतं. पण त्याची हिम्मत होत नव्हती. आजही शंतनू आणि प्रज्ञाची नजरा-नजर झाली. तिलाही असच वाटत होतं की, श्रेयाला आज त्यानेच सोडायला जावं. डोळ्यानेच ती शंतनूला धीर देत होती. खरं तर श्रेयाच्या हट्टामुळे आज तो पाघळला होता. त्याच्यात आधीसारखी हिम्मत आलीये असं त्याला क्षणभर वाटलही. पण, जमेल की, नाही ही भीती अजूनही घर करून होतीच. श्रेयाच्या बोलण्याने त्याला गहिवरून आलं आणि तिच्या प्रश्नाला काहीही उत्तर न देता तो त्याच्या रुममध्ये निघून गेला. प्रज्ञाने श्रेयाची कशी बशी समजूत काढली आणि ती तिला सोडवायला गेली. शंतनू खिडकीतून दिसणाऱ्या फुललेल्या गुलमोहराकडे बघत स्वतःला पुन्हा एकदा शोधण्याचा प्रयत्न करू लागला.

खरं तर शंतनू खूप मोठा बिजनेसमन होता. तसा वडिलोपार्जित व्यवसाय पण, त्याने अगदी जिद्दीने नव्या पद्धतीने तो खूप मोठा केला होता. रात्रंदिवस कष्ट केले. प्रज्ञाची ही त्याला साथ होतीच. ती देखील  ऑफिसमध्ये जात होती. वडीलही होते सुरुवतीला पण, आता वडीलांना आराम मिळावा आणि प्रज्ञालाही घरी मुलींची काळजी घ्यावी लागणार त्यामुळे त्याने स्वतःहूनच त्यांना सांगितले की, “मी करेल सगळं एकटा मॅनेज, तुम्ही काहीही काळजी करू नका” आणि, तो करतही होता. त्याला दोन मुली होत्या. सहा  वर्षाची श्रेया आणि नऊ वर्षाची प्रिया. शंतनूचे आई वडीलही तिथेच राहत होते. अशी एकदम आनंदी आणि परफेक्ट फमिली होती. शंतनू काम संभाळून घरी देखील वेळ देत असे. मुलींचे तर भरपूर लाड करायचा प्रत्येक शनिवारी ते सगळे ठरवून बाहेर फिरायला जात. तो आपल्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांशी देखील खूप आपुलकीने, सहकार्याने वागायचा त्यामुळे त्याच्याबद्दलचा लोकांचं मतही चांगलच होतं. खूप माणसं कमावली होती त्याने. मस्त टुमदार बंगला, बंगल्याच्या बाजूला बगीचा, गाडी, घरात नोकरही होते. त्यांनाही तो कधी कमी लेखत नसत. त्यांच्या अडचणींमध्ये तो त्यांना नेहमी मदत करत असत. त्यांच्या दृष्टीने तो देवमाणूस होता. एकंदर काय तर सगळं कसं अगदी दृष्ट लागण्यासारखं होतं.




क्रमशः
भाग २ वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

अस्मिता कुलकर्णी 


Share:

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या