तू असाच रहा माझ्या सोबतीला...



आभाळ होईल ठेंगणं,
अस काहीतरी करू
एकमेकांच्या सहवासाचे,
सुंदर क्षण पेरू ....
खरा खुरा उतरवू राजमहाल गोष्टीतला
तू असाच रहा माझ्या सोबतीला..

चंद्र ,तारे ,चांदण्या
असतील कितीही दूर ...
जुळवूया आनंद देणारे
आपणच आपले सूर
स्वच्छ प्रकाश अनुभवू आपल्याच विश्वासातला.
तू असाच रहा माझ्या सोबतीला..
  
 घेऊया स्वच्छ पावसाचे
चिंब चिंब पांघरूण...
ऐकूया सांजवेळी पडलेल्या
इंद्रधनूची धून
सजूया त्याच्या रंगांसारखं अन, रंगवूया जीवनाला
तू असाच रहा माझ्या सोबतीला..

बोल तुझे नी माझे
रंगवूया नवी कविता
सूर तुझे नी माझे
खळाळत्या सुंदर लाटा
समुद्राची अथांगता शिकवू या मनाला
तू असाच रहा माझ्या सोबतीला..

जगावेगळे काही क्षण
आवडतील जगायला.
तुझ्या नजरेनेच
आपले स्वप्न बघायला...
सुंदर आकार देऊया स्वप्नातल्या कल्पनेला
तू असाच रहा माझ्या सोबतीला..

मला, खरं तर निखळ हसणं हवंय..
स्वच्छंद जगणं हवंय ..
नजरेने फक्त सौंदर्यच दिसेल,
सं निरागस बघणं हवंय ...
आवडेल रे मला जगण्यातली मजा घ्यायला
तू असाच रहा माझ्या सोबतीला..



 अस्मिता कुलकर्णी

Share:

14 comments:

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या