हरवलेली प्रेरणा.. भाग - १




रोजप्रमाणे आजही सेंटर मध्ये जाऊन आजच्या Appoinments बघितल्या. खूप मोठी लिस्ट होती. मी रोजप्रमाणेच त्याच हास्याने सगळ्यांचे स्वागत करत होते. प्रत्येकाला त्यांच्या अडचणींप्रमाणे समुपदेशन करत होते. आपल्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून इतरांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटावे या हेतूनेच मी लोकांसमोर हसऱ्या चेहऱ्यानेच जाते.

सेशन सुरु असतानाच अचानक एक गृहस्थ समोर येऊन उभा राहीला. तो खूप गोंधळलेला होता. सेशन चालू असलेला रोहीतही खूप घाबरला. मी रोहीतला शांत केले आणि त्यांनाही योग्य ती वेळ देऊन बाहेर बसण्यास सांगितले. सेशन संपलं, रोहीत बाहेर पडलेला दिसताच तो गृहस्थ पुन्हा धावत पळत आत आला. गृहस्थ म्हणजे साधारण ३५ वर्षांचा असलेला एक माणूस आणि त्याच्याबरोबर एक कुणी ‘ती’ पण होती. खूप अस्वस्थ, गोंधळलेला, रडवेला त्याला मी शांतपणे बसवून पाणी पिण्यास दिले. चहा मागवला पण त्याला कधी बोलू आणि काय बोलू असे झाले होते. मी बोला म्हंटल्यावर तो अगदी लहान मुलासारखा ढसा ढसा रडू लागला. मला नेमकं काय झाले आहे याचा अंदाज काही केल्या येईना. 


"शांत व्हा, आणि मला सांगा, तुमचं नाव काय आहे?" 
तेंव्हा कसाबसा शांत होऊन तो म्हणाला
प्लीज माझ्या बायकोला वाचवा, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. असून नसल्यासारखी अवस्था झालीये तिची, प्लीज”. 
हळू हळू तो जरासा शांत झाला. माझ्याकडून येणाऱ्या शब्दांची तो अक्षरशः सुन्नपणे वाट बघत होता.
“काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल.”  
माझी होकारार्थी मान हललेली बघून तो सुखावला. चेहऱ्यावर खूप मोठं समधान आणि अगदीच छोटसं स्मितहास्य दिसलं, आणि तो सांगू लागला. “माझं नाव सिद्धार्थ आणि तिचं प्रेरणा....”

तो जसं जसं व्यक्त होत गेला तसा मला संपूर्ण परिस्थितीचा अंदाज आला. त्याचे प्रेम बघून आणि हे जे काही घडलं आहे ते सारं ऐकून खूप वाईट वाटलं. त्याचं सगळं सांगून झाल्यानंतर बाहेर बसवलेली तिला मी आत बोलावून घेतले. तिच्या चेहऱ्यावर शुन्य भाव, घाबरलेली, भांबावलेली, डोळे अगदीच निस्तेज. तिच्याशी संवाद साधण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागणार होते ही पुरेपूर जाणीव मला होतीच. आज मी फक्त तिचे नाव आणि घरचा पत्ता एवढ्याच माहितीवर थांबले. नाव विचारल्यावरही पूर्ण नाव सांगताना तिची धांदल उडालीच, पत्ता तर दूरचीच गोष्ट. फक्त “प्रेरणा” हे नाव तिने खूप मोठ्याने उच्चारले. मी तिच्याकडे बघून माझ्या नेहमीच्याच हास्यात अजून भर टाकून “खूपच सुंदर नाव आहे तुझं” असे म्हणून त्यांना पुढची Appoinment  दिली.


त्याच्या डोळ्यात माझ्यावरचा विश्वास दिसत होता आणि मी देखील त्या विश्वासाची जबाबदारी स्वीकारली होती. मी घरी गेल्यानंतर आधी माझ्या नवऱ्याला फोन लावला, मनसोक्त गप्पा मारून घेतल्या. मग मलाही मोकळं वाटलं आणि विचारांना दिशा मिळाली. त्या रात्रभरही माझ्या डोक्यात ह्या केस संदर्भातच विचार चालले होते. एखादं आपलं जवळचं हक्काचं माणूस आपल्या समोर आहे, पण आपल्या जवळ नाही ही गोष्टं खरच किती वेदना देणारी आहे. काही केल्या विचार मनातून जात नव्हता. काही दिवसांपूर्वी घडलेली आत्महत्येची केस पुन्हा एकदा उगाचच मनात घोळून गेली.. काही केल्या शांत वाटेना, शेवटी एक मस्त अशी गझल ऐकली तेंव्हा कुठे खूप शांत आणि छान झोप लागली.

दूसरा  दिवस उगवला भरभर रोजप्रमाणे तयार होऊन दोघांचे डबे भरून नवऱ्याशी “प्रेमळ” संवाद करून त्याला बाय म्हंटल. भेटू संध्याकाळी, असं म्हणून गाडीचा स्पीड वाढवला. मलाही आज प्रेरणाला कधी भेटेल असे झाले होते. सिद्धार्थ आणि प्रेरणाची परत नव्याने ओळख करून द्यायची होती.

मी सेंटर मध्ये येण्याच्या अगोदरच ते दोघेही सेंटरमध्ये हजर होते. मी तिला थांबवून घेतलं आणि तो ऑफिसला निघून गेला. तशी तिची नजर घाबरली ती त्याला शोधू लागली. चेहरा  कासावीस, रडवेला झाला. मी तिच्या जवळ जाऊन खूप विश्वासाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तशी ती हळू-हळू शांत झाली. आता माझा चेहरा तिला जरा जवळचा वाटू लागला. अगदी जुजबी प्रश्न विचारून तिला थोडं बोलतं केलं..”तुझं नाव खरच खूप आवडलं मला.” तसे तिने थोडेसे ओठ लांब केले. हसणं नव्हतच ते, हो पण आमची नजरानजर मात्र झाली..

तुला सगळ्यात जास्ती काय आवडतं ? मी उत्तराची वाटच बघत होते ती खूप वेळ शांत होती, पण अचानक उद्गारली, माझं गाव! मी तिला पेपर देऊन तिच्या गावाविषयी काही वाक्य लिहिण्यास सांगितली. तो तिचा आवडीचा विषय असल्यामुळे काही वाक्य कशाला, तिने अक्खा निबंधच लिहिला. नंतर तिलाच तो वाचायलाही लावला तिने तो अगदी मनापासून वाचला. चेहरा खुलला, जणू गावातच पोहोचली होती ती. तिथल्या आठवणी, माणसं अगदी तिच्या समोरच आहेत असं वाटत होतं. वाचणं संपलं तस तसा तिच्या चेहऱ्यावरचा आनंदही ओसरला.. पुन्हा गोंधळली. सिद्धार्थ कधी येईल? म्हणून विचारायला लागली. आणि तो आला, तशी ती त्याच्याकडे धावली त्याच्या जवळ जाऊन मनसोक्त रडली. त्यालाही आश्चर्य वाटलं कित्येक दिवस झाले तीने त्याच्याकडे निटसं पाहिलंही नव्हतं, मनसोक्त बोलणं दूरच ती रडलीही नव्हती. त्याला रडतेय हे बघून वाईट वाटलं खरं पण एका दृष्टीने तो खुश झाला होता. तो thank you म्हणाला, मी देखील पुढची Appoinment दिली आणि तिला बाय म्हंटलं.

Share:

0 comments:

Post a Comment

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या