
आज उठायला जरा उशिरच झाला. खूप गडबड होती
उठल्यावर सगळं आवरे पर्यंत फोनकडे बघायलाही वेळ झाला नाही. सगळं आवरून झाल्यावर
फोन हातात घेतला तर बाबांचे चार मिस कॉल. पहाटे पहाटे उठून फोन केला होता बाबांनी.
माझ्यासाठी पाच म्हणजे अगदीच लवकर होतं पण, बाबांची सकाळ
चार वाजताच होते. थोडक्यात माझ्याकडून फोन घेणं होणारच नव्हतं, पण इतक्या लवकर का कॉल केला असावा म्हणून घाबरून घाईघाईने बाबांना फोन केला.
हॅलो म्हंटल्यावर, खूप हळवा आवाज आला खरं तर, मला जरा काळजीच वाटली. मी विचारलं, “काय झालं बाबा, सगळं ठीक आहे ना ? आई बरी आहे ना?” एवढे मिस कॉल? माझे अखंड प्रश्न सुरु झाले. “अगं हो हो काही नाही झालं
आम्ही व्यवस्थित आहोत. उलट आज खूप छान वाटतंय अगदी खूप फ्रेश. “अरे वा बाबा आज काय
स्पेशल ? आईने डायबेटीस विसरून मस्त काहीतरी गोड खायला
केलय वाटतं." बाबाही हसले, छान वाटलं. “अगं
काल तुझी खूप आठवण येत होती. मग तुझ्या लग्नाचे फोटो काढले आणि बघत बसलो होतो. मग
हळू हळू जुने फोटो निघाले त्यात तुझं लहानपण आमचं लग्न, तुझे- आजी आजोबा सगळंच आलं ओघानं. खूप जुन्या गोष्टी आठवल्या खूप गप्पा
मारल्या, तुझं लहानपण पुन्हा एकदा अनुभवलं. लहानपणी
हट्ट करून घेतलेल्या खेळण्या, ड्रेस याच्या
सगळ्या आठवणी जाग्या झाल्या पहिल्यांदा जावई दाखवला होता तो देखील फोटो बघितला
बरका आणि सगळं लग्न आठवलं. खरं तर खूप छान वाटलं. मला परत एकदा तरुण झाल्यासारखं
वाटतंय.आज मी काहीही करू शकतो असं वाटतंय अगदी.” बाबांच्या बोलण्यावरून खरं तर
गहिवरून आलं होतं. पण सावरून बाबांना गम्मत म्हणून म्हंटलं,”बाबा तुम्ही तर माझे हीरोच आहात. तुम्ही तरुण झाल्यासारखं वाटतंय काय म्हणता
अगदी तिशीतलेच वाटतात अजूनही मला." दोघेही मनसोक्त हसलो आणि फोन ठेवला.
ह्या संवादाने जाणीव झाली की, आपण आनंदात घालवलेले क्षण साठवून ठेवण्यासाठी “फोटो" हे माध्यम कसलं
सॉल्लिड आहे. आयुष्यात आपण जेंव्हा पुढे पुढे जातो तेंव्हा मागचे अनंदाचेच क्षण
आपल्याला आपल्या सुख-दुःखाच्या क्षणी, नव्याने
जगण्याचे बळ देतात. हातातून निसटलेले क्षण पुन्हा जगता येत नाहीत पण पुन्हा
अनुभवता नक्कीच येऊ शकतात. खरं तर हे क्षण आपल्या मनात अगदी रुजलेले असतात पण ते
दृष्टीलाही दिसत असतील तर त्याची जाणीव अगदी आतून आपल्या मनातून होते. जसा आहे
तसाच टिपलेला क्षण पुन्हा एकदा नव्याने जगला जातो.
पूर्वीच्या काळी एवढ्या आधुनिक गोष्टी
नसल्यामुळे काही गोष्टी नक्कीच मिस झाल्या असतील पण, आपल्या आई वाडीलांसाठी तेवढेच काही फोटो आहेत जे की, त्यांनी प्रिंट काढून ठेवलेले वेगवेगळे अगदी डोळ्याच्या जवळ घेऊन बघता येणारे.
ते बघून बघूनच ते पुन्हा पुन्हा तरुण होतात आणि नव्याने जगतात.खरं त्यांच्या
काळातले ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो आत्ताही त्यांच्या आयुष्यात रंग भरतात.
लग्नाच्या प्रत्येक विधीचे फोटो, लहान बाळाचे रोज होणारे बदल टिपणारे फोटो, फिरायला गेल्यानंतरचे मोकळेपणा टिपणारे फोटो, घरातल्या सगळ्यांच्या नकळत काढलेला दोघांचा किंवा एकट्याचा एखादा सेल्फी, असे अनेक प्रकारे आपण हे फोटो काढत असतो. रोजच्या धावपळीच्या रुटीन मध्ये असे
काहींसेच क्षण मिळतात जे आपण अगदी मनापासून जगलेले असतात. हे क्षण जर फोटोत साठवून
ठेवले तर त्याची माजा काही औरच.
कोणाकोणाला फोटो काढणं फारसं आवडत नाही तर
काही अगदी रोजचा रोज फोटो स्टेटस म्हणून शेअर करतात. काही सोशल साईटवर आपले फोटो
शेअर करून लाईक आणि कमेन्ट ची वाट बघतात तर कोणाला ते अपल्यापुरतेच मर्यादित
असलेले आवडतात. आता तर एवढी आधुनिक टेक्नॉलॉजी निघाली आहे की, तुम्हाला एखादा फोटो बघताना अगदी आपण त्या फोटोचाच एक भाग आहोत असा भास होतो.
पूर्वी काढलेले फोटो कधी हरवून जात कधी खराब होत, पण आता तुम्ही ते फोटो पिढ्यांपिढ्या जपून ठेऊ शकता.काही वेळा आधुनिकतेचा
दुरुपयोगही होत आहे पण चांगल्या गोष्टींसाठी याचा उपयोग झाला तर दुधात साखरच.
अर्थात प्रत्येकानेच आधुनिक गोष्टी
वापराव्यात असं नाही पण प्रत्येकाने आपापल्या परीने फोटो मात्र नक्की काढावेत.
काही काही दिवसांनी घरातल्यांनी, मित्रमंडळींनी
मिळून ते क्षण पून्हा एकदा एकत्र भरभरून जगावे.
श्राव्याच्या पहिल्या वाढदिवसाला आम्हीही तिचे
बोळके हास्य असलेल्या फोटोंचे एक कोलाज तयार केले होते. ते तयार करत असताना देखील
आम्ही तिचं एक वर्ष जसं च्या तसं अनुभवलं. आता श्राव्या चार वर्षाची झाली आहे. ते
कोलाज अजूनही भिंतीवर फ्रेम करून लावले आहे. रोज त्याच्याकडे बघितलं की, सगळे जुने छान क्षण आठवतात खूप छान, प्रसन्न आणि
मोकळं वाटतं. श्राव्यालाही त्या कोलाजमध्ये असलेल्या फोटो मागे घडलेल्या गोष्टी ऐकायला खूप आवडते आणि
मग आमच्या तिघांचा दहा मीनिटांचाच असला तरी एकमेकांना क्वालिटी टाइम दिला
जातो..
त्यामुळे नक्की फोटो काढत जा, फोटो काढता क्षणी
आणि फोटो पाहिल्यानंतर मनापासून हसत जा..
अस्मिता कुलकर्णी
😍😍😍😍once again beautiful and memorable one😊👍
ReplyDeleteThanks dear..
Deleteखखू छान! अशीच लिहित रहा.
ReplyDeleteThank you...Nakkich..
DeleteKhup chhan:)
ReplyDeleteThanks dear...
Delete