
सध्या ज्या गोष्टी नजरेसमोर आल्या त्याने मन अगदीच उदास झालं होतं. एक स्त्री
असल्यामुळे त्याची जाणीव अगदीच तीव्र होत होती. भीती, असुरक्षितता, काळजी सगळ्या भावना एकदम
जाणवत होत्या आणि मला हे सुचलं....
बोलता न येत होते शब्दाने
पण, शरीर घाव बोलत होते,
प्रतिकार होत होता वासनेला
पण, मन हतबल होत होते....
विकृतीने असे संचारले
तिथे भयानक थैमान होते,
चित्त थरारक अशा दृश्याचे
ते लज्जास्पद कोंदण होते....
जागी होईल माणुसकी
तिचा, आंधळा विश्वास होता,
तिच्या, विश्वासाचा खेळ करणारा
तो, असा एक हैवान होता....
त्याने हिसकावून घेतला
जो, मोगरा तिने वेचला होता,
ती हरत चालली तो, एक-एक क्षण
अन तो, हरूनही जिंकत होता....
मावळली आशा होती
अंधारले तिचे अस्तित्व होते,
ती थांबली जणू श्वास रोखून
अन शरीरही कोमेजत होते.
जरी, हाक ऐकू न आली कुणाला
जरी, ना कोणी कृष्ण धावूनी आला,
जरी, साथ कुणाची न त्या क्षणी तुला
तूच ऊठ, आव्हान दे त्या वादळाला....
तिच झाली स्वयंसिद्धा
तिच नवी उमेद बनली होती,
सर्वार्थाने अशी लढली ती
तिलाच ती गवसली होती.....
तिनेच फोडला टाहो शेवटी
पुन्हा एकदा केला वार होता,
एकवटला सारा जीव असा
की त्याचा डाव मोडला होता.
उघड्या डोळ्यात तिच्या
समोरच्या क्षणाची खात्री होती,
ती उठली सावरून स्वतःला
आता, तडफड संपली होती.
जरी रोजचाच होता सूर्योदय
पण, तिने नव्याने पहिला होता,
नव्यानेच ती जन्मली होती
अन श्वासही शुद्ध मोकळा होता...
स्त्रियांना निसर्गाकडून सौंदर्याचे वरदान मिळाले आहे पण हेच वरदान
त्यांच्यासाठी शाप ठरतंय असं वाटतय. आजकाल सर्रास घडणाऱ्या घडामोडींमुळे मन नाराज
होत चाललंय. भीती वाटते मुलगी असण्याची आणि आपल्याला एक मुलगी असण्याची. घरातून
बाहेर पडायला लागल्यावर मुलींची काळजी ही एक खूप मोठी गोष्टं मनाला सारखी सतावत
असते. आत्ताचा काळ एवढा निर्ढावला आहे की, कुठलातरी एक समाज तयार होत आहे की, ज्याला न कायद्याची भीती न
स्वतःची लाज आणि, काहीही झालं तरी हा समाज वाढतच आहे. तेंव्हा प्रत्येक स्त्री ने मुलीने आपली
काळजी स्वतःच घ्यायला हवी.
मुलगी लहान असल्यापासूनच तिच्याशी घरातल्या लोकांचा विशेषतः आईचा मोकळा संवाद
हवा. आई मुलीच्या प्रत्येक गोष्टीत महत्वाची भूमिका बजावत असते. लहानपणी घेतली
जाणारी काळजी, खाणं- पिणं, राहणं अश्या अनेक नाजूक
गोष्टीही ती जितक्या मोकळे पणाने आपल्या मुलीला समजावून सांगते त्याच बरोबर असाही
एक समाज आपल्या आजूबाजूला आहे ह्याची देखील ओळख तिला करून देणे गरजेचे असते. तसं पाहायला गेलं तर
मुलीना तो सेन्स जन्मापासूनच असतो. तिला प्रत्येक स्पर्शाची जाण असते. फक्त ह्या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघायचे
हे तिला सांगायला हवे.. तिलाही आई वडिलांशी मोकळेपणाने बोलता यायला हवं. पुरुषाची
नजर, स्पर्श हे विचित्र वाटत असेल तर तिला आईला वडिलांना हे सांगता यायला हवं. तसेच
बाहेरच्या लोकांवर कसा आणि किती विश्वास ठेवायचा हेही त्यांना शिकवावेच लागेल. मुलींच्या
पालकांची जबाबदारी दुप्पट होत चालली आहे. वेगवेगळ्या क्लासेसबरोबर कराटे, कुन्फू यांसारखे क्लासही
आवश्यक आहेत जर क्लास नाही लावला तरी आई-वडिलांनीच काही सोप्प्या trics मुलींना शिकवणे गरजेचेच आहे. मुलगी साधरण वयात
आली की, ती प्रत्येक पुरुषाशी लढू शकेल, त्यांचा सामना करू शकेल एवढी धमक तिच्यात निर्माण करायला
हवी. कधी कधी मुली देखील वाहवत जातात तेंव्हा चांगल्या आणि वाईट गोष्टींची जाण
तिला आधीच द्यायला हवी. खरं तर कणखरता तिच्या अंगात असायला हवी.
लहान काय आणि मोठं काय आज कल स्त्री चं वय हा शून्य विषय आहे. प्रत्येकीलाच स्वतःच्या
मनगटात बळ आणणे गरजेचे आहे. मुंबईच्या लोकलमध्ये फिरताना ज्या प्रकारे स्त्रिया
स्व-सौरक्षणा साठी पिना, टाचण्या, तिखटाचे पाकीट घेऊन फिरतात
तसेच प्रत्येक स्त्रीने बाहेर पडताना आपल्या पर्स मध्ये ह्या गोष्टी रोज ठेवायलाच
पाहिजेत. मदतीला कोणी येयील ह्याची वाट बघण्यापेक्षा मी माझे संरक्षण स्वतःच करणार
असा विश्वास कायम मनात असायला हवा. समाजाला घाबरण्या पेक्षा आपण किती strong आहोत हे त्याला जाणवून
द्यायला पाहिजे.
बघायला गेला तर
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हेही लक्षात घ्यायला हवं. अशा किती तरी केसेस घडून जातात आणि त्या नजरेसमोरही येत नाहीत किंवा
काही केसेस आरोप करायचा म्हणून समोर आणल्या जातात, आणि मग न्याय वगैरे, अर्थात ज्याने कृत्य केलं त्याला
हमखास शिक्षा ही झालीच पाहिजे पण, त्या गोष्टी चिघळतात. राजकारण सहज आपल्या पद्धतीने ह्या गोष्टींचा
पाठलाग करतं. आपण कितीही ओरडून सांगत असू तरी आपला आवाज त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचत
नाही. याहीपेक्षा त्यांना जे ऐकायचं असतं तेच त्यांना ऐकू येतं आणि, न्याय मिळणं कठीण होऊन
बसतं.
खरं तर एक स्त्री पूर्ण घर सुधरवू शकते. आईचे आपल्या मुलांवर बारीक लक्ष हवे.
त्यांनाही विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी शेअर करण्याची सवय लावायला हवी. बायकोही
आपल्या नवऱ्याशी ह्या विषयावर मोकळेपणाने बोलली पाहिजे. तिच्या बोलण्यावरून खरच हा
विषय किती नाजूक आहे ह्याची जाणीव प्रत्येक नवऱ्याला व्हायला हवी. एक बहिण आपल्या
भावाच्या गोष्टींशी नक्कीच परिचित असते तिने त्यालाही ह्या गोष्टी किती संवेदनशील
आहेत ते समजून सांगावे, मैत्रीण मित्राशी बोलताना किती comfortable असते आणि ती का
असते हेही तिने त्याला जाणवून द्यायला हवे. एकंदर काय तर स्त्री पुरुषाच्या
प्रत्येक नात्यात ह्या विषयावर जाणीवपूर्वक चर्चा व्हायलाच हवी की, जेणे करून प्रत्येकाला ह्या
नात्यांविषयी आणि स्त्रियांविषयी आदर निर्माण होईल.
एखाद्या वेळेस अशी काही घटना घडते आणि सगळे लोकं अचानक जागे झाल्यासारखे
वागतात. फक्त त्याच वेळी त्यांचं समजाशी असलेलं नातं उफाळून येतं. खूप चीड चीड
होते. पुरुष असो वा स्त्री, राग अनावर होतो. मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरण्यात
त्यांना शहाणपणा वाटतो जात, धर्म, राजकारण, मिडिया अगदी सगळ्यांनाच ऊत येतो आणि त्यातून काहीच हाती
लागत नाही. ती घटना तिथेच थांबते. आज एका घटनेला न्याय मिळाला की सगळं संपलं, दुसऱ्या दिवसापासून समाज
बदलला चांगला झाला याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. खरं तर संवेदनशील समाजाची
निर्मिती ही एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे. अर्थात ही एका कुणाची नाही तर, प्रत्येकाचीच नैतिक जबादारी आहे.
जी नेहमीच प्रत्येकाने पार पाडायला हवी.
त्यामुळे समाजातील अशा विकृतीशी लढण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही सज्ज
असायला हवं. आचरणात चांगल्या गोष्टी, संस्कार यांचा जाणीवपूर्वक दैनंदिन जीवनात उपयोग करावा. सामाजिक
कर्तव्य म्हणून प्रत्येक स्त्रीचा आदर व्हायलाच हवा आणि, प्रत्येक स्त्रीने तो स्वतःहूनही
जपावा.
अस्मिता कुलकर्णी
Wah parkhad mat mandale ahes ani bhavana hi
ReplyDeleteKhup chHan Amsita
Keep it up 👍
Thanks dear..
Deleteछान!!
ReplyDeleteप्रत्येक स्त्रीने असाच विचार करायला हवाच.
ReplyDeleteधन्यवाद..हो नक्कीच..
Delete