घुसमट...



ध्या ज्या गोष्टी नजरेसमोर आल्या त्याने मन अगदीच उदास झालं होतं. एक स्त्री असल्यामुळे त्याची जाणीव अगदीच तीव्र होत होती. भीती, असुरक्षितता, काळजी सगळ्या भावना एकदम जाणवत होत्या आणि मला हे सुचलं....

बोलता न येत होते शब्दाने
पण, शरीर घाव बोलत होते,
प्रतिकार होत होता वासनेला
पण, मन हतबल होत होते....

विकृतीने असे संचारले
तिथे भयानक थैमान होते,
चित्त थरारक अशा दृश्याचे
ते लज्जास्पद कोंदण होते....

जागी होईल माणुसकी
तिचा, आंधळा विश्वास होता,
तिच्या, विश्वासाचा खेळ करणारा
तो, असा एक हैवान होता....

त्याने हिसकावून घेतला
जो, मोगरा तिने वेचला होता,
ती हरत चालली तो, एक-एक क्षण
अन तो, हरूनही जिंकत होता....

मावळली आशा होती
अंधारले तिचे अस्तित्व होते,
ती थांबली जणू श्वास रोखून
अन शरीरही कोमेजत होते.

जरी, हाक ऐकू न आली कुणाला
जरी, ना कोणी कृष्ण धावूनी आला,
जरी, साथ कुणाची न त्या क्षणी तुला
तूच ऊठ, आव्हान दे त्या वादळाला....

तिच झाली स्वयंसिद्धा
तिच नवी उमेद बनली होती,
सर्वार्थाने अशी लढली ती
तिलाच ती गवसली होती.....

तिनेच फोडला टाहो शेवटी
पुन्हा एकदा केला वार होता,
एकवटला सारा जीव असा
की त्याचा डाव मोडला होता.

उघड्या डोळ्यात तिच्या
समोरच्या क्षणाची खात्री होती,
ती उठली सावरून स्वतःला
आता, तडफड संपली होती.

जरी रोजचाच होता सूर्योदय
पण, तिने नव्याने पहिला होता,
नव्यानेच ती जन्मली होती
अन श्वासही शुद्ध मोकळा होता...

स्त्रियांना निसर्गाकडून सौंदर्याचे वरदान मिळाले आहे पण हेच वरदान त्यांच्यासाठी शाप ठरतंय असं वाटतय. आजकाल सर्रास घडणाऱ्या घडामोडींमुळे मन नाराज होत चाललंय. भीती वाटते मुलगी असण्याची आणि आपल्याला एक मुलगी असण्याची. घरातून बाहेर पडायला लागल्यावर मुलींची काळजी ही एक खूप मोठी गोष्टं मनाला सारखी सतावत असते. आत्ताचा काळ एवढा निर्ढावला आहे की, कुठलातरी एक समाज तयार होत आहे की, ज्याला न कायद्याची भीती न स्वतःची लाज आणि, काहीही झालं तरी हा समाज वाढतच आहे. तेंव्हा प्रत्येक स्त्री ने मुलीने आपली काळजी स्वतःच घ्यायला हवी.

मुलगी लहान असल्यापासूनच तिच्याशी घरातल्या लोकांचा विशेषतः आईचा मोकळा संवाद हवा. आई मुलीच्या प्रत्येक गोष्टीत महत्वाची भूमिका बजावत असते. लहानपणी घेतली जाणारी काळजी, खाणं-  पिणं, राहणं अश्या अनेक नाजूक गोष्टीही ती जितक्या मोकळे पणाने आपल्या मुलीला समजावून सांगते त्याच बरोबर असाही एक समाज आपल्या आजूबाजूला आहे ह्याची देखील ओळख तिला करून देणे गरजेचे असते. तसं पाहायला गेलं तर मुलीना तो सेन्स जन्मापासूनच असतो. तिला प्रत्येक स्पर्शाची जाण  असते. फक्त ह्या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघायचे हे तिला सांगायला हवे.. तिलाही आई वडिलांशी मोकळेपणाने बोलता यायला हवं. पुरुषाची नजर, स्पर्श हे विचित्र वाटत असेल तर तिला आईला वडिलांना हे सांगता यायला हवं. तसेच बाहेरच्या लोकांवर कसा आणि किती विश्वास ठेवायचा हेही त्यांना शिकवावेच लागेल. मुलींच्या पालकांची जबाबदारी दुप्पट होत चालली आहे. वेगवेगळ्या क्लासेसबरोबर कराटे, कुन्फू यांसारखे क्लासही आवश्यक आहेत जर क्लास नाही लावला तरी आई-वडिलांनीच काही सोप्प्या trics  मुलींना शिकवणे गरजेचेच आहे. मुलगी साधरण वयात आली की, ती प्रत्येक पुरुषाशी लढू शकेल, त्यांचा सामना करू शकेल एवढी धमक तिच्यात निर्माण करायला हवी. कधी कधी मुली देखील वाहवत जातात तेंव्हा चांगल्या आणि वाईट गोष्टींची जाण तिला आधीच द्यायला हवी. खरं तर कणखरता तिच्या अंगात असायला हवी.

लहान काय आणि मोठं काय आज कल स्त्री चं वय हा शून्य विषय आहे. प्रत्येकीलाच स्वतःच्या मनगटात बळ आणणे गरजेचे आहे. मुंबईच्या लोकलमध्ये फिरताना ज्या प्रकारे स्त्रिया स्व-सौरक्षणा साठी  पिना, टाचण्या, तिखटाचे पाकीट घेऊन फिरतात तसेच प्रत्येक स्त्रीने बाहेर पडताना आपल्या पर्स मध्ये ह्या गोष्टी रोज ठेवायलाच पाहिजेत. मदतीला कोणी येयील ह्याची वाट बघण्यापेक्षा मी माझे संरक्षण स्वतःच करणार असा विश्वास कायम मनात असायला हवा. समाजाला घाबरण्या पेक्षा आपण किती strong आहोत हे त्याला जाणवून द्यायला पाहिजे.
बघायला गेला तर प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हेही लक्षात घ्यायला हवं. अशा किती तरी केसेस  घडून जातात आणि त्या नजरेसमोरही येत नाहीत किंवा काही केसेस आरोप करायचा म्हणून समोर आणल्या जातात, आणि मग न्याय वगैरे, अर्थात ज्याने कृत्य केलं त्याला हमखास शिक्षा ही झालीच पाहिजे पण, त्या गोष्टी चिघळतात. राजकारण सहज आपल्या पद्धतीने ह्या गोष्टींचा पाठलाग करतं. आपण कितीही ओरडून सांगत असू तरी आपला आवाज त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. याहीपेक्षा त्यांना जे ऐकायचं असतं तेच त्यांना ऐकू येतं आणि, न्याय मिळणं कठीण होऊन बसतं.

खरं तर एक स्त्री पूर्ण घर सुधरवू शकते. आईचे आपल्या मुलांवर बारीक लक्ष हवे. त्यांनाही विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी शेअर करण्याची सवय लावायला हवी. बायकोही आपल्या नवऱ्याशी ह्या विषयावर मोकळेपणाने बोलली पाहिजे. तिच्या बोलण्यावरून खरच हा विषय किती नाजूक आहे ह्याची जाणीव प्रत्येक नवऱ्याला व्हायला हवी. एक बहिण आपल्या भावाच्या गोष्टींशी नक्कीच परिचित असते तिने त्यालाही ह्या गोष्टी किती संवेदनशील आहेत ते समजून सांगावे, मैत्रीण मित्राशी बोलताना किती comfortable असते आणि ती का असते हेही तिने त्याला जाणवून द्यायला हवे. एकंदर काय तर स्त्री पुरुषाच्या प्रत्येक नात्यात ह्या विषयावर जाणीवपूर्वक चर्चा व्हायलाच हवी की, जेणे करून प्रत्येकाला ह्या नात्यांविषयी आणि स्त्रियांविषयी आदर निर्माण होईल.

एखाद्या वेळेस अशी काही घटना घडते आणि सगळे लोकं अचानक जागे झाल्यासारखे वागतात. फक्त त्याच वेळी त्यांचं समजाशी असलेलं नातं उफाळून येतं. खूप चीड चीड होते. पुरुष असो वा स्त्री, राग अनावर होतो. मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरण्यात त्यांना शहाणपणा वाटतो जात, धर्म, राजकारण, मिडिया अगदी सगळ्यांनाच ऊत येतो आणि त्यातून काहीच हाती लागत नाही. ती घटना तिथेच थांबते. आज एका घटनेला न्याय मिळाला की सगळं संपलं, दुसऱ्या दिवसापासून समाज बदलला चांगला झाला याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. खरं तर संवेदनशील समाजाची निर्मिती ही एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे. अर्थात ही एका कुणाची नाही तर, प्रत्येकाचीच नैतिक जबादारी आहे. जी नेहमीच प्रत्येकाने पार पाडायला हवी.

त्यामुळे समाजातील अशा विकृतीशी लढण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही सज्ज असायला हवं. आचरणात चांगल्या गोष्टी, संस्कार यांचा जाणीवपूर्वक दैनंदिन जीवनात उपयोग करावा. सामाजिक कर्तव्य म्हणून प्रत्येक स्त्रीचा आदर व्हायलाच हवा आणि, प्रत्येक स्त्रीने तो स्वतःहूनही जपावा.

अस्मिता कुलकर्णी
Share:

फोटो - साठवण एका क्षणाची...




ज उठायला जरा उशिरच झाला. खूप गडबड होती उठल्यावर सगळं आवरे पर्यंत फोनकडे बघायलाही वेळ झाला नाही. सगळं आवरून झाल्यावर फोन हातात घेतला तर बाबांचे चार मिस कॉल. पहाटे पहाटे उठून फोन केला होता बाबांनी. माझ्यासाठी पाच म्हणजे अगदीच लवकर होतं पण, बाबांची सकाळ चार वाजताच होते. थोडक्यात माझ्याकडून फोन घेणं होणारच नव्हतं, पण इतक्या लवकर का कॉल केला असावा म्हणून घाबरून घाईघाईने बाबांना फोन केला.
हॅलो म्हंटल्यावर, खूप हळवा आवाज आला खरं तर, मला जरा काळजीच वाटली. मी विचारलं, “काय झालं बाबा, सगळं ठीक आहे ना ? आई बरी आहे ना?” एवढे मिस कॉल? माझे अखंड प्रश्न सुरु झाले. “अगं हो हो काही नाही झालं आम्ही व्यवस्थित आहोत. उलट आज खूप छान वाटतंय अगदी खूप फ्रेश. “अरे वा बाबा आज काय स्पेशल ? आईने डायबेटीस विसरून मस्त काहीतरी गोड खायला केलय वाटतं." बाबाही हसले, छान वाटलं. “अगं काल तुझी खूप आठवण येत होती. मग तुझ्या लग्नाचे फोटो काढले आणि बघत बसलो होतो. मग हळू हळू जुने फोटो निघाले त्यात तुझं लहानपण आमचं लग्न, तुझे- आजी आजोबा सगळंच आलं ओघानं. खूप जुन्या गोष्टी आठवल्या खूप गप्पा मारल्या, तुझं लहानपण पुन्हा एकदा अनुभवलं. लहानपणी हट्ट करून घेतलेल्या खेळण्या, ड्रेस याच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या पहिल्यांदा जावई दाखवला होता तो देखील फोटो बघितला बरका आणि सगळं लग्न आठवलं. खरं तर खूप छान वाटलं. मला परत एकदा तरुण झाल्यासारखं वाटतंय.आज मी काहीही करू शकतो असं वाटतंय अगदी.” बाबांच्या बोलण्यावरून खरं तर गहिवरून आलं होतं. पण सावरून बाबांना गम्मत म्हणून म्हंटलं,बाबा तुम्ही तर माझे हीरोच आहात. तुम्ही तरुण झाल्यासारखं वाटतंय काय म्हणता अगदी तिशीतलेच वाटतात अजूनही मला." दोघेही मनसोक्त हसलो आणि फोन ठेवला.
ह्या संवादाने जाणीव झाली की, आपण आनंदात घालवलेले क्षण साठवून ठेवण्यासाठी “फोटो" हे माध्यम कसलं सॉल्लिड आहे. आयुष्यात आपण जेंव्हा पुढे पुढे जातो तेंव्हा मागचे अनंदाचेच क्षण आपल्याला आपल्या सुख-दुःखाच्या क्षणी, नव्याने जगण्याचे बळ देतात. हातातून निसटलेले क्षण पुन्हा जगता येत नाहीत पण पुन्हा अनुभवता नक्कीच येऊ शकतात. खरं तर हे क्षण आपल्या मनात अगदी रुजलेले असतात पण ते दृष्टीलाही दिसत असतील तर त्याची जाणीव अगदी आतून आपल्या मनातून होते. जसा आहे तसाच टिपलेला क्षण पुन्हा एकदा नव्याने जगला जातो.
पूर्वीच्या काळी एवढ्या आधुनिक गोष्टी नसल्यामुळे काही गोष्टी नक्कीच मिस झाल्या असतील पण, आपल्या आई वाडीलांसाठी तेवढेच काही फोटो आहेत जे की, त्यांनी प्रिंट काढून ठेवलेले वेगवेगळे अगदी डोळ्याच्या जवळ घेऊन बघता येणारे. ते बघून बघूनच ते पुन्हा पुन्हा तरुण होतात आणि नव्याने जगतात.खरं त्यांच्या काळातले ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो आत्ताही त्यांच्या आयुष्यात रंग भरतात.
लग्नाच्या प्रत्येक विधीचे फोटो, लहान बाळाचे रोज होणारे बदल टिपणारे फोटो, फिरायला गेल्यानंतरचे मोकळेपणा टिपणारे फोटो, घरातल्या सगळ्यांच्या नकळत काढलेला दोघांचा किंवा एकट्याचा एखादा सेल्फी, असे अनेक प्रकारे आपण हे फोटो काढत असतो. रोजच्या धावपळीच्या रुटीन मध्ये असे काहींसेच क्षण मिळतात जे आपण अगदी मनापासून जगलेले असतात. हे क्षण जर फोटोत साठवून ठेवले तर त्याची माजा काही औरच.
कोणाकोणाला फोटो काढणं फारसं आवडत नाही तर काही अगदी रोजचा रोज फोटो स्टेटस म्हणून शेअर करतात. काही सोशल साईटवर आपले फोटो शेअर करून लाईक आणि कमेन्ट ची वाट बघतात तर कोणाला ते अपल्यापुरतेच मर्यादित असलेले आवडतात. आता तर एवढी आधुनिक टेक्नॉलॉजी निघाली आहे की, तुम्हाला एखादा फोटो बघताना अगदी आपण त्या फोटोचाच एक भाग आहोत असा भास होतो. पूर्वी काढलेले फोटो कधी हरवून जात कधी खराब होत, पण आता तुम्ही ते फोटो पिढ्यांपिढ्या जपून ठेऊ शकता.काही वेळा आधुनिकतेचा दुरुपयोगही होत आहे पण चांगल्या गोष्टींसाठी याचा उपयोग झाला तर दुधात साखरच.
अर्थात प्रत्येकानेच आधुनिक गोष्टी वापराव्यात असं नाही पण प्रत्येकाने आपापल्या परीने फोटो मात्र नक्की काढावेत. काही काही दिवसांनी घरातल्यांनी, मित्रमंडळींनी मिळून ते क्षण पून्हा एकदा एकत्र भरभरून जगावे.
श्राव्याच्या पहिल्या वाढदिवसाला आम्हीही तिचे बोळके हास्य असलेल्या फोटोंचे एक कोलाज तयार केले होते. ते तयार करत असताना देखील आम्ही तिचं एक वर्ष जसं च्या तसं अनुभवलं. आता श्राव्या चार वर्षाची झाली आहे. ते कोलाज अजूनही भिंतीवर फ्रेम करून लावले आहे. रोज त्याच्याकडे बघितलं की, सगळे जुने छान क्षण आठवतात खूप छान, प्रसन्न आणि मोकळं वाटतं. श्राव्यालाही त्या कोलाजमध्ये असलेल्या फोटो मागे घडलेल्या गोष्टी ऐकायला खूप आवडते आणि मग आमच्या तिघांचा दहा मीनिटांचा असला तरी एकमेकांना क्वालिटी टाइम दिला जातो..
त्यामुळे नक्की फोटो काढत जा, फोटो काढता क्षणी आणि फोटो पाहिल्यानंतर मनापासून हसत जा..


अस्मिता कुलकर्णी

Share:

तू असाच रहा माझ्या सोबतीला...



आभाळ होईल ठेंगणं,
अस काहीतरी करू
एकमेकांच्या सहवासाचे,
सुंदर क्षण पेरू ....
खरा खुरा उतरवू राजमहाल गोष्टीतला
तू असाच रहा माझ्या सोबतीला..

चंद्र ,तारे ,चांदण्या
असतील कितीही दूर ...
जुळवूया आनंद देणारे
आपणच आपले सूर
स्वच्छ प्रकाश अनुभवू आपल्याच विश्वासातला.
तू असाच रहा माझ्या सोबतीला..
  
 घेऊया स्वच्छ पावसाचे
चिंब चिंब पांघरूण...
ऐकूया सांजवेळी पडलेल्या
इंद्रधनूची धून
सजूया त्याच्या रंगांसारखं अन, रंगवूया जीवनाला
तू असाच रहा माझ्या सोबतीला..

बोल तुझे नी माझे
रंगवूया नवी कविता
सूर तुझे नी माझे
खळाळत्या सुंदर लाटा
समुद्राची अथांगता शिकवू या मनाला
तू असाच रहा माझ्या सोबतीला..

जगावेगळे काही क्षण
आवडतील जगायला.
तुझ्या नजरेनेच
आपले स्वप्न बघायला...
सुंदर आकार देऊया स्वप्नातल्या कल्पनेला
तू असाच रहा माझ्या सोबतीला..

मला, खरं तर निखळ हसणं हवंय..
स्वच्छंद जगणं हवंय ..
नजरेने फक्त सौंदर्यच दिसेल,
सं निरागस बघणं हवंय ...
आवडेल रे मला जगण्यातली मजा घ्यायला
तू असाच रहा माझ्या सोबतीला..



 अस्मिता कुलकर्णी

Share:

हरवलेली प्रेरणा... भाग - २




ता खरं सुरुवात झाली होती ती पुढच्या session ला येतेय की, नाही यावर सगळं अवलंबून होतं.

नवीन दिवस उगवला. मी नेहमीप्रमाणे तयार होऊन सेंटर मध्ये हजर. पण आज मात्र ते दोघे मला दिसले नाहीत माझी निराशा झाली. काळजी वाटली. मी तिची अगदी मनापसून वाट बघत होते. बराच उशीर झाला होता. माझी आशा मावळली. पण तितक्यात ते दोघेही आले आहेत असं सांगण्यासाठी आमचे रघु काका आत आले, आणि माझा जीव भांड्यात पडला. सिद्धार्थ ऑफिसला गेला आणि तिला मी आत बोलावले. आज मात्र ती जरा फ्रेश वाटत होती उशीर का झाला म्हंटल्यावर मला तिने कारणही सांगितले. मलाच मोकळं वाटलं. आज ती नक्की माझ्याशी मोकळेपणाने बोलणार याची मला आता पक्की खात्री वाटत होती. रादर आज फक्त तिच बोलणार असं वाटत होतं.

मी तिला स्वतः बद्दल काही सांगशील का असे विचारले. तिने मानेनेच हुंकार दिला. आणि ती सांगायला लागली.

“आमचे गाव खूपच खेडं आहे. जे मला खूप आवडतं, लग्नही तिथेच झालं. त्यामुळे आजूबाजूलाही तिच परिस्थिती, चार माणसं जास्ती नाहीत की, गर्दी नाही, धावपळ नाही. अगदी रोजच्याच कामात थोडा सुद्धा बदल नाही.” ती थांबली, परत गावामध्ये रमली. मी “प्रेरणा” म्हंटल्यावर ती पुढे सांगू लागली. “आमचं जेंव्हा मुंबईला येण्याचं ठरलं त्यावेळी, बऱ्याच लोकांकडून मुंबईबद्दल खूप काही ऐकलं होतं. त्यामुळे मला माझीच काळजी वाटत होती. इकडे येतानाच जेंव्हा माझे गाव मागे मागे चालले होते तेंव्हाच माझ्या मनात अगदी धस्स झालं होतं. मुंबईत कोणी ओळखीचही नाही. काही अडचण आली तर कसं करणार. मुलांच्या शाळेचा अभ्यास मला घ्यायला जमेल का? मुंबईतल्या लोकांसारखं राहायला, बोलायला जमेल का? त्यांच्या विचारांशी माझे विचार जुळतील का ?  असे खूप विचार माझ्या मनात येत होते. मुंबई जवळ येत होती तसतशी झाडं कमी होऊन माणसांची गर्दी वाढत होती. मुंबईत पोहोचलो आणि सुरुवातीलाच गाड्यांची मोठ्ठी रांग लागल्यामुळे आमची बस खूप वेळ एका जागीच थांबली होती. मला अगदीच गुदमरल्यासारखं होत होतं. 
तिला आत्ताही खरच खूप घाम आला होता. 
“पुढे इथे गाडीतून उतरलो आणि खूपच माणसं, गाड्या, उंच इमारती बघून जीव घाबरून गेला. रस्ता सुद्धा ओलांडता येईना, सिद्धार्थ खूप भरभर लोकल साठी धावत होता. मी आणि मुलं फक्त त्याच्या मागे मागे चाललो होतो. स्टेशन वर पोहोचलो आणि समोरून भरधाव येणाऱ्या लोकलमुळे मात्र मी अगदीच गांगरून गेले.”

मला समजलं, मनातल्या अनेक प्रश्नांनी येण्याच्या आधीपासूनच तिला कमकुवत बनवायला सुरुवात केली होती. सरळ चाललेल्या आयुष्याने अचानक वेगळे वळण घेतले होते. तिच्या मनात आधी पासूनच भीती बसली होती. मुंबईत आल्यानंतर ती समोर दिसायला लागली. जाणवायला लागली. एकटीने बाहेर जाणेही तिला अशक्य वाटू लागले. लोकांशी संवाद तिला जमेना, हळू हळू मुलांना शाळेत सोडणे आणणे बंद झाले. मुलांचा अभ्यास घेणे तिला अवघड वाटू लागले. मुलांशी नवऱ्याशी बोलणही कमी झालं उगाचच झोपून राहायला लागली. हळू हळू तिला काहीच जमेनासे झाले. या सगळ्यामुळे सिद्धार्थची नकळत पणे तिच्यावर खूप चिडचिडही वाढली होती. त्याचा तिला जास्तीच त्रास होत होता.

ती सांगतच होती, “आमच्या गावी असताना आम्ही खूप खुश होतो. आमचा प्रेम विवाह, एकमेकांवर जीवापाड प्रेम. मला दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. माझं शिक्षण अर्धवटच राहिलेलं. घरातली परिस्थिती नाजूकच होती, पण मी लहान लहन मुलांचे क्लास घेत होते. रांगोळी मेहंदी काढायला मला फार आवडायचं. आणि मला बोलवायचे देखील लग्न घरी मेहंदी काढायला. मला स्वयंपाक बनवायलाही खूप आवडायचं. दुसऱ्यांना चांगलं खायला घालणं यापेक्षा समधान कशातच नाही असच मला वाटायचं.”

तिच्या बोलण्यावरून आणि तिला दिलेल्या टास्क वरून लक्षात येत होतं की, प्रेरणामध्ये खूप चांगले गुण होते. तिला खूप गोष्टींची आवड होती. तिच्याकडे कल्पकता होती. दिसायलाही सुंदर होती. घरातली कामे तर अगदी पटापट करत. घरात सगळं काही टापटीप. प्रसन्न वातावरण, स्वयंपाकही रुचकर बनवत. आयुष्यात आत्तापर्यंत त्यांनी खूप त्रास सहन केला होता. एकमेकांच्या भक्कम साथीने ते प्रत्येक परिस्थितीला सामोरे गेले होते.
खरं तर ती आहे तशीच खूप सुंदर, हुशार होती फक्त मनातले पूर्वग्रह आणि भिती यामुळे तिच्यातला आत्मविश्वास हारवत चालला होता. मुळात बदलाचा ‘स्वीकारच’ झाला नव्हता. त्यामुळे नवीन परिस्थितीतही मी चांगलं काही करू शकते याची तिची स्वतःबद्दलच खात्री होत नव्हती. 

एकंदरीत सगळाच अंदाज आल्यावर एक उपचार म्हणून तिला करण्यासाठी सांगितलेल्या कृतीवरून असे समजले की तिची हुशारी, टापटीपपणा सारं काही तसच आहे. पण हरवला होता तो “आत्मविश्वास” वागणं बदलण्यामागचं कारण समजल्या बरोबर उपचार सुरु केले. तिच्या नावाप्रमाणे तिच्यातही किती प्रेरणा दडलेली आहे याची जाणीव तिला करून दिली. तिचा स्व तिला परत आणून दिला. स्वतःची स्वतःला नव्याने ओळख करून दिली. यात बरेच दिवस गेले जवळ जवळ दोन महिने. तिनेही Thearpy ला चांगलाच Response  दिला. हरवलेला आत्मविश्वास ती पुन्हा शोधू लागली आणि तिला तो सापडला. खूप दिवस एकाच जागेवर बसलेल्या पक्षाला उडता येत नसेल आणि अचानक तो आकाशात विहरताना कसा दिसेल तसं मला तिच्याकडे बघून जाणवायला लागलं. ती खुश राहायला लागली. बाहेर जाणं वाढलं. चार मैत्रिणीही झाल्या. मुलांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला लागली, आणि तिला घेऊन आलेल्या त्याला पुन्हा आपल्या वर्तुळात बघू लागली.

“बदल हा निसर्गाचा नियम आहे.” हा बदल आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात येतच असतो. जसं की, घर बदलणं, गाव बदलणं, माणसं बदलणं, नोकरीतला बदल, परिस्थितीतला बदल, वयानुसार माणसा माणसात होणारे बदल. ह्या बदलांना, परिस्थितीला ठामपणे, आत्मविश्वास न डगमगू देता सामोरे जावेच लागते. सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे होणाऱ्या बदलाचा मनापसून स्वीकार करावा म्हणजे परिस्थितीशी समरूप होता येते. मनात कोणतेही पूर्वग्रह, भीती ना बाळगता येणाऱ्या परिस्थितीचा  डोळसपणे सामना करावा. मला हे जमेलच असा विश्वास नेहमी स्वतःमध्ये असायला हवा. नाहीतर आपल्यातले आपणच हरवून जातो

आज शेवटची भेट होती.  म्हणजे या साठीची तरी, त्या पहिल्या दिवसामध्ये आणि आजमध्ये खूपच फरक होता. दोघांच्या चेहऱ्यावर खूपच आनंद होता. डोळ्यातही चमक दिसत होती. बस्स, त्यांच्याकडे बघून मलाही माझ्या घेतलेल्या त्यांच्या विश्वासाची जबाबदारी पूर्ण केल्याचा आनंद झाला. माझे नेहमीचे हास्य अजूनच खुलले. दोघांच्या चेहऱ्यावर एकही शंकेची रेष दिसत नव्हती. त्यांनी माझ्यासाठी एक बुके आणला. बोलणं झालं, त्याने माझ्या हातात एका पानावर काहीतरी लिहून दिलं होतं. ते निघाले अगदी मनमोकळे हसत.

त्यानंतर मी ते लिखाण वाचायला सुरुवात केली. त्याच्या मनात साठलेल्या प्रत्येक भावना त्याने त्यावर उतरवल्या होत्या. शेवटी त्याने असा उल्लेख केला होतं की,आयुष्यात सगळ्यात सुंदर आणि सोबत राहणारं माझं नातं  हरवत चाललं होतं ते तुम्ही मला परत सापडून दिलं. तुम्ही माझी बायको, माझी प्रेयसी आणि मुलांना त्यांची आई परत मिळवून दिली. खरच खूप खूप Thank you.
वाचताना अंगावर काटा आला. शरीर शहारलं, डोळ्यात नकळत पाणी तरळलं, मनात मात्र अस्मानीचा आनंद झोके घेत होता.

....एखाद्याच्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी आपला उपयोग होणं यापेक्षा समाधान कशात असू शकते.....

अस्मिता कुलकर्णी
Share:

हरवलेली प्रेरणा.. भाग - १




रोजप्रमाणे आजही सेंटर मध्ये जाऊन आजच्या Appoinments बघितल्या. खूप मोठी लिस्ट होती. मी रोजप्रमाणेच त्याच हास्याने सगळ्यांचे स्वागत करत होते. प्रत्येकाला त्यांच्या अडचणींप्रमाणे समुपदेशन करत होते. आपल्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून इतरांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटावे या हेतूनेच मी लोकांसमोर हसऱ्या चेहऱ्यानेच जाते.

सेशन सुरु असतानाच अचानक एक गृहस्थ समोर येऊन उभा राहीला. तो खूप गोंधळलेला होता. सेशन चालू असलेला रोहीतही खूप घाबरला. मी रोहीतला शांत केले आणि त्यांनाही योग्य ती वेळ देऊन बाहेर बसण्यास सांगितले. सेशन संपलं, रोहीत बाहेर पडलेला दिसताच तो गृहस्थ पुन्हा धावत पळत आत आला. गृहस्थ म्हणजे साधारण ३५ वर्षांचा असलेला एक माणूस आणि त्याच्याबरोबर एक कुणी ‘ती’ पण होती. खूप अस्वस्थ, गोंधळलेला, रडवेला त्याला मी शांतपणे बसवून पाणी पिण्यास दिले. चहा मागवला पण त्याला कधी बोलू आणि काय बोलू असे झाले होते. मी बोला म्हंटल्यावर तो अगदी लहान मुलासारखा ढसा ढसा रडू लागला. मला नेमकं काय झाले आहे याचा अंदाज काही केल्या येईना. 


"शांत व्हा, आणि मला सांगा, तुमचं नाव काय आहे?" 
तेंव्हा कसाबसा शांत होऊन तो म्हणाला
प्लीज माझ्या बायकोला वाचवा, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. असून नसल्यासारखी अवस्था झालीये तिची, प्लीज”. 
हळू हळू तो जरासा शांत झाला. माझ्याकडून येणाऱ्या शब्दांची तो अक्षरशः सुन्नपणे वाट बघत होता.
“काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल.”  
माझी होकारार्थी मान हललेली बघून तो सुखावला. चेहऱ्यावर खूप मोठं समधान आणि अगदीच छोटसं स्मितहास्य दिसलं, आणि तो सांगू लागला. “माझं नाव सिद्धार्थ आणि तिचं प्रेरणा....”

तो जसं जसं व्यक्त होत गेला तसा मला संपूर्ण परिस्थितीचा अंदाज आला. त्याचे प्रेम बघून आणि हे जे काही घडलं आहे ते सारं ऐकून खूप वाईट वाटलं. त्याचं सगळं सांगून झाल्यानंतर बाहेर बसवलेली तिला मी आत बोलावून घेतले. तिच्या चेहऱ्यावर शुन्य भाव, घाबरलेली, भांबावलेली, डोळे अगदीच निस्तेज. तिच्याशी संवाद साधण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागणार होते ही पुरेपूर जाणीव मला होतीच. आज मी फक्त तिचे नाव आणि घरचा पत्ता एवढ्याच माहितीवर थांबले. नाव विचारल्यावरही पूर्ण नाव सांगताना तिची धांदल उडालीच, पत्ता तर दूरचीच गोष्ट. फक्त “प्रेरणा” हे नाव तिने खूप मोठ्याने उच्चारले. मी तिच्याकडे बघून माझ्या नेहमीच्याच हास्यात अजून भर टाकून “खूपच सुंदर नाव आहे तुझं” असे म्हणून त्यांना पुढची Appoinment  दिली.


त्याच्या डोळ्यात माझ्यावरचा विश्वास दिसत होता आणि मी देखील त्या विश्वासाची जबाबदारी स्वीकारली होती. मी घरी गेल्यानंतर आधी माझ्या नवऱ्याला फोन लावला, मनसोक्त गप्पा मारून घेतल्या. मग मलाही मोकळं वाटलं आणि विचारांना दिशा मिळाली. त्या रात्रभरही माझ्या डोक्यात ह्या केस संदर्भातच विचार चालले होते. एखादं आपलं जवळचं हक्काचं माणूस आपल्या समोर आहे, पण आपल्या जवळ नाही ही गोष्टं खरच किती वेदना देणारी आहे. काही केल्या विचार मनातून जात नव्हता. काही दिवसांपूर्वी घडलेली आत्महत्येची केस पुन्हा एकदा उगाचच मनात घोळून गेली.. काही केल्या शांत वाटेना, शेवटी एक मस्त अशी गझल ऐकली तेंव्हा कुठे खूप शांत आणि छान झोप लागली.

दूसरा  दिवस उगवला भरभर रोजप्रमाणे तयार होऊन दोघांचे डबे भरून नवऱ्याशी “प्रेमळ” संवाद करून त्याला बाय म्हंटल. भेटू संध्याकाळी, असं म्हणून गाडीचा स्पीड वाढवला. मलाही आज प्रेरणाला कधी भेटेल असे झाले होते. सिद्धार्थ आणि प्रेरणाची परत नव्याने ओळख करून द्यायची होती.

मी सेंटर मध्ये येण्याच्या अगोदरच ते दोघेही सेंटरमध्ये हजर होते. मी तिला थांबवून घेतलं आणि तो ऑफिसला निघून गेला. तशी तिची नजर घाबरली ती त्याला शोधू लागली. चेहरा  कासावीस, रडवेला झाला. मी तिच्या जवळ जाऊन खूप विश्वासाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तशी ती हळू-हळू शांत झाली. आता माझा चेहरा तिला जरा जवळचा वाटू लागला. अगदी जुजबी प्रश्न विचारून तिला थोडं बोलतं केलं..”तुझं नाव खरच खूप आवडलं मला.” तसे तिने थोडेसे ओठ लांब केले. हसणं नव्हतच ते, हो पण आमची नजरानजर मात्र झाली..

तुला सगळ्यात जास्ती काय आवडतं ? मी उत्तराची वाटच बघत होते ती खूप वेळ शांत होती, पण अचानक उद्गारली, माझं गाव! मी तिला पेपर देऊन तिच्या गावाविषयी काही वाक्य लिहिण्यास सांगितली. तो तिचा आवडीचा विषय असल्यामुळे काही वाक्य कशाला, तिने अक्खा निबंधच लिहिला. नंतर तिलाच तो वाचायलाही लावला तिने तो अगदी मनापासून वाचला. चेहरा खुलला, जणू गावातच पोहोचली होती ती. तिथल्या आठवणी, माणसं अगदी तिच्या समोरच आहेत असं वाटत होतं. वाचणं संपलं तस तसा तिच्या चेहऱ्यावरचा आनंदही ओसरला.. पुन्हा गोंधळली. सिद्धार्थ कधी येईल? म्हणून विचारायला लागली. आणि तो आला, तशी ती त्याच्याकडे धावली त्याच्या जवळ जाऊन मनसोक्त रडली. त्यालाही आश्चर्य वाटलं कित्येक दिवस झाले तीने त्याच्याकडे निटसं पाहिलंही नव्हतं, मनसोक्त बोलणं दूरच ती रडलीही नव्हती. त्याला रडतेय हे बघून वाईट वाटलं खरं पण एका दृष्टीने तो खुश झाला होता. तो thank you म्हणाला, मी देखील पुढची Appoinment दिली आणि तिला बाय म्हंटलं.

Share:

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या