‘विशेष’ क्षण





       मी अमेरिकेत, मस्त एन्जॉय सुरु होता. सावनीचं लहानपण आणि अमेरिकेचं नवखेपण दोन्ही गोष्टी मनसोक्त अनुभवणं चालू होतं. सावनी तीन वर्षाची झाली होती. आम्ही जिथे राहत होतो तिथे सहा महिने बर्फ आणि थंडच असायचं त्यामुळे थंडीच्या दिवसात सावनीला मॉल मध्ये असलेल्या ‘प्ले-एरिया’ मधे न्यावं लागायचं. एकदा तिला ‘साऊथ हिल’ नावाच्या एका मॉल मध्ये आम्ही घेऊन गेलो होतो. ती तर एकदम खूष असायची. खूप मुलं मुली, खेळायला खूप गोष्टी, नुसत्या उड्या आणि धिंगाणा आई-बाबांना विसरून नुसता अखंड दंगा. मग फक्त लांबूनच लक्ष ठेवावे लागत. तिच्याबरोबरच इतर मुलांकडेही लक्ष जायचच. मुलांचा निरागसपणा, गोडवा, प्रत्येकाच्या वायानुसारचा समजूतदारपणा, स्वतः विचार करून काहीतरी वेगळ्याच कृतीतून रंगवलेल्या कल्पना हे सारं काही बघण्यात एक वेगळीच मौज असायची.

   मुलांची संख्या भरपूर, अगदी गोंधळ चालू होता. सगळ्यांकडे बघता बघता नजर एका मुलावर पडली साधारण चार वर्षाचा वाटत होता. एकाच जागी स्थिरावलेला, चेहऱ्यावर वेगळेच हावभाव, एक वेगळाच आवाजाचा टोन, वेगळ्याच हालचाली, फक्त एकटाच आईची आठवण काढणारा, म्हणजे आईशिवाय काहीच न करणारा. आजूबाजूला एवढी मुलांची गर्दी असूनही तो एकटाच होता त्याच्या स्वतःच्याच विश्वात. डोळे थबकले, विचार थांबले, सावनी सुद्धा दिसेनाशीच झाली. जगाच्या पाठीवर कुठेही जा हे एक जागतिक आणि नैसर्गिक सत्य आहे जे मी समोर बघत होते. मी भारतात असताना अशा मुलांबरोबर आणि त्यांच्या पालकांबरोबर नोकरीनिमित्त  खूप छान क्षण घालवले होते. त्यांच्यामुळे खूप गोष्टी शिकलेही होते. आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच पूर्ण बदलून गेला होता. स्वतःचीच नव्याने ओळख झाली होती. इथे आल्यापासून सावनीमुळे ह्या विषयी विचारच केला गेला नाही आणि आज अचानक हा समोर दिसला. खूप वाईट वाटलं, त्याच्या आईकडे बघितल्यावर जीवाची घालमेलही झाली. तिचं लक्ष इतर मुलांकडे जात होतं. इतर वेळेस ती नक्कीच कणखर असेल पण त्या क्षणाला तिचं जग किती थांबल्यासारखं झालं असेल, असं उगाच वाटून गेलं. अचानक सावनी दिसली आणि परत सगळं सुरु झाल्यासारखं वाटलं. मी सावनीकडे गेले तिला त्याला ‘हाय’ ‘हॅलो’ म्हणायला लावले. त्याच्याशी खेळायलाही लावले. मलाही छान वाटलं आणि त्याच्या आईलाही मोकळं वाटलं. तिच्या चेहऱ्यावर त्या काही क्षणापुरतं तरी समाधान दिसलं. थोडा वेळ थांबून बाय करून आम्ही निघालो त्याचे बाबा आले आणि तेही घरी निघाले.

    मला मनातून खूप छान वाटत होतं. त्याच्याकडे किंवा आईकडे बघून जर नुसतच वाईट वाटून घेतलं असतं तर त्यातून काहीच अर्थ निघाला नसता. फार वेळ नाही पण त्याच्याबरोबर काही क्षण खेळून, बोलून त्याच्या आणि आईच्या चेहऱ्यावर हास्य उमटवल्याचे समाधान वाटत होते आणि, महत्वाचं म्हणजे सावनीलाही ह्या सत्याची अजाणतेपणाने का असेना पण ओळख झाली याचे मला वाटलेले समाधान.

       विशेष मुलं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुलांमधे खूप प्रकार आहेत जसे की, ऑटिस्टिकमतीमंदडाऊन सिंड्रोमसेरेब्रल पाल्सीडिस्लेक्सिया, असे बऱ्याच प्रकारची मुलं आपल्याला आजूबाजूला सतत वावरतांना दिसत असतात.  अशा मुलांना समजून घेणं तसं फार सोपं असतं फक्त त्यांच्या नजरेतून, हालचालीतून त्यांना नेमकं काय सांगायचं आहे याचा विचार करून ते समजून घ्यावं लागतं. प्रत्येकामध्ये अशी एक तरी गोष्टं असते की, जी त्यांना खूप चांगल्या प्रकारे येत असते. त्यांना थोडसं प्रेम आणि वेळ दिला की ते आपल्याला अपोआप समजतच. एक सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांच्याकडे बघायला हवं. त्यांना मनापासून स्वीकारायला हवं. आपले काहीसेच क्षण का असेनात पण त्यांच्याबरोबर घालवायला हवेत. आपण जितके त्यांच्या सहवासात राहू, त्यांच्या जवळ राहू तितकीच त्यांची सुंदरता आपल्याला जवळून अनुभवायला मिळेल. विचित्र नजरेनी त्यांना फक्त बघण्यापेक्षा त्याच नजरेनी तू किती छान आहेस याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे त्यांच्या पालकांच्या मनातही त्यांच्या बद्दल काही आशेची किरणे निर्माण होतील.

        आपल्या मुलांनाही ह्या एका समजाच्या अविभाज्य घटकाची ओळख होईल आणि या मुलांबरोबरही छान मैत्रीचे नाते नक्कीच निर्माण होऊ शकते याची जाणीवही होईल.

                                                                                                                                                          
  अस्मिता कुलकर्णी

Share:

9 comments:

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या