भाग - ७ वाचण्यासाठी इथे क्लिक करा.


शंतनूला रडणं आवरेना. घर डोळ्यासमोर आलं आणि घराची ऊब जाणवली. मुलींचं हसणं
डोळ्यासमोर आलं आणि खरा आनंद जाणवला. आईबाबांचा चेहरा आठवून विश्वास काय असतो ते कळलं
आणि, प्रज्ञाचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि खरी साथ
काय असते हे समजलं. क्षणात सगळ्या जाणीवा जाग्या झाल्या. मित्रांबरोबर घालवलेले
क्षण आठवले. टपरीवर पिलेल्या चहाचा घोट ते मीटिंगमध्ये पिलेल्या कॉफीची चव अगदी
सगळच आठवत होतं. इतके दिवस मनाचे सगळेच दरवाजे बंद झाले होते त्याच्याच नकळत. आज
त्यातून बाहेर डोकावताना त्याला सगळं हवं हवसं वाटत होतं. जीवाची घालमेल थांबली
होती. विचार करणं, एखादी जुनी गोष्टं, माणसं आठवणं हे त्याच्यासाठी मोठं काम असायचं
आणि शंतनू नेहमी त्याच्यापासून लांब पळायचा. आज मात्र तेच सारं त्याच्यासामोर आपसूकच
उभं राहिलं. संस्थेमध्ये येण्या अगोदर जवळ जवळ सहा महिने घरी त्याला असा त्रास
व्हायला सुरुवात झालीच होती आणि आता संस्थेमध्ये येऊनही जवळ जवळ आठ महिने झाले
होते. त्याला जागेवरच ठेऊन कितीतरी क्षण त्याच्या हातातून निसटून पुढे गेले होते, ह्याची त्याला तशी जाणीव नव्हतीच पण काहीतरी
हरवत चाललं होतं हे मात्र त्याला आत्ता समजलं. काय अशी गोष्ट घडली आणि माझ्या ह्या अशा
वागण्याला सुरुवात झाली त्याच्या मनात प्रश्न डोकावून गेला. त्याला हे सगळं कसं
घडत गेलं हे आठवत नव्हतच. डोळ्यातल्या पाण्याबरोबर बरेच भाव ओघळून गेले. अचानक
कंपनी डोळ्यासमोर उभी राहिली हृदायचे ठोके पुन्हा वाढले. परत भीतीचं काहूर मनात
दाटून आलं. शंतनूने गच्च डोळे मिटले आणि वेगळीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला पण, काही केल्या ती बिल्डींग, त्यातलं शंतनूच ऑफिस, केबिनमधली खुर्ची, आणि भिंतीवर लावलेली बाबांनी दिलेली ती फ्रेम
हे जास्तीच पक्क होत चाललं होतं डोळ्यासमोर. त्या फ्रेमला धरून ओक्साबोक्शी रडलेला
शंतनू तसाच्या तसा त्याला समोर दिसला आणि त्याने एकदम डोळे उघडले. त्याचे उत्तर
त्याला सापडले.
धड धड अपोआप कमी झाली. फक्त मनात थोडी भीती राहिली. त्यानंतरचा प्रत्येक क्षण
काही त्याला आठवला नाही पण, आज आपण इथे
त्यामुळेच आहोत हे त्याला कळलं. आपल्यामुळे खरच सगळ्यांना किती त्रास झाला असेल
ह्याची जाणीव त्याला झाली. त्याला अपराधी वाटू लागलं. विचार, आठवणी ह्यात तो इतका गुंतला की, त्याला आता थांबणं अवघड झालं होतं. एका पाठोपाठ
एक असे काहीही त्याला आठवत होते. मधेच व्हरांड्यात असलेला चौपाळा तर मधेच ऑफिस, मधेच आईच्या हातच्या जेवणाची चव तर मधेच क्लाइंट च्या रिस्पॉन्सची वाट बघत असताना झालेली तगमग, मित्रमंडळी तर कधी
ऑफिस मधले केबिन. शंतनू डोक्याला हात लावत लावत खूप जोरात ओरडला तसे सगळेच दारापाशी धावले, डॉक्टरांनी पटकन प्रज्ञाला बोलवायला
पाठवले. प्रज्ञाला कळलं तसं प्रज्ञा धावत धावत रुमजवळ आली. तिच्या पाठोपाठ आई-बाबा, दिनेश, सिद्धार्थ सगळेच
धावले. दारावर थाप मारत मारत सगळेच “शंतनू, शंतनू काय झालं? तू ठीक आहेस ना? अरे दार उघड. शंतनू.....” शंतनूचं मन आता शांत झालं होतं. सगळंच चित्र स्वच्छ
झालं होतं. त्याने डोळे पुसले, आरशात स्वतःला
बघितलं आणि डोळ्यात बघून स्वतःलाच एक विश्वास दिला. शेवटी शंतनूने दार उघडले.
सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. शंतनू ओळखीचा वाटायला लागला होता. आईने त्याच्या
चेहऱ्यावरून हात फिरवला, प्रज्ञाने हातात
हात घेतला, पाठीवरून हात फिरवला. तो सगळ्यांकडे बघून खूप
छान हसला. काय झालं? ठीक आहेस ना? असे कोणतेच प्रश्न कुणीच त्याला विचारले नाही
सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्या हास्यातून मिळालीच होती.
चेहऱ्यावर समधान घेऊन सगळे त्याला हॉल मध्ये घेऊन गेले. हॉलमध्ये पाय ठेवला
आणि त्याच्या मनावरचं दडपण अगदीच कमी झालं. मोकळं वाटलं.
त्याने पाय ठेवला तसे सगळेच त्याच्याकडे धावले. आत्या, मामा, मावशी, सगळे नातलग गळा पडू पडू त्याच्याशी बोलत होते. खरं
तर कोणालाही अश्रू आवरले नाहीत. शंतनू बद्दल असणारं प्रेम त्या अश्रूतून बोलत
होते. त्यालाही ते अशक्यच झाले होते. त्याचेही डोळे त्या अश्रूंशी संवाद साधतच
होते. मुलींना मिठीत सामावून तो खूप रडला. ऑफिसमधले, मित्र कंपनी सगळेच शंतनूला भेटले. काही जणांचे चेहरे आणि नावं आठवणं त्याला
कठीण वाटले पण, बऱ्याच वेळानंतर त्याने ते सांगितलेही. सगळं
वातावरण हसरं बनलं. सगळीकडे आनंद पसरला अन दुःखाचा प्रत्येक बंध अलगद हातातून निसटून
गेला. सगळ्यांशी बोलून झालं, मुली शंतनूच्या
मागे मागेच करत होत्या. बाबा कधी केक कापणार यासाठी त्यांची नूसती घाई चालली होती.
“बाबा चल ना रे आता केक कापायला, किती वेळ बोलतोच
आहेस.”
“हो शंतनू चल आता पटकन केक कापून घे.” प्रज्ञाही म्हणाली.
शंतनू केक समोर जाऊन थांबला. आवडीचा केक बघून लहान मुलासारखा वागला. पटकन केक
कापून तो कुणीतरी पटकन तोंडात घालावा असं त्याला क्षणभर वाटलं. त्याने पटकन तो कट
केला आणि श्रेया आणि प्रियाने त्याचे दोन तुकडे शंतनूला एकदम भरवले. त्याची इच्छा
पूर्ण झाली. प्रत्येक जण पुढे जाऊन शंतनू बद्दल भरभरून बोलायला लागलं. शंतनूचा मामा उठला आणि समोर आला आधीच त्याला
राहवत नव्हतं पुढे आला आणि रडायलाच लागला, तसा शंतनू त्याच्या
जवळ गेला आणि त्याला जादूकी झप्पी दिली. मामा शांत झाला आणि बोलायला लागला, “मला आठवतंय शंतनू लहानपणापासून आत्तपर्यंत
कितीही वेळा घरी आला तरी प्रत्येक वेळेस माझ्या शेतात एक तरी आंब्याचे झाड
लावायचा. त्याच्या आठवणीने ते झाड जपायचा मी नेहमी प्रयत्न करायचो आता तिथे मोठी
आमराई तयार झाली आहे. आणि त्या आंब्याचा गोडवा शंतनू सारखाच आहे. मी वाट बघतोय
पुढच्या झाडाची जागाही ठरवून ठेवली आहे. किती धिंगाणा करायचे सगळे तूम्ही, आत्ताही माझ्या डोळ्यासमोर तुझं ते वागणं
बहुतेक लापाछपी खेळतंय. माझी म्हातारी होत चाललेली नजर शोधतेय तूला. तू लवकर ये
परत.” शंतनू फक्त हसला आणि पुन्हा एकदा मामाला त्याने मिठी मारली. दोघेही जागेवर
जाऊन बसले. सिद्धार्थ, शंतनूचा मित्र समोर
गेला आणि त्याला त्यांच्या मैत्रीचा पहिला दिवस आठवला. “कॉलेज मधला पहिला दिवस, त्याच दिवशी शंतनूशी ओळख झाली. माझी खूप गरिबी
होती हे त्याने पहिल्याच दिवशी हेरले आणि तेंव्हापासून ते आज स्वतःच्या कंपनीत जॉब
देऊ पर्यंत प्रत्येक वेळी माझ्या मदतीला उभा राहिला. ह्या गोष्टीला आता जवळ जवळ
अकरा वर्ष झाले असतील. अशी एकही गोष्टं नाही की, जी आम्ही एकमेकांना सांगितली नाही, एक दिवस असा नाही की, आम्ही एकमेकांशी बोललो नाहीत.. आणि बोलता बोलता
तो रडायला लागला.. क्षणभर थांबला, पून्हा स्वतःला
सावरून म्हणाला की, “शान्त्या प्लीज
यार, आवर आता तुझा हा पसारा आणि चल आपल्या घरी खूप
बोलायचं राहून गेलंय रे, खूप काही सांगायचंय
तुला. तसा शंतनू जागेवरून उठला आणि त्याने सिद्धार्थ ला मिठी मारली. दोघेही खूप
हळवे झाले. दोघांना सावरून प्रज्ञाने शंतनूला पुन्हा त्याच्या जागेवर बसवलं.
सगळ्यांनीच मनसोक्त गप्पा मारल्या शंतनूशी. शंतनूला स्वतःशीच नव्याने ओळख झाली. सगळ्यांचे
खाणे उरकले. तसं तसं एक-एक जण शंतनूचा निरोप घेऊन घरी जायला निघाले. शंतनूच्या
मनाची तशी तशी पुन्हा घालमेल व्हायला लागली. बैचेन व्हायला लागला. हे सगळे का जात
आहेत? प्लीज नका जाऊ मला सोडून असं मनातल्या मनातच
शंतनू बोलायला लागला. शेवटी सगळे घरी परतले. शंतनूला त्याच्या रुममध्ये नेले गेले.
आता फक्त घरचेच राहिले होते. शंतनूला सोडून कोणालाच जावंसं वाटत नव्हतं पण, काही पर्याय नव्हता. आई बाबांनी जवळ घेऊन
“काळजी घे राजा आणि, लवकर घरी ये.” असं
म्हंटल्यावर पुन्हा सगळ्यांचे डोळे पाणावले. मुलींनाही टाटा म्हणताना त्याचा जीव
जड झाला होता. आई बाबा मुलींना घेऊन गाडीत जाऊन बसले. प्रज्ञाने पुन्हा एकदा
शंतनूला मिठी मारली शंतनूलाही तिला सोडूच नये असं वाटत होतं. तीही तेच म्हणाली, “प्लीज शंतनू लवकर घरी ये, मी नाही जगू शकत तुझ्या शिवाय. इतके दिवस मी
कसे काढले ते नाही सांगू शकणार मी” आणि प्रज्ञा हळू हळू मिठी सोडवून शेवटी हातातला
हात सोडवून मागे न बघताच गाडीकडे निघून गेली. शंतनूची नजर तिच्यावरच खिळली होती.
तिच्या पावलांचे ठसे तो शोधत राहिला बराच वेळ आणि त्याला जाणवलं, आपली माणसं बरोबर असणं म्हणजेच आयुष्यातला खरा
आनंद आहे. त्यांच्या सोबत असणं म्हणजेच खरं जगणं आहे. खरं तर आपण नेमके कुठे कमी पडतोय हे त्याला समजत
नव्हतेच, पण ते समजून घेण्याचा एक आशेचा किरण मात्र
नक्कीच त्याच्या या टप्प्यावर निर्माण झाला होता आणि शंतनू त्यामधे उजळून निघाला.
त्याला रात्रीचा औषधांचा डोस देऊन बेडवर झोपवले. तरीही त्याला आज झोप लागतच
नव्हती. डोक्यात खूप विचार येत होते. मधेच उठून बाहेर गुलमोहराकडे बघायचा, त्याच्याशी बोलायचा. शेवटी मनाशी ठरवलं आणि
गुलमोहोराला म्हणाला, “मी लवकरच घरी
जाणार. गुलमोहरा मला तुझा लवकरच निरोप
घ्यावा लागणार.” पटकन बेडवर आला आणि झोपला. आता त्याला शांत झोप लागली होती, आणि गुलमोहोर जणू अंधारातही खुलला होता.
दुसरा दिवस उगवला. कुठून आणि कशी सुरुवात करावी शंतनूला काहीही समजत नव्हतं.
संस्थेत प्रत्येक कृतीचं निरीक्षण केलं
जात होतं. शंतनू थोडा गोंधळलाच होता. कसं, काय? त्याला कळत नव्हतं पण, घरी जायची त्याची इच्छा त्याला सगळ्या कृती
उत्तम पद्धतीने करण्यासाठी उद्युक्त करत होती. अजून अजून चांगल्या पद्धतीने गोष्टी
कशा केल्या जातील याकडे त्याचा कल वाढू लागला. रोजच्या कृती तो अगदी डोळे झाकून
करायला लागला. मेमरी गेम अथवा concentration साठी असणाऱ्या activity मध्ये मात्र शंतनू कडून
अजूनही चूका होत होत्या. पण त्यातला त्याचा सहभाग चांगलाच वाढला होता. डॉक्टरांनाही
त्याच्यात झालेला बदल लक्षात येत होता. शंतनूवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून
त्याच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने त्याच त्याच activity करून घेतल्या जात होत्या. कौन्सेलिंग चालूच होते. त्याचा सकाळच्या औषधांचा
डोस देखील बंद झाला. तो रात्र रात्र प्रत्येक गोष्टीचा विचार करू लागला. का जमत
नाही? का जमत नाहीये? म्हणून स्वतःलाच त्रास करून घ्यायला लागला. दुसऱ्या दिवशी तेवढ्याच
सकारात्मकतेने तो दिवसभर वावरू लागला. हळू हळू शंतनूला सगळ्या activity जमायला लागल्या. सुरुवातीला थोडी भीती वाटायची
पण त्यात पडला की, जमायचं त्याला.
आत्मविश्वास अजूनही म्हणावा तितका नव्हताच आला. सारासार विचार करता तो आता पूर्ण
बरा झाला होता. आता त्याला गरज होती आपल्या माणसांची. तिथे गेल्यावर बाकीच्या
गोष्टी तो आपोआपच करायला लागेल याची खात्री डॉक्टर देत होत्या.
जवळ जवळ वाढदिवसानंतर एक ते दीड महिना झाला होता. प्रज्ञा संस्थेमध्ये आली.
“hi प्रज्ञा”
“hello डॉक्टर”
“डोळे बंद कर” डॉक्टर प्रज्ञाला म्हणाल्या. प्रज्ञाला थोडसं विचित्रच वाटलं.
आता ही कसली गम्मत असा विचार करत तिनेही डोळे झाकले. डॉक्टरांनी शंतनूचे डिस्चार्ज
पेपर प्रज्ञाच्या समोर टेबल वर ठेवले.
“आता उघड डोळे.”
प्रज्ञाने डोळे उघडले आणि समोर ठेवलेले पेपर्स बघितले, तिचा आनंद ओसंडून वाहू लागला. तिला आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटलं. डॉक्टरांच्या
गळ्यात पडून ती खूप ढसा ढसा रडली. डॉक्टरांनीही आज तिला थांबवले नाही.
“हो प्रज्ञा आता शंतनू घरी येऊ शकतो. फक्त काही activity आणि औषधाचा डोस न चुकता सुरु राहिला पाहिजे.
चुकूनही औषध विसरायला नको. एक महिन्यानी पुन्हा दाखवायला घेऊन ये त्याला, तेंव्हा
पुढच्या डोसबद्दल सांगेल.”
प्रज्ञाकडे बघत हसत हसत डॉक्टरांनी प्रज्ञाला विचारले,
“मग उद्या किती वाजता येणार न्यायला?”
“कधी येऊ?”
“कधीही येऊ शकतेस.”
“ठीक आहे, सकाळी अकरा वाजता?”
“ओके”
“Thank you डॉक्टर, तुमचे आमच्यावर खूप ऋण आहेत ह्याची परतफेड करणं
कसं जमेल आम्हाला?”
“अगं हे माझं कर्तव्य आहे ते मी पार पाडलं. इथून बरे होऊन जे जे घरी जातात
त्याच्या चेहऱ्यावरचा आणि त्याच्या
घरच्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तीच आमची परतफेड असते. तेंव्हाच कुठे
आम्हालाही समाधान मिळते.”
“तरीपण डॉक्टर thanks a lot.”
“you r most welcome.” काळजी घे, काळजी करू नकोस. अचानक काही वाटलं तर इथे direct फोन केला तरी चालेल.”
“ok डॉक्टर. Bye.”
“bye.”
प्रज्ञा केबिनमधून बाहेर पडली ते नाचतच, गाणं गुणगुणत. आज
तिच्या चेहऱ्यावर जे काही दिसत होतं ते वेगळंच काहीतरी होतं. प्रज्ञा घरी पोहोचली.
दारातून आत जाताना मात्र तिने चेहरा जरा उदास केला. प्रज्ञा आली समजल्याबरोबर आई
बाबा आशेने तिच्याकडे धावले. प्रज्ञाचा चेहरा बघून दोघेही नाराज झाले.
“काय झालं प्रज्ञा?”
“ काही नाही नेहमीचच.”
“मग चेहरा इतका का पडलाय तुझा?”
“आज शंतनू नीट बोलला नाही माझ्याशी.”
आईची काळजी जरा वाढलीच.
“ का गं? डॉक्टर काय म्हणाल्या?”
“डॉक्टर म्हणाल्या, तुमचा शंतनू आम्हाला
खूप त्रास देतोय त्याला घरी घेऊन जा.”
आईने नकारार्थी मान डोलावली. “अरे देवा!”
चेहऱ्यावर जरा आठ्या आणून पुन्हा आईने प्रश्न केला,
काय म्हणालीस?
“हो आई बरोबर ऐकलत तुम्ही”
“म्हणजे?”
“म्हणजे, आपला शंतनू घरी येणार..... ये...... डॉक्टर
म्हणाल्या, तो आता पूर्ण बरा झाला आहे.”
आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दोघीही कडकडून भेटल्या. बाबांच्या
चेहऱ्यावरचा आनंदही टिपण्यासारखा होता.
आईने नेहमीप्रमाणे देवाला गोडाचा शिरा केला. बाहेरून खेळून आल्यानंतर मुलींना
देखील प्रज्ञाने सांगितले. त्यांचेही चेहरे खूप खुश झाले. उद्या मारत मारतच त्या
त्यांच्या रुममध्ये गेल्या. सगळ्यांचं जोरदार प्लानिंग सुरु झालं. घर डेकोरेट
केलं. स्वागताची सगळी तयारी झाली. रात्र न होता लगेच दूसरा दिवस उगवावा असंच वाटत
होतं सगळ्यांना. मुली झोपल्या पण बाकी कोणालाच झोप लागत नव्हती. मनाची नुसती चलबिचल
होत होती. कशी बशी पाहाटे पहाटे झोप लागली सगळ्यांना. प्रज्ञाने सहा चा अलार्म
लावलेलाच होता. तो वाजला आणि प्रज्ञा खडबडून जागी झाली. आयुष्यातल्या त्या नव्या
वळणावर उभी राहून प्रज्ञा सूर्याला न्याहाळायला त्यांच्या गच्चीत जाऊन उभी राहिली.
तोही तिला तितकंच समाधान आणि सकारत्मकता घेऊन आला. हा दिवस त्यांच्या आयुष्यातला
खूप महत्वाचा आणि आनंदाचा दिवस होता. भराभर सगळी कामे उरकून बरोबर दहा वाजता सगळे
निघण्यासाठी तयार होते.
सगळ्यांनी
गणपती बाप्पाला हात जोडले आणि शंतनूला घरी घेऊन येण्यासाठी निघाले.
क्रमशः(नोट : मी पुढील काही दिवसात पुढील भाग publish करेन. तुम्ही पुढील भागांसाठी मला follow करू शकता किंवा तुमच्या email द्वारे subscribe करू शकता).
अस्मिता कुलकर्णी