
आंब्याची एक फोड चाखली आणि मन माझ्या गावाकडे धावलं. खरं तर मनाला खूप हूर हूर
लागली होती. शिक्षणाच्या निमित्ताने लहानपणापासूनच काकांकडे रहायला होतो. फक्त
उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी मिळायची गावाचा आस्वाद घेण्यासाठी. जाताना
दिसणाऱ्या खुणा शोधताना खूप मजा यायची आणि त्या दिसल्यानंतर तेवढाच आनंदही
व्हायचा. पोहोचल्यानंतर सारं काही तसच आहे ना हे बघण्यासाठी नजरेची धडपड असायची. आत्ताही
वाटलं सगळं तसच असेल ना? डोळे बंद केले आणि अनुभवलं परत एकदा त्याला जसं च्या तसं.
मोठ्ठा श्वास घेतला आणि खरच जाणवला की, अंगणातल्या ओल्या मातीचा सुगंध. तिथला वारा, तिथला पाऊस सगळं स्पर्शून
गेलं मनाला अगदी खोल पर्यंत. अचानक माझी सावली हात सोडून धावली त्याला नजरेत
साठवायला. मी हसले आणि घेत राहिले त्याचा अनुभव.
पाण्याची दिसणारी टाकी जी घराच्या अगदी समोरच आहे ती इथूनच दिसायला लागली. तिच्यातून
पडणारे पाणी आमच्यासाठी धबधब्यापेक्षा नक्कीच कमी नसायचं, आम्ही मनसोक्त खेळायचो
त्या पाण्यात. टाकीवर बसणारी भूतं ह्याविषयी होणारी मजेशीर चर्चा तर अखंड चालू
असायची. नजर सारखी टाकी कधी दिसतेय ह्यावरच असायची. ती एक गावाजवळ पोहोचल्याची खुण
होती. टाकी दिसल्या नंतरचा अर्धा तास कधी संपेल असं व्हायचं नेहमी आणि, आत्ताही अगदी तसच वाटलं.
जाताना नदी ओलांडून जावी लागणारी वाट, शेतातल्या मंदिराचं
दिसणारं शिखर, अशी एक-एक खुण मागे टाकत शेवटी वेशीजवळ पोहोचले. आता मात्र रहावेना, मन सैरभैर झाले. डाव्या
हाताला मंदिरातील देवांचं दर्शन घेतलं आणि नजर घराकडे वळली आई दिसतेय का ह्यासाठी जीवाची
नुसती तगमग चालली होती आणि, तसच झालं, गाडीचा आवाज ऐकून घाई-घाई दारात उठून आलेली आई आणि तिचा
हसरा चेहरा लांबूनच दिसला आणि, मन हसलं. टुमदार अंगण जणू हात पसरून मला जवळ बोलवत होतं.
अंगणात रेखाटलेली रांगोळी माझं हसून स्वागत करत होती. एका बाजूला माझ्याच हातानी
रंगवलेलं तुळशी वृंदावन अगदी तसच नवीन कोरं वाटत होतं. त्याचे रंगही खुलले होते
माझ्याबरोबर. ती डोलती तुळस अंगणाचं पावित्र्य वाढवत होती. लहानपणी विटांचं आणि
लाल मातीचं बांधलेलं छोटंसं घर अगदी दिमाखात उभं होतं एका बाजूला. आजूबाजूने
असलेली मोकळी जागा दाखवत होती माझंच बागडणं मला. जास्वंद, अबोली, जुई सगळी झाडं प्रेमळ
नजरेनी माझ्याकडे बघत होती. पारिजातका ने तर अख्खं अंगणच कुशीत घेतलं होतं.
पारिजातकाचं स्वतःचं आयुष्य फार नसलं तरी त्याचा सुवास आपलं सगळं आयुष्य व्यापू
शकतो. केशरी देठ आणि पांढरेशुभ्र टपोरे फूल, आहाहा!! अगदी ओंजळीत फुलं वेचून घेतल्यासारखं
वाटलं.
पायऱ्या चढून धावत धावत आई बाबांच्या कुशीत शिरले. आजूबाजूला बरेच चिल्ले-पिल्ले
आधीच जमा झाले होते. तेंव्हा त्यांच्यातलीच एक वाटले मला मी. आत गेले आणि नजरेचा शोध
सुरु झाला. छान चार खोल्याचं घर. स्वयपाक घरात गेले जातं, ऊखळ दिसलं आणि आईने करून ठेवलेल्या
चटण्या, घरच्या कैरीचं लोणचं, ठेचा दिसला आणि पोटात अगदी कावळेच ओरडायला लागले. तिथून मागची
एक खोली जिथे धान्य ठेवलेलं होतं, आणि पूर्ण खोलीभर आंब्याचाच सुगंध दरवळत होता. आडीत हात
गेला आणि एक आंबा शोधून शोधून खायला घेतला. लहानपणी जेंव्हा सगळे जमायचे तेंव्हा सकाळ
झाली की, मोठी बादली गच्च भरून आडीतून आंबे
काढले जायचे आणि सगळीकडून गोल करून कोण जास्ती आंबे खातंय अशी रोज पैज लागायची. ही
खोली लापाछपी च्या वेळेस आमच्या चांगलीच उपयोगाला यायची. आंबा खात खात तिथून निघाले गच्चीवर, अरुंद असा जिना चढत आणि
त्याची नक्षीदार खिडकी न्याहळत मी गच्चीवर पोहोचले. खूप शांत वाटत होतं. ह्याच
गच्चीवर रात्रीचे चांदणे मोजत, पळत्या चांदण्या शोधत, झोपायचो. रात्रभर खूप गप्पा रंगायच्या मग झोप
ती कसली? एखाद्या वेळेस पाऊस पडलाच मग तर काय, खूपच धांदल उडायची. एक
थेंब अंगावर पडायचा अवकाश की, सगळेच जागे व्ह्यायचे. मग पळापळ, आपापलं पांघरून घेऊन खाली
पळायचे. जिथे जागा मिळेल तिथे आडवे व्हायचे. सुट्टी असायची त्यामुळे चुलत, मामे, आत्ये सगळेच भाऊ बहिण
असायचे. येताना एस टी चे पहिले मोठे बाकडे पूर्ण भरून जायचे. आल्यावर नुसता
धिंगाणा. सकाळी उन्हं डोक्यावर आल्यावर उठणं, आईचं अंघोळीसाठी मागे लागणं, मग, तू कर तू कर असं एकमेकांवर
ढकलणं, आणि दिवसभर मनसोक्त खेळणं. जवळ जवळ अंगणातच आमचा अख्खा दिवस जायचा. लपाछपी, शिरा-पुरी, विटी-दांडू, डब्बा एक्स्प्रेस, विषामृत असे कितीतरी खेळ
दिवस दिवस चालू राहायचे आणि अंगण अगदी खुलून जायचं. अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा काल
खेळत असलेल्या खेळाचेच राज्य कोणावर तरी आलेले, तिथूनच सुरुवात व्हायची. दिवस कसे भर भर
संपायचे. गच्चीशी खूप बोलका संवाद झाला आणि आईने हाक मारली.
मागच्याच अंगणात असलेल्या चुलीवर आईने मस्तसा घरच्या नुसत्या दुधाचा चहा केला.
चुलीवरच्या स्वयपाकाची चव खरच कशालाच येऊ शकत नाही. लहानपणी आईच्या स्वयपाकाच्या
नादात माझी लुडबुड पोळ्या लाटायला असायचीच. आई पण एक शेवटची पोळी करायला द्यायची
आणि ती छान भाजून खायला घ्यायची. हळू हळू
आईच्या पोळीत माझी पोळी कधी मिसळून गेली कळलंच नाही. आईने आधीच वांग्याचं भरीत, मेथीची पात्तळ भाजी, भाकरी, लसणाची चटणी, दही असा मस्त बेत करून
ठेवला होता. मनसोक्त गप्पा मारत सगळे जेवलो. मला आठवलं, लहानपणी माझ्या मैत्रिणी
आपापली ताटं जेवणासाहित घेऊन यायची आणि मग झक्कास अंगत पंगत, वाटावाटी व्हायची. जेवण करून मनसोक्त गप्पा मारायला
सुरुवात केली आणि, चोरून खाल्लेली गारीगार, यात्रेत केलेली मज्जा, गुऱ्हाळात खाल्लेली गुळावरची
साय, ताजा ताजा खरवस, अशा अनेक आठवणी निघाल्या. बोलत बोलत आम्ही शेताकडे जायला
निघालो.
आता हा घरा इतकाच जिव्हाळ्याचा विषय रादर जास्तीच. देवीच्या मंदिरापाशी उभा राहिल्यावर
पूर्ण शेत दिसतं.एका बाजूला लांब लांब पर्यंत धरणाचं पाणी पसरलेलं दिसतं. शेताततही
तितकाच धुमाकूळ घालत होतो आम्ही. शेतात जेवण घेऊन यायचो, आंब्याच्या झाडाखाली बसून
मस्त जेवायचो, आणि मग नुसता खेळ. केळीच्या बागेत खेळलेली लापाछपी, सूरपारंब्या, सगळच आठवलं. माझ्या एका
मैत्रिणीवर एकदा सलग अकरा वेळेला राज्य आलं होतं. खूप धमाल आली होती. बाबांनी
जोरात आरोळी दिली आणि मी धावत गेले. बाबांनी माझ्यासाठी झोका बांधलेला पाहून माझा
आनंद गगनात मावेना. झोक्यावर बसले आणि मी खूप हळवी झाले. झोक्याचं आपल्याशी नातं
काय असतं कोणास ठाऊक पण त्याच्यावर विश्वास ठेऊन आपण उंच उंच जाण्याचा प्रयत्न करत
असतो. खेळता खेळता खूप एकरूप होऊन जातो आपण त्याच्याशी. आत्ताही मी अगदी भान हरपून
खेळले. लहानपणी माझा नेहमी हट्ट असायचा मला झोका पाहिजे म्हणजे पाहिजेच. बाबांनाही
ते बघून खूपच छान वाटलं. शेतात आल्यावर काय खाऊ नी, काय नाही असं झालं होतं. ऊस, बोरं, गाभुळलेली चिंच सगळं
डोळ्यासमोर दिसत होतं. शेवटी झाडाची कैरी तोडली आणि फोडून खायला घेतली. आठवणी
संपता संपत नव्हत्या, दिवस मात्र संपत आला होता. मंदिरात देवीपुढे दिवा लावला
आणि आम्ही घरी परतत होतो. आता मात्र संध्याकाळ झाली होती. सूर्यास्ताच्या तांबूस
खुणा अलगद आभाळावर उतरल्या होत्या. सगळी माणसं घराकडे निघाली होती. कोणाच्या
डोक्यावर भाकरी बांधून नेलेलं टोपलं त्यात संध्याकाळच्या जेवणासाठी ताजी ताजी भाजी
तर, कुणाच्या डोक्यावर सरपणाचा भारा, बैलगाडीचा आवाज, गुरांच्या गळ्यात असणार्या घुंगुरमाळांचा आवाज, मधेच गुरांचा आणि
शेळ्यांचा आवाज सगळं कानावर पडत होतं. बाबांना राम राम काका, कधी आल्या ताई? असे लोकं प्रेमाने विचारत होते.
गावात पोहोचल्यावर पारावर गप्पा मारत बसलेले लोकं आपुलकीने एकमेकांची दिवसभराची
विचारपूस करत होते. काहींच्या घरी तेलाची चिमणी होती तर काहींच्या घरी पिवळा छोटा
बल्ब. सगळ्यांची मुलं अंगणात खेळत होती. सगळं कसं मनात साठवून घ्यावंसं वाटत होतं.
शेजारच्या छोट्याने त्याच्या आईला हाक मारल्यासारखा भास झाला, पण नंतर लक्षात आलं की, छोट्याने नाही तर माझी
मुलगी मला हाक मारत होती. अचानक डोळे उघडले, आणि जाणवले की, मी साता समुद्रापार आहे. पण हा क्षण मला खूप
सुखावून गेला. मी मुलीला जवळ घेतलं आणि तिच्याकडे बघून प्रसन्न हसले. तिला माझ्या
हसण्याचं काहीच पडलेलं नव्हतं तिला समोर फक्त आंबा दिसत होता. तिने आज आंब्याचा रस
कर ना आई....असा हट्ट सुरु केला आणि मीही केला मग रस, आठवणींचा कप्पा मनात तसाच
ठेऊन.
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा हळवा
कप्पा असतोच. अशा आठवणी असतातच की, ज्या कधीही आठवल्या तरी तेवढाच आनंद देऊन जातात. ज्या पुन्हा
पुन्हा हव्या हव्याशा वाटतात. ज्या कायमच्या मनात घर करून राहतात. तुम्ही जगाच्या
पाठीवर कुठेही गेलात, जागा बदलली, परिस्थिती बदलली, माणसं बदलली, नाती बदलली तरी त्या जागेची आठवण, त्या माणसांची आठवण, त्या वास्तू ची ऊब, गावाच्या सान्निध्यात
घालवलेला प्रत्येक क्षण, आपल्याच लोकांच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण हे सारं
काही एक चांगली आठवण म्हणून आपल्या कायम
सोबत राहतं. आपलं गाव, जिथे आपण अगदी मनापसून खरेखुरे क्षण अनुभवलेले असतात ते तर
आपल्यापासून कधीच वेगळे होऊ शकत नाहीत.
किती रोज धागे नव्याने विणावे
तुला आठवावे मनी साठवावे
चांदणे तुझे मी रोज पांघरावे
क्षणांचे मनोरे उरी दाटवावे
बागडले अशी मी तुझ्या अंगणी
अन, तुझेच नाते पुन्हा उलघडावे
हिंदोळ्याने तुझ्या सवे उंच उंच जावे
एकरूप होऊनी तुझेच गीत गावे
मनी तू माझ्या असा मोकळा की,
तुझे श्वास माझ्या हृद्यी जपावे
तूच किनारा तूच ठाव माझा
असा अंतरी बहरतो गाव माझा
असा अंतरी बहरतो गाव माझा......
अस्मिता कुलकर्णी