सोबत जन्मांतरीची....



    शेजारच्या घरात राहणारं जोडपं, साधारण साठ-सत्तर वर्षाचं असेल. आजी सांगायची त्यांच्या काळातला ‘प्रेम विवाह’. एकमेकांवर जीवापाड प्रेम, एक मुलगी तिचं लग्न झालेलं. फार गोतावळा नाही. अगदी राजा-राणी सारखे दोघंच एमेकांसाठी, पण अतिशय समाधानी, प्रत्येक क्षणा-क्षणात आनंद शोधणारे, एकमेकांची काळजी घेणारे. औषधं, पथ्यपाणी अगदीच जपणारे. मी बघितलं आहे त्यांच्या घरात जुन्या फोटोच्या खूप फ्रेम लाऊन ठेवल्या आहेत आणि जुने गिफ्ट्स सुद्धा अगदी अचूक जागेवर ठेवलेले आहेत. ते अजूनही लग्नाचा वाढदिवस एकमेकांना काहीतरी सरप्राईज देऊन सेलिब्रेट करतात. फिरायला गेल्यावर ते अजूनही तिच्यासाठी मोगऱ्याचाच गजरा घेतात आणि तीसुद्धा चक्क लाजून त्यांना तो माळायला लावते. तसा त्यांचाही आंबट गोड संवाद चालूच असतो, आणि नंतर घरात येणारा ओंजळीतला चाफा त्यांचं नातं खुलवतो..

खरच एक सुंदर हुरहूर लावणारं नवरा-बायकोचं नातं म्हणजे एक नाजूक कळीच असते. ती आपोआप फुलतेच, आपण तिला खुलवणं खूप महत्वाचं असतं. नात्यात भरभरून प्रेम असणं, विश्वास असणं, काळजी घेणं, एकमेकांचा विचार करणं, त्या विचारांचा आदर करणं, प्रत्येक भावना हळुवार जपणं हे या नात्यात सहजता आणतं, मोकळेपणा आणतं. प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्या प्रकारची नाती जन्मापासून असतातच पण एक अनोळखी माणूस आपलं अख्खं आयुष्यच बनून जातो. अगदी हक्काचं, मैत्रीचं आणि प्रेमाचं नातं म्हणजे नवरा-बायकोचं....

“लग्न” या सुंदर विधीमुळे हा धागा आपल्याशी कायमचा बांधला जातो. जो कधीही तुटणार नाही, ताणला जाणर नाही, विरळ होणार नाही याची काळजी आपण सतत घेत असतो. लग्न ठरल्यापासून अगदी त्या क्षणापासून आपण एकमेकांचे झालो आहोत असं वाटायला लागतं, मन हवेत झोका घ्यायला लागतं, जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती आपणच आहोत  असं काहीसं वाटायला लागतं. जगणं किती सोप्पं आहे जाणवायला लागतं. खूप मनापासून एकमेकांना आपलं मानलं जातं. कोणाशीही कधीही न बोललेल्या गोष्टी दोघात सहज बोलल्या जाऊ लागतात, आणि तेही आपल्याच नकळत. स्वप्नातला तो आणि ती खरोखरच समोर आल्यासारखं वाटतं.. दोघांचं असणं, वागणं, हसणं, बोलणं एकमेकांसठी खूप अर्थपूर्ण ठरतं. दोघे एकमेकांशिवाय जगूच शकत नाही असं नातं निर्माण होतं. विचार केला तरी डोळे पाणवतात, इतके एकरूप होऊन जातात नवरा-बायको. तो आधार तो विश्वास इतका समधान देऊन जातो की, वाटतं बस्स आता दुसरं काहीच नको. आयुष्यात ह्या एकाच व्यक्तीबरोबर आपण आपले आयुष्य भरभरून जगू शकतो. “निरपेक्ष आभाळात विहरताना जितकं मोकळं आणि स्वच्छंद वाटतं अगदी तसच एकमेकांच्या सहवासात असताना वाटतं.”

त्या व्यक्तीचा खांदा आपला पक्का आधार होतो, तिचा हातातला घट्ट हात आपल्या जगण्याची ताकद बनतो, मारलेली प्रत्येक मिठी आपल्या समाधानाची पातळी ठरवते, एकमेकांची स्वप्नेच ध्येय बनतात, घेतला जाणारा  प्रत्येक श्वास एकमेकांच्या मनाचा मोकळेपणा ठरवतो. वेगवेगळा असा विचारच करता येत नाही. आनंद, दु:ख सगळ्याच भावना वाटून घेतल्या जातात.  आवडलेल्या गोष्टी जश्या बोलल्या जातात तश्याच न आवडणाऱ्या गोष्टीही सहज बोलल्या जातात. जगण्याचं एक सुंदर कारण अलगद उलगडत जातं.

मी माझ्या ओळखीत कितीतरी वयस्कर जोडपे अशी बघितली आहेत की जी सगळीकडे बरोबर फिरतात. एकमेकांशिवाय त्याचं पानही हालत नाही. करमणुकीसाठी त्यांना बाहेरच्या गोष्टींची गरजही भासत नाही. मनापासून जगतात आणि एकमेकांसाठीच जगतात.

मला अशी शंका वाटते की, आजची पिढी आजी-आजोबा झाल्यावर अशीच एकमेकांना साथ देतील का? आत्ताच्या चढाओढीच्या काळात बाहेरच्या लोकांबरोबर, काही नवरा-बायकोतही स्पर्धा चालू असते. स्वतःच्या इगो मुळे आपल्याच जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले जात आहे याची काही जणांना जाणीवही नसते. ‘स्पेस’ च्या नादात दुरावणारा संवाद घराघरात वाढत चाललाय. खरं तर स्पर्धा, ईर्ष्या या नात्यात तरी नसावी. दोघांनीही एकमेकांना वेळ देऊन, समजून घेऊन शेवटपर्यंत ह्या आजी आजोबांसारखीच साथ द्यायला हवी..

खरचएकमेकांच्या सोबतीशिवाय पूर्णत्व नाहीच.

सुंदर स्वप्न बघण्यासाठी, तिच्या नजरेची सोबत...
डगमगणाऱ्या वाटेवरून चालताना, त्याच्या सावरणाऱ्या हातांची सोबत..

येणाऱ्या प्रत्येक सुख दु:खात, तिच्या भावनांची सोबत...
आपलं नातं सुंदर फुलवण्यासाठी, त्याच्या तिच्यावरच्या विश्वासाची सोबत...

मनसोक्त आनंदासाठी, तिच्या सहवासाची सोबत...
गोंधळलेल्या मनाला, त्याच्या विचारांची सोबत..

महत्वाच्या प्रत्येक क्षणी, तिच्या निर्णयाची सोबत...
चुकलेल्या क्षणी समजून सांगणाऱ्या, त्याच्या शब्दांची सोबत...

आणि हे सगळं अनुभवण्यासाठी आयुष्य जगण्यासाठी, फक्त आणि फक्त एकमेकांच्या प्रेमाची सोबत...


अस्मिता कुलकर्णी


Share:

‘विशेष’ क्षण





       मी अमेरिकेत, मस्त एन्जॉय सुरु होता. सावनीचं लहानपण आणि अमेरिकेचं नवखेपण दोन्ही गोष्टी मनसोक्त अनुभवणं चालू होतं. सावनी तीन वर्षाची झाली होती. आम्ही जिथे राहत होतो तिथे सहा महिने बर्फ आणि थंडच असायचं त्यामुळे थंडीच्या दिवसात सावनीला मॉल मध्ये असलेल्या ‘प्ले-एरिया’ मधे न्यावं लागायचं. एकदा तिला ‘साऊथ हिल’ नावाच्या एका मॉल मध्ये आम्ही घेऊन गेलो होतो. ती तर एकदम खूष असायची. खूप मुलं मुली, खेळायला खूप गोष्टी, नुसत्या उड्या आणि धिंगाणा आई-बाबांना विसरून नुसता अखंड दंगा. मग फक्त लांबूनच लक्ष ठेवावे लागत. तिच्याबरोबरच इतर मुलांकडेही लक्ष जायचच. मुलांचा निरागसपणा, गोडवा, प्रत्येकाच्या वायानुसारचा समजूतदारपणा, स्वतः विचार करून काहीतरी वेगळ्याच कृतीतून रंगवलेल्या कल्पना हे सारं काही बघण्यात एक वेगळीच मौज असायची.

   मुलांची संख्या भरपूर, अगदी गोंधळ चालू होता. सगळ्यांकडे बघता बघता नजर एका मुलावर पडली साधारण चार वर्षाचा वाटत होता. एकाच जागी स्थिरावलेला, चेहऱ्यावर वेगळेच हावभाव, एक वेगळाच आवाजाचा टोन, वेगळ्याच हालचाली, फक्त एकटाच आईची आठवण काढणारा, म्हणजे आईशिवाय काहीच न करणारा. आजूबाजूला एवढी मुलांची गर्दी असूनही तो एकटाच होता त्याच्या स्वतःच्याच विश्वात. डोळे थबकले, विचार थांबले, सावनी सुद्धा दिसेनाशीच झाली. जगाच्या पाठीवर कुठेही जा हे एक जागतिक आणि नैसर्गिक सत्य आहे जे मी समोर बघत होते. मी भारतात असताना अशा मुलांबरोबर आणि त्यांच्या पालकांबरोबर नोकरीनिमित्त  खूप छान क्षण घालवले होते. त्यांच्यामुळे खूप गोष्टी शिकलेही होते. आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच पूर्ण बदलून गेला होता. स्वतःचीच नव्याने ओळख झाली होती. इथे आल्यापासून सावनीमुळे ह्या विषयी विचारच केला गेला नाही आणि आज अचानक हा समोर दिसला. खूप वाईट वाटलं, त्याच्या आईकडे बघितल्यावर जीवाची घालमेलही झाली. तिचं लक्ष इतर मुलांकडे जात होतं. इतर वेळेस ती नक्कीच कणखर असेल पण त्या क्षणाला तिचं जग किती थांबल्यासारखं झालं असेल, असं उगाच वाटून गेलं. अचानक सावनी दिसली आणि परत सगळं सुरु झाल्यासारखं वाटलं. मी सावनीकडे गेले तिला त्याला ‘हाय’ ‘हॅलो’ म्हणायला लावले. त्याच्याशी खेळायलाही लावले. मलाही छान वाटलं आणि त्याच्या आईलाही मोकळं वाटलं. तिच्या चेहऱ्यावर त्या काही क्षणापुरतं तरी समाधान दिसलं. थोडा वेळ थांबून बाय करून आम्ही निघालो त्याचे बाबा आले आणि तेही घरी निघाले.

    मला मनातून खूप छान वाटत होतं. त्याच्याकडे किंवा आईकडे बघून जर नुसतच वाईट वाटून घेतलं असतं तर त्यातून काहीच अर्थ निघाला नसता. फार वेळ नाही पण त्याच्याबरोबर काही क्षण खेळून, बोलून त्याच्या आणि आईच्या चेहऱ्यावर हास्य उमटवल्याचे समाधान वाटत होते आणि, महत्वाचं म्हणजे सावनीलाही ह्या सत्याची अजाणतेपणाने का असेना पण ओळख झाली याचे मला वाटलेले समाधान.

       विशेष मुलं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुलांमधे खूप प्रकार आहेत जसे की, ऑटिस्टिकमतीमंदडाऊन सिंड्रोमसेरेब्रल पाल्सीडिस्लेक्सिया, असे बऱ्याच प्रकारची मुलं आपल्याला आजूबाजूला सतत वावरतांना दिसत असतात.  अशा मुलांना समजून घेणं तसं फार सोपं असतं फक्त त्यांच्या नजरेतून, हालचालीतून त्यांना नेमकं काय सांगायचं आहे याचा विचार करून ते समजून घ्यावं लागतं. प्रत्येकामध्ये अशी एक तरी गोष्टं असते की, जी त्यांना खूप चांगल्या प्रकारे येत असते. त्यांना थोडसं प्रेम आणि वेळ दिला की ते आपल्याला अपोआप समजतच. एक सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांच्याकडे बघायला हवं. त्यांना मनापासून स्वीकारायला हवं. आपले काहीसेच क्षण का असेनात पण त्यांच्याबरोबर घालवायला हवेत. आपण जितके त्यांच्या सहवासात राहू, त्यांच्या जवळ राहू तितकीच त्यांची सुंदरता आपल्याला जवळून अनुभवायला मिळेल. विचित्र नजरेनी त्यांना फक्त बघण्यापेक्षा त्याच नजरेनी तू किती छान आहेस याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे त्यांच्या पालकांच्या मनातही त्यांच्या बद्दल काही आशेची किरणे निर्माण होतील.

        आपल्या मुलांनाही ह्या एका समजाच्या अविभाज्य घटकाची ओळख होईल आणि या मुलांबरोबरही छान मैत्रीचे नाते नक्कीच निर्माण होऊ शकते याची जाणीवही होईल.

                                                                                                                                                          
  अस्मिता कुलकर्णी

Share:

स्वतः भोवतीचे चांगले कुंपण...

   ‘लहानपण देगा देवा’ हे वारंवार वाटत असलेलं स्वतःचं मन अचानक कधी मोठेपणाकडे, सामंजस्याकडे  वळतं समजतच नाही. सगळ्या गोष्टींचे, घडणाऱ्या घडामोडींचे अर्थ लहानपणी आपल्याच विचारानुसार घेतले जातात. त्या विचारांची धाव कितपत असणार याचा अंदाज येतोच. तो अल्लडपणा, निरागसपणा, खेळकरपणा सारं काही अगदी वेगळंच.. हेवेदावे, अपेक्षा, दडपण ह्या आणि अशा प्रकारच्या गोष्टींना तेंव्हा लहानश्या मनात कुठेच जागा नसते. आपल्या आजूबाजूला, घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी छानच आहेत याच आनंदात राहून आपण आपल्याच विश्वात खूष असतो. त्यामुळे आपल्या भोवती एक सकारत्मक भावना निर्माण होते. स्वतःभोवती चांगले कुंपण तयार होते. समोर येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद आपल्यात ह्या सकारात्मक्तेमुळे आपोआपच तयार होते. आणि आपण आपल्याच नकळत मोठे व्हायला लागतो. लहानपणीच्या त्याच गोष्टींचा विचार हळू हळू वेगळ्या दृष्टीकोनातून करायला लागतो. कधी कधी लहानपणी केलेल्या विचारांवर हसूही येते, कधी वेडेपणाही वाटतो. पण ती सकारात्मकता मात्र तशीच असते.त्यामुळे दृष्टीकोन वेगळा असला तरी, विचार चांगलाच असतो..आणि असाच आपला स्वभाव बनत जातो. लहानपणापासूनच आपण एक चांगली व्यक्ती कसे होऊ शकतो यासाठी आपल्या घरचे आपल्याला कळायला लागल्यापासून आपणही प्रयत्न करतच असतो. थोडक्यात काय तर लहानपण हे सुद्धा आपल्या चांगल्या व्यक्तिमत्वासाठी खूप महत्वाचा टप्पा असतो.

       छुम छुम पैंजण वाजवत पहिला पाऊल टाकायला सुरुवात केलेल्या त्याच घरात आता पाय वाजवून चालायलाही नको वाटतं, सगळ्यांच्या मागे लागून, हट्ट करून, रडून चॉकलेट्स, बिस्किटं खाणारे आपण स्वतःहून घरातल्या लहानांना ते देतो. लहानपणी आपल्याला आपले डोके चोळून झोपवणाऱ्या आपल्या आई बाबांचे पाय आता तेलाने चोळून देऊन त्यांना कशी शांत झोप लागेल याची काळजी आपलं मन घेतं. कायम सोनुली, पिल्ला, राजा असे शब्द लहनपणी ऐकून अपोआप आपल्या बोलण्यातही  जवळीकपणा आणि आदर दिसायला लागतो. चांदोबा, इसापनीती वाचता वाचता जाडी भरडी पुस्तकंही आता सहज वाचली जातात. फरक इतकाच की, लहानपणी आई बाबा वाचून दाखवत आणि आता चार गोष्टी आपण त्यांना पटवून देतो. इतकी सहजता आपल्या आयुष्यात येते ती म्हणजे त्या लहानपणी आपल्या भोवती तयार झालेल्या चांगल्या सकारत्मक संस्काराच्या कुंपणामुळेच. जे कुंपण आपल्यात सारं काही सामावून घेऊ पहातं, आणि आपल्या अनुभवानुसार स्वतःची मर्यादा वाढवतं.

     आता तर आयुष्याचा महत्वाचा टप्पा येतो ते म्हणजे “लग्न” मुलींच्या बाबतीत घर बदलतं, माणसं बदलतात, पद्धतीही बदलतात तडजोडीचा भाग मुली काय आणि मुलं काय प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्या फार फरकाने येतच असतो. ह्या परिस्थितीला कधी कधी समजावून घेणं उमजत नसलं तरी, चांगलं काहीतरी घडावं, चांगलच व्हावं असा अट्टहास मनात घट्ट पाय रोवून उभा असतो. हेही सगळं त्या स्वतःभोवतीच्या चांगल्या कुंपणामुळे.

  आता आपलंच बालपण नव्याने अनुभवण्याची संधी आपल्याला मिळते. पहिल्यांदा आनंदाची बातमी समजल्यावर मनात अगदीच धस्स होतं. काळजी, आनंद, उत्साह सगळं एकदम मनात दाटतं. आपण आपल्या आईच्या पोटात असतानाच्या नऊ महिन्यांसाहित जे काही चांगलं आणि सकारात्मक तिने आपल्याला अनुभवून दिलं तसच आपल्या बाळालाही मिळावं याची जबाबदारी आता आपल्यावर असते. अप्रत्यक्षपणे का असेना पण त्याला सगळं जाणवत असतं. त्यामुळे सतत प्रसन्न, आनंदी, हसतमुख राहणं अतिशय महत्वाचं असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकारात्मक वातावरण त्याच्या आजूबाजूला असणे हे आपले कर्तव्य असते. जो पर्यंत त्याच्यामध्ये स्वतः स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होत नाही तोपर्यंत आपली जबाबदारी दुप्पट असते. जे जे काही छान अनुभव आपण लहनपणी घेतले ते त्यानेही अनुभवावं. त्यानेही  त्याच सकारात्मकतेने, जिद्दीने पुढे जावं आणि जे काही चांगलं असेल ते सामावून घेणाऱ्या कुंपणाची कायम सोबत ठेवावी, याची जबाबदारी आपल्यावर असते आणि ती आपण सहज पेलवून नेतो.

  हे आणि आयुष्यातल्या बर्याच छोट्या मोठ्या गोष्टी ह्या चांगल्या कुंपणामुळे सहज फुलतात. फक्त चांगले, स्वच्छ विचार, बोलण्यात गोडवा आणि मनात सकारात्मकता हवी...
Share:

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या