आयुष्याच्या संध्याकाळी

जय काकांनी नुकतीच VRS घेतली. संध्या काकूंना देखील शाळेची नोकरी सोड आता, कायमची रजा घे असा त्यांचा आग्रह चालू झाला पण, काकूंच्या मनात अजून एखादा वर्ष नोकरी करावी असं वाटत होतं. आधी त्यांचं एकत्र कुटुंब होतं दीर, जावा, सासू-सासरे सगळेच एकत्र. पण काही वर्षांपूर्वी काकांच्या पुतण्याचं लग्न झालं आणि नंतर मुलाचंही लग्न झालं त्यामुळे सामंजस्याने सगळे वेगवेगळे राहायला लागले. सासू सासरे मात्र ह्यांच्या कडेच होते. तेही आता ह्या जगात नाहीत. एकुलता एक मुलगा, मुलगी नवऱ्याबरोबर काही वर्षांसाठी परदेशी गेली होती. असं त्याचं छोटंसं कुटुंब, एकमेकांवर जीवापाड प्रेम आणि हो त्यांना सून देखील अगदी त्यांच्यात मिसळून जाईल अशीच मिळाली. लग्नाला दोन वर्ष झाली होती आता आजोबा आज्जीला नातवंड कधी अंगा खांद्यावर खेळवू असं झालं होतं. त्यांनी कधी बोलून दाखवलं नव्हतं. राजेश रियाचं ठरलंच होतं तसं की, दोन वर्ष मुल होऊ द्यायचं नाही, काका काकूही कधी त्यांच्या मागे लागले नाहीत. दोन वर्ष नुकतेच पूर्ण झाले. त्यांची पाऊलेही त्या दिशेने वाळू लागली. काळजी वाटणारी गोष्ट, सहा महिने होऊन गेले तरी त्यांना यश आले नाही. आता मात्र काळजी वाढायला लागली पण, अचानक एक दिवस माधवीला चक्कर येत होती म्हणून ती ऑफिस मधून घरी निघून आली. राजेश घरी आला आणि दोघांनी लगेच दवाखाना गाठला,  दवाखान्यातून परत येताना राजेश जवळ जवळ अर्ध हलवाईचं दुकानच बरोबर घेऊन आला. फोन करून त्याने आधीच घरी सांगितलं होतं त्यामुळे काका काकूंचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला होता. स्वागताची जोरदार तयारी केली होती. औक्षण केलं, तुकडा ओवाळून टाकला. द्रष्ट देखील काढली. काकू रियाला आईची उणीव कधीच जाणवू देत नसत एकमेकांना आनंद देण्यातच खरं सुख आहे हे कोणी त्यांच्याकडून शिकावं. काका देखील चांगलेच होते पण, अतिशय शिस्तबद्ध त्या गेष्टीचा कधी कधी सगळ्यांना जरा त्रास व्हायचा पण, त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या विषयी असणाऱ्या आदरामुळे तो त्रास कधीही कोणाच्याही चेहऱ्यावर कधीच जाणवला नाही. रियाच्या बातमीनंतरचा प्रत्येक दिवस आनंदोत्सवच असायचा त्यांच्या घरी. रियाची नोकरी पर्मनंट नव्हती त्यामुळे, सगळ्यांनी तिला ती सोडायचा सल्ला दिला कारण बाळ झाल्यावर किमान दोन वर्ष तरी तिने नोकरी करू नये असं सगळ्याचं मत होतं. थोडक्यात आत्ता तिच्या तब्येतीची काळजी आणि नंतर बाळाची. तसं काका-काकू आरामात सांभाळतील पण, रिया देखील लगेच ह्या निर्णयात सहभागी झाली. काकांचं रोजचं रुटीन चांगलंच बसलं होतं आणि, आता काकुंचं ही त्यांना बसवायचं होतं. शेवटी काकूही शाळेतून कायमची राजा घेणार यावर शिक्का मोर्तब झाला. काका काकूंनी खूप हलाकीचे दिवस काढून मुलांना मोठं केलं होतं. पण, आता मात्र त्यांची परिस्थिती अगदीच चांगली होती. ते जिथे राहत होते ते त्यांचं स्वतःच घर होतं शिवाय राजेश आणि रियाने त्यांचा वेगळा flat देखील घेऊन ठेवला होता. बघता बघता नात घरात आली आणि तिच्या आयुष्यात ह्यांचं सगळ्याचं आयुष्य कसं अगदी गुंतून गेलं. बघता बघता दोन वर्षाची झाली सायली. आता मात्र तिच्याकडे बघून काका काकूंना नेहमी वाटू लागलं खरच आनंद कितीही मिळाला तरी तो कमीच वाटतो. तिच्या सहवासासाठी तरी आयुष्याच्या ह्या टप्प्यावर नेहमी असं मनात येऊन जायचं, पुन्हा नव्याने जन्म मिळावा.

एक दिवस काका काकू गच्चीवर निवांत गप्पा मारत बसले होते. खूप वर्षांनतर हा निवांतपणा त्यांच्या आयुष्यात आला होता. जुन्या आठवणी, लग्न कसे ठरले तेंव्हापासून एकमेकांची कशी साथ देत आले आणि आत्ताही देत आहेत इथपर्यंत सगळे विषय बोलत होते. म्हणजे थोडक्यात काय तर,  आता पुन्हा तेच निसटून चाललेले दिवस गोळा करून ठेवता येतात का ते बघणं चालू होतं. नव्याने सहवास, प्रेम, आदर सारं काही वाढतच चाललं होतं. खरं तर एकत्र कुटुंब असल्यामुळे वेगळा असा वेळ एकमेकांना कधी देताच आला नाही त्यातून नोकरी, घरकाम, जबाबदाऱ्या, खूप गुंतून गेले होते वेगवेगळ्या विश्वात पण, प्रेम मात्र जीवापाड. तेंव्हाचा वेळ आत्ता कुठे सापडेल का नव्याने हे त्यांना अनुभवावंसं वाटू लागलं. शेवटी एक दिवस न राहून त्यांनी राजेश आणि रियाला एक विनंती केली की, आम्हाला जरा दोन महिने आपल्या ह्याच घरात फक्त दोघांनाच राहून बघायचंय. राजेश आणि रियाला उलट आनंदच वाटला त्यांनीही समजून घेतलं त्यांच्या म्हणण्याचा आदर केला आणि ते दोन महिन्यासाठी आपल्या स्वतःच्या flat वर राहायला गेले. मग काय दोघांनी अगदी छान एकमेकांबरोबर वेळ घालवला, मित्र-मैत्रिणी, जिवलग, नातेवाईक, जागरणं, सिनेमे, लटके भांडण, रागावून पुन्हा मनवणं, अगदी तरुणाईतल्या जोडप्यासारखे. ह्या दोन महिन्यांमध्ये त्यांनी सगळं आयुष्य नव्याने जगून घेतलं. वेगळ्याच दुनियेत वावरत होते ते आणि त्यानंतरचा त्यांचा प्रवास मात्र एक सुंदर आणि समाधानी आयुष्याचा होता. कोणतीच सल मनात नव्हती, कोणाशी अबोला नाही, गैरसमज नाही, नाराजी नाही कारण ह्या वेळी आपल्या माणसांची जितकी गरज असते ती याआधी कधी फारशी जाणवलेली नसते पण, ह्या वळणावर त्यांच्या आधाराची, सहवासाची ऊब खूप काही देऊन जाते.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी गोष्टं असतेच की, ती करायची राहून गेलेली असते, कधी पैसा नसतो तर, कधी वेळ. कधी जाणीव नसते तर, कधी जाणीव असूनही इच्छा नसते. मग ह्या हळुवार  आलेल्या आयुष्याच्या संध्याकाळी त्या तांबूस खुणा अंगावर झळकू लागल्या की, एक वेगळीच जाणीव होते. सुखी तर असतोच पण, कायम एक हुरहूर मनात चालूच असते. सगळ्यांमधेच जीव अडकलेला असतो. मुलं, नातवंड, नातेवाईक, मित्र परिवार सारं काही नव्याने पुन्हा-पुन्हा हवंहवंसं वाटायला लागलेलं असतं. आकाशात उंच झेप घेण्यासाठी आई वडिलांनी ज्या हातातून मुक्त केलेले असते त्या हातांची मिठी परत हवीहवीशी वाटायला लागलेली असते. ती काही जणांना मिळते पण काहींना नुसतीच जाणीवही पुरते. अचानक फार फार जुन्या मित्राची नुकतीच झालेली गळाभेट रडवल्याशिवाय रहात नाही. शब्दातून व्यक्त कधीच होता येत नाही रादर ते सगळ्यांना दाखवता येत नाही. मनातली तगमग डोळ्यांना समजते आणि मग डोळे शब्द बनतात आणि कोसळतात स्वतःच्याच नकळत. आपल्यापेक्षा वरिष्ठ मंडळी आठवली की, वाटतं त्यांच्या जागेवर आता आपण आलो आहोत. छोट्या छोट्या गोष्टीत मन हळवं बनत जातं. आता आयुष्यात बरीच स्थिरता आलेली असते आणि नसली तरी ती हवीहवीशी नक्कीच वाटत असते. तेंव्हा सुचत जातात उगाचच जोडलेल्या आयुष्याबद्दलच्या चार ओळी. आत्तापर्यंतच्या प्रत्येक क्षणाचा मागोवा आपलेच आपण पुन्हा पुन्हा न्यहाळतो. मन नाजूक झालेली जाणीव सतत होत राहते. बरेचदा सगळ्यांना फारशी काही पडलेली नसते पण, आपण मात्र आपल्या भोवितच फिरत असतो मला हे करायचंय अजून, तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाही, माझ्यावाचून आता कोणाचं काहीच अढत नाही, असे भलते सलते विचार कधी ना कधी मनात अपोआप येऊन जातात. ह्या विचारांनी कधी कधी घरातलं वातावरण देखील बिघडू शकतं. खरं तर सगळ्यांचं कौतुकही असतं प्रत्येकाला पण, रिकामी जागा आपल्याशिवाय भरली जाणार ह्या कल्पनेने कधी कधी मन उगाचच कासावीस होतं. नातवंड म्हणजे तर काय नव्याने मिळालेला स्वच्छंद आनंद त्याच्या नजरेत बघून सुखाची नव्याने ओळख होते. असे कितीतरी क्षण वरचे वर आयुष्यात येत राहतात आणि नेहमी वाटत राहतं की, आयुष्याच्या ह्या वळणावर पुन्हा नव्याने जन्म मिळावा.

सुखाची कल्पना अन मनोरे मनाचे
जगले असे सुंदर क्षण सारे सुखाचे,   
काही बोलके अन, काही अंतरीचे  
काही स्वप्नांचे तर, काही वास्तवाचे
अजूनही वाटे गोड स्वप्नांनी प्रत्येक दिन उजळावा,
आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नव्याने जन्म मिळावा....

सावरलेल्या आयुष्याच्या वाटा अनेक होत्या
वळणावरती चालताना सावल्या सोबत होत्या,   
अडचणीतूनही कित्येक वाटा मी, शोधल्या होत्या
वळून बघता मागे, पाऊलखुणा तशाच होत्या
अजूनही वाटते तशा क्षणांचा शोध नव्याने घ्यावा,
आयुष्याच्या संध्याकाळी पून्हा नव्याने जन्म मिळावा....

तो हात हाती, शेवटपर्यंत तसाच रहावा  
मिळून फुलवलेला संसार मन भरून पहावा,
भूतकाळातला प्रत्येक क्षण नजरेसमोर लख्ख दिसावा
तिच सोबत अन, तोच सहवास मनात अगदी खोल रुजावा
मुरांबा आमच्या सहवासाचा आयुष्यभर असाच टिकावा,  
आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नव्याने जन्म मिळावा....

निसटून गेले क्षण सारे मन उगाच उदास होई
तांबूस खुणा खुणावती ओंजळीत घे, तुझीच रोषणाई
अलगद मग, जाणवावा तोच ओलावा मनी
आयुष्याची ओढ नव्याने जपेन प्रत्येक क्षणी
सुखाच्या सरींचा मग नकळत सूर गवसावा,   
आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नव्याने जन्म मिळावा....

मी हितगुज करेल प्रत्येक दिवसाशी
अजूनही जगण्याची आशा उराशी,
स्वप्नांना ओंजळीत अलगद साठवून ठेवीन
निरपेक्ष नजरेतून त्या क्षणात सामावून जाईन   
सुंदर हळव्या पानावरती हळुवार नव्याने शब्द सुचावा,
आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नव्याने जन्म मिळावा....
पुन्हा नव्याने जन्म मिळावा....


- अस्मिता कुलकर्णी
Share:

गेट मूव्ह ऑन..


          रवा एक जुनी मैत्रीण अचानक मॉल मध्ये दिसली. तिच आहे का दोनदा तीनदा खात्री करून घेतली आणि मग हाक मारली, “प्रीती” ती देखील धावत धावत आली. होस्टेल नंतर कित्येक वर्षानंतर भेटलो होतो आम्ही. “कशी आहेस?” “मी मस्त, तू सांग, इथेच असतेस का?” “हो अगं, इथेच असते.” मी जरा विचारात पडले खरं तर तिचं एका मुलावर खूप प्रेम होतं. तो तर हैद्राबादला रहायचा. शिक्षण इथे पुण्यात झालं होतं. होस्टेल मध्ये असताना खूप बोलायची, त्याच्याबद्दल सांगायची. मला त्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. मी काही विचारणार, तेवढ्यात तिचे मिस्टर आणि लहान मुलगा दोघंही तिथे आले आणि माझी उत्सुकता अजूनच वाढली कारण तो, तो नव्हताच. ते थोडसं बोलून, मला हाय-हेलो करून पुन्हा कोणत्यातरी शॉप मध्ये शिरले. मग, मी न राहून शेवटी विचारलंच. “अगं काय हे, तुझं?” मी काही विचारणार तेवढ्यात तीनेच माझ्या डोळ्यातला प्रश्न ओळखला आणि तिने सांगितलं. “मलाही कळलंच नाही की, नेमकं काय काय घडलं आणि माझ्या आयुष्यातून तो अचानक कसा निघून गेला, आता मी नवीन नातं स्वीकारलं आहे. आम्ही तिघे खूप खुश आहोत आमच्या आयुष्यात. खूप गोष्टी मागे सोडून पुन्हा नव्याने सुरुवात केली. सुरुवातीला अवघड गेलं पण नंतर जमलं सगळं.” “ओह्ह sorry, मी विचारायलाच नको होतं. तुला दुखवायचं नव्हतं मला.” “अगं असं काही नाही, ठीक आहे. मला फारसं वाईट नाही वाटत आता कारण, मी ते सगळं विसरले आहे. बराच काळ स्वतःला त्रास करून घेत होते पण, आता नाही. माझा नवरा खूप छान आहे. माझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याला सगळं माहिती देखील आहे. कदाचित मी त्याच्याबरोबरही इतकी खुश राहिले नसते जेवढी आत्ता आहे.” मला खरं तर वाईट वाटलं कारण खरचंच तिचा खूप जीव होता त्याच्यावर. तिच्याशी बोलून घरी निघाले पण, त्याच सगळ्या आठवणी येत होत्या डोक्यात. खरं तर म्हणतात पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही पण, तिने समजून घेतलं परिस्थितीला, त्याला आणि स्वतःच्या आयुष्याला देखील. कितीतरी गोष्टी, आठवणी खरच आपण मागे सोडून पुढे निघून येतो, परत कधीच मागे वळून न बघण्यासाठी. सहज नवं स्वीकारतो आणि चालत राहतो, आनंदाने नव्या वाटा शोधत आणि त्या सापडतात देखील. वेळेलाही थोडा वेळ दिला की पुसटश्या होत जातात गोष्टी. कोत्याही दुःखाचं असो वा कोणत्या आठवणींचं असो, असंच असतं काळ सरला की, त्याचा प्रभाव कमी होतो आणि धुरकट झालेल्या चारी दिशा, हरवत चाललेल्या वाटा, निसटत चाललेली नाती, आणि शोधत असलेलं प्रेम पुन्हा एकदा नव्याने स्वच्छ दिसायला लागतं आणि, आपणही त्याच्याशी पुन्हा समरस होऊन जातो नव्याने सगळं अनुभवायला...किती छान आहे हे खरं. कधीच थांबल्यासारख वाटणार नाही, आयुष्यात सतत चांगले बदल होत राहणार, वाहत्या पाण्यासारखं स्वच्छंद वाटणार नेहमीच आणि, मनातला आणि चेहऱ्यावरचा आनंदही वारंवार सापडणार...

गाडी चालवत चालवत घरी पोहोचेपर्यंत एक कविता सुचली...
  
प्रेमाच्या क्षणांचा आनंद अन, मोकळ्या वाटा
त्याचा सहवास अंतरी अन, त्याच्याच वेगळ्या छटा
बावरले होते त्याच्याचसाठी, विसरून मला मी
सावरले होते त्याला मी, सावरून मला मी  
मी गुंतून राहिले, त्या विरघळणाऱ्या क्षणांमध्ये
तो मात्र थांबला नाही...
त्या जुन्या कोणत्याच आठवणींचा
हिशोबही आता उरला नाही.....

वेगळीच होते मी, आता ती गवसत नाही
सापडल्या कधी खुणा तरी, तशी मी मलाच आठवत नाही
सैरभैर होते कधी मन, माझेच मला समजत नाही
भावनेचा गुंता सोडवला तरी, काही कोडी सुटता सुटत नाही
वादळात धरला होता हात
पण, तो कधी बरोबर चालला नाही...
 त्या जुन्या कोणत्याच आठवणींचा
हिशोबही आता उरला नाही.....

एकटी ना कधी, संगे सदा सोबती
गप्पांच्या मैफिली अन, मैत्रीचे बंध हाती
वेगळे माझे बघणे, त्यानेच हेरले होते
बरोबरीने आम्ही कितीतरी, क्षण जगले होते
ओळखून माझे मन, जाणूनी ती घुसमट
तो कधीच काही बोलला नाही...
 त्या कोणत्याच आठवणींचा
हिशोबही आता उरला नाही.....

हातावरच्या बोलक्या रेषा, नाव त्याचेच सांगती
गालावरची खळी बोलकी, लाजून हळूच हसती
 त्याच्या डोळ्यात मी, प्रेम पहिले होते
त्याच्या मनातले नकळत मी, जाणिले होते
अर्ध्यावरती डाव सोडला त्याने
पण, तो रडला नाही...
 त्या कोणत्याच आठवणींचा
 हिशोब आता उरला नाही....

पुसटसे झाले क्षण, पाऊल अचानक वळले
नव्याने बंध जोडूनी, नवीन नाते जुळले
थबकला आज पुन्हा, येऊन माझ्या समोर
पाणावले डोळे त्याचे, त्याने चुकविली नजर...
प्रश्न ठेउनी गेला पुन्हा,
आजही मला तो कळला नाही
असो, तसंही त्या कोणत्याच आठवणींचा
हिशोब आता उरला नाही....



- अस्मिता कुलकर्णी

Share:

माहेर...




डोळाभर पाही माझे मन, माझ्या मायेचे आंगण
माहेराच्या माझ्या दारी, सुखी क्षणांचे आंदण..

वाट पाहते ती माया, अशी ओढ त्याच्या मनी
ये ग लाडके परतुनी, असं बोलतं ते कानी..

दारासमोर आनंदी, उभी अंगणी तुळस
घराला ग बाई माझ्या, सुखी स्वप्नांचा कळस..

होते भावूक क्षणात, घेते कवेत मला ते  
वादळात सावरते, देते आधार मला ते..  

गुज न काही मनी त्याच्या, आहे खरंखुरं   
मोहरून जाते मन, कशाची न त्याला सर..  

माहेराच्या आठवणीत मला, सूर गवसतो
तिथला पाऊसही जणू माझ्या, प्रेमात बरसतो..

तिथे फुलतो मोगरा, पारिजातकाचा सडा
मुक्यानेच बोलतो ग, माझा चिरेबंदी वाडा..

थांबले ग अश्रू त्याचे, त्याने मला पाहियले
त्याच्या मनातले भाव, सारे डोळ्यात दाटले..

सावरले माझे मन, मी हसून बोलले
जुने हसरे ग क्षण, डोळ्यासमोर धावले..

कशी मांडू मी शब्दात, भावा बहिणीची ओढ
अपोआप येते कशी माया, न सुटलेलं कोडं..

मायबाप बघती, माझ्या सुखाच्या ग छटा
संसारात रंगलेल्या, माझ्या चंदेरी ग वाटा..

हात सुटला हातून, गेली परक्याच्या घरी
सुखाचे ग क्षण पेर, आता तुझ्या संसारी..

तिथल्या आठवणींचे क्षण, माझ्या बरोबरी आले
स्वप्नात ग बाई माझ्या, मी माहेराला गेले..

 - अस्मिता कुलकर्णी

Share:

चांदणी मी तुझी


           
                          मी चांदणी रे एक,
                       त्या मखमली आकाशी,
                       परतून बघ मागे,
                       मी बोलले जराशी,
                       नकळताच ओढ लागली कुणाची,
                       व्हाया आवडेल मला रे,
                       कविता माझ्या प्रियाची..                       
                                                   शब्द तुझे, अर्थ तुझे,
                                                   स्पर्श तुझा, अंदाज तुझे,
                                                   नजर माझी, स्वप्न तुझे,
                                                   माझ्या मनातील असणे तुझे,
                                                   हुरहूर मिटवू दे, 
                                                   मज काळजातली,
                                                   व्हाया आवडेल मला रे,
                                                   कविता तुझ्या हृदयातली....
                        हात तुझा घट्ट हाती,
                        साथ तुझी प्रत्येक जन्मी,
                        फक्त तुझ्या विचारांनीच,
                        सहवासाची जागा घेतली,
                        माझ्या मनीच्या प्रिया, 
                        मी साद तुजला घातली,
                        व्हाया आवडेल मला रे,
                        कविता तुझ्या स्वप्नातली....
                                                तुझ्यामुळे अर्थ मिळाला,
                                                सापडत गेले जगणे,
                                                सूर तुझ्यातच गवसले,
                                                अन सुंदर बनले माझे गाणे,
                                                जादू उमजली, 
                                                खऱ्या जगण्यातली,
                                                व्हाया आवडेल मला रे,
                                                कविता तुझ्या मनातली....
                       सहजच तू आलास अन,
                       मी हसरी बनले,
                       क्षण मोहरून गेले माझे,
                       अन हसणेच आयुष्य बनले,
                       प्रेमाने तुझ्या, 
                       माझी आयुष्याची ओंजळ भरली,
                       व्हाया आवडेल मला रे,
                       कविता तुझ्या हसण्यातली....  
                                                              - अस्मिता कुलकर्णी 
Share:

लढा स्वतःशीच स्वतःचा (भाग -९)

भाग - ८ वाचण्यासाठी  इथे क्लिक करा


       गळेच खूप आनंदात होते. बाबांनी गाडी चालू केली आणि, स्पीड जणू आपोआपच वाढत होता. कधी संस्थेत पोहोचतोय आणि शंतनूला घरी घेऊन येतोय असं सगळ्यांना झालं होतं. शंतनू देखील घरी जाण्यासाठी उत्सुक होता. गाडी संस्थेच्या आवारात पोहोचली तसं सगळ्यांच्याच मनात धस्स झालं. आयुष्य आता ह्या संस्थेशी जोडलं गेलय. आयुष्यातला अविभाज्य काळ, जो शेवटपर्यंत कधीच विसरला जाणार नाही. कितीतरी हसरे-रडके क्षण इथे मुरले आहेत. या संस्थेमुळेच आपला शंतनू आपल्याला परत मिळाला. खूप सुखाचा पाठलाग केला आणि आज शेवटी ते आम्हाला इथेच गवसलं. असे अनेक विचार सगळ्यांच्याच मनात डोकावत होते. इकडे शंतनू गुलमोहोराचा निरोप घेत होता. गुलमोहोर जवळचा मित्रच बनला होता शंतनूचा. सगळे शंतनूच्या रुममध्ये पोहोचले शंतनूचा हसरा चेहरा बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. डॉक्टरांची भेट घेतली आणि सगळे संस्थेमधून बाहेर पडले.
शंतनू गाडीत बसला. शक्यतो तो कधी मागे बसत नसत पण आता त्याला गाडी चालवायला लगेच जमणारं नव्हतं. संस्थेच्या गेटमधून गाडी बाहेर पडली तेंव्हा सगळ्यांच्याच नजरा मागे सुटत चाललेल्या  संस्थेकडेच होत्या. डॉक्टरांचे, तिथल्या मदतनीस चे आणि ह्या वास्तूचे आपल्यावर खूप खूप उपकार आहेत हा भाव सगळ्यांच्याच डोळ्यात उठून दिसत होता. गाडी बऱ्यापैकी पुढे आली. शंतनूची नजर आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी, रस्ते, काही खुणा ओळखण्याचा प्रयत्न करत होती. कित्येक वर्ष झालं हे बघितलच नाही असं त्याला वाटत होतं. बाहेरच्या गोष्टी बघत बघत तो भूतकाळातही डोकावू पाहत होता. बाबांनी मधेच गमतीने शंतनूला विचारले, “काय रे शंतनू चालवायची का गाडी?” तसं शंतनू एकदम घाबरला. “मला नाही जमणार.... बाबा...” असं दचकत दचकतच तो बाबांना म्हणाला. “अरे गंमत केली शंतनू, शांत हो, काळजी करू नकोस.” आईचं लगेच वाक्य “काय हो तुम्ही पण माझ्या लेकराला आत्ता तर घेरी येतोय तो. आणि लगेच तुम्ही त्याला काहीही विचारत आहात.” सगळे हसले पण, शंतनूला अजूनही लक्षात येत नव्हतं की, खरच ह्या सगळ्या गोष्टी मी पूर्वीसारख्या करू शकणार आहे की, नाही? त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आत्ता तरी उसनं हसू होतं, हे लगेच सगळ्यांच्या लक्षात आलं, तसं सगळे अचानक शांत झाले. “शंतनू तुला पाहिजे तितका आणि त्या पद्धतीने तुझा तुझा वेळ घे, काही घाई नाहीये आपल्याला. अजिबात काळजी करू नकोस सगळं छानच होणार आहे.” बाबांनी पुन्हा एकदा शंतनूला सकारात्मक डोस दिला आणि त्याची हिम्मत वाढवण्याचा प्रयत्न केला.
गाडी घराजवळ पोहोचली. शंतनू गाडीतून उतरला, त्याने पाय जमिनीवर ठेवला आणि त्याला एक खूप जवळचा स्पर्श जाणवला स्वतःच्या जागेचा, घराचा जणू ते सगळी डोळ्यात तेल घालून शंतनूची वाट पहात होते. तसं बघायला गेलं तर ह्या निर्जीव गोष्टी पण, का कोणास ठाऊक कोणत्याही गोष्टीशी अथवा माणसाशी एकदा नातं जोडलं गेलं की, त्याच्यापासून आपण आणि आपल्या पासून ते कधीच दूर जाऊ शकत नाहीत. हीच भावना शंतनूला अख्खं घर फिरताना जाणवत होती. वाढदिवसा दिवशी डोळ्यासमोर दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी तशाच आहेत ना, रादर त्या आधी होत्याच आणि आत्ताही आहेत का? हे शंतनूची नजर अचूक हेरत होती. त्याला मनस्वी आनंद होत होता. त्याच्या स्वागतासाठी बगीचाही जणू  खुलला होता. प्रज्ञा आणि आईने मस्त गोड धोड जेवायला केलं होतं. गप्पा मारत मारत सगळे एकत्र जेवायला बसले जसे, ते आधी बसायचे अगदी तसेच. सगळ्यांच्याच आयुष्यात हे रंगीबेरंगी क्षण पुन्हा नाचत-डोलत समोर उधळले जात होते अगदी मनसोक्त. खूप दिवसांनी सगळ्यांना अन्नाची खरी चव समजली होती. मनापासून हसणं, खुश असणं, म्हणजे काय हे जाणवत होतं. बराच वेळ गप्पा मारल्या आणि, शंतनू आराम करण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. सगळेच शंतनूची खूप काळजी घेत होते. त्याला बऱ्याच कृती करण्यासाठी सपोर्ट करत होते. डॉक्टरांनी दिलेल्या activity आणि औषधं देखील व्यवस्थित सुरु होते. सगळं बऱ्यापैकी चांगलं चालू होतं पण, शंतनू अजूनही कसल्या तरी दबावाखालीच वाटायचा. बाहेर जायचं म्हंटल की, त्याच्या अंगावर काटा यायचा, त्याला खूप भीती वाटायची. खूप वेळा सगळे त्याला एखाद्या कृतीसाठी प्रवृत्त करत पण, ती जर गेटच्या बाहेरची असेल तर तो ती टाळायचाच. सगळ्यांनी त्याला खूप छान समजून घेतलं होतं. मुलींकडून कधीतरी हट्ट व्हायचा, मागण्या असायच्या तेंव्हा प्रज्ञा आणि आई संभाळून घ्यायच्या.
      एके दिवशी प्रज्ञा आणि बाबा ऑफिस मध्ये गेले होते. आई देवळात गेली होती. शंतनू एकटाच घरी होता. शाळेतून अचानक फोन आला, शंतनूचा नाविलाज होता. फोनजवळ गेला आणि हो, नाही करत करत त्याने फोन उचलला. तिकडून लगेच श्रेयाच्या टीचर बोलू लागल्या, “श्रेयाला खूप ताप आला आहे प्लीज तिला घरी घेऊन जाता का? आम्ही मिस प्रज्ञाला फोन लावत आहोत पण तो बंद सांगत आहेत.” इकडे शंतनू आधी शांतच होता. “hello, तुम्ही ऐकत आहात ना?” असं पुन्हा एकदा टीचर ने विचारलं तेंव्हा शेवटी शंतनू घाबरत घाबरतच म्हणाला, “हो हो मी येतो.” शंतनूने फोन ठेवला. मनात भितीलाही सोबत घेऊन तो सगळ्या कृती करू लागला. मला जावच लागेल, असं तो त्या भितीलाही ठणकावून सांगू लागला. त्याने स्वतःच आवरलं, गाडीची चावी शोधली. चप्पल घातली. त्याला खूप घाम यायला लागला. पार्किंग मध्ये गाडीजवळ गेला, घाबरतच दार उघडलं. आता मात्र त्याच्या घामाच्या धारा अक्षरशः कपाळावरून अंगावर ओघळायला लागल्या. हात थर थर कापायला लागले. घशाला कोरड पडायला लागली. त्याच्या हातातून चावी निसटून गाडीच्या खाली पडली त्याने ती थरथरत्या हातानेच परत उचलली. तो पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न करू लागला पण, मनातली भीती त्याला हे करण्यापासून थांबवत होती. आणि शेवटी तीच वरचढ ठरली. त्या क्षणी अचानक शंतनू गाडीतून चटकन उतरला ते थेट त्याच्या रुममध्ये जाऊन दार बंद करून बसला. त्याला जवळ जवळ अर्धा तास काहीच सुचत नव्हतं. नंतर आई देवळातून घरी आल्यावर पुन्हा शाळेतून फोन आला “तुम्ही येत आहात ना श्रेयाला घ्यायला? तिचा ताप वाढतच चाललाय” आईच्या लक्षात आलं की, आधी एकदा फोन येऊन गेलाय आणि तो नक्कीच शंतनूने उचलला असावा. विचार करत करतच आई म्हणाली, “हो हो निघतच होते मी, येते लवकर तुम्ही काळजी घ्या तोपर्यंत तिची प्लीज.”आईनी पटकन प्रज्ञाला फोन लावला बाबांना फोन लावला पण दोघेही बिझी होते. मग आईनी ऑफिस मधल्या फोनवर फोन केला आणि प्रज्ञाला अर्जंट निरोप देण्यास सांगितले. प्रज्ञाला निरोप मिळताच हातातलं सगळं काम बाबांवर सोपवून ती श्रेयाच्या शाळेत गेली.
      इकडे आई शंतनूच्या रुमजवळ गेली. दार लावलेलं होतं. “शंतनू अरे शंतनू” आईने हाक मारली तसं शंतनूने घाई घाई दार उघडलं तो भर भर सगळं आईला सांगायला लागला. “अगं आई कोणाला तरी  जावं लागेल पटकन शाळेत.” त्याचा घाम पदराने पुसत पुसत आई त्याला म्हणत होती, “अरे शांत हो, मला समजलंय सगळं मी केला आहे फोन प्रज्ञाला ती जाईल तिला आणायला तू काळजी करू नकोस.” तसा शंतनू हळू हळू शांत झाला पण, त्याला मनोमन खूप वाईट वाटलं होतं. “मला नाही का ग जमणार आई परत हे सगळं?” असं रडवेल्या स्वरात शंतनू आईला म्हणत होता. आई त्याला खूप समजावून सांगत होती, “जसं पुढे जाणाऱ्या माणसांना भरपूर अडचणींना तोंड द्यावं लागत असतं ना, तसच तुझं झालंय शंतनू, पण तू थांबू नकोस प्रयत्न करत रहा. बाकी सगळे प्रयत्न तू केलेस पण, गाडी चालू करू शकला नाहीस इतकच ना पुढच्या वेळेस तुला नक्कीच ते ही जमेल. आम्हाला सगळ्यांना खात्री आहे.” तसं शंतनूला देखील स्वतःची हिम्मत जराशी वाढल्यासारखी वाटली. त्याने आईला छान मिठी मारली. तसं आई पटकन म्हणली. “चल माझ्या नातीसाठी छान सूप करते.” ये तू पण खाली. शंतनू सवयीप्रमाणे खिडकीपाशी जाऊन उभा राहिला आणि त्याचं लक्ष खिडकीतून दिसणाऱ्या एका गुलमोहराकडे गेलं, अगदी संस्थेत कशी सोबत करायचा तशीच सोबत त्याला इथेही सापडली होती. ते झाड खूप वर्षांपासून तिथेच होतं पण, शंतनूने कधी त्याच्याकडे इतकं निरखून बघितलंच नव्हतं. संस्थेतल्या गुलमोहोराची आठवण झाली आणि त्याचे डोळे पाणावले. पुन्हा नव्याने हिम्मत मिळवण्यासाठी आणि भीती लांब पळवण्यासाठी  गुलमोहोर इथे माझ्यासाठी आला असेल असं त्याला वाटलं. फरक फक्त एवढाच होता की, आता शंतनूचे विषय वेगळे होते. ते झाडही शंतनू सारखे नुकतेच बहरायला लागले होते. त्या दिवसापासून शंतनू पुन्हा त्या गुलमोहोराशी हितगुज करू लागला. ह्या गोष्टीला जवळ जवळ दोन ते तीन महिने होऊन गेले होते. आज बऱ्याच दिवसांनी श्रेयाने  कितीही हट्ट केला होता तरी आजही शंतनूची तिला शाळेत सोडवायला जाण्यासाठी हिम्मत झालीच नाही. आजही त्याने बागेतल्या कामाचं निमित्त सांगून श्रेयाच्या हट्टाला जवळ जवळ टाळलंच. शेवटी प्रज्ञाच मुलींना घेऊन शाळेत गेली.
आईने शंतनूला आवाज दिला की, मी देवळात जाऊन येते. आईचा आवाज ऐकून रुममध्ये एकटक गुलमोहोराकडे बघत बसलेल्या शंतनूची तंद्री मोडली. गुलमोहोराकडे बघता बघता सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा त्याचा भूतकाळ जशाच्या तसा त्याच्यासमोरून गेला होता. त्याचे डोळे डबडबले होते. मला सगळं आधीसारखं सगळं करायला कधी जमणार आहे? जमेल की, नाही? असा विचार परत त्याच्या मनात घोळत होता. आजही श्रेयाला शाळेत सोडायला मी तयार झालोच नाही ह्याचं शंतनू ला खूप वाईट वाटत होतं. बराच वेळ झाला शंतनू रुममध्ये दार बंद करूनच बसला होता. प्रज्ञा शाळेत गेली होती. आई शेजारच्या वनिता काकूंकडे गेली होती. बाबा एकटेच घरात होते. बाबा आज खूप दिवसांनी इतक्या वेळ घरी थांबले होते. त्यांना आज सकाळपासूनच जरा बरं वाटत नव्हतं. बाबा शंतनूच्या रूमजवळ गेले आणि त्यांनी दारावर टक टक केली. खरं तर हे सगळं आधीसारखं जमायला हवं अशी शंतनूची खूप इच्छा आहे पण, त्याची भीती त्याला हे करूच देत नाही आणि तो परिस्थितीसमोर हतबल होतो. आज आत्ता मात्र त्याने मनाशी पक्क केलं की, “जमेल मला नक्की आणि मी खूप प्रयत्न करणार माझ्या कुटुंबांनी माझ्यासाठी आजपर्यंत खूप सहन केलय. मी त्यांना अजून त्रास नाही देणार मी करणार प्रयत्न नक्कीच जमेल मला.” असं स्वतःशीच बोलून नव्याने बळ आणत पुन्हा आवाजाचा कानोसा घेत, डोळे पुसत शंतनूने दरवाजा उघडला. बाबा आत जाऊन शंतनूशी बोलणार तितक्यात त्यांना खूप घाम आला आणि अचानक चक्कर येऊन ते बेशुद्धच पडले. आता मात्र शंतनू पूर्ण हादरला. “बाबा काय होतंय तुम्हाला? बाबा, जागे व्हा, बाबा, बाबा....., प्रज्ञा, आई, पटकन या बाबांना बघा काय होतंय, आई, प्रज्ञा....” कोणाचाही आवाज न आल्यामुळे शंतनू उठून खाली धावला जिन्याच्या काही पायऱ्या सोडून पटकन उडी मारून त्याने पाणी घेतले. त्याने परत दोघींना आवाज दिला पण, घरी कोणीही नाहीये हे त्याच्या लक्षात आले. तो आल्यासारखाच परत रूमकडे धावला तोंडावर पाणी मारले, पाणी पाजण्याचा प्रयत्न केला पण, बाबांची काहीही हलचाल जाणवत नव्हती. शेवटी त्याने बाबांना उचलले, खाली घेऊन आला, सोफ्यावर झोपवले, गाडीची चावी घेतली, पायात चप्पल अडकवली, बऱ्याच दिवसांपासून बेवारस झालेलं क्रेडीट कार्ड घाई घाई आठवणीने उचललं, त्यानंतर बाबांना उचलून गाडीत मागच्या सीटवर झोपवलं. गाडी चालू केली आणि भरधाव वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. तो जसा जसा पुढे जात होता तसा तसा त्याला रस्ताही आठवत होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांना भेटला, सगळ्या formalities पूर्ण केल्या आणि बाबांना admit केलं. काही वेळाने सगळ्या टेस्ट झाल्या. बाबांचं बिपी शूट झालं होतं. बऱ्याच वेळाने बाबा शुद्धीवर आले. डॉक्टरांनी त्यांना बोलण्यास मनाई केली होती. त्यामुळे शंतनू बाहेरच उभा होता. काचेतून बाबा त्यांच्या आधीच्या शंतनूला पाहत होते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. या आनंदापुढे त्यांना झालेला त्रास काहीच नव्हता. असं त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते. अजूनही शंतनू त्याच शॉक मध्ये होता. पण त्याला जराही जाणीव नव्हती की, त्याने ह्या परिस्थितीत त्याच्याच नकळत नेमकं काय काय  केलं होतं.
इकडे प्रज्ञा घरी आली. घराला कुलूप बघून थोडीशी विचारत पडली. अरेच्या घराला कुलूप? सगळे बाहेर गेले? असं कसं होईल? गाडीही नाहीये. तेव्हढ्यात शेजारच्या विनिताकाकुंकडून आई देखील आली. अगं कुलूप कुणी लावलं? आईनेच पुन्हा प्रश्न विचारला, “म्हणजे तुम्ही नाही लावलं का कुलूप?” “नाही शंतनू आणि बाबा होते की, घरात विनीताची मुलगी आलीये म्हणून मी सहज भेटायला गेले होते.” आता मात्र दोघींना देखील काही समजेना की, काय झालं असेल? त्यांची अशी चर्चा चालूच होती, तेवढ्यात बाबांच्या फोनवरून प्रज्ञाला फोन आला. प्रज्ञा पटकन म्हणाली “बाबा कुठे आहात तुम्ही? सगळं ठीक आहे ना? शंतनू कुठेय?” प्रज्ञाला शंतनूचीच पुन्हा एकदा काळजी वाटली. तेवढ्यात तिकडून आवाज आला “अगं प्रज्ञा मी शंतनूच बोलतोय.” “काय?” कोण बोलतोय?” “शंतनू” प्रज्ञा शंतनूचा फोनवरचा आवाज जवळ-जवळ विसरलीच होती. “ऐक, बाबांचा बिपी खूप वाढला होता. मी त्यांना आपल्या नेहमीच्या हॉस्पिटल मध्ये आणलं आहे. आता ते बरे आहेत. काही काळजी करू नका, आईला सांभाळ, व्यवस्थीत सांग तिला सगळं.” प्रज्ञा आश्चर्याने सगळं ऐकत होती. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. “प्रज्ञा, प्रज्ञा ऐकतेस ना” “हो हो शंतनू, ठीके आम्ही येतो.” शंतनू नाव ऐकल्यावर आई देखील तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागली. प्रज्ञाने फोन ठेवला. आईला सगळं व्यवस्थीत सांगितलं. दोघीही हॉस्पिटल मध्ये पोहोचल्या. तोपर्यंत दोघींनाही इतका आश्चर्याचा धक्का बसला होता की, त्या एकमेकिंशीही काहीच बोलल्या नाहीत. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरही दोघींचं लक्ष शंतनूकडेच होतं. बाबाही काचेतून त्यालाच न्याहळत होते. शंतनूला काही केल्या त्याने वेगळं काही केलंय असं जाणवतही नव्हतं. ह्या दोघी बाबांना बघून बाहेर आल्या आणि न राहून शंतनूला खूप प्रश्न विचारायला लागल्या. ह्या प्रश्न-उत्तरात त्याला बोलता बोलता लक्षात आलं की, त्याने नक्की काय काय केलंय. आता मात्र त्याच्याही आनंदाला पारावर राहिला नाही. त्याचं लक्ष काचेतून बाबांकडे गेलं तसं बाबाही खूप खुश दिसत होते. आई आणि प्रज्ञा तर अजूनही त्याच्याकडे अवाक नजरेने बघत होत्या. त्यांच्या सगळ्यांच्याच नजरेत एक प्रकारचा अभिमान जाणवत होता. शंतनूची भीती पूर्णपणे नाहीशीच होती. तो खूप confidently सगळं सांभाळत होता. बाबा दोन दिवसात ओके झाले. त्यांना डिस्चार्ज मिळाला. आत्ताही शंतनूच त्यांना घरी घेऊन आला. प्रज्ञानेही आठवडाभर ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. सगळेच बाबांची काळजी घेत होते. शंतनू देखील सगळी काळजी घेत होता. बाबा आठ दिवसात पुन्हा ठणठणीत झाले. सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं. काळे मळभ स्वच्छ झाल्यासारखे वाटत होते. खरं तर बाबांचं आजारपण त्यांच्यासाठी आनंदाचं निमित्त ठरलं. हा सगळ्यांच्याच आयुष्यातला टर्निंग point ठरला. मुली देखील खूप खुश होत्या. अजूनही शंतनूच कोडं उलगडता उलगडत नव्हतं. असं अचानक कसं काय झालं? ह्या धक्क्यातून अजून आई आणि प्रज्ञा दोघीही बाहेर आल्याच नव्हत्या.
तोच एका शनिवारी शंतनू प्रज्ञाला आवाज देऊ लागला. “प्रज्ञा, प्रज्ञा कुठे आहेस तू? प्रज्ञा” शंतनू घाई घाईने बोलवत सगळ्या घरभर शोधत होता. “आले आले प्रज्ञाने साद दिली. खरं तर तिचा ठोकाच चुकला शंतनूने परत घरी आल्यापासून प्रज्ञाला अशा हाका कधीच मारल्या नव्हत्या. आज स्वतःहून शंतनू हाका मारतोय ह्याचा सगळ्यांना आनंद तर झालाच पण, का हाका मारत असेल? ह्याविषयी काळजीही वाटली. प्रज्ञा मागच्या अंगणातून धावत धावत आली. आई देखील स्वयंपाक घरातून घाई घाई बाहेर आली. दोघींच्याही चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव अगदीच समजून येण्यासारखे होते. “काय रे शंतनू, काय झालं? बरं वाटत नाहीये का?” ह्या प्रश्नाचा आता त्याला कंटाळा आला होता. “का फक्त बरं वाटत नसेल तेंव्हाच फक्त मी बोलावू शकतो का?” प्रज्ञाच्या खूप जवळ गेला आणि त्याने जरा हसत हसतच म्हंटल. तसं दोघींनाही वेगळंच वाटलं. आईला जाणवलं, ती आपल्या खोलीत निघून गेली. प्रज्ञा थोडी लाजलीही. इतक्या दिवसांनी असा क्षण तिच्या समोर आला होता. तिला कशी प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हतं. ती मागे मागे भिंतीकडे सरकत होती. तसा तसा शंतनू अजूनच तिच्या जवळ जवळ जात होता. शेवटी ती भिंतीला टेकली, हाही तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला आणि गालाजवळ जातोय असं भासवून तिच्या कानात म्हणाला की, “आज मुलींना शाळेतून आणायला मी आणि तू आपण दोघे जाऊया.” तशी प्रज्ञाने खुश होऊन शंतनूला मिठीच मारली. दोघंही न बोलताच त्यांची मिठी एकमेकांना बरंच काही सांगून जात होती. प्रज्ञाच्या पाठीवरून हात फिरवत तो तिला आजचा सगळा प्लान सांगत होता. आज आपण अगदी तसाच प्लान करूया जसा आधी करायचो, श्रेयाला आणि प्रियाला शाळेतून घेऊया आणि मग स्मिता मावशीकडे जाऊन त्यांना फ्रेश होऊ देऊ आणि मग, तिथून नाथाई पार्क मध्ये जाऊ, तिथे भेळ, पाणीपुरी खाऊ आणि मग, दुर्गा लस्सी पिऊ, ओके? प्रज्ञा निरुत्तरच होती. तिला अचानक हा सगळा प्रकार बघून खरं तर धक्काच बसला होता. तिला तिच्या कानावर अजिबात विश्वास बसत नव्हता. तीही शंतनूकडे बघून हो म्हणाली आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. आई रूममधून बाहेर आली तसे दोघेही पटकन लांब झाले. आई हसली आणि गमतीने म्हणाली, “काय रे काय चाललं होतं दोघांचं? मलाही घ्या ना तुमच्यात” तसं पटकन सावरा सावर करत प्रज्ञा म्हणाली, “आज आम्ही मस्त प्लान करणार आहोत,  श्रेयाला आणि प्रियाला घेऊन, आधी करायचो तसा.” हे ऐकून आईलाही खूप सुखद धक्का बसला. “अरेवा, छानच आहे की, मग” आईला प्रज्ञाच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता. तिचा हा हसरा चेहरा इतके दिवस कुठेतरी हरवला होता. हे सगळं बघून आईला शंतनू आणि प्रज्ञाने लग्नानंतर पहिल्यांदा बाहेर फिरायला जाताना घेतलेली परमिशन आठवली. तेंव्हा शंतनू विचारत होता आणि आज प्रज्ञाच जायचंय असं सांगत होती. अगदी हक्काने. प्रज्ञा ह्या घरची सून जरी असली तरी ती आता आमची मुलगीच बनली आहे. तिने ह्या घरावर आमच्या सगळ्यांवर जीवापाड प्रेम केलंय. त्या प्रेमानेच तिने हा हक्क मिळवला आहे. आईच्या तोंडून वाक्य निघालं  “ह्या क्षणाची तर मीही खूप आतुरतेने वाट पाहत होते.” खरं तर सगळेच खूप खुश होते. त्यांची प्रत्येकाची स्वतःबरोबरची लढाई नुसती संपलीच नव्हती तर, ती त्यांनी जिंकली होती. शंतनूला खूप काही वेगळं घडतंय असं जाणवायला नको म्हणून आई लगेच आपल्या कामाला लागली.
      प्रज्ञाच्या काळजात धडधड होत होती जवळ जवळ दोन वर्षांनी ती अशी स्वतःसाठी बाहेर पडत होती. मुलींना घेऊन जरी गेली तरी तिचा अर्धा जीव तर शंतनू मधेच अडकलेला असायचा. आज ती खूप मोकळी वाटत होती. मनावर कसलच दडपण नव्हतं. चेहऱ्यावर एकही शंकेची रेष दिसत नव्हती. तिच्या आनंदामुळे चेहरा अगदी खुलून दिसत होता. प्रज्ञाने आज खूप छान तयार झाली. दोन वर्षापूर्वी दिलेला valentine day चा पंजाबी ड्रेस आणि त्यावरची matching ज्वेलरी तिने घातली. तिने आज पेढ्याची वेणी घातली होती कारण, आज तिला गजरा माळायचा होता. शंतनू रुममध्ये आला त्याने तिला पहिले आणि तो नव्याने तिच्या प्रेमातच पडला. “ तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला,I love you प्रज्ञा, खरच तू नसतीस तर माझं काय झालं असतं? तुझी सोबत, मुलींची माया आणि आई बाबांचे आशीर्वादच मला पुन्हा इथपर्यंत घेऊन आले आहेत, मी वचन देतो प्रज्ञा, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही” असं तो बोलत असतो तोच प्रज्ञा त्याला थांबवते. “शंतनू मी तुझी खूप वाट बघत होते, आता मी तुला कधीच एकटं नाही पडू देणार. I am always विथ you.” दारावर knock knock झालं आणि आई-बाबा आत आले आईने मीठ मोहरीच आणली होती दोघांवरून उतरवून टाकायला. आईने दोघांचीही दृष्ट काढली. बाबांनीही शंतनूला कडकडून मिठी मारली. दोघांनीही आई-बाबांना नमस्कार केला. बाबांनी शंतनूला “लवकर ऑफिसला ये, तेही तुझी आमच्या एव्हढीच वाट बघतंय” असा आशीर्वाद दिला. चौघंही एकाच वेळी हसले. प्रज्ञाने ह्या हसऱ्या क्षणाला आपल्या सेल्फी मध्ये कैद करून घेतले. मागे बहरलेलं गुलमोहोराचं झाडही ह्या सेल्फी मध्ये सहज सामावून गेलं होतं.  
घे भरारी, बळ पंखात आण
ठेव विश्वास स्वतःवर, अन ध्येयाचे भान
तूच हो शिल्पकार तुझ्या, आयुष्याचा
हाच असेल लढा तुझा, स्वतःशीच स्वतःचा....

शंतनू च्या बाबतीत जे घडलं. ते सर्वसामान्य घरात कोठेही घडू शकतं. कोणताही आजार असू दे, मानसिक अथवा शारीरिक किंवा आयुष्यात कोणतीही अडचण आली तरी, कुटुंबाने एकमेकांची साथ कधीच सोडली नाही पाहिजे. एकमेकांच्या साथीने, नात्यांच्या आधारावर कोणत्याही गोष्टीचा सामना करताच येतो. फक्त एकमेकांबद्दल विश्वास, प्रेम, आणि आदर असायला हवा. एकमेकांना समजून घेता यायला हवं. कुटुंबाची खंबीरपणे मिळणारी साथ आयुष्यात खूप काही देऊन जाते.

समाप्त !!!
अस्मिता कुलकर्णी 

Share:

लढा स्वतःशीच स्वतःचा (भाग -८)

भाग - ७ वाचण्यासाठी  इथे क्लिक करा


शंतनूला रडणं आवरेना. घर डोळ्यासमोर आलं आणि घराची ऊब जाणवली. मुलींचं हसणं डोळ्यासमोर आलं आणि खरा आनंद जाणवला. आईबाबांचा चेहरा आठवून विश्वास काय असतो ते कळलं आणि, प्रज्ञाचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि खरी साथ काय असते हे समजलं. क्षणात सगळ्या जाणीवा जाग्या झाल्या. मित्रांबरोबर घालवलेले क्षण आठवले. टपरीवर पिलेल्या चहाचा घोट ते मीटिंगमध्ये पिलेल्या कॉफीची चव अगदी सगळच आठवत होतं. इतके दिवस मनाचे सगळेच दरवाजे बंद झाले होते त्याच्याच नकळत. आज त्यातून बाहेर डोकावताना त्याला सगळं हवं हवसं वाटत होतं. जीवाची घालमेल थांबली होती. विचार करणं, एखादी जुनी गोष्टं, माणसं आठवणं हे त्याच्यासाठी मोठं काम असायचं आणि शंतनू नेहमी त्याच्यापासून लांब पळायचा. आज मात्र तेच सारं त्याच्यासामोर आपसूकच उभं राहिलं. संस्थेमध्ये येण्या अगोदर जवळ जवळ सहा महिने घरी त्याला असा त्रास व्हायला सुरुवात झालीच होती आणि आता संस्थेमध्ये येऊनही जवळ जवळ आठ महिने झाले होते. त्याला जागेवरच ठेऊन कितीतरी क्षण त्याच्या हातातून निसटून पुढे गेले होते, ह्याची त्याला तशी जाणीव नव्हतीच पण काहीतरी हरवत चाललं होतं हे मात्र त्याला आत्ता  समजलं. काय अशी गोष्ट घडली आणि माझ्या ह्या अशा वागण्याला सुरुवात झाली त्याच्या मनात प्रश्न डोकावून गेला. त्याला हे सगळं कसं घडत गेलं हे आठवत नव्हतच. डोळ्यातल्या पाण्याबरोबर बरेच भाव ओघळून गेले. अचानक कंपनी डोळ्यासमोर उभी राहिली हृदायचे ठोके पुन्हा वाढले. परत भीतीचं काहूर मनात दाटून आलं. शंतनूने गच्च डोळे मिटले आणि वेगळीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला पण, काही केल्या ती बिल्डींग, त्यातलं शंतनूच ऑफिस, केबिनमधली खुर्ची, आणि भिंतीवर लावलेली बाबांनी दिलेली ती फ्रेम हे जास्तीच पक्क होत चाललं होतं डोळ्यासमोर. त्या फ्रेमला धरून ओक्साबोक्शी रडलेला शंतनू तसाच्या तसा त्याला समोर दिसला आणि त्याने एकदम डोळे उघडले. त्याचे उत्तर त्याला सापडले.
धड धड अपोआप कमी झाली. फक्त मनात थोडी भीती राहिली. त्यानंतरचा प्रत्येक क्षण काही त्याला आठवला नाही पण, आज आपण इथे त्यामुळेच आहोत हे त्याला कळलं. आपल्यामुळे खरच सगळ्यांना किती त्रास झाला असेल ह्याची जाणीव त्याला झाली. त्याला अपराधी वाटू लागलं. विचार, आठवणी ह्यात तो इतका गुंतला की, त्याला आता थांबणं अवघड झालं होतं. एका पाठोपाठ एक असे काहीही त्याला आठवत होते. मधेच व्हरांड्यात असलेला चौपाळा तर मधेच ऑफिस, मधेच आईच्या हातच्या जेवणाची चव तर मधेच क्लाइंट च्या रिस्पॉन्सची वाट बघत असताना झालेली तगमग, मित्रमंडळी तर कधी ऑफिस मधले केबिन. शंतनू डोक्याला हात लावत लावत खूप जोरात ओरडला तसे सगळेच दारापाशी धावले, डॉक्टरांनी  पटकन प्रज्ञाला बोलवायला पाठवले. प्रज्ञाला कळलं तसं प्रज्ञा धावत धावत रुमजवळ आली. तिच्या पाठोपाठ आई-बाबा, दिनेश, सिद्धार्थ सगळेच धावले. दारावर थाप मारत मारत सगळेच “शंतनू, शंतनू काय झालं? तू ठीक आहेस ना? अरे दार उघड. शंतनू.....” शंतनूचं मन आता शांत झालं होतं. सगळंच चित्र स्वच्छ झालं होतं. त्याने डोळे पुसले, आरशात स्वतःला बघितलं आणि डोळ्यात बघून स्वतःलाच एक विश्वास दिला. शेवटी शंतनूने दार उघडले. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. शंतनू ओळखीचा वाटायला लागला होता. आईने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, प्रज्ञाने हातात हात घेतला, पाठीवरून हात फिरवला. तो सगळ्यांकडे बघून खूप छान हसला. काय झालं? ठीक आहेस ना? असे कोणतेच प्रश्न कुणीच त्याला विचारले नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्या हास्यातून मिळालीच होती.
चेहऱ्यावर समधान घेऊन सगळे त्याला हॉल मध्ये घेऊन गेले. हॉलमध्ये पाय ठेवला आणि त्याच्या  मनावरचं दडपण अगदीच कमी झालं. मोकळं वाटलं. त्याने पाय ठेवला तसे सगळेच त्याच्याकडे धावले. आत्या, मामा, मावशी, सगळे नातलग गळा पडू पडू त्याच्याशी बोलत होते. खरं तर कोणालाही अश्रू आवरले नाहीत. शंतनू बद्दल असणारं प्रेम त्या अश्रूतून बोलत होते. त्यालाही ते अशक्यच झाले होते. त्याचेही डोळे त्या अश्रूंशी संवाद साधतच होते. मुलींना मिठीत सामावून तो खूप रडला. ऑफिसमधले, मित्र कंपनी सगळेच शंतनूला भेटले. काही जणांचे चेहरे आणि नावं आठवणं त्याला कठीण वाटले पण, बऱ्याच वेळानंतर त्याने ते सांगितलेही. सगळं वातावरण हसरं बनलं. सगळीकडे आनंद पसरला अन दुःखाचा प्रत्येक बंध अलगद हातातून निसटून गेला. सगळ्यांशी बोलून झालं, मुली शंतनूच्या मागे मागेच करत होत्या. बाबा कधी केक कापणार यासाठी त्यांची नूसती घाई चालली होती.
“बाबा चल ना रे आता केक कापायला, किती वेळ बोलतोच आहेस.”
“हो शंतनू चल आता पटकन केक कापून घे.” प्रज्ञाही म्हणाली.
शंतनू केक समोर जाऊन थांबला. आवडीचा केक बघून लहान मुलासारखा वागला. पटकन केक कापून तो कुणीतरी पटकन तोंडात घालावा असं त्याला क्षणभर वाटलं. त्याने पटकन तो कट केला आणि श्रेया आणि प्रियाने त्याचे दोन तुकडे शंतनूला एकदम भरवले. त्याची इच्छा पूर्ण झाली. प्रत्येक जण पुढे जाऊन शंतनू बद्दल भरभरून बोलायला लागलं. शंतनूचा मामा उठला आणि समोर आला आधीच त्याला राहवत नव्हतं पुढे आला आणि रडायलाच लागला, तसा शंतनू त्याच्या जवळ गेला आणि त्याला जादूकी झप्पी दिली. मामा शांत झाला आणि बोलायला लागला, “मला आठवतंय शंतनू लहानपणापासून आत्तपर्यंत कितीही वेळा घरी आला तरी प्रत्येक वेळेस माझ्या शेतात एक तरी आंब्याचे झाड लावायचा. त्याच्या आठवणीने ते झाड जपायचा मी नेहमी प्रयत्न करायचो आता तिथे मोठी आमराई तयार झाली आहे. आणि त्या आंब्याचा गोडवा शंतनू सारखाच आहे. मी वाट बघतोय पुढच्या झाडाची जागाही ठरवून ठेवली आहे. किती धिंगाणा करायचे सगळे तूम्ही, आत्ताही माझ्या डोळ्यासमोर तुझं ते वागणं बहुतेक लापाछपी खेळतंय. माझी म्हातारी होत चाललेली नजर शोधतेय तूला. तू लवकर ये परत.” शंतनू फक्त हसला आणि पुन्हा एकदा मामाला त्याने मिठी मारली. दोघेही जागेवर जाऊन बसले. सिद्धार्थ, शंतनूचा मित्र समोर गेला आणि त्याला त्यांच्या मैत्रीचा पहिला दिवस आठवला. “कॉलेज मधला पहिला दिवस, त्याच दिवशी शंतनूशी ओळख झाली. माझी खूप गरिबी होती हे त्याने पहिल्याच दिवशी हेरले आणि तेंव्हापासून ते आज स्वतःच्या कंपनीत जॉब देऊ पर्यंत प्रत्येक वेळी माझ्या मदतीला उभा राहिला. ह्या गोष्टीला आता जवळ जवळ अकरा वर्ष झाले असतील. अशी एकही गोष्टं नाही की, जी आम्ही एकमेकांना सांगितली नाही, एक दिवस असा नाही की, आम्ही एकमेकांशी बोललो नाहीत.. आणि बोलता बोलता तो रडायला लागला.. क्षणभर थांबला, पून्हा स्वतःला सावरून म्हणाला की, “शान्त्या प्लीज यार, आवर आता तुझा हा पसारा आणि चल आपल्या घरी खूप बोलायचं राहून गेलंय रे, खूप काही सांगायचंय तुला. तसा शंतनू जागेवरून उठला आणि त्याने सिद्धार्थ ला मिठी मारली. दोघेही खूप हळवे झाले. दोघांना सावरून प्रज्ञाने शंतनूला पुन्हा त्याच्या जागेवर बसवलं. सगळ्यांनीच मनसोक्त गप्पा मारल्या शंतनूशी. शंतनूला स्वतःशीच नव्याने ओळख झाली. सगळ्यांचे खाणे उरकले. तसं तसं एक-एक जण शंतनूचा निरोप घेऊन घरी जायला निघाले. शंतनूच्या मनाची तशी तशी पुन्हा घालमेल व्हायला लागली. बैचेन व्हायला लागला. हे सगळे का जात आहेत? प्लीज नका जाऊ मला सोडून असं मनातल्या मनातच शंतनू बोलायला लागला. शेवटी सगळे घरी परतले. शंतनूला त्याच्या रुममध्ये नेले गेले. आता फक्त घरचेच राहिले होते. शंतनूला सोडून कोणालाच जावंसं वाटत नव्हतं पण, काही पर्याय नव्हता. आई बाबांनी जवळ घेऊन “काळजी घे राजा आणि, लवकर घरी ये.” असं म्हंटल्यावर पुन्हा सगळ्यांचे डोळे पाणावले. मुलींनाही टाटा म्हणताना त्याचा जीव जड झाला होता. आई बाबा मुलींना घेऊन गाडीत जाऊन बसले. प्रज्ञाने पुन्हा एकदा शंतनूला मिठी मारली शंतनूलाही तिला सोडूच नये असं वाटत होतं. तीही तेच म्हणाली, “प्लीज शंतनू लवकर घरी ये, मी नाही जगू शकत तुझ्या शिवाय. इतके दिवस मी कसे काढले ते नाही सांगू शकणार मी” आणि प्रज्ञा हळू हळू मिठी सोडवून शेवटी हातातला हात सोडवून मागे न बघताच गाडीकडे निघून गेली. शंतनूची नजर तिच्यावरच खिळली होती. तिच्या पावलांचे ठसे तो शोधत राहिला बराच वेळ आणि त्याला जाणवलं, आपली माणसं बरोबर असणं म्हणजेच आयुष्यातला खरा आनंद आहे. त्यांच्या सोबत असणं म्हणजेच खरं जगणं आहे. खरं तर आपण नेमके कुठे कमी पडतोय हे त्याला समजत नव्हतेच, पण ते समजून घेण्याचा एक आशेचा किरण मात्र नक्कीच त्याच्या या टप्प्यावर निर्माण झाला होता आणि शंतनू त्यामधे उजळून निघाला.
त्याला रात्रीचा औषधांचा डोस देऊन बेडवर झोपवले. तरीही त्याला आज झोप लागतच नव्हती. डोक्यात खूप विचार येत होते. मधेच उठून बाहेर गुलमोहराकडे बघायचा, त्याच्याशी बोलायचा. शेवटी मनाशी ठरवलं आणि गुलमोहोराला म्हणाला, “मी लवकरच घरी जाणार. गुलमोहरा मला तुझा लवकरच निरोप  घ्यावा लागणार.” पटकन बेडवर आला आणि झोपला. आता त्याला शांत झोप लागली होती, आणि गुलमोहोर जणू अंधारातही खुलला होता.                 
दुसरा दिवस उगवला. कुठून आणि कशी सुरुवात करावी शंतनूला काहीही समजत नव्हतं. संस्थेत  प्रत्येक कृतीचं निरीक्षण केलं जात होतं. शंतनू थोडा गोंधळलाच होता. कसं, काय? त्याला कळत नव्हतं पण, घरी जायची त्याची इच्छा त्याला सगळ्या कृती उत्तम पद्धतीने करण्यासाठी उद्युक्त करत होती. अजून अजून चांगल्या पद्धतीने गोष्टी कशा केल्या जातील याकडे त्याचा कल वाढू लागला. रोजच्या कृती तो अगदी डोळे झाकून करायला लागला. मेमरी गेम अथवा concentration साठी असणाऱ्या activity मध्ये मात्र शंतनू कडून अजूनही चूका होत होत्या. पण त्यातला त्याचा सहभाग चांगलाच वाढला होता. डॉक्टरांनाही त्याच्यात झालेला बदल लक्षात येत होता. शंतनूवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून त्याच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने त्याच त्याच activity करून घेतल्या जात होत्या. कौन्सेलिंग चालूच होते. त्याचा सकाळच्या औषधांचा डोस देखील बंद झाला. तो रात्र रात्र प्रत्येक गोष्टीचा विचार करू लागला. का जमत नाही? का जमत नाहीये? म्हणून स्वतःलाच त्रास करून घ्यायला लागला. दुसऱ्या दिवशी तेवढ्याच सकारात्मकतेने तो दिवसभर वावरू लागला. हळू हळू शंतनूला सगळ्या activity जमायला लागल्या. सुरुवातीला थोडी भीती वाटायची पण त्यात पडला की, जमायचं त्याला. आत्मविश्वास अजूनही म्हणावा तितका नव्हताच आला. सारासार विचार करता तो आता पूर्ण बरा झाला होता. आता त्याला गरज होती आपल्या माणसांची. तिथे गेल्यावर बाकीच्या गोष्टी तो आपोआपच करायला लागेल याची खात्री डॉक्टर देत होत्या.
जवळ जवळ वाढदिवसानंतर एक ते दीड महिना झाला होता. प्रज्ञा संस्थेमध्ये आली.
hi प्रज्ञा”
hello डॉक्टर”
“डोळे बंद कर” डॉक्टर प्रज्ञाला म्हणाल्या. प्रज्ञाला थोडसं विचित्रच वाटलं. आता ही कसली गम्मत असा विचार करत तिनेही डोळे झाकले. डॉक्टरांनी शंतनूचे डिस्चार्ज पेपर प्रज्ञाच्या समोर टेबल वर ठेवले.
“आता उघड डोळे.”
प्रज्ञाने डोळे उघडले आणि समोर ठेवलेले पेपर्स बघितले, तिचा आनंद ओसंडून वाहू लागला. तिला  आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटलं. डॉक्टरांच्या गळ्यात पडून ती खूप ढसा ढसा रडली. डॉक्टरांनीही आज तिला थांबवले नाही.
“हो प्रज्ञा आता शंतनू घरी येऊ शकतो. फक्त काही activity आणि औषधाचा डोस न चुकता सुरु राहिला पाहिजे. चुकूनही औषध विसरायला नको. एक महिन्यानी पुन्हा दाखवायला घेऊन ये त्याला, तेंव्हा  पुढच्या डोसबद्दल सांगेल.”
प्रज्ञाकडे बघत हसत हसत डॉक्टरांनी प्रज्ञाला विचारले,
“मग उद्या किती वाजता येणार न्यायला?
“कधी येऊ?
“कधीही येऊ शकतेस.”
“ठीक आहे, सकाळी अकरा वाजता?
“ओके”
Thank you डॉक्टर, तुमचे आमच्यावर खूप ऋण आहेत ह्याची परतफेड करणं कसं जमेल आम्हाला?
“अगं हे माझं कर्तव्य आहे ते मी पार पाडलं. इथून बरे होऊन जे जे घरी जातात त्याच्या चेहऱ्यावरचा  आणि त्याच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तीच आमची परतफेड असते. तेंव्हाच कुठे आम्हालाही समाधान मिळते.”
“तरीपण डॉक्टर thanks a lot.”
you r most welcome.” काळजी घे, काळजी करू नकोस. अचानक काही वाटलं तर इथे direct फोन केला तरी चालेल.”
ok डॉक्टर. Bye.”
bye.”
प्रज्ञा केबिनमधून बाहेर पडली ते नाचतच, गाणं गुणगुणत. आज तिच्या चेहऱ्यावर जे काही दिसत होतं ते वेगळंच काहीतरी होतं. प्रज्ञा घरी पोहोचली. दारातून आत जाताना मात्र तिने चेहरा जरा उदास केला. प्रज्ञा आली समजल्याबरोबर आई बाबा आशेने तिच्याकडे धावले. प्रज्ञाचा चेहरा बघून दोघेही नाराज झाले.
“काय झालं प्रज्ञा?
“ काही नाही नेहमीचच.”
“मग चेहरा इतका का पडलाय तुझा?
“आज शंतनू नीट बोलला नाही माझ्याशी.”
आईची काळजी जरा वाढलीच.
“ का गं? डॉक्टर काय म्हणाल्या?
“डॉक्टर म्हणाल्या, तुमचा शंतनू आम्हाला खूप त्रास देतोय त्याला घरी घेऊन जा.”
आईने नकारार्थी मान डोलावली. “अरे देवा!”
चेहऱ्यावर जरा आठ्या आणून पुन्हा आईने प्रश्न केला,
काय म्हणालीस?
“हो आई बरोबर ऐकलत तुम्ही”
“म्हणजे?
“म्हणजे, आपला शंतनू घरी येणार..... ये...... डॉक्टर म्हणाल्या, तो आता पूर्ण बरा झाला आहे.”
आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दोघीही कडकडून भेटल्या. बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंदही टिपण्यासारखा होता.
आईने नेहमीप्रमाणे देवाला गोडाचा शिरा केला. बाहेरून खेळून आल्यानंतर मुलींना देखील प्रज्ञाने सांगितले. त्यांचेही चेहरे खूप खुश झाले. उद्या मारत मारतच त्या त्यांच्या रुममध्ये गेल्या. सगळ्यांचं जोरदार प्लानिंग सुरु झालं. घर डेकोरेट केलं. स्वागताची सगळी तयारी झाली. रात्र न होता लगेच दूसरा दिवस उगवावा असंच वाटत होतं सगळ्यांना. मुली झोपल्या पण बाकी कोणालाच झोप लागत नव्हती. मनाची नुसती चलबिचल होत होती. कशी बशी पाहाटे पहाटे झोप लागली सगळ्यांना. प्रज्ञाने सहा चा अलार्म लावलेलाच होता. तो वाजला आणि प्रज्ञा खडबडून जागी झाली. आयुष्यातल्या त्या नव्या वळणावर उभी राहून प्रज्ञा सूर्याला न्याहाळायला त्यांच्या गच्चीत जाऊन उभी राहिली. तोही तिला तितकंच समाधान आणि सकारत्मकता घेऊन आला. हा दिवस त्यांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा आणि आनंदाचा दिवस होता. भराभर सगळी कामे उरकून बरोबर दहा वाजता सगळे निघण्यासाठी तयार होते.
सगळ्यांनी गणपती बाप्पाला हात जोडले आणि शंतनूला घरी घेऊन येण्यासाठी निघाले.


क्रमशः(नोट : मी पुढील काही दिवसात पुढील भाग publish करेन. तुम्ही पुढील भागांसाठी मला follow करू शकता किंवा तुमच्या email द्वारे subscribe करू शकता).


अस्मिता कुलकर्णी
Share:

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या