आयुष्याच्या संध्याकाळी

जय काकांनी नुकतीच VRS घेतली. संध्या काकूंना देखील शाळेची नोकरी सोड आता, कायमची रजा घे असा त्यांचा आग्रह चालू झाला पण, काकूंच्या मनात अजून एखादा वर्ष नोकरी करावी असं वाटत होतं. आधी त्यांचं एकत्र कुटुंब होतं दीर, जावा, सासू-सासरे सगळेच एकत्र. पण काही वर्षांपूर्वी काकांच्या पुतण्याचं लग्न झालं आणि नंतर मुलाचंही लग्न झालं त्यामुळे सामंजस्याने सगळे वेगवेगळे राहायला लागले. सासू सासरे मात्र ह्यांच्या कडेच होते. तेही आता ह्या जगात नाहीत. एकुलता एक मुलगा, मुलगी नवऱ्याबरोबर काही वर्षांसाठी परदेशी गेली होती. असं त्याचं छोटंसं कुटुंब, एकमेकांवर जीवापाड प्रेम आणि हो त्यांना सून देखील अगदी त्यांच्यात मिसळून जाईल अशीच मिळाली. लग्नाला दोन वर्ष झाली होती आता आजोबा आज्जीला नातवंड कधी अंगा खांद्यावर खेळवू असं झालं होतं. त्यांनी कधी बोलून दाखवलं नव्हतं. राजेश रियाचं ठरलंच होतं तसं की, दोन वर्ष मुल होऊ द्यायचं नाही, काका काकूही कधी त्यांच्या मागे लागले नाहीत. दोन वर्ष नुकतेच पूर्ण झाले. त्यांची पाऊलेही त्या दिशेने वाळू लागली. काळजी वाटणारी गोष्ट, सहा महिने होऊन गेले तरी त्यांना यश आले नाही. आता मात्र काळजी वाढायला लागली पण, अचानक एक दिवस माधवीला चक्कर येत होती म्हणून ती ऑफिस मधून घरी निघून आली. राजेश घरी आला आणि दोघांनी लगेच दवाखाना गाठला,  दवाखान्यातून परत येताना राजेश जवळ जवळ अर्ध हलवाईचं दुकानच बरोबर घेऊन आला. फोन करून त्याने आधीच घरी सांगितलं होतं त्यामुळे काका काकूंचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला होता. स्वागताची जोरदार तयारी केली होती. औक्षण केलं, तुकडा ओवाळून टाकला. द्रष्ट देखील काढली. काकू रियाला आईची उणीव कधीच जाणवू देत नसत एकमेकांना आनंद देण्यातच खरं सुख आहे हे कोणी त्यांच्याकडून शिकावं. काका देखील चांगलेच होते पण, अतिशय शिस्तबद्ध त्या गेष्टीचा कधी कधी सगळ्यांना जरा त्रास व्हायचा पण, त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या विषयी असणाऱ्या आदरामुळे तो त्रास कधीही कोणाच्याही चेहऱ्यावर कधीच जाणवला नाही. रियाच्या बातमीनंतरचा प्रत्येक दिवस आनंदोत्सवच असायचा त्यांच्या घरी. रियाची नोकरी पर्मनंट नव्हती त्यामुळे, सगळ्यांनी तिला ती सोडायचा सल्ला दिला कारण बाळ झाल्यावर किमान दोन वर्ष तरी तिने नोकरी करू नये असं सगळ्याचं मत होतं. थोडक्यात आत्ता तिच्या तब्येतीची काळजी आणि नंतर बाळाची. तसं काका-काकू आरामात सांभाळतील पण, रिया देखील लगेच ह्या निर्णयात सहभागी झाली. काकांचं रोजचं रुटीन चांगलंच बसलं होतं आणि, आता काकुंचं ही त्यांना बसवायचं होतं. शेवटी काकूही शाळेतून कायमची राजा घेणार यावर शिक्का मोर्तब झाला. काका काकूंनी खूप हलाकीचे दिवस काढून मुलांना मोठं केलं होतं. पण, आता मात्र त्यांची परिस्थिती अगदीच चांगली होती. ते जिथे राहत होते ते त्यांचं स्वतःच घर होतं शिवाय राजेश आणि रियाने त्यांचा वेगळा flat देखील घेऊन ठेवला होता. बघता बघता नात घरात आली आणि तिच्या आयुष्यात ह्यांचं सगळ्याचं आयुष्य कसं अगदी गुंतून गेलं. बघता बघता दोन वर्षाची झाली सायली. आता मात्र तिच्याकडे बघून काका काकूंना नेहमी वाटू लागलं खरच आनंद कितीही मिळाला तरी तो कमीच वाटतो. तिच्या सहवासासाठी तरी आयुष्याच्या ह्या टप्प्यावर नेहमी असं मनात येऊन जायचं, पुन्हा नव्याने जन्म मिळावा.

एक दिवस काका काकू गच्चीवर निवांत गप्पा मारत बसले होते. खूप वर्षांनतर हा निवांतपणा त्यांच्या आयुष्यात आला होता. जुन्या आठवणी, लग्न कसे ठरले तेंव्हापासून एकमेकांची कशी साथ देत आले आणि आत्ताही देत आहेत इथपर्यंत सगळे विषय बोलत होते. म्हणजे थोडक्यात काय तर,  आता पुन्हा तेच निसटून चाललेले दिवस गोळा करून ठेवता येतात का ते बघणं चालू होतं. नव्याने सहवास, प्रेम, आदर सारं काही वाढतच चाललं होतं. खरं तर एकत्र कुटुंब असल्यामुळे वेगळा असा वेळ एकमेकांना कधी देताच आला नाही त्यातून नोकरी, घरकाम, जबाबदाऱ्या, खूप गुंतून गेले होते वेगवेगळ्या विश्वात पण, प्रेम मात्र जीवापाड. तेंव्हाचा वेळ आत्ता कुठे सापडेल का नव्याने हे त्यांना अनुभवावंसं वाटू लागलं. शेवटी एक दिवस न राहून त्यांनी राजेश आणि रियाला एक विनंती केली की, आम्हाला जरा दोन महिने आपल्या ह्याच घरात फक्त दोघांनाच राहून बघायचंय. राजेश आणि रियाला उलट आनंदच वाटला त्यांनीही समजून घेतलं त्यांच्या म्हणण्याचा आदर केला आणि ते दोन महिन्यासाठी आपल्या स्वतःच्या flat वर राहायला गेले. मग काय दोघांनी अगदी छान एकमेकांबरोबर वेळ घालवला, मित्र-मैत्रिणी, जिवलग, नातेवाईक, जागरणं, सिनेमे, लटके भांडण, रागावून पुन्हा मनवणं, अगदी तरुणाईतल्या जोडप्यासारखे. ह्या दोन महिन्यांमध्ये त्यांनी सगळं आयुष्य नव्याने जगून घेतलं. वेगळ्याच दुनियेत वावरत होते ते आणि त्यानंतरचा त्यांचा प्रवास मात्र एक सुंदर आणि समाधानी आयुष्याचा होता. कोणतीच सल मनात नव्हती, कोणाशी अबोला नाही, गैरसमज नाही, नाराजी नाही कारण ह्या वेळी आपल्या माणसांची जितकी गरज असते ती याआधी कधी फारशी जाणवलेली नसते पण, ह्या वळणावर त्यांच्या आधाराची, सहवासाची ऊब खूप काही देऊन जाते.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी गोष्टं असतेच की, ती करायची राहून गेलेली असते, कधी पैसा नसतो तर, कधी वेळ. कधी जाणीव नसते तर, कधी जाणीव असूनही इच्छा नसते. मग ह्या हळुवार  आलेल्या आयुष्याच्या संध्याकाळी त्या तांबूस खुणा अंगावर झळकू लागल्या की, एक वेगळीच जाणीव होते. सुखी तर असतोच पण, कायम एक हुरहूर मनात चालूच असते. सगळ्यांमधेच जीव अडकलेला असतो. मुलं, नातवंड, नातेवाईक, मित्र परिवार सारं काही नव्याने पुन्हा-पुन्हा हवंहवंसं वाटायला लागलेलं असतं. आकाशात उंच झेप घेण्यासाठी आई वडिलांनी ज्या हातातून मुक्त केलेले असते त्या हातांची मिठी परत हवीहवीशी वाटायला लागलेली असते. ती काही जणांना मिळते पण काहींना नुसतीच जाणीवही पुरते. अचानक फार फार जुन्या मित्राची नुकतीच झालेली गळाभेट रडवल्याशिवाय रहात नाही. शब्दातून व्यक्त कधीच होता येत नाही रादर ते सगळ्यांना दाखवता येत नाही. मनातली तगमग डोळ्यांना समजते आणि मग डोळे शब्द बनतात आणि कोसळतात स्वतःच्याच नकळत. आपल्यापेक्षा वरिष्ठ मंडळी आठवली की, वाटतं त्यांच्या जागेवर आता आपण आलो आहोत. छोट्या छोट्या गोष्टीत मन हळवं बनत जातं. आता आयुष्यात बरीच स्थिरता आलेली असते आणि नसली तरी ती हवीहवीशी नक्कीच वाटत असते. तेंव्हा सुचत जातात उगाचच जोडलेल्या आयुष्याबद्दलच्या चार ओळी. आत्तापर्यंतच्या प्रत्येक क्षणाचा मागोवा आपलेच आपण पुन्हा पुन्हा न्यहाळतो. मन नाजूक झालेली जाणीव सतत होत राहते. बरेचदा सगळ्यांना फारशी काही पडलेली नसते पण, आपण मात्र आपल्या भोवितच फिरत असतो मला हे करायचंय अजून, तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाही, माझ्यावाचून आता कोणाचं काहीच अढत नाही, असे भलते सलते विचार कधी ना कधी मनात अपोआप येऊन जातात. ह्या विचारांनी कधी कधी घरातलं वातावरण देखील बिघडू शकतं. खरं तर सगळ्यांचं कौतुकही असतं प्रत्येकाला पण, रिकामी जागा आपल्याशिवाय भरली जाणार ह्या कल्पनेने कधी कधी मन उगाचच कासावीस होतं. नातवंड म्हणजे तर काय नव्याने मिळालेला स्वच्छंद आनंद त्याच्या नजरेत बघून सुखाची नव्याने ओळख होते. असे कितीतरी क्षण वरचे वर आयुष्यात येत राहतात आणि नेहमी वाटत राहतं की, आयुष्याच्या ह्या वळणावर पुन्हा नव्याने जन्म मिळावा.

सुखाची कल्पना अन मनोरे मनाचे
जगले असे सुंदर क्षण सारे सुखाचे,   
काही बोलके अन, काही अंतरीचे  
काही स्वप्नांचे तर, काही वास्तवाचे
अजूनही वाटे गोड स्वप्नांनी प्रत्येक दिन उजळावा,
आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नव्याने जन्म मिळावा....

सावरलेल्या आयुष्याच्या वाटा अनेक होत्या
वळणावरती चालताना सावल्या सोबत होत्या,   
अडचणीतूनही कित्येक वाटा मी, शोधल्या होत्या
वळून बघता मागे, पाऊलखुणा तशाच होत्या
अजूनही वाटते तशा क्षणांचा शोध नव्याने घ्यावा,
आयुष्याच्या संध्याकाळी पून्हा नव्याने जन्म मिळावा....

तो हात हाती, शेवटपर्यंत तसाच रहावा  
मिळून फुलवलेला संसार मन भरून पहावा,
भूतकाळातला प्रत्येक क्षण नजरेसमोर लख्ख दिसावा
तिच सोबत अन, तोच सहवास मनात अगदी खोल रुजावा
मुरांबा आमच्या सहवासाचा आयुष्यभर असाच टिकावा,  
आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नव्याने जन्म मिळावा....

निसटून गेले क्षण सारे मन उगाच उदास होई
तांबूस खुणा खुणावती ओंजळीत घे, तुझीच रोषणाई
अलगद मग, जाणवावा तोच ओलावा मनी
आयुष्याची ओढ नव्याने जपेन प्रत्येक क्षणी
सुखाच्या सरींचा मग नकळत सूर गवसावा,   
आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नव्याने जन्म मिळावा....

मी हितगुज करेल प्रत्येक दिवसाशी
अजूनही जगण्याची आशा उराशी,
स्वप्नांना ओंजळीत अलगद साठवून ठेवीन
निरपेक्ष नजरेतून त्या क्षणात सामावून जाईन   
सुंदर हळव्या पानावरती हळुवार नव्याने शब्द सुचावा,
आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नव्याने जन्म मिळावा....
पुन्हा नव्याने जन्म मिळावा....


- अस्मिता कुलकर्णी
Share:

4 comments:

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या