त्या सुखाच्या चांदण्यांचा, रंगही आगळा वेगळा...
कधी उजळत्या दिशाही दाही
तर, कधी तांबूसश्या रंग छटा
धूसर प्रकाशातही अचानक,
गवसत जातात सहजच वाटा
अंधारातही रंग शोधता,
आयुष्य म्हणजे सोहळा
त्या सुखाच्या चांदण्यांचा, रंगही आगळा वेगळा...
कधी बहरलेला गुलमोहोर
तर, कधी क्षणभंगुर पारिजात
कधी ,मोगरा सुगंधी ओंजळीत
तर, कधी वेल जुईची आसमंतात
क्षणातला सुगंध शोधता,
आयुष्य म्हणजे सोहळा
त्या सुखाच्या चांदण्यांचा, रंगही आगळा वेगळा...
कधी, स्वतःशी संवाद मोकळा,
कधी, आपल्याच मनाशी अबोला
कधी, शब्दच पडती अपूरे,
कधी, भाव कळतो कोऱ्या
कागदातला
संवादांचा अर्थ शोधता,
आयुष्य म्हणजे सोहळा
त्या सुखाच्या चांदण्यांचा, रंगही आगळा वेगळा...
कधी मातीचा सुवास सुंदर
तर, कधी बेधडक साद विजेची
बिलगून वाराही हळूच सांगतो,
जाणवतेच ना तेंव्हा, चाहूल पावसाची
त्या थेंबातील जाणीव
शोधता, आयुष्य म्हणजे सोहळा
त्या सुखाच्या चांदण्यांचा,
रंगही आगळा वेगळा...
0 comments:
Post a Comment