
मी चांदणी रे एक,
त्या मखमली आकाशी,
परतून बघ मागे,
मी बोलले जराशी,
नकळताच ओढ लागली कुणाची,
व्हाया आवडेल मला रे,
कविता माझ्या प्रियाची..
शब्द तुझे, अर्थ तुझे,
स्पर्श तुझा, अंदाज तुझे,
नजर माझी, स्वप्न तुझे,
माझ्या मनातील असणे तुझे,
हुरहूर मिटवू दे,
मज काळजातली,
व्हाया आवडेल मला रे,
कविता तुझ्या हृदयातली....
हात तुझा घट्ट हाती,
साथ तुझी प्रत्येक जन्मी,
फक्त तुझ्या विचारांनीच,
सहवासाची जागा घेतली,
माझ्या मनीच्या प्रिया,
मी साद तुजला घातली,
व्हाया आवडेल मला रे,
कविता तुझ्या स्वप्नातली....
तुझ्यामुळे अर्थ मिळाला,
सापडत गेले जगणे,
सूर तुझ्यातच गवसले,
अन सुंदर बनले माझे गाणे,
जादू उमजली,
खऱ्या जगण्यातली,
व्हाया आवडेल मला रे,
कविता तुझ्या मनातली....
सहजच तू आलास अन,
मी हसरी बनले,
क्षण मोहरून गेले माझे,
अन हसणेच आयुष्य बनले,
प्रेमाने तुझ्या,
माझी आयुष्याची ओंजळ भरली,
व्हाया आवडेल मला रे,
कविता तुझ्या हसण्यातली....
- अस्मिता कुलकर्णी
Very nice poem👌👌👌
ReplyDelete