
परवा एक जुनी मैत्रीण अचानक मॉल मध्ये दिसली. तिच आहे का दोनदा तीनदा खात्री
करून घेतली आणि मग हाक मारली, “प्रीती” ती देखील धावत धावत आली. होस्टेल नंतर
कित्येक वर्षानंतर भेटलो होतो आम्ही. “कशी आहेस?” “मी मस्त, तू सांग, इथेच असतेस का?” “हो अगं, इथेच असते.” मी जरा विचारात
पडले खरं तर तिचं एका मुलावर खूप प्रेम होतं. तो तर हैद्राबादला रहायचा. शिक्षण
इथे पुण्यात झालं होतं. होस्टेल मध्ये असताना खूप बोलायची, त्याच्याबद्दल सांगायची.
मला त्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. मी काही विचारणार, तेवढ्यात तिचे
मिस्टर आणि लहान मुलगा दोघंही तिथे आले आणि माझी उत्सुकता अजूनच वाढली कारण तो, तो
नव्हताच. ते थोडसं बोलून, मला हाय-हेलो करून पुन्हा कोणत्यातरी शॉप मध्ये शिरले.
मग, मी न राहून शेवटी विचारलंच. “अगं काय हे, तुझं?” मी काही विचारणार तेवढ्यात तीनेच
माझ्या डोळ्यातला प्रश्न ओळखला आणि तिने सांगितलं. “मलाही कळलंच नाही की, नेमकं काय काय घडलं आणि माझ्या आयुष्यातून तो अचानक कसा
निघून गेला, आता मी नवीन नातं स्वीकारलं आहे. आम्ही तिघे खूप खुश आहोत आमच्या
आयुष्यात. खूप गोष्टी मागे सोडून पुन्हा नव्याने सुरुवात केली. सुरुवातीला अवघड
गेलं पण नंतर जमलं सगळं.” “ओह्ह sorry, मी
विचारायलाच नको होतं. तुला दुखवायचं नव्हतं मला.” “अगं असं काही नाही, ठीक आहे.
मला फारसं वाईट नाही वाटत आता कारण, मी ते सगळं विसरले आहे. बराच काळ स्वतःला
त्रास करून घेत होते पण, आता नाही. माझा नवरा खूप छान आहे. माझ्यावर खूप प्रेम
करतो आणि त्याला सगळं माहिती देखील आहे. कदाचित मी त्याच्याबरोबरही इतकी खुश
राहिले नसते जेवढी आत्ता आहे.” मला खरं तर वाईट वाटलं कारण खरचंच तिचा खूप जीव
होता त्याच्यावर. तिच्याशी बोलून घरी निघाले पण, त्याच सगळ्या आठवणी येत होत्या
डोक्यात. खरं तर म्हणतात
पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही पण, तिने समजून घेतलं परिस्थितीला, त्याला आणि स्वतःच्या आयुष्याला देखील. कितीतरी गोष्टी,
आठवणी खरच आपण मागे सोडून पुढे निघून येतो, परत कधीच मागे वळून न बघण्यासाठी. सहज
नवं स्वीकारतो आणि चालत राहतो, आनंदाने नव्या वाटा शोधत आणि त्या सापडतात देखील.
वेळेलाही थोडा वेळ दिला की पुसटश्या होत जातात गोष्टी. कोत्याही दुःखाचं असो वा
कोणत्या आठवणींचं असो, असंच असतं काळ सरला की, त्याचा प्रभाव कमी होतो आणि धुरकट झालेल्या चारी दिशा, हरवत चाललेल्या वाटा,
निसटत चाललेली नाती, आणि शोधत असलेलं प्रेम पुन्हा एकदा नव्याने स्वच्छ दिसायला
लागतं आणि, आपणही त्याच्याशी पुन्हा समरस होऊन जातो नव्याने सगळं अनुभवायला...किती
छान आहे हे खरं. कधीच थांबल्यासारख वाटणार नाही, आयुष्यात सतत चांगले बदल होत
राहणार, वाहत्या पाण्यासारखं स्वच्छंद वाटणार नेहमीच आणि, मनातला आणि चेहऱ्यावरचा
आनंदही वारंवार सापडणार...
गाडी चालवत चालवत घरी पोहोचेपर्यंत एक कविता सुचली...
प्रेमाच्या क्षणांचा आनंद अन, मोकळ्या वाटा
त्याचा सहवास अंतरी अन, त्याच्याच वेगळ्या छटा
बावरले होते त्याच्याचसाठी, विसरून मला मी
सावरले होते त्याला मी, सावरून मला मी
मी गुंतून राहिले, त्या विरघळणाऱ्या क्षणांमध्ये
तो मात्र थांबला नाही...
त्या जुन्या कोणत्याच आठवणींचा
हिशोबही आता उरला नाही.....
वेगळीच होते मी, आता ती गवसत नाही
सापडल्या कधी खुणा तरी, तशी मी मलाच आठवत नाही
सैरभैर होते कधी मन, माझेच मला समजत नाही
भावनेचा गुंता सोडवला तरी, काही कोडी सुटता सुटत नाही
वादळात धरला होता हात
पण, तो कधी बरोबर चालला नाही...
त्या जुन्या कोणत्याच आठवणींचा
हिशोबही आता उरला नाही.....
एकटी ना कधी, संगे सदा सोबती
गप्पांच्या मैफिली अन, मैत्रीचे बंध हाती
वेगळे माझे बघणे, त्यानेच हेरले होते
बरोबरीने आम्ही कितीतरी, क्षण जगले होते
ओळखून माझे मन, जाणूनी ती घुसमट
तो कधीच काही बोलला नाही...
त्या कोणत्याच आठवणींचा
हिशोबही आता उरला नाही.....
हातावरच्या बोलक्या रेषा, नाव त्याचेच सांगती
गालावरची खळी बोलकी, लाजून हळूच हसती
त्याच्या डोळ्यात मी, प्रेम पहिले
होते
त्याच्या मनातले नकळत मी, जाणिले होते
अर्ध्यावरती डाव सोडला त्याने
पण, तो रडला नाही...
त्या कोणत्याच आठवणींचा
हिशोब आता उरला नाही....
पुसटसे झाले क्षण, पाऊल अचानक वळले
नव्याने बंध जोडूनी, नवीन नाते जुळले
थबकला आज पुन्हा, येऊन माझ्या समोर
पाणावले डोळे त्याचे, त्याने चुकविली नजर...
प्रश्न ठेउनी गेला पुन्हा,
आजही मला तो कळला नाही
असो, तसंही त्या कोणत्याच आठवणींचा
हिशोब आता उरला नाही....
- अस्मिता कुलकर्णी