माहेर...




डोळाभर पाही माझे मन, माझ्या मायेचे आंगण
माहेराच्या माझ्या दारी, सुखी क्षणांचे आंदण..

वाट पाहते ती माया, अशी ओढ त्याच्या मनी
ये ग लाडके परतुनी, असं बोलतं ते कानी..

दारासमोर आनंदी, उभी अंगणी तुळस
घराला ग बाई माझ्या, सुखी स्वप्नांचा कळस..

होते भावूक क्षणात, घेते कवेत मला ते  
वादळात सावरते, देते आधार मला ते..  

गुज न काही मनी त्याच्या, आहे खरंखुरं   
मोहरून जाते मन, कशाची न त्याला सर..  

माहेराच्या आठवणीत मला, सूर गवसतो
तिथला पाऊसही जणू माझ्या, प्रेमात बरसतो..

तिथे फुलतो मोगरा, पारिजातकाचा सडा
मुक्यानेच बोलतो ग, माझा चिरेबंदी वाडा..

थांबले ग अश्रू त्याचे, त्याने मला पाहियले
त्याच्या मनातले भाव, सारे डोळ्यात दाटले..

सावरले माझे मन, मी हसून बोलले
जुने हसरे ग क्षण, डोळ्यासमोर धावले..

कशी मांडू मी शब्दात, भावा बहिणीची ओढ
अपोआप येते कशी माया, न सुटलेलं कोडं..

मायबाप बघती, माझ्या सुखाच्या ग छटा
संसारात रंगलेल्या, माझ्या चंदेरी ग वाटा..

हात सुटला हातून, गेली परक्याच्या घरी
सुखाचे ग क्षण पेर, आता तुझ्या संसारी..

तिथल्या आठवणींचे क्षण, माझ्या बरोबरी आले
स्वप्नात ग बाई माझ्या, मी माहेराला गेले..

 - अस्मिता कुलकर्णी

Share:

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या