सगळेच खूप आनंदात होते. बाबांनी गाडी चालू केली आणि, स्पीड जणू आपोआपच वाढत होता. कधी संस्थेत
पोहोचतोय आणि शंतनूला घरी घेऊन येतोय असं सगळ्यांना झालं होतं. शंतनू देखील घरी
जाण्यासाठी उत्सुक होता. गाडी संस्थेच्या आवारात पोहोचली तसं सगळ्यांच्याच मनात
धस्स झालं. आयुष्य आता ह्या संस्थेशी जोडलं गेलय. आयुष्यातला अविभाज्य काळ, जो शेवटपर्यंत कधीच विसरला जाणार नाही. कितीतरी
हसरे-रडके क्षण इथे मुरले आहेत. या संस्थेमुळेच आपला शंतनू आपल्याला परत मिळाला.
खूप सुखाचा पाठलाग केला आणि आज शेवटी ते आम्हाला इथेच गवसलं. असे अनेक विचार
सगळ्यांच्याच मनात डोकावत होते. इकडे शंतनू गुलमोहोराचा निरोप घेत होता. गुलमोहोर
जवळचा मित्रच बनला होता शंतनूचा. सगळे शंतनूच्या रुममध्ये पोहोचले शंतनूचा हसरा
चेहरा बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. डॉक्टरांची भेट घेतली आणि सगळे
संस्थेमधून बाहेर पडले.
शंतनू गाडीत बसला. शक्यतो तो कधी मागे बसत नसत पण आता त्याला गाडी चालवायला
लगेच जमणारं नव्हतं. संस्थेच्या गेटमधून गाडी बाहेर पडली तेंव्हा सगळ्यांच्याच
नजरा मागे सुटत चाललेल्या संस्थेकडेच
होत्या. डॉक्टरांचे, तिथल्या मदतनीस चे
आणि ह्या वास्तूचे आपल्यावर खूप खूप उपकार आहेत हा भाव सगळ्यांच्याच डोळ्यात उठून
दिसत होता. गाडी बऱ्यापैकी पुढे आली. शंतनूची नजर आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी, रस्ते, काही खुणा ओळखण्याचा
प्रयत्न करत होती. कित्येक वर्ष झालं हे बघितलच नाही असं त्याला वाटत होतं.
बाहेरच्या गोष्टी बघत बघत तो भूतकाळातही डोकावू पाहत होता. बाबांनी मधेच गमतीने शंतनूला
विचारले, “काय रे शंतनू चालवायची का गाडी?” तसं शंतनू एकदम घाबरला. “मला नाही जमणार....
बाबा...” असं दचकत दचकतच तो बाबांना म्हणाला. “अरे गंमत केली शंतनू, शांत हो, काळजी करू नकोस.”
आईचं लगेच वाक्य “काय हो तुम्ही पण माझ्या लेकराला आत्ता तर घेरी येतोय तो. आणि
लगेच तुम्ही त्याला काहीही विचारत आहात.” सगळे हसले पण, शंतनूला अजूनही लक्षात येत नव्हतं की, खरच ह्या सगळ्या गोष्टी मी पूर्वीसारख्या करू
शकणार आहे की, नाही? त्यामुळे त्याच्या
चेहऱ्यावर आत्ता तरी उसनं हसू होतं, हे लगेच
सगळ्यांच्या लक्षात आलं, तसं सगळे अचानक
शांत झाले. “शंतनू तुला पाहिजे तितका आणि त्या पद्धतीने तुझा तुझा वेळ घे, काही घाई नाहीये आपल्याला. अजिबात काळजी करू
नकोस सगळं छानच होणार आहे.” बाबांनी पुन्हा एकदा शंतनूला सकारात्मक डोस दिला आणि
त्याची हिम्मत वाढवण्याचा प्रयत्न केला.
गाडी घराजवळ पोहोचली. शंतनू गाडीतून उतरला, त्याने पाय जमिनीवर ठेवला
आणि त्याला एक खूप जवळचा स्पर्श जाणवला स्वतःच्या जागेचा, घराचा जणू ते सगळी डोळ्यात
तेल घालून शंतनूची वाट पहात होते. तसं बघायला गेलं तर ह्या निर्जीव गोष्टी पण, का कोणास ठाऊक कोणत्याही
गोष्टीशी अथवा माणसाशी एकदा नातं जोडलं गेलं की, त्याच्यापासून आपण आणि आपल्या पासून ते कधीच
दूर जाऊ शकत नाहीत. हीच भावना शंतनूला अख्खं घर फिरताना जाणवत होती. वाढदिवसा
दिवशी डोळ्यासमोर दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी तशाच आहेत ना, रादर त्या आधी होत्याच आणि
आत्ताही आहेत का? हे शंतनूची नजर अचूक हेरत होती. त्याला मनस्वी आनंद होत होता. त्याच्या
स्वागतासाठी बगीचाही जणू खुलला होता. प्रज्ञा
आणि आईने मस्त गोड धोड जेवायला केलं होतं. गप्पा मारत मारत सगळे एकत्र जेवायला
बसले जसे, ते आधी बसायचे अगदी तसेच. सगळ्यांच्याच आयुष्यात हे रंगीबेरंगी क्षण पुन्हा
नाचत-डोलत समोर उधळले जात होते अगदी मनसोक्त. खूप दिवसांनी सगळ्यांना अन्नाची खरी
चव समजली होती. मनापासून हसणं, खुश असणं, म्हणजे काय हे जाणवत होतं. बराच वेळ गप्पा मारल्या आणि, शंतनू आराम करण्यासाठी
त्याच्या खोलीत गेला. सगळेच शंतनूची खूप काळजी घेत होते. त्याला बऱ्याच कृती
करण्यासाठी सपोर्ट करत होते. डॉक्टरांनी दिलेल्या activity आणि औषधं देखील व्यवस्थित सुरु होते. सगळं
बऱ्यापैकी चांगलं चालू होतं पण, शंतनू अजूनही कसल्या तरी दबावाखालीच वाटायचा. बाहेर जायचं
म्हंटल की, त्याच्या अंगावर काटा यायचा, त्याला खूप भीती वाटायची. खूप वेळा सगळे त्याला एखाद्या
कृतीसाठी प्रवृत्त करत पण, ती जर गेटच्या बाहेरची असेल तर तो ती टाळायचाच. सगळ्यांनी
त्याला खूप छान समजून घेतलं होतं. मुलींकडून कधीतरी हट्ट व्हायचा, मागण्या असायच्या तेंव्हा
प्रज्ञा आणि आई संभाळून घ्यायच्या.
एके
दिवशी प्रज्ञा आणि बाबा ऑफिस मध्ये गेले होते. आई देवळात गेली होती. शंतनू एकटाच
घरी होता. शाळेतून अचानक फोन आला, शंतनूचा नाविलाज होता. फोनजवळ गेला आणि हो, नाही करत करत त्याने फोन
उचलला. तिकडून लगेच श्रेयाच्या टीचर बोलू लागल्या, “श्रेयाला खूप ताप आला आहे प्लीज तिला घरी घेऊन
जाता का? आम्ही मिस प्रज्ञाला फोन लावत आहोत पण तो बंद सांगत आहेत.” इकडे शंतनू आधी
शांतच होता. “hello, तुम्ही ऐकत आहात ना?” असं पुन्हा एकदा टीचर ने विचारलं तेंव्हा
शेवटी शंतनू घाबरत घाबरतच म्हणाला, “हो हो मी येतो.” शंतनूने फोन ठेवला. मनात भितीलाही सोबत
घेऊन तो सगळ्या कृती करू लागला. मला जावच लागेल, असं तो त्या भितीलाही ठणकावून सांगू लागला.
त्याने स्वतःच आवरलं, गाडीची चावी शोधली. चप्पल घातली. त्याला खूप घाम यायला
लागला. पार्किंग मध्ये गाडीजवळ गेला, घाबरतच दार उघडलं. आता मात्र त्याच्या घामाच्या धारा
अक्षरशः कपाळावरून अंगावर ओघळायला लागल्या. हात थर थर कापायला लागले. घशाला कोरड
पडायला लागली. त्याच्या हातातून चावी निसटून गाडीच्या खाली पडली त्याने ती
थरथरत्या हातानेच परत उचलली. तो पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न करू लागला पण, मनातली भीती त्याला हे
करण्यापासून थांबवत होती. आणि शेवटी तीच वरचढ ठरली. त्या क्षणी अचानक शंतनू गाडीतून
चटकन उतरला ते थेट त्याच्या रुममध्ये जाऊन दार बंद करून बसला. त्याला जवळ जवळ
अर्धा तास काहीच सुचत नव्हतं. नंतर आई देवळातून घरी आल्यावर पुन्हा शाळेतून फोन
आला “तुम्ही येत आहात ना श्रेयाला घ्यायला? तिचा ताप वाढतच चाललाय” आईच्या लक्षात आलं की, आधी एकदा फोन येऊन गेलाय
आणि तो नक्कीच शंतनूने उचलला असावा. विचार करत करतच आई म्हणाली, “हो हो निघतच होते मी, येते लवकर तुम्ही काळजी
घ्या तोपर्यंत तिची प्लीज.”आईनी पटकन प्रज्ञाला फोन लावला बाबांना फोन लावला पण
दोघेही बिझी होते. मग आईनी ऑफिस मधल्या फोनवर फोन केला आणि प्रज्ञाला अर्जंट निरोप
देण्यास सांगितले. प्रज्ञाला निरोप मिळताच हातातलं सगळं काम बाबांवर सोपवून ती श्रेयाच्या
शाळेत गेली.
इकडे
आई शंतनूच्या रुमजवळ गेली. दार लावलेलं होतं. “शंतनू अरे शंतनू” आईने हाक मारली
तसं शंतनूने घाई घाई दार उघडलं तो भर भर सगळं आईला सांगायला लागला. “अगं आई कोणाला
तरी जावं लागेल पटकन शाळेत.” त्याचा घाम
पदराने पुसत पुसत आई त्याला म्हणत होती, “अरे शांत हो, मला समजलंय सगळं मी केला आहे फोन प्रज्ञाला ती
जाईल तिला आणायला तू काळजी करू नकोस.” तसा शंतनू हळू हळू शांत झाला पण, त्याला मनोमन खूप वाईट
वाटलं होतं. “मला नाही का ग जमणार आई परत हे सगळं?” असं रडवेल्या स्वरात शंतनू आईला म्हणत होता.
आई त्याला खूप समजावून सांगत होती, “जसं पुढे जाणाऱ्या माणसांना भरपूर अडचणींना तोंड द्यावं
लागत असतं ना, तसच तुझं झालंय शंतनू, पण तू थांबू नकोस प्रयत्न करत रहा. बाकी सगळे प्रयत्न तू
केलेस पण, गाडी चालू करू शकला नाहीस इतकच ना पुढच्या वेळेस तुला नक्कीच ते ही जमेल.
आम्हाला सगळ्यांना खात्री आहे.” तसं शंतनूला देखील स्वतःची हिम्मत जराशी वाढल्यासारखी
वाटली. त्याने आईला छान मिठी मारली. तसं आई पटकन म्हणली. “चल माझ्या नातीसाठी छान
सूप करते.” ये तू पण खाली. शंतनू सवयीप्रमाणे खिडकीपाशी जाऊन उभा राहिला आणि
त्याचं लक्ष खिडकीतून दिसणाऱ्या एका गुलमोहराकडे गेलं, अगदी संस्थेत कशी सोबत
करायचा तशीच सोबत त्याला इथेही सापडली होती. ते झाड खूप वर्षांपासून तिथेच होतं पण, शंतनूने कधी त्याच्याकडे
इतकं निरखून बघितलंच नव्हतं. संस्थेतल्या गुलमोहोराची आठवण झाली आणि त्याचे डोळे
पाणावले. पुन्हा नव्याने हिम्मत मिळवण्यासाठी आणि भीती लांब पळवण्यासाठी गुलमोहोर इथे माझ्यासाठी आला असेल असं त्याला
वाटलं. फरक फक्त एवढाच होता की, आता शंतनूचे विषय वेगळे होते. ते झाडही शंतनू सारखे नुकतेच
बहरायला लागले होते. त्या दिवसापासून शंतनू पुन्हा त्या गुलमोहोराशी हितगुज करू
लागला. ह्या गोष्टीला जवळ जवळ दोन ते तीन महिने होऊन गेले होते. आज बऱ्याच दिवसांनी श्रेयाने कितीही हट्ट केला होता तरी आजही शंतनूची तिला शाळेत
सोडवायला जाण्यासाठी हिम्मत झालीच नाही. आजही त्याने बागेतल्या कामाचं निमित्त
सांगून श्रेयाच्या हट्टाला जवळ जवळ टाळलंच. शेवटी प्रज्ञाच मुलींना घेऊन शाळेत गेली.
आईने शंतनूला आवाज
दिला की, मी देवळात जाऊन येते. आईचा आवाज ऐकून रुममध्ये एकटक गुलमोहोराकडे बघत
बसलेल्या शंतनूची तंद्री मोडली. गुलमोहोराकडे बघता बघता सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा
त्याचा भूतकाळ जशाच्या तसा त्याच्यासमोरून गेला होता. त्याचे डोळे डबडबले होते.
मला सगळं आधीसारखं सगळं करायला कधी जमणार आहे? जमेल की, नाही? असा विचार परत त्याच्या मनात घोळत होता. आजही
श्रेयाला शाळेत सोडायला मी तयार झालोच नाही ह्याचं शंतनू ला खूप वाईट वाटत होतं.
बराच वेळ झाला शंतनू रुममध्ये दार बंद करूनच बसला होता. प्रज्ञा शाळेत गेली होती. आई
शेजारच्या वनिता काकूंकडे गेली होती. बाबा एकटेच घरात होते. बाबा आज खूप दिवसांनी
इतक्या वेळ घरी थांबले होते. त्यांना आज सकाळपासूनच जरा बरं वाटत नव्हतं. बाबा
शंतनूच्या रूमजवळ गेले आणि त्यांनी दारावर टक टक केली. खरं तर हे सगळं आधीसारखं
जमायला हवं अशी शंतनूची खूप इच्छा आहे पण, त्याची भीती त्याला हे करूच देत नाही आणि तो
परिस्थितीसमोर हतबल होतो. आज आत्ता मात्र त्याने मनाशी पक्क केलं की, “जमेल मला नक्की आणि मी
खूप प्रयत्न करणार माझ्या कुटुंबांनी माझ्यासाठी आजपर्यंत खूप सहन केलय. मी
त्यांना अजून त्रास नाही देणार मी करणार प्रयत्न नक्कीच जमेल मला.” असं स्वतःशीच
बोलून नव्याने बळ आणत पुन्हा आवाजाचा कानोसा घेत, डोळे पुसत शंतनूने दरवाजा उघडला. बाबा आत जाऊन
शंतनूशी बोलणार तितक्यात त्यांना खूप घाम आला आणि अचानक चक्कर येऊन ते बेशुद्धच
पडले. आता मात्र शंतनू पूर्ण हादरला. “बाबा काय होतंय तुम्हाला? बाबा, जागे व्हा, बाबा, बाबा....., प्रज्ञा, आई, पटकन या बाबांना बघा काय
होतंय, आई, प्रज्ञा....” कोणाचाही आवाज न आल्यामुळे शंतनू उठून खाली धावला जिन्याच्या
काही पायऱ्या सोडून पटकन उडी मारून त्याने पाणी घेतले. त्याने परत दोघींना आवाज
दिला पण, घरी कोणीही नाहीये हे त्याच्या लक्षात आले. तो आल्यासारखाच परत रूमकडे धावला
तोंडावर पाणी मारले, पाणी पाजण्याचा प्रयत्न केला पण, बाबांची काहीही हलचाल
जाणवत नव्हती. शेवटी त्याने बाबांना उचलले, खाली घेऊन आला, सोफ्यावर झोपवले, गाडीची चावी घेतली, पायात चप्पल अडकवली, बऱ्याच दिवसांपासून बेवारस
झालेलं क्रेडीट कार्ड घाई घाई आठवणीने उचललं, त्यानंतर बाबांना उचलून गाडीत मागच्या सीटवर
झोपवलं. गाडी चालू केली आणि भरधाव वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. तो जसा जसा
पुढे जात होता तसा तसा त्याला रस्ताही आठवत होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांना
भेटला, सगळ्या formalities पूर्ण केल्या आणि बाबांना admit केलं. काही वेळाने सगळ्या टेस्ट झाल्या. बाबांचं
बिपी शूट झालं होतं. बऱ्याच वेळाने बाबा शुद्धीवर आले. डॉक्टरांनी त्यांना
बोलण्यास मनाई केली होती. त्यामुळे शंतनू बाहेरच उभा होता. काचेतून बाबा त्यांच्या
आधीच्या शंतनूला पाहत होते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. या
आनंदापुढे त्यांना झालेला त्रास काहीच नव्हता. असं त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत
होते. अजूनही शंतनू त्याच शॉक मध्ये होता. पण त्याला जराही जाणीव नव्हती की, त्याने ह्या परिस्थितीत
त्याच्याच नकळत नेमकं काय काय केलं होतं.
इकडे प्रज्ञा घरी आली. घराला कुलूप बघून थोडीशी विचारत
पडली. अरेच्या घराला कुलूप? सगळे बाहेर गेले? असं कसं होईल? गाडीही नाहीये. तेव्हढ्यात शेजारच्या
विनिताकाकुंकडून आई देखील आली. अगं कुलूप कुणी लावलं? आईनेच पुन्हा प्रश्न
विचारला, “म्हणजे तुम्ही नाही लावलं का कुलूप?” “नाही शंतनू आणि बाबा होते की, घरात विनीताची मुलगी आलीये
म्हणून मी सहज भेटायला गेले होते.” आता मात्र दोघींना देखील काही समजेना की, काय झालं असेल? त्यांची अशी चर्चा चालूच
होती, तेवढ्यात बाबांच्या फोनवरून प्रज्ञाला फोन आला. प्रज्ञा पटकन म्हणाली “बाबा
कुठे आहात तुम्ही? सगळं ठीक आहे ना? शंतनू कुठेय?” प्रज्ञाला शंतनूचीच पुन्हा एकदा काळजी वाटली.
तेवढ्यात तिकडून आवाज आला “अगं प्रज्ञा मी शंतनूच बोलतोय.” “काय?” कोण बोलतोय?” “शंतनू” प्रज्ञा शंतनूचा
फोनवरचा आवाज जवळ-जवळ विसरलीच होती. “ऐक, बाबांचा बिपी खूप वाढला होता. मी त्यांना
आपल्या नेहमीच्या हॉस्पिटल मध्ये आणलं आहे. आता ते बरे आहेत. काही काळजी करू नका, आईला सांभाळ, व्यवस्थीत सांग तिला सगळं.”
प्रज्ञा आश्चर्याने सगळं ऐकत होती. तिच्या तोंडून
शब्द बाहेर पडत नव्हते. “प्रज्ञा, प्रज्ञा ऐकतेस ना” “हो हो शंतनू, ठीके आम्ही येतो.” शंतनू
नाव ऐकल्यावर आई देखील तिच्याकडे आश्चर्याने बघायला
लागली. प्रज्ञाने फोन ठेवला. आईला सगळं व्यवस्थीत सांगितलं. दोघीही हॉस्पिटल मध्ये
पोहोचल्या. तोपर्यंत दोघींनाही इतका आश्चर्याचा धक्का बसला होता की, त्या एकमेकिंशीही काहीच
बोलल्या नाहीत. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरही दोघींचं लक्ष शंतनूकडेच होतं. बाबाही
काचेतून त्यालाच न्याहळत होते. शंतनूला काही केल्या त्याने वेगळं काही केलंय असं
जाणवतही नव्हतं. ह्या दोघी बाबांना बघून बाहेर आल्या आणि न राहून शंतनूला खूप
प्रश्न विचारायला लागल्या. ह्या प्रश्न-उत्तरात त्याला बोलता बोलता लक्षात आलं की, त्याने नक्की काय काय केलंय.
आता मात्र त्याच्याही आनंदाला पारावर राहिला नाही. त्याचं लक्ष काचेतून बाबांकडे
गेलं तसं बाबाही खूप खुश दिसत होते. आई आणि प्रज्ञा तर अजूनही त्याच्याकडे अवाक
नजरेने बघत होत्या. त्यांच्या सगळ्यांच्याच नजरेत एक प्रकारचा अभिमान जाणवत होता. शंतनूची
भीती पूर्णपणे नाहीशीच होती. तो खूप confidently सगळं सांभाळत होता. बाबा दोन दिवसात ओके झाले. त्यांना
डिस्चार्ज मिळाला. आत्ताही शंतनूच त्यांना घरी घेऊन आला. प्रज्ञानेही आठवडाभर
ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. सगळेच बाबांची काळजी घेत होते. शंतनू देखील सगळी
काळजी घेत होता. बाबा आठ दिवसात पुन्हा ठणठणीत झाले. सगळीकडे आनंदाचं वातावरण
झालं. काळे मळभ स्वच्छ झाल्यासारखे वाटत होते. खरं तर बाबांचं आजारपण
त्यांच्यासाठी आनंदाचं निमित्त ठरलं. हा सगळ्यांच्याच आयुष्यातला टर्निंग point ठरला. मुली देखील खूप खुश
होत्या. अजूनही शंतनूच कोडं उलगडता उलगडत नव्हतं. असं अचानक कसं काय झालं? ह्या धक्क्यातून अजून आई
आणि प्रज्ञा दोघीही बाहेर आल्याच नव्हत्या.
तोच एका शनिवारी शंतनू प्रज्ञाला आवाज देऊ
लागला. “प्रज्ञा, प्रज्ञा कुठे आहेस तू? प्रज्ञा” शंतनू घाई घाईने बोलवत सगळ्या घरभर शोधत होता. “आले
आले प्रज्ञाने साद दिली. खरं तर तिचा ठोकाच चुकला शंतनूने परत घरी आल्यापासून
प्रज्ञाला अशा हाका कधीच मारल्या नव्हत्या. आज स्वतःहून शंतनू हाका मारतोय ह्याचा
सगळ्यांना आनंद तर झालाच पण, का हाका मारत असेल? ह्याविषयी काळजीही वाटली. प्रज्ञा मागच्या
अंगणातून धावत धावत आली. आई देखील स्वयंपाक घरातून घाई घाई बाहेर आली. दोघींच्याही
चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव अगदीच समजून येण्यासारखे होते. “काय रे शंतनू, काय झालं? बरं वाटत नाहीये का?” ह्या प्रश्नाचा आता
त्याला कंटाळा आला होता. “का फक्त बरं वाटत नसेल तेंव्हाच फक्त मी बोलावू शकतो का?” प्रज्ञाच्या खूप जवळ गेला
आणि त्याने जरा हसत हसतच म्हंटल. तसं दोघींनाही वेगळंच वाटलं. आईला जाणवलं, ती आपल्या खोलीत निघून
गेली. प्रज्ञा थोडी लाजलीही. इतक्या दिवसांनी असा क्षण तिच्या समोर आला होता. तिला
कशी प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हतं. ती मागे मागे भिंतीकडे सरकत होती. तसा तसा
शंतनू अजूनच तिच्या जवळ जवळ जात होता. शेवटी ती भिंतीला टेकली, हाही तिच्या अगदी जवळ जाऊन
उभा राहिला आणि गालाजवळ जातोय असं भासवून तिच्या कानात म्हणाला की, “आज मुलींना शाळेतून
आणायला मी आणि तू आपण दोघे जाऊया.” तशी प्रज्ञाने खुश होऊन शंतनूला मिठीच मारली.
दोघंही न बोलताच त्यांची मिठी एकमेकांना बरंच काही सांगून जात होती. प्रज्ञाच्या
पाठीवरून हात फिरवत तो तिला आजचा सगळा प्लान सांगत होता. आज आपण अगदी तसाच प्लान
करूया जसा आधी करायचो, श्रेयाला आणि प्रियाला शाळेतून घेऊया आणि मग स्मिता
मावशीकडे जाऊन त्यांना फ्रेश होऊ देऊ आणि मग, तिथून नाथाई पार्क मध्ये जाऊ, तिथे भेळ, पाणीपुरी खाऊ आणि मग, दुर्गा लस्सी पिऊ, ओके? प्रज्ञा निरुत्तरच होती.
तिला अचानक हा सगळा प्रकार बघून खरं तर धक्काच बसला होता. तिला तिच्या कानावर
अजिबात विश्वास बसत नव्हता. तीही शंतनूकडे बघून हो म्हणाली आणि पुन्हा त्याच्या
मिठीत शिरली. आई रूममधून बाहेर आली तसे दोघेही पटकन लांब झाले. आई हसली आणि गमतीने
म्हणाली, “काय रे काय चाललं होतं दोघांचं? मलाही घ्या ना तुमच्यात” तसं पटकन सावरा सावर करत प्रज्ञा
म्हणाली, “आज आम्ही मस्त प्लान करणार आहोत, श्रेयाला आणि
प्रियाला घेऊन, आधी करायचो तसा.” हे ऐकून आईलाही खूप सुखद धक्का बसला. “अरेवा, छानच आहे की, मग” आईला प्रज्ञाच्या
चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता. तिचा हा हसरा चेहरा इतके दिवस कुठेतरी
हरवला होता. हे सगळं बघून आईला शंतनू आणि प्रज्ञाने लग्नानंतर पहिल्यांदा बाहेर
फिरायला जाताना घेतलेली परमिशन आठवली. तेंव्हा शंतनू विचारत होता आणि आज प्रज्ञाच
जायचंय असं सांगत होती. अगदी हक्काने. प्रज्ञा ह्या घरची सून जरी असली तरी ती आता
आमची मुलगीच बनली आहे. तिने ह्या घरावर आमच्या सगळ्यांवर जीवापाड प्रेम केलंय.
त्या प्रेमानेच तिने हा हक्क मिळवला आहे. आईच्या तोंडून वाक्य निघालं “ह्या क्षणाची तर मीही खूप आतुरतेने वाट पाहत
होते.” खरं तर सगळेच खूप खुश होते. त्यांची प्रत्येकाची स्वतःबरोबरची लढाई नुसती
संपलीच नव्हती तर, ती त्यांनी जिंकली होती. शंतनूला खूप काही वेगळं घडतंय असं
जाणवायला नको म्हणून आई लगेच आपल्या कामाला लागली.
प्रज्ञाच्या
काळजात धडधड होत होती जवळ जवळ दोन वर्षांनी ती अशी स्वतःसाठी बाहेर पडत होती.
मुलींना घेऊन जरी गेली तरी तिचा अर्धा जीव तर शंतनू मधेच अडकलेला असायचा. आज ती
खूप मोकळी वाटत होती. मनावर कसलच दडपण नव्हतं. चेहऱ्यावर एकही शंकेची रेष दिसत
नव्हती. तिच्या आनंदामुळे चेहरा अगदी खुलून दिसत होता. प्रज्ञाने आज खूप छान तयार
झाली. दोन वर्षापूर्वी दिलेला valentine day चा पंजाबी ड्रेस आणि त्यावरची matching ज्वेलरी तिने
घातली. तिने आज पेढ्याची वेणी घातली होती कारण, आज तिला गजरा माळायचा होता. शंतनू रुममध्ये आला
त्याने तिला पहिले आणि तो नव्याने तिच्या प्रेमातच पडला. “ तो तिच्या जवळ गेला आणि
म्हणाला, “I love you प्रज्ञा, खरच तू नसतीस तर माझं काय झालं असतं? तुझी सोबत, मुलींची माया आणि आई बाबांचे आशीर्वादच मला
पुन्हा इथपर्यंत घेऊन आले आहेत, मी वचन देतो प्रज्ञा, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही” असं तो
बोलत असतो तोच प्रज्ञा त्याला थांबवते. “शंतनू मी तुझी खूप वाट बघत होते, आता मी तुला कधीच एकटं
नाही पडू देणार. I am always विथ you.” दारावर knock knock झालं आणि आई-बाबा आत आले आईने मीठ मोहरीच आणली होती
दोघांवरून उतरवून टाकायला. आईने दोघांचीही दृष्ट काढली. बाबांनीही शंतनूला कडकडून
मिठी मारली. दोघांनीही आई-बाबांना नमस्कार केला. बाबांनी शंतनूला “लवकर ऑफिसला ये, तेही तुझी आमच्या एव्हढीच वाट
बघतंय” असा आशीर्वाद दिला. चौघंही एकाच वेळी हसले. प्रज्ञाने ह्या हसऱ्या क्षणाला
आपल्या सेल्फी मध्ये कैद करून घेतले. मागे बहरलेलं गुलमोहोराचं झाडही ह्या सेल्फी मध्ये सहज सामावून गेलं होतं.
घे भरारी, बळ पंखात आण
ठेव विश्वास स्वतःवर, अन ध्येयाचे भान
तूच हो शिल्पकार तुझ्या, आयुष्याचा
हाच असेल लढा तुझा, स्वतःशीच स्वतःचा....
शंतनू च्या बाबतीत
जे घडलं. ते सर्वसामान्य घरात कोठेही घडू शकतं. कोणताही आजार असू दे, मानसिक अथवा शारीरिक किंवा
आयुष्यात कोणतीही अडचण आली तरी, कुटुंबाने एकमेकांची साथ कधीच सोडली नाही पाहिजे.
एकमेकांच्या साथीने, नात्यांच्या आधारावर कोणत्याही गोष्टीचा सामना करताच येतो.
फक्त एकमेकांबद्दल विश्वास, प्रेम, आणि आदर असायला हवा. एकमेकांना समजून घेता यायला हवं. कुटुंबाची
खंबीरपणे मिळणारी साथ आयुष्यात खूप काही देऊन जाते.
समाप्त !!!
अस्मिता कुलकर्णी