बरेच दिवस झाले होते. शंतनू मध्ये चांगलाच फरक पडला होता. औषधांचा डोस देखील
दोन वेळेसच घ्यावा लागत होता. जास्तीचे इंजेक्शन देण्याची गरज आता एवढ्यात पडलीच
नव्हती. भास होणं बंदच झालं होतं, चीड चीड करणंही जवळ
जवळ संपलच होतं. स्वतःची काळजी घेणं, स्वतःच व्यवस्थीत
आवरणं ह्या गोष्टी तो करू लागला होता. सुरुवातीला छोट्या छोट्या कृती करताना देखील
त्याला भीती वाटत होती, जसं की, नखं कापणे, दाढी करणे, बराच वेळ जर बाथरूम मध्ये लागला तर भीतीने त्याचा
जीव गुदमरून जात होता. हळू हळू तो स्वतःहूनच का नाही जमत मला? ह्या प्रश्नावर आला आणि नंतर जमायलाच हवं, असं तो स्वतःलाच सांगायला लागला. आता मात्र
ह्या गोष्टी तो अगदी सहज करत होता. पण, यानंतर तो पुन्हा
थांबला होता. ह्याशिवाय थोडी जरी अवघड कामे असतील तर तो त्यापासून दूरच असायचा. ठराविक
वर्तुळाबाहेर पडणं त्याला अशक्य वाटत होतं. कोणी अचानक नावाने हाक मारली तरी
घाबरून जात होता. अचानक कोणतीही कृती करणं त्याला अवाक्या बाहेरचं वाटत होतं. कमी
होती ती आत्मविश्वासाची. नवीन काही करण्याची त्याच्यात हिम्मतच येत नव्हती. त्याच्या
मनात अपयशाची भीती अगदी पक्की होऊन बसली होती पण, हो शंतनूचा पहिल्या शंतनू कडे जाण्याचा प्रवास अर्ध्या रस्त्यात तरी नक्कीच
पोहोचला होता.
घरच्यांनाही खूप समाधान वाटत होतं. ते आता फक्त शंतनू घरी
कधी येतोय ह्याचीच वाट बघत होते. त्याच्या स्वागताची तयारीही सुरु केली होती हळू
हळू. प्रज्ञालाही एक वेगळाच हुरूप आला होता. ते म्हणतात ना, दिवस कसेही संपायचे पण रात्र सरता सरत नव्हती प्रज्ञाची.
असा एकही क्षण नसेल की, तो लांब असूनही ती
त्याच्या जवळ नव्हती. प्रज्ञाने घर, ऑफिस आणि शंतनू
सगळंच अगदी प्रेमाने, हिमतीने समजून घेऊन सावरलं होतं.
एक दिवस असंच प्रज्ञा, मुली, आई बाबा जुने अल्बम काढून फोटो बघत बसले होते.
त्यात शंतनूचे अगदी लहानपणापासून चे फोटो होते. त्यात खूप आठवणी निघाल्या. खूप वेळ
गप्पा रंगल्या. वेळ कसा गेला समजलंच नाही. शंतनूच्या वाढदिवसाचा एक फोटो प्रियाने
हातात घेतला आणि तिला अचानक आठवलं ती प्रज्ञाला म्हणाली, “अगं आई बाबाचा वाढदिवस आहे ना पूढच्या
महिन्यात, बाबा घरी येईल का तो पर्यंत? आपण मस्त सेलिब्रेशन करू.” प्रज्ञालाच काही
नक्की माहिती नव्हतं, शंतनू नक्की घरी
कधी येणार आहे ते. “अरेवा प्रिया, तुझ्या लक्षात आहे, मस्त हं आपण करूया नक्की सेलिब्रेशन.” मुलींनी
उड्याच मारायला सुरुवात केली. प्रज्ञाही
त्यांच्याकडे बघून आनंदून गेली. तिलाही वाटलं की, शंतनू घरीच यावा तोपर्यंत. फार दिवस राहिले नव्हते अगदी दहा बारा दिवसच
राहिले होते. प्रज्ञा म्हणाली “मी आता उद्या जाणारच आहे बाबाकडे तेंव्हा
डॉक्टरांना विचारते काय म्हणतात ते.” असा संवाद होऊन सगळे झोपायला गेले.
इकडे शंतनू मध्ये प्रोग्रेस होती पण, जितक्या वेगाने ती
हवी होती तेवढी नक्कीच नव्हती. तो त्याचा भूतकाळ विसरत चालला होता. एवढी जीव
लावणारी मित्रमंडळी, ऑफिस स्टाफ, नातेवाईक सगळ्यांचे चेहरे पुसट होत चालले होते.
त्याचं ध्येयच त्याला कळत नव्हतं. त्याला नेमकं motive लक्षातच येत नव्हतं.
दुसऱ्या दिवशी प्रज्ञा ठरवल्याप्रमाणे संस्थेत शंतनूला भेटायला आली. तसं
प्रत्येक भेटीत थोडी थोडी सुधारणा नक्कीच जाणवत होती. शंतनूशी बोलणं झाल्यावर
प्रज्ञा डॉक्टरांना भेटायला त्यांच्या केबिन मध्ये गेली.
“hello डॉक्टर”
“hi प्रज्ञा”, कशी आहेस?”
“मी ठीक आहे, शंतनू कसा आहे?”
“अगं छानच प्रोग्रेस आहे, फक्त थोडा कमी
पडतोय. त्याला खरं तर एका सकारात्मक स्ट्रोक ची गरज आहे जो त्याला खूप happiness देऊन जाईल आणि पुन्हा नवीन दृष्टीकोन घेऊन तो
आयुष्याकडे बघायला लागेल. एखादी अशी गोष्टं समोर दिसायला पाहिजे की, जी बघितल्यावर ती मिळवण्यासाठी तो खूप प्रयत्न
करेल.”
प्रज्ञा विचार करत होती काय करता येईल.
“प्रज्ञा मला सांग, त्याला सगळ्यात
जास्ती काय आवडतं?”
“खरं तर त्याचा आनंद म्हणजे, त्याने कमावलेली
माणसं आणि घर हाच आहे.”
“असं काहीतरी करायला हवं की, घरचे सगळे त्याला एकत्र भेटायला येतील”
प्रज्ञा म्हणाली, “खरं तर शंतनूचा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात.
मी तेच विचारण्यासाठी आले होते की, शंतनू कधीपर्यंत
घरी येईल? मुली तयारीलाही लागल्या आहेत.”
“नाही ग प्रज्ञा, अजून थोडा वेळ तरी आहे
त्याला.”
प्रज्ञा नाराज झाली, तिचा स्वर काळजीत बदलला. अजून किती दिवस? ह्या प्रश्नाने पून्हा तिच्या मनात चलबिचल होऊ
लागली.
“अगं प्रज्ञा काळजी करू नकोस शंतनू मध्ये खूप चांगले बदल झाले आहेत. फक्त तो
पूर्णपणे ठीक आहे असं म्हणण्याच्या थोडासा मागे आहे, इतकंच.”
“नक्की ना डॉक्टर?”
“Yess, नक्की”
“
मग ठीक आहे, मी समजावेल मुलींना.”
“तुम्ही जे मला विचारलं त्यावर विचार करून कळवते तुम्हाला.”
“ओके”
असा संवाद होऊन प्रज्ञा उठली आणि दार उघडून बाहेर पडणार तेवढ्यात डॉक्टरांनाच
एकदम सुचलं, ”अगं नाहीतर माझ्याकडे एक छान idea आहे. संस्थेचा मोठा hall आहे, तिथे आमचेच काही
सहकारी मदतीला असतील तिथे तुम्ही शंतनूचा वाढदिवस साजरा करू शकतात. वीस तीस
माणसांना आरामात बोलावू शकतेस तू. शंतनू चा वाढदिवसही होईल आणि आपला हेतूही साध्य
होईल.”
हे ऐकून प्रज्ञाला काय म्हणावे ते समजेचना तिला खूप आनंद झाला. मुलींचा आनंदी
चेहरा तिच्या डोळ्यासमोर झळकून गेला. मुलींना तसाही बाबा कमीच भेटला होता. एका
बाजूला शंतनू अजून घरी येऊ शकणार नाही ह्यामुळे वाईट देखील वाटत होतं पण, हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करता येणार
म्हणून आनंदही झाला होता.
“thank you डॉक्टर, आम्ही नक्की वाढदिवस साजरा करू, खरच thanks alot”
त्या क्षणापासून प्रज्ञा वाढदिवसाचाच
विचार करू लागली. प्रज्ञा घरी पोहोचली
“ये ...आपण वाढदिवस साजरा करणार.”
असं प्रज्ञा ओरडतच घरात घुसली. सगळेच तिच्याकडे धावत आले. तिच्या चेहऱ्यावरचा
आनंद पाहून सगळ्यांना असच वाटलं की, शंतनू बहुतेक घरी
येणार वाटतं. आई बाबांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. देवाला हात जोडले. “देवापुढे
साखर ठेऊन येते हं,” असं म्हणून आई घाई
घाईने किचन मध्ये गेल्या. प्रज्ञा सेलिब्रेशन बद्दल बोलू लागली. कोणा कोणाला
बोलवायचं? काय काय गिफ्ट्स आणायचे? खायला काय काय करायचं? असं सगळंच सगळे ठरवायला लागले.
बोलता बोलता प्रज्ञा म्हणाली, “फक्त पत्ता
सांगताना जरा कसंतरी वाटेल पण ठीक आहे शंतनू साठी एवढं तर करावंच लागेल.”
“म्हणजे?” आई म्हणाल्या.
“अहो आई, शंतनूचा वाढदिवस आपल्याला तिथे जाऊन साजरा करता
येणार आहे. आपण पंचवीस ते तीस माणसांना बोलावू शकतो.”
सगळ्यांचं हसू, आनंद एका क्षणात
ओसरलं.
“म्हणजे शंतनू घरी नाही येणार?”
“अजून तरी नाही म्हणाल्या डॉक्टर, पण लवकरच तो येऊ
शकेल असंही त्या म्हणाल्या.”
“तसं तर त्या पहिल्या दिवसापासून म्हणत आहेत.” आईंच्या डोळ्यात पाणी तरळले. मुली
देखील खूप नाराज झाल्या. बाबांनी मात्र आपला आवंढा गिळला. ते पुन्हा वाढदिवसाच्या
विषयाकडे वळले.
“आई, डॉक्टर म्हणाल्या की, ह्या एका गोष्टीनंतर शंतनू अगदी बरा होईल.
ह्यामुळे त्याला खूप आनंद मिळेल. त्याने सगळ्यांना, आपल्या माणसांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं
त्यामुळे त्याला स्वतःच जग सापडेल. नवीन दृष्टीकोन मिळेल, ध्येय सापडेल असं डॉक्टरांचं मत आहे.”
खरं तर सगळेच पहिल्यांदा नाराज झाले पण, दुसऱ्या क्षणी
बाबाला खूप आनंद मिळेल ह्या एका वाक्यामुळे सगळे पुन्हा खुश झाले. चेहऱ्यावरची
नाराजी पुसून सगळे सेलिब्रेशन साठी तयार झाले आणि, ठरलं तर मग, “बाबाचा जोरदार वाढदिवस करूया आपण” असं म्हणून
श्रेया आणि प्रिया दोघीही उड्या मारायला लागल्या.
वाढदिवसाची जोरदार तयारी सुरु झाली.
शंतनूच्या आवडी निवडी लक्षात घेऊन त्याप्रमाणेच सगळी खरेदी चालू होती. त्याच्या
आवडीच्या केकची order दिली. ऑफिस स्टाफ, मित्रमंडळी आणि घरचे काही अशी तीस जणांची लिस्ट
काढली. पत्ता सांगताना जरा वेगळं वाटत होतं प्रज्ञाला पण, जेंव्हा समोरून “हो हो नक्की येणार आमच्या
शंतनूसाठी” असं वाक्य ऐकल्यावर तिला आतून खूप positive वाटायचं. छान वाटायचं. बरेचसे गोड पदार्थ प्रज्ञा आणि आईने घरीच बनवले. काही
नातेवाईक आधीच घरी रहायला आले. जणू घरात दिवाळी असल्यासारखच वाटत होतं.
इकडे शंतनू ला देखील कल्पना दिली होती की, तुझा वाढदिवस साजरा करणार आहोत. तुझ्या ओळखीचे, घरचे सगळेच येणार आहेत. सुरुवातीला जेंव्हा शंतनूला हे सांगितले तेंव्हा तो
खूपच nervous झाला.
त्याला आनंद झालाच नाही उलट टेन्शनच आलं. तरी देखील प्रज्ञा आणि डॉक्टर त्याच्या
मनाची तयारी करून घेतच होते. एका आठवड्यावर वाढदिवस आला. अगदी घरातले चार माणसं
सोडली तर शंतनू कसा दिसत असेल? कसा वागत असेल? याचा अंदाज कोणालाच नव्हता. खरं तर सगळ्यांना
त्याची काळजी होतीच पण आता त्याला भेटण्याची त्यांची उत्सुकता खूप वाढली होती.
प्रज्ञाने शंतनूला लिस्ट वाचून दाखवली होती. प्रत्येक नाव उच्चारले की, सगळेच अनोळखी वाटत होते. त्याची द्विधा
मनस्थिती होत होती. मी काय करणार आहे नक्की कोणास ठाऊक? असे विचार त्याच्या मनात येत होते. कोणत्याच
मतावर तो ठाम होत नव्हता आणि खरं तर हीच शंतनूची खरी परिक्षा होती. हळू हळू तो कसा
बसा तयार होत होता. नकळत का असेना पण शंतनू सगळ्यांचा विचार करू लागला होता. खूप
चेहरे आठवण्याचा प्रयत्न करत होता. त्या चेहऱ्यांना नावं देण्याचा प्रयत्न करत
होता. जोड्या जुळवा-जुळव चालली होती. बरीचशी नावं आणि
चेहरे त्याला आठवलेही. जमेल मला, मी भेटेल सगळ्यांना.
असं स्वतःलाच समजावत शंतनू दिवस मोजत होता. खरं तर त्याला ह्या गोष्टीचं टेन्शन आलंच
होतं. खूप दिवसांनी एव्हढ्या लोकांमध्ये जाणं अशक्य वाटत होतं. तरी देखील तोही
प्रयत्न करत होता. कारण प्रज्ञावर त्याचा विश्वास होता. पण त्याचा स्वतःवरच
विश्वास नव्हता.
वाढदिवसाचा दिवस उगवला. सगळे सकाळपासूनच खूप उत्साहात होते. आज सगळ्यांना काय
करू नी, काय नको असं झालं होतं. प्रज्ञा, सिद्धार्थ, दिनेश, आत्येभाऊ समीर सगळे डेकोरेशन करण्यासाठी
संस्थेमध्ये सकाळीच गेले होते. तिथे त्यांनी त्याला आवडणाऱ्या फुलांच्या माळा
लावल्या. त्या सुवासाने सगळी मरगळ, सगळी निगेटिव्हिटी
निघून गेली. खूप फ्रेश आणि स्वच्छ वाटत होतं. लहानपणापासूनचे बरेचसे फोटो लावले.
आवडीच्या, अगदी मनाच्या जवळ असलेल्या काही वस्तू
आजूबाजूला मांडून ठेवल्या. मधे मधे आकाशी आणि पांढऱ्या रंगाचे फुगे लावले. दारात
गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या. शंतनूची गणपती बाप्पावर खूप श्रद्धा आहे. त्यामुळे
गणपती बाप्पाची घरीच असलेली आणि त्याची फेवरेट मुर्तीही प्रज्ञाने आणली होती.
शंतनूला आल्या आल्या लगेच ती दिसेल अशी ठेवली होती. डेकोरेशन पूर्ण केले आणि सगळे
पुन्हा घरी परतले.
घरी सगळे आवरून बसले होते. पाच कधी वाजतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. “बाबाला
आम्ही हे गिफ्ट देणार आई” असं म्हणून श्रेया आणि प्रिया ने एक फ्रेम प्रज्ञाच्या
हातात ठेवली. त्यांनी घरातच एक छान कोलाज फ्रेम बनवली होती, त्यात त्या दोघींचे आणि बाबाचे फोटो लावले
होते. प्रज्ञालाही ते बघून खूप कौतूक वाटलं आणि “खरच या आठवणी त्याच्यासाठी आत्ता
खूप महत्वाच्या आहेत.” असं ती त्या कोलाज वरून हात फिरवत म्हणाली. प्रज्ञानेही
स्वतः एक ग्रीटिंग तयार केले होते. त्यावर एक पेंटिंग आणि एक कविता लिहिली होती. शंतनूला वाढदिवसाबद्दल आधीच कल्पना दिली होती
तरी त्याची अगदी शेवट पर्यंत मनाची तयारी करून घेणे गरजेचेच होते. प्रज्ञा स्वतःचं
आवरून पुढे गेली. शंतनूचा आवडीचा शर्ट प्रज्ञाने बरोबर घेतला होता, ज्या शर्ट शी खूप आनंदाचे क्षण जोडले गले होते.
प्रज्ञा शंतनूशी मोकळेपणाने बोलता बोलता त्याला आवरण्यात मदत करत होती. घरी कोण
कोण आलंय, कोण इथे येणार आहे. सगळे येण्याच्या आधी काय
काय म्हणाले? हे सगळं ती शंतनूला सांगत होती. शंतनूची मनाची
तयारी खरं तर झाल्यासारखी वाटत होती. तो तयारही झाला होता. आवरून खुर्चीवर बसला
होता. हात चोळत होता, पाय हलवत होता, ऊठून परत तिथेच बसत होता. त्याला तसं टेन्शनच
आलं होतं. प्रज्ञा त्याला खूप समजावून सांगत होती त्याला धीर देत होती. शंतनू
नक्की खुश होईल याची तिला खात्री होती.
ह्या सगळ्या आवरण्यात आणि बोलण्यात
प्रज्ञाने आणलेलं गिफ्ट आणि ग्रिटिंग द्यायचं राहूनच गेलं. तिला अचानक आठवलं तशी
ती घाई घाई उठली आणि शंतनूला एक घट्ट मिठी मारून ते त्याच्या हातात दिलं. “happy birthday dear” असं म्हणाली आणि, नेमका त्याच वेळी पाच वाजल्याचा अलार्म झाला.
तेवढ्यात घरचे सगळे संस्थेमध्ये आले. आई-बाबा, मुली शंतनूला भेटायला आत आले. प्रज्ञाने दिलेले गिफ्ट आणि ग्रिटिंग न बघताच
नकळत टेबलावर ठेवले गेले. त्यांना सगळ्यांना बघून शंतनूला खूप आनंद झाला. त्याने
मुलींना कडकडून मिठी मारली. आई बाबांना नमस्कार केला. हा त्याच्यातला बदल बघून
सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. हॉल मध्ये देखील गर्दी झाली. सगळे पोहोचले होते.
शंतनूला कधी बघू असे सगळ्यांनाच झालं होते. पुन्हा एकदा आधीचा शंतनूच बघायचा आहे असंच
सगळ्याचं मन म्हणत होतं आणि नजरा त्याच्या वाटेकडेच लागल्या होत्या.
शंतनू आणि सगळे रूम मधून बाहेर पडले. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही एक प्रकारचे
समाधान होते. हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून सगळे चालत होते. तसं तसं शंतनूच्या मनातली
घालमेल वाढायला लागली, त्याला टेन्शन
यायला लागलं. आपण कुठे आहोत आणि आता सगळ्यांसमोर इथे असा ह्या अवस्थेत जावं लागणार
ह्याचं त्याला वाईट वाटायला लागलं. नकारात्मक विचार जोर धरू लागला आणि अचानक “नाही
जमणार मला बहुतेक” असं म्हणून चालता चालता तो मागे वळला आणि पळत पळत पुन्हा आपल्या
रुममध्ये निघून गेला. रुमचं दार आतून लाऊन घेतलं. सगळ्यांनाच धक्का बसला हा असा का
पळत गेला?
“अरे शंतनू काय झालं? अरे ऐक शंतनू, प्लीज थांब” असं म्हणत म्हणत प्रज्ञा मागे पळत
गेली. रूमपर्यंत पोहचे पर्यंत त्याने दार बंद केले होते. दारावर थाप मारत मारत ती
त्याला म्हणाली,
“शंतनू तूला जमतंय सगळं, तू काळजी नको करूस, सगळे आपलेच आहेत.”
“नाही नाही प्रज्ञा मला नाही जमणार, मी नाही येऊ शकत
प्रज्ञा”. शंतनू आतूनच बोलत होता. कानावर आणि डोक्यावर हात ठेवत तो नाही नाही असंच
म्हणत होता.
“प्लीज शंतनू चल ना सगळे तुझी वाट बघत आहेत फक्त आणि फक्त तुझ्यासाठी तुला
भेटण्यासाठी सगळे एका फोनवर तयार झाले इथे यायला. प्लीज शंतनू चल ना रे”
प्रज्ञाने शंतनूला खूप समजावून सांगितले. शंतनू काही केल्या तयारच होत नव्हता.
प्रज्ञा हरली ती दारावर थाप मारता मारता
दाराला पाठ लावून रडत रडतच खाली बसली “प्लीज ना रे, मी आहे तुझ्या बरोबर. ये ना रे, बाहेर. दार तरी
उघड.”
आता मात्र प्रज्ञाची थोडी चीड चीड झाली. तिच्या सगळ्याच भावना एकत्र झाल्या
होत्या. त्या क्षणी प्रज्ञाला पहिल्यांदाच
हतबल झाल्यासारखं वाटलं.
“जाऊदे काहीच होऊ शकणार नाही, काहीच नाही.” तीला
पुढची काळजी वाटत होती. कारण डॉक्टर म्हणाल्या होत्या की, ह्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत.
असं म्हणून शेवटी प्रज्ञा रडत रडत जरा चिडूनच निघून गेली. इकडे आई बाबा
मुलींना समजावत होते. प्रज्ञा बाहेर पडल्यानंतर डॉक्टरांनी देखील शंतनूला कन्व्हेन्स करण्याचा खूप
प्रयत्न केला. काही केल्या शंतनू बाहेर आलाच नाही. प्रज्ञाने हॉल मध्ये येऊन सगळी
हकीगत सांगितली. सगळेच काळजीत पडले. बराच वेळ झाला अजूनही सगळे त्याच्या येण्याची
वाट बघत होतेच. शंतनू नेहमीसारखा गुलमोहराच्या झाडाकडे एकटक बघत शांतपणे उभा होता.
तो कशाचा विचार करत असेल असं अजिबात वाटत नव्हतं. त्याच्या डोळ्यातून पाणी येत
होते. खरं तर कोणालाही दुखवावं असा त्याचा हेतू अजीबात नव्हता पण, जे काही घडलं ते तो थांबवू शकला नाही. सगळं
बाजूला ठेऊन फक्त प्रज्ञाचा आत्ताचा आवाज त्याच्या कानात घुमत होता. त्याला तिला
भेटावसं वाटत होतं पण ओघानं हॉल वर जाणं आलंच असतं त्यामुळे तो तेही करू शकत
नव्हता. त्याला खरं तर काहीच सुधरत नव्हतं. काय करायचं पुढे याचा विचार त्याच्या
डोक्यात येतच नव्हता. गुलमोहराकडे पाहता पाहता त्याची नजर अचानक प्रज्ञाने
त्याच्यासाठी घेऊन आलेल्या ग्रिटिंग आणि गिफ्ट कडे गेली. तो घाई घाईने टेबल जवळ
गेला. त्याने गिफ्ट उघडून बघितले आणि अचानक प्रज्ञाने त्याला मागून मिठी मारली असं
जाणवलं. त्याने डोळे बंद केले. त्याला प्रज्ञाची आणि त्याची पहिली भेट आठवली. तो
मनातल्या मनात हरवून गेला. पाऊस पडत होता. सुंदर आकाशी रंगाचा सिल्क चा long frock तिने घातला होता.
त्यावर थोडीशी हील असलेला पांढऱ्या रंगाचा Sandal घातला होता आणि, खांद्याला पांढऱ्या सोनरी रंगाची पर्स अडकवलेली
होती. त्यावेळेसच्या परफ्युमचा सुवास आत्ता अचानक मला जाणवला. केसाला एका बाजूला क्लिप लावून बाकी केस मोकळे सोडल होते.
हातात खड्याचं ब्रेसलेट घातलं होतं. गळा
रिकामाच होता जणू तिला समजलंच होतं की, मी तिला नेकलेस
गिफ्ट देणार होतो. तिने माझ्यासाठी गुलाबी सेंटेड पेपर मध्ये गिफ्ट packing करून आणलं होतं. एक branded silver रंगाचा बेल्ट आणि
डार्क ब्लू रंगाची डायल असलेलं घड्याळ तिने माझ्यासाठी आणलं होतं. ते मी खूप वर्ष वापरलं.
रोज ऑफिसला जाताना ते प्रज्ञा हातात देत तेंव्हा तेंव्हा ती पहिली भेट आठवायची मला.
आणि रोज नव्याने प्रेमात पडायचो तिच्या. एक दिवस अचानक माझ्याकडूनच ते घड्याळ
कुठेतरी हरवलं. तरी देखील ती आठवण तशीच रहावी म्हणून आम्ही रोज तेच घड्याळ हातात
घालतोय अशी एक्टिंग करायचो आणि, प्रज्ञा तेंव्हा तेंव्हा तशीच लाजायची. शंतनूच्या खूप आठवणी जाग्या झाल्या.
तो मनाशीच हसला, त्याने डोळे उघडले. बॉक्स मधून घड्याळ काढले
आणि हातात घातले. त्याला खूप मोकळं आणि छान वाटलं. तो शेजारीच ठेवलेलं ग्रिटिंग
उचलून बघायला लागला. त्यावर प्रज्ञाने काढलेले सुंदर पेंटिंग आणि तिनेच केलेली एक
छानशी कविता त्याला दिसली. त्याचे पाणावलेले डोळे तिचे शब्द खूप मनापासून वाचत
होते.....
मेघ सावळा अवखळ साथी
धुक्यासारखी मखमल हाती,
मृगजळासारखे दुःख क्षणिक
तार्यांसारखे सुख
अगणित....
उमलून घे नव्या क्षणी
नको उदास राहूस मनी,
मोहरून जा, जग आता भरभरून
स्वतःला पुन्हा अनुभव जवळून....
साथ घे, विश्वास दे,
नात्यांचीही जाण घे,
कर्तव्याचे भान ठेउनी
प्रेमाचा आधार घे....
ओंजळीत घे अलगद
आयुष्याचा पसारा,
क्षणा क्षणातला आनंद अन
मोत्यांसारखा थेंब टपोरा....
जिथे तू, तिथे मी,
तुझ्या पावलांवर माझे पाऊल,
प्रेम माझे तुझ्याचसाठी
अन तुझ्या प्रेमाची लागलीये चाहूल....
पूर्ण होतील आपल्या इच्छा
ह्याच माझ्या सदिच्छा,
पूर्ण करूया स्वप्न अपुली
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा....
शंतनू आम्ही सगळे तुझी खूप वाट बघतोय प्लीज लवकर घरी ये. प्रत्येक क्षणा
क्षणाला तुझी आठवण येते आम्हाला. माझ्या जगण्यासाठी तू खूप मोठ्ठं कारण आहे. तुझ्याशिवाय
नाही जगू शकत मी. ये ना लवकर घरी....i love you.....
शंतनूने हे सगळं वाचलं आणि त्याच्या डोळ्यातून घळा घळा पाणी वहायला लागलं.
सगळ्यांचेच चेहरे डोळ्यासमोरून जायला लागले. घर, घरातले सगळे, घरासमोरची बाग, गाडी, ऑफिस सगळं सगळं
अगदी लख्ख समोर दिसायला लागलं.
अस्मिता कुलकर्णी